Monday, February 29, 2016

प्रभावी सत्यकथन - 'अलिगढ़' (Movie Review - Aligarh)

'अलिगढ़'.
सत्यघटनेवर आधारित अजून एक चित्रपट. पण हा वेगळा आहे. कारण ही घटना काही माध्यमांचा टीआरपी वाढवणारी नव्हती किंवा ह्यात एखादा लोकप्रिय चित्रपट बनेल असा मालमसालाही नव्हता. किंबहुना, ही जी घटना आहे किंवा हा जो विषय आहे, तो आपल्याकडेच नव्हे तर जगाच्या बहुतांश भागात अस्पर्श्य, निषिद्ध आहे. 'समलिंगी संबंध'. ह्यावर बोलायचीही बहुतेकांची इच्छा नसते. ही एक अमानवी विकृती आहे, हे आपल्या मनावर कोरलं गेलेलं आहे. भारतीय संविधानानुसार समलिंगी संबंधांना 'गुन्हा' मानलं गेलं आहे. २००९ साली त्यात एक अमेंडमेंट झाली आणि 'समलैंगिक संबंध असणे हा गुन्हा नाही' असं ठरवलं गेलं. मात्र पुन्हा एकदा २०१३ साली त्याला गुन्हा ठरवलं गेलं. आजच्या घडीस समलैंगिक संबंध हे गुन्हाच आहेत.


'अलिगढ़' ही कहाणी आहे 'डॉ. श्रीनिवास रामचंद्र सिरस' ह्यांची. डॉ. सिरस अलिगढ़ विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक होते. २००९ साली विद्यापीठानेच करवून आणलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये डॉ. सिरस त्यांच्या राहत्या घरात एका व्यक्तीसह समलिंगी संबंध साधत असताना त्यांना व्हिडीओ शूट करण्यात आलं. ह्यानंतर तडकाफडकी त्यांना विद्यापीठाने निलंबित केलं आणि कालांतराने त्या निलंबनाविरुद्ध डॉ. सिरस कोर्टात गेले व केस जिंकलेही. मात्र काही दिवसांतच त्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला. ह्या मृत्यूमागेही अलिगढ विद्यापीठातील काही लोकांचा तसेच, डॉ. सिरस ह्यांची व्हिडीओग्राफी करणाऱ्या पत्रकारांचा हात असल्याचा संशय वर्तवला गेला होता. पण तशी केस दाखल होऊनही, पोलिसांना पुरावा न मिळाल्याने ती रद्द ठरली. डॉ. सिरस ह्यांचा मृत्यू आत्महत्या मानला जातो, तरी त्या मागचं गूढ उकललं गेलेलं नाहीच.
सिरस ह्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक तरुण पत्रकार दीपू सबॅस्टियनने खूप मदत केली होती. डॉ. सिरस दोषमुक्त तर झाले, पण वाचले मात्र नाहीत.

ही सगळी कहाणी चित्रपटात येते. ह्यात लपवण्यासारखं काही नाही कारण हे सारं कथानक विविध ठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध आहेच. पण मग जर हे सगळ्यांना माहित आहे, ज्यांना माहित नाही त्यांना वाचण्यासाठी उपलब्धही आहे, तर चित्रपट का पाहायचा ?
कुणी म्हणेल मनोज वाजपेयीसाठी, कुणी म्हणेल हंसल मेहतासाठी.
माझ्या मते एक चित्रपट ज्या ज्या घटकांमुळे बनतो, त्या प्रत्येक घटकासाठी 'अलिगढ़' पाहायला हवा. दिग्दर्शन, अभिनय, कथानक, पटकथा, संकलन, छायाचित्रण, संशोधन, असा प्रत्येक घटक. इथला संथ फिरणारा किंवा काही वेळा एकाच जागी मठ्ठासारखा बसून राहिलेला कॅमेरा, हळूहळू पुढे सरकणारं कथानक 'कोर्ट'सारखा अंत पाहत नाहीत. कथानक तयार उपलब्ध होतं. पण पटकथेसाठी व संशोधनासाठी केलेलं काम जाणवतं. कोर्टात चाललेल्या खटल्यापासूनच सुरुवात करून 'फ्लॅशबॅक' तंत्राचा उपयोग करून चित्रपट अधिक नाट्यमय बनवता आला असता, पण ते न करण्याचा संयम दाखवला गेला आहे. समलिंगी व्यक्तीची देहबोली, त्याची मानसिकता, ह्याचा व्यवस्थित अभ्यास करुन जीवनशैली, आवड-निवड, वागण्या-बोलण्याची ढब ठरवली गेलेली आहे. कुठल्याही प्रकारचं बालिश, उथळ समर्थन देण्याचा हास्यास्पद प्रयत्नसुद्धा कुठे केला गेलेला नाही. सगळा भर जे आहे, जसं आहे ते व तसं दाखवण्यावर राहिलेला आहे.


