Thursday, November 03, 2016

असं एखादं पाखरू वाह्यात - शिवाय (Movie Review - Shivaay)

प्रास्ताविक वगैरे काही नाही. डायरेक्ट सुरूच करतो, कारण बिनडोकपणाचं वर्णन करायला कसलं प्रास्ताविक वगैरे करणार !

तर सिनेमा सुरु होतो जोरजोराच्या उच्छ्वासांनी. दम लागलेला नरपुंगव आहे आपला एक 'A' वगळलेला अजय देवग्न. इतस्तत: विखुरलेल्या बर्फात निपचित पडलेल्या माणसांकडे एक कटाक्ष टाकून तो नजर सर्वत्र फिरवतो, त्याला एक लोकरीची छोटीशी बाहुली दिसते. तिला हातात घेऊन तो जमिनीवर बद्दकन् सांडतो.
उच्छ्वास कंटिन्यूड..
विखुरलेलं बर्फ पडद्यावर उडतं आणि कहाणी ९ वर्षं मागे जाते आणि हजारो फूट उंचावरच्या अजून एका बर्फाळ भागात पोहोचते. जाडजूड जाकीटं, हातमोजे, कानटोप्या घातलेली मिलिटरीची ३-४ माणसं. पैकी एक जण जोरात हाक मारतो... 'शिवाssssय!'
कॅमेरा झरझर वर जात उंच, अतिशय उंच शिखरावर पोहोचतो. सर्वदूर पसरलेला अमर्याद बर्फ, त्या उंचीवरून दिसत असलेल्या बर्फाच्छादित शिखरांच्या अगणित रांगा वगैरे पडद्यावर पाहून आपल्याला कुडकुडायला लागतं. पण पाठीवर त्रिशूळ गोंदवलेला कुणी भोलेनाथाचा अवतार उघड्यानेच त्या बर्फावर पालथा निजलेला दिसतो. बहुतेक त्याचं हृदय लाकडी असावं. हजारो फूट खालून दिलेली हाक त्याच्यापर्यंत पोहोचते आणि गांजा मारुन भिर्र झालेला असतानाही तो जागा होतो आणि उघड्या शरीरावर एक जाकीट चढवतो, त्याची चेनही अर्धी उघडीच ठेवतो आणि कड्यावरून स्वत:ला झोकून देतो ! 'असं एखादं पाखरू वेल्हाळ ज्याला सामोरं येतया आभाळ' म्हणजे काय, तर हे. हातात दोन मोठे हूक आणि अर्धउघड्या जाकीटच्या मागे असलेला एक दोरखंड ह्यांच्या जोरावर तो नजर पोहोचणार नाही, अश्या उंचीवरून खाली टप्पे खात, स्लाईड करत, लटकत, उड्या मारत काही क्षणांतच खालपर्यंत पोहोचतो, तोपर्यंत त्याला हाक मारणाऱ्याने हाक मारताना तोंडापाशी नेलेला हातही खाली आलेला नसतो ! (च्यायला.. इथे दिवाळीचा कंदील लावून खाली उतरताना शिडीचा घोडा डुगडुगला तरी आमच्या छातीतले दोन-चार ठोके जमिनीवर पडतात. मीसुद्धा पाठीवर त्रिशूळ, दंडावर नागोबा, छातीवर केसांच्या जटा वगैरे गोंदवून घ्यायचं ठरवतो आहे. मग डायरेक्ट उंच उडी मारुन एका हाताने छताच्या हुकाला धरीन आणि दुसऱ्या हातातला कंदील लटकवून लगेच खाली उडी मारीन.) खाली पोहोचल्यावर मिलिटरीवाले त्या आईसप्रूफ वीराला, त्याने पुरवलेल्या अत्यंत महत्वाच्या बातमीसाठी धन्यवाद आणि कामाचा मोबदला म्हणून एक पाकिट देतात. 'ह्याचं नाव 'शिवाय' आहे आणि तो अचाट साहसी व शक्तिमान आहे', हे लोकांना समजावं इतकंच ह्या पहिल्या दोन-पाच मिनिटांचं महत्व आहे. पण प्रत्यक्षांत, 'पुढचा सिनेमा म्हणजे आचरटपणाचा पोटाला तडस लागेस्तोवर मिळणारा डोस आहे', हे त्यातून समजून येतं.
आचरटपणा कंटिन्यूड..
'शिवाय' (अजय देवग्न) हा उत्तराखंडातल्या कुठल्याश्या दुर्गम गावांत राहणारा एक साहसी गिर्यारोहक आणि धाडसी टूरीस्ट गाईड असतो. त्याने 'अपने आपको पाला हैं' असतं आणि अंगभर गोंदवलेलं असतं. गिर्यारोहणासाठी आलेली एक गोरी गोरी पान, फुलासारखी छान बल्गेरियन सुंदरी 'ओल्गा' (एरिका कार) आणि गावरान काटेरी वांग्यासारखा दिसणारा 'शिवाय' प्रेमात पडतात. ओल्गाला स्वगृही अनेक जबाबदाऱ्या असतात आणि आगा-पिच्छा काहीही नसतानाही 'शिवाय'ची स्वत:च्या प्रेमाखातर परदेशात स्थायिक होण्याची तयारी नसते (ब्लडी मेल शॉविनीस्ट!), त्यामुळे ते लग्न करत नाहीत. मात्र प्रेमापत्य होण्याची वेळ येतेच. 'मी ह्या बाळाची जबाबदारी घेईन' असं विनवून विनवून 'शिवाय' ओल्गाला बाळाला जन्म देण्यासाठी भाग पाडतो आणि 'गौरा' (एबिगेल इम्स) चा जन्म होतो. इंटरवलपर्यंत बाप आणि लेक, मुलीच्या जन्मानंतर लगेच बल्गेरियाला निघून गेलेल्या ओल्गाला भेटण्यासाठी बल्गेरियाला पोहोचतात आणि तिथे गौरा एका संकटात सापडते.

