Sunday, March 22, 2015

विस्कळीत 'ब्लॅक होम' (Movie Review - BLACK HOME)

एक संशयास्पद रिमांड होम. 'राजावाडी रिमांड होम'. जिथल्या मुलींवर अनन्वित अत्याचार केले जात असतात. त्यांचा व्यवसायही केला जात असतो. ह्या सगळ्याची खबरबात समाजसेवक राघव आणि सरिता एका टेलिव्हिजन वृत्तवाहिनीचा अधिकारी डी.के. (आशुतोष राणा) पर्यंत पोहोचवतात. ह्या मागे बरंच मोठं रॅकेट असण्याची शक्यता बेरकी व चाणाक्ष डी. के. जाणतो आणि त्याच्यावर आधीच अनेकांची नजर असल्याने तो दुसऱ्या कुणाकरवी ह्या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचं ठरवतो. साहजिकच असं 'दुसरं कुणी' म्हणजे असं कुणी पाहिजे, जे फार विचार करणारं नसेल जेणेकरून त्या व्यक्तीकडून तो हवं तसं काम करवून घेऊ शकेल. त्याच्या कार्यालयातल्या अनेक बिनडोक लोकांपैकी सगळ्यात बिनडोक व्यक्ती 'अंजली' (सिमरन सेहमी) ला तो ह्या कामासाठी नेमतो आणि तिच्या व राघव-सरिताच्या मदतीने ह्या प्रकरणाला खणून काढतो. 'राजावाडी रिमांड होम' च्या प्रमुखाच्या भूमिकेतील अचिंत कौर आणि तिचा असिस्टन्ट दाखवलेला शरद पोंक्षे ही ह्या रॅकेटमधली लहान प्यादी. तर साहजिकच मुख्यमंत्री (मोहन जोशी) आणि गृहमंत्री (मुरली शर्मा) सारखी बडी धेंडंही ह्यात सामील असतातच. चॅनेलमधलं अंतर्गत राजकारण व ह्या प्रकरणामुळे येणारा राजकीय दबाव ह्या सगळ्याचा सामना करून डी के 'राजावाडी रिमांड होम'चं सत्य जगासमोर आणतो का ? कसं ? त्यासाठी कुणाला काय किंमत मोजावी लागते ? दोषींचं काय होतं ? वगैरे प्रश्नांची उत्तरं चित्रपट देतो. पण त्यासाठी बरंच काही झेलावं लागतं!

'सिमरन सेहमी' हा ठोकळा पहिल्यापासून शेवटपर्यंत अत्यंत नकली वावराने अक्षरश: वैताग आणतो. तिचे तिच्या होणाऱ्या पतीसोबतचे (संतोष जुवेकर) संवाद, त्याच्या कुटुंबीयांसोबतच्या गप्पा, आईसोबतचं वागणं सगळं केवळ नकली आणि थिल्लर आहे. बटबटीत चेहरा आणि उग्र मेक अप तिचं उपद्रव मूल्य आणखीच वाढवतात. प्रमुख पात्राची अभिनयाच्या नावाने बोंब असल्यावर लोक चित्रपट आवडीने का बघतील ?
आशुतोष राणाची सगळी दृश्यं त्याच्या केबिनमध्येच आहेत. बहुतेक त्याला दोन तासांसाठी बोलवून संपूर्ण शेड्युल उरकून घेतलेलं असावं. एकाच जागी, एकाच पवित्र्यात सगळी दृश्यं असल्यामुळे त्याच्यासारख्या ताकदीच्या अभिनेत्याचाही थोड्या वेळाने कंटाळाच येतो.

'रिमांड होम' मधल्या 'मिर्ची' नामक मुलीच्या भूमिकेतील 'चित्रांशी रावत' मूळची हॉकीपटू. उत्तराखंडकडून ती अजूनही राष्ट्रीय पातळीवर खेळते. 'चक दे इंडिया'मुळे तिचा चित्रपटात प्रवेश झाला आणि तिच्यातल्या अभिनयगुणांनी चांगलीच ख्याती मिळवली. 'ब्लॅक होम' मधली तिची भूमिकाही ताकदीची होती. पण तिच्याऐवजी सगळा फोकस थिल्लर अंजलीवर राहिल्याने सगळा बट्ट्याबोळ झाला.
मोहन जोशी, मुरली शर्मा ह्यांना विशेष काम नाही. पण शरद पोंक्षेंचा 'भोगी' मात्र अंगावर येतो.

वास्तवदर्शनाच्या प्रयत्नात रिमांड होम संदर्भातलं कथानक अतिरंजित, अतिभडक दाखवलं गेलं आहे आणि समांतरपणे अंजली व तिची कहाणी इतकी भंपकपणे चालते की वास्तव अतिरंजित आहे की अतिभंपक, हेच समजत नाही. चेहऱ्यावर एकच एक भाव ओढलेला डी.के., बाष्कळ अभिनयाचं मूर्तस्वरूप असलेली अंजली, तिची फडतूस कहाणी, अचानक कुठून तरी उगवून म-कार, भ-कार काढणारी मिर्ची, कथानकाच्या मांडणीत सपशेल गंडलेलं दिवसाचं वेळापत्रक ही सगळी ठिगळं विचित्र पद्धतीने जोडल्यामुळे एक दमदार 'प्लॉट' केवळ विस्कळीत हाताळणीने वाया गेला आहे.
त्यातल्या त्यात लक्षात राहतं ते अमर मोहिलेंचं पार्श्वसंगीत आणि बऱ्यापैकी जमून आलेली १-२ गाणी.

अखेरीस, एक गोष्ट आवर्जून सांगतो. एक प्रार्थना आशा भोसलेंनी गायली आहे. आशाताईंची इतकी सुंदर गाणी आम्हा रसिकांनी कानांत प्राण आणून ऐकली आणि मनात मौल्यवान रत्नांप्रमाणे साठवली आहेत. ज्या कानांनी आम्ही त्यांचा दैवी आवाज ऐकला, त्यावर मनापासून प्रेम केलं, त्याच कानांना त्यांचा इतका खराब झालेला आवाज ऐकवत नाही. ते गाणं त्यांनी नसतं गायलं तर काय फरक पडला असता ? मोठ्या लोकांनी त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्या रसिकांसाठी तरी आपला अट्टाहास सोडावा म्हणतो !

चांगला रस्ता बरोबर असतोच असं नाही, बरोबर रस्ता चांगला असेलच असंही नाही. सुंदर गाण्याचे शब्द चांगले असतीलच असेलच असं नाही, सर्वच चांगल्या शब्दांचं चांगलं गाणं बनेलच असंही नाही. चांगल्