Saturday, June 18, 2016

निवडक वास्तवाचं प्रभावी सादरीकरण - 'उडता पंजाब' (Movie Review - Udta Punjab)

राजकीय नेते, उच्चपदस्थ पोलीस, सरकारी अधिकारी, समाजातील इतर काही बडी धेंडं वगैरेंच्या आशीर्वाद व सहभागाने चाललेला ड्रग्सचा बेकायदेशीर व्यापार, त्याच्या आहारी गेलेली एक तरुण पिढी, ह्या सगळ्याविरुद्ध एखाद्या तत्वनिष्ठ सामान्य व्यक्तीचं किंवा व्यक्तींचं उभं राहणं, कुणी सुधारणं, कुणी बरबाद होणं कुणी संपणं असं सगळं कथानक आपण ह्यापूर्वीही अनेक सिनेमांत पाहिलं आहे. 'उडता पंजाब'चं कथानक ह्याहून वेगळं असं काही सांगत नाही.
पण फरक आहे.

विशाल भारद्वाजसोबत अनेक सिनेमांवर दिग्दर्शन व लेखणासाठी काम केल्यावर दिग्दर्शक म्हणून अभिशेष चौबेने इश्क़िया आणि डेढ इश्क़िया हे दोन वेगळ्याच धाटणीचे जबरदस्त सिनेमे केले आणि त्यानंतर आता 'उडता पंजाब'. ही ड्रग्सच्या बोकाळलेल्या व्यापाराची ह्याआधीही सांगून झालेली कहाणी चौबे स्वत:च्या शैलीत सांगतात. ह्या सादरीकरणात कुठलेही अशक्य योगायोग, अचाट शक्तीप्रदर्शनं आणि इतर 'अ व अ' गोष्टींना बिलकुल स्थान नाही. नाही म्हणायला जेव्हा काही पात्रांचं मनपरिवर्तन होतं, तेव्हा ते जरा अतिसहज, अतिसुलभ वगैरे वाटतं. पण नंतर हळूहळू त्यांच्यातला तो बदल जस्टीफाय होत जातो. कहाणी वास्तवाशी फटकून वागणार नाही, ह्याची पुरेपूर खरबरदारी घेतलेली जाणवते.
पण म्हणून ह्याला 'वास्तववादी' म्हणता येईल का ? - असा 'सैराट'ने पाडलेला प्रश्न मला परत पडला.

एक कथानक ज्याला वास्तवाची जोड आहे, ते वास्तववादीच असतं का ? नक्कीच नाही. आज पंजाबची जी अवस्था आहे, ती ह्याहून खूप भयंकर आहे. ड्रग्समुळे कुटुंबंच्या कुटुंबं उध्वस्त झाली आहेत. किरकोळ १२००-१५०० च्या लोकसंख्येच्या गावांतही लाखो रुपयांचे ड्रग्स नियमित विकले जात आहेत. काही हजार कोटींची उलाढाल हा धंदा करतो आहे. 'मकबूलपुरा' सारखी गावं 'विधवांची गावं' बनली आहेत. कित्येक तरुण मुलं, घरातली करती पुरुषमंडळी ड्रग्सच्या विळख्यात येऊन संपली आहेत. फक्त पुरुषच नव्हे तर स्त्रियांतही ड्रग्सचं प्रमाण प्रचंड आहे. किती तरी ठिकाणी सर्व कुटुंबीय एकत्र मिळून हा आहार करत आहेत ! बहुतांश तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी गेलेली आहे. 'पंजाब'चं जे 'सुजलाम सुफलाम' चित्र आपल्यासमोर वर्षानुवर्षं आहे, ते झपाट्याने बदलत चाललं आहे.
ही सगळी अत्यंत चिंताजनक परिस्थिती 'उडता पंजाब'मध्ये व्यवस्थित सादर केली गेलेली नाही. इथे फक्त ड्रग्सचं एक भलंमोठं रॅकेट चालवणारे राजकीय नेते, त्यांच्या व्यवसायात सहभागी भ्रष्ट सरकारी अधिकारी आणि आहारी गेलेली तरुण व अल्पवयीन पिढी इतकंच चित्र दिसतं. प्रत्यक्षात ही वाळवी फक्त एखाद-दुसरी पिढीच पोखरत नसून तिने एक संपूर्ण समाज पोखरायला घेतलेला आहे. ज्याला वय, ऐपत, लिंग, शिक्षण वगैरे असे कुठलेच अडसर नाहीत. इतकी व्यापकता 'उडता पंजाब'च्या कथानकात दिसून येत नसली, तरी असलेले कथानक अस्वस्थ करणारे नक्कीच आहे.

ही कहाणी असिस्टन्ट सब-इन्स्पेक्टर सरताज सिंग (दिलजित दोसांझ), डॉक्टर प्रीती साहनी (करीना कपूर), रॅपर टॉमी सिंग (शाहीद कपूर) आणि एक गरीब मुलगी जिचं नाव उघड होतच नाही (आलिया भट्ट) ह्यांची आहे. सरताज आणि डॉ. प्रीती ह्यांची कहाणी एकत्र सुरु आहे तर टॉमी आणि 'ए.ग.मु.' च्या कहाण्या स्वतंत्र सुरु आहेत. पण पुढे जाऊन ह्या तीन कहाण्या एकत्र येतात आणि तिन्हींचा शेवटही एकत्रच होतो. सरताज भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग आहे, प्रीती व्यसनाधीन व्यक्तींना मदत करणारी एक कार्यकर्ती आहे, व्यसनाधीन तरुण पिढीचा 'टॉमी सिंग' हा आदर्श आहे आणि 'ए.ग.मु.' अपघाताने ह्या सगळ्या व्यापारात ओढली जाऊन भरडली जात आहे.