ह्याच्या पुढचा भाग फडतूस योगायोग, भंपक साहसदृश्यं, फुसकी रहस्यमयता, बोगस भावनिक नाट्ये वगैरेंनी माखलेला आहे. तर एकूणच चित्रपट बकवास अभिनय, फुटकळ संवाद, भंकस कथालेखन, फुळकट संगीत वगैरेंनी लडबडलेला आहे.



आपण लग्न करू शकत नाही, हे माहित असतानाही मूल होईल अशी परिस्थिती येऊ देणं व त्यानंतर तिची तयारी नसतानाही 'मी जबाबदारी घेईन' वगैरे बाता मारुन तिला मूल जन्माला घालायला भाग पाडणं आणि नंतर तिला खल-स्त्री ठरवणं की जणू तिला तिच्या बाळाविषयी कधी काही प्रेमच नव्हतं, हा सगळा दांभिकपणा असह्य आहे. पदोपदी, 'शिवाय'ला सिंगल पेरेंट म्हणून सहानुभूती देत झुकतं माप देणारी एककल्ली कथा म्हणूनच अजिबात पटत नाही.
९ वर्षांनंतर जेव्हा शिवाय-ओल्गा समोरासमोर येतात, तेव्हाचा त्यांचा ब्लेम-गेम आणि नंतरचा भावनिक आवेग इतका पोकळ आहे की ग्रेस मार्क देऊन पासही करावंसं वाटू नये. असे अनेक प्रसंग अतिशय ढिसाळ पद्धतीने चित्रित केल्याने वैतागाचा कडेलोट होऊन आपणही एखादा हूक आणि दोरखंड घेऊन कुठल्याश्या बर्फाळ शिखरावरून उडी मारावी की काय, असं वाटतं.

सहसा सिनेमातील बालकलाकार भाव खाऊन जात असतात. त्यांच्या अभिनयात आणि एकंदर वावरात बरंच काही कमी-जास्त असलं, तरी त्यांचा निरागसपणा सगळ्यावर मात करतो आणि ते आवडतातच. 'एबिगेल इम्स' आपला हा समज खोटा ठरवते. एक तर तिला मुकी दाखवण्यामागे 'हिंदी बोलायची गरजच पडणार नाही' ही सोय असण्याशिवाय इतर काहीही कारण नाही आणि तिला ते मुकेपण वेडेपण वाटलं असावं की काय, अशी ती काम करते. ती जशी मुकी न वाटता वेडीच वाटते, तशीच निरागस न वाटता नतद्रष्टच वाटते. खोडकर न वाटता, कार्टी वाटते आणि लोभस न वाटता असह्य वाटते.

सर्व भूमिका एकसारख्याच ढिसाळपणे लिहिलेल्या आहेत, ह्या कन्सिस्टन्सीबद्दल मात्र 'रॉबिन भट्ट' आणि 'संदीप श्रीवास्तव' ह्या लेखकाचं मनापासून अभिनंदन. ह्यांची आडनावं 'मठ्ठ' आणि 'अवास्तव' सुद्धा शोभतील, पण सध्या जी आहेत त्यातूनही उपरोधिक विनोदनिर्मिती चांगली होते आहे, त्यामुळे असोत.

१०५ कोटी खर्चून हा सिनेमा बनवला आहे. त्यापैकी काही कोटी तर बल्गेरियातल्या रस्त्यावरच्या गाड्या तोडण्या-फोडण्यातच लागले असावेत. गरीब बिच्चारा रोहित शेट्टी मोजक्या गाड्या उडवतो, तोडतो, फोडतो. इथे तर 'दिसली गाडी की फुटलीच पाहिजे' असा प्रकार चालू असतो. बोनेटवर बसून एका हातात गाडीचं स्टिअरिंग पकडून दुसऱ्या हाताने बाजूच्या गाडीमधल्याशी झटापट करतानाचं दृश्य पाहून तर डोळ्यांचं पारणं फिटावं !
अचाट साहसदृश्यांना जर तर्कसंगत कथा-पटकथा व तुल्यबळ अभिनयाची जोड असली, तर तितकीशी खटकत नाहीत. 'मिशन इम्पॉसिबल'सुद्धा पचवतोच की आम्ही ! पण त्यासाठी आवश्यक 'बॅलेन्सिंग अ‍ॅक्ट' कोण करणार ? नुसतंच 'टॉम क्रूझ'चं करपलेलं भारतीय व्हर्जन म्हणून एरव्ही कितीही आवडत असला तरी त्या देवग्नाला कसं सहन करायचं ? वांगं आवडतं म्हणून काय नुसतं खायचं होय ?

सणासुदीच्या दिवसांत एक अशक्य वाह्यात चित्रपट पाहिला आणि मनातल्या मनात त्याचं शीर्षक बदलून 'शिवाय' ऐवजी 'शिव्याय' केलं आहे. फॅन मंडळींना तर सगळंच आवडत असतं. त्यामुळे जर देवग्नफॅन असलात आणि ऑलरेडी पाहून झाला नसेल, तर नक्की पाहा. देव जसा 'यत्र तत्र सर्वत्र' आहे, तसाच 'देवग्न'ही चित्रपटात ठायी ठायी आहे. इथून पुढे 'खानावळी'ला स्वप्रेमाबद्दल नावं ठेवत असताना ह्या साळसूदपणाचा आव आणून दिवाळी खराब करणाऱ्या भरताच्या वांग्यालाही लक्षात ठेवा, म्हणजे झालं.

रेटिंग - *

- रणजित पराडकर

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...