डॉ. सिरसच्या भूमिकेत मनोज वाजपेयीने एक महान कामगिरी केली आहे. ह्या कामासाठी अप्रतिम, जबरदस्त, कमाल वगैरे नेहमीची विशेषणं थिटी आहेत. 'डॉ. सिरस' ही व्यक्तिरेखा काव्यात्मक आहे. काव्य आवडेल किंवा नावडेल, पण ते चूक किंवा बरोबर असत नाही. त्यात असलेल्या गुंतागुंतीला गूढता म्हणतात, अनाकलनीयता नाही. सिरस समजून घेण्याला कठीण आहे कारण ते कुठलं बाळबोध गद्य नाही. ते काव्य आहे. काव्य समजून घेणं म्हणजे एखाद्या अज्ञात अथांग डोहाच्या तळाशी जाणं. ह्यात धोका आहे, काहीच न मिळण्याचा किंवा काही तरी धक्कादायक सापडण्याचा किंवा हरवून जाण्याचाही. मनोज वाजपेयी 'सिरस' नावाच्या काव्यात्मक व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरून तळाचा ठाव घेऊन परत येतो आणि ह्या शोधमोहिमेत त्याला काय सापडलं ते पडद्यावर विलक्षण ताकदीने सादर करतो. अंगावर संकटांमागून संकटं चाल करून येत असताना, समजून घेणारं, धीर देणारं असं कुणीही जवळचं माणूस नसतानाही डॉ. सिरस ह्यांची सूचक विनोदबुद्धी अत्यंत गंभीर विषयाला सादर करताना गांभीर्याचा समतोल ढळू देत नाही. ह्या मागे मनोज वाजपेयीचा संयत अभिनय आणि अप्रतिम देहबोली आहे. 'ळ' चा उच्चार आणि बोलण्याची मराठी ढब त्याने व्यवस्थित निभावली आहे.

पत्रकार दीपू सबॅस्टियनच्या भूमिकेत राजकुमार राव आहे. तो बहुतेक दिग्दर्शक हंसल मेहतांचा आवडता अभिनेता असावा. शाहीद, सिटीलाईट्स नंतर हा त्या दोघांचा तिसरा चित्रपट. राजकुमार रावचं अभिनयकौशल्य काय पो छे, शाहीद, सिटीलाईट्स मध्ये दिसलंच आहे. इथेही ते दिसतं. सिरसच्या मृत्यूची बातमी समजल्यावर गोंधळलेल्या मनस्थितीला त्याने ज्या सहजतेने सादर केलं आहे त्याला तोडच नाही. सहजाभिनय करणाऱ्या काही आश्वासक नावांपैकी राजकुमार एक. त्याच्या नावाभोवती कुठलं स्टारपणाचं वलय नाही. त्याचं तसं व्यक्तिमत्वही नाही. कदाचित म्हणूनच तो पडद्यावर त्या त्या व्यक्तिरेखेवर भारी होत नाही. तर ती व्यक्तिरेखा आणि तो एकरूप होतात.


थोड्याश्या कालावधीत दीपू आणि सिरसमध्ये जोडलं गेलेलं मैत्रीचं नातं खूप सुंदर सादर झालं आहे. ह्याचं श्रेय दोन्ही अभिनेते व ह्या दोन्ही व्यक्तिरेखा लिहिणारे अपूर्व असरानी आणि इशानी बॅनर्जी ह्यांनाही द्यायला हवं. सिरस दीपूशी बोलताना खूप कम्फर्टेबल आहे, तरीही नेमक्या विषयावर बोलताना तो नजर मिळवत नाही. खासकरून दोघांमधला बोटीतला संवादाचा प्रसंग तर खूपच परिणामकारक झाला आहे. इथे कॅमेरा गडबडला आहे की काय, असंही क्षणभर वाटतं. पण प्रत्यक्षात ते दोघे समोरासमोर बसूनही दोन विरुद्ध दिशांना बघत बोलत असल्यामुळे आपलाच गोंधळ झालेला असतो ! अर्थपूर्ण, योग्य जागी योग्य तितके खुमासदार, सूचक संवादसुद्धा चित्रपटाला अर्थवाही बनवतात.


'चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे' असं नेहमी म्हटलं जातं. 'मला काय सांगायचं आहे' हे जेव्हा दिग्दर्शकाला स्वत:लाच नीट समजलेलं नसतं, तेव्हा चांगल्या विषयाचीही हेळसांड होते आणि जेव्हा ही एक जाणीव अगदी स्वच्छ पाण्यासारखी आरपार असते, तेव्हा मसान, मांझी, अलिगढ सारखे चित्रपट बनतात. इथे दिग्दर्शक नवा असो वा जुना त्याचा उद्गार किती अनन्यसाधारण आहे, हे समजून येतं. हंसल मेहतांना 'सिरस'ची कहाणी दाखवायची होती. त्यांनी ती दाखवली. ती दाखवत असताना त्यांना बरंच काही करता आलं असतं. अलिगढ विद्यापीठ ही एक मुस्लीम बहुल संस्था. तिथे एक हिंदू प्रोफेसर एक प्रादेशिक भाषा शिकवतो आणि हेड ऑफ द डिपार्टमेण्ट होतो, ही बाब मत्सर वाटण्यासारखीच आणि एकूणच ह्या केसमध्ये उपलब्ध माहितीनुसार विचार केला तर कुठल्याश्या आकसापोटीच कारवाई झालेलीही जाणवते. इथे 'अल्पसंख्यांकावरील अन्याय' हाही एक मुद्दा होता. दुसरं म्हणजे, 'समलैंगिक संबंध व समलिंगी व्यक्ती ह्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन कसा बदलायला हवा', ह्यावरही एक दुढ्ढाचारी भाष्य करता येऊ शकलं असतं. मात्र मेहता असल्या कुठल्याही फंदात पडत नाहीत आणि तरीही ते ह्या सगळ्यावर विचार करायला भाग पाडतात. ते सिरसना सहानुभूतीच्या बुळबुळीतपणात बरबटवत नाहीत. ते 'सिरस' ही व्यक्ती उभी करतात. मग तिच्याबद्दल माणुसकी व त्यायोगे सहानुभूती स्वाभाविकपणेच निर्माण होणार असते.

मेहतांनी इथे गाण्यांनाही टाळलं आहे. तसं पाहता गाणी कुठल्याच कथानकासाठी अगदी अत्यावश्यक नसतातच, त्यामुळे ते इथे खटकत नाही. मात्र भारतीय चित्रपटाचा निस्सीम चाहता म्हणून मला नेहमी असं वाटत आलं आहे की चित्रपट संगीत हे आपलं वैशिष्ट्य आहे आणि त्याला आपण जपावं. हे एक साधन आहे, त्याचा खुबीने वापर करणे हेसुद्धा एक आव्हान आहे. टाळणे म्हणजे वापर करणे नव्हे.

'अलिगढ़' हा मुख्य धारेतला चित्रपट नक्कीच नाही. त्याच्या वाटेला सामान्य प्रेक्षक जाणार नाही. जाऊच नये. ते 'अरसिकेषु कवित्व निवेदनं' होईल. मोठ्या शहरांत, मल्टीप्लेक्सेसमध्ये आताशा असे चित्रपट बऱ्यापैकी चालतात. त्यामुळे भरपूर गल्ला जमत नसला, तरी मेहनतीचं चीज तरी होतं. एक उत्तम चित्रपट रसिकांच्या पोचपावतीसाठी चित्रपटगृहांत वाट पाहतो आहे. ज्यांचं चित्रपटावर प्रेम आहे, त्यांनी तो आवर्जून पाहावा. सत्यघटनेवर आधारित चित्रपटांचा ओव्हरडोस झाला आहे, हे जरी मान्य केलं, तरी त्यामुळे चांगला चित्रपट वाईट ठरत नाही.

रेटिंग - * * * *

2 comments:

  1. अप्रतिम परीक्षण , आम्ही सगळेच सिनेमा बघायला नक्की जाऊ।।। अप्रतिम ।।।
    चिन्मय संत, जळगाव ।

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...