एका राजकीय नेत्याने चालवलेला हा कारभार असला, तरी त्याला एक-दोनदा नुसता चेहरा दाखवण्याशिवाय फारसं काम नाही आणि इतर लोक तर त्याची प्यादी म्हणूनच आहेत. हा लढा कुणा व्यक्तीविरोधात नसून, एका व्यवस्थेविरोधात आहे आणि व्यवस्थेला चेहरा नसतो. म्हणूनच ह्या कहाणीतल्या खलप्रवृत्तीला एरव्हीप्रमाणे ठसठशीत चेहरा-मोहरा नाही.

दिलजित दोसांझ हिंदी सिनेमात अभिनेता म्हणून प्रथमच झळकतो. एक पूर्ण लांबीची मुख्य व्यक्तिरेखा साकारताना तो कुठेच कमी पडत नाही. करीनासारख्या 'सीझन्ड' अभिनेत्रीसमोरही तो टीकाच आश्वासक वाटतो. 'आप इतना.. परफेक्ट हो.. की..... टाटा !' असं अर्धवट वाक्य बोलतानाचा सरताज खूपच आपलासा वाटतो. करीना काही ग्रेट अभिनेत्री वगैरे नाही, पण तिची डॉ. प्रीती साहनीसुद्धा लक्षणीय आहे. बऱ्याचदा असते, तशी ओव्हर अ‍ॅक्टिंग तिच्याकडून झालेली नाही. 'चंदिगढला गेल्यावर सीसीडीमध्ये जाऊ या' असं ती जेव्हा म्हणते, तेव्हा मनात नकळतच कालवाकालव होते.
शाहीदचा ड्रग अ‍ॅडिक्ट टॉमी जबरदस्त झाला आहे ! गेल्या काही वर्षांत एक अभिनेता म्हणून शाहीद कपूरने खूप प्रभावित केलं आहे. सणकी व थोडासा सटकलेला टॉमी भरपूर धमाल करतो.
मात्र सगळ्यात दमदार आहे आलिया भट्ट. ह्या भूमिकेसाठी तिला कळकट दिसणं खूप गरजेचं होतं. मुळात अत्यंत गोड चेहरा असताना असा कळकटपणा वागवणं, खूप कठीण असावं. मेक अपमुळे एखादा 'लूक' येईल पण तो 'लूक' खरा वाटावा ही जबाबदारी तर तिचीच ना ? तिचा निर्दोष निरागसपणा रगडला आणि भरडला जात असताना आपल्यालाच असह्य होतं. त्यातून येणारा बंडखोर संताप व त्या संतापाचे होणारे उद्रेक तिने ताकदीने सादर केले आहेत.

अमित त्रिवेदीचं संगीत सिनेमाला साजेसं आहे. 'इक कुडी' मध्ये टिपिकल अमित त्रिवेदी स्टाईल मेलडी आहे. इतर गाणी बेतास बात आहेत.

अर्ध्याहून अधिक सिनेमा पंजाबीत आहे. त्याला 'हिंदी सिनेमा' म्हणावं का, असाही एक प्रश्न आहे. हे ठरवण्याचे मापदंड काय असतात किंवा असतात तरी का, समजत नाही. माझ्या मते तरी हा एक पंजाबी सिनेमा आहे, हिंदी नाही. कारण ह्याच न्यायाने 'फोबिया' इंग्रजी सिनेमा होऊ शकतो. 'वेटिंग' तर नक्कीच इंग्रजी समजायला हरकत नाही.

सेन्सॉरशिपमुळे 'उडता पंजाब' ने बरंच वादंग माजवलं आहे. ह्या प्रसिद्धीचा उपयोग चित्रपटाला होणार आहे. एरव्ही ह्याहून जास्त भडक वास्तवदर्शन करणारे गँग ऑफ वासेपूर सारखे चित्रपट शांतपणे आले आणि माफक यश मिळवून गेले. 'उ.पं.' मध्ये धक्कादायक असं काहीच चित्रण नाही. किंबहुना, जितकं वास्तव त्याने दाखवायला हवं होतं तितकं दाखवलेलंच नाही, असंच मला वाटलं.

मात्र, 'वास्तवदर्शन' किंवा 'वास्तववाद' हा काही चांगल्या चित्रपटाचा एकमेव निकष होऊ शकत नाही. उत्कृष्ट अभिनय, परिणामकारक हाताळणी, अर्थपूर्ण लेखन, श्रवणीय संगीत, उत्तम तांत्रिक मूल्ये वगैरे अनेक निकष असू शकतात आणि त्या सर्वांचा एकत्रित विचार केल्यास 'उ.पं.' एक लक्षवेधी सिनेमा ठरतो.

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर

1 comment:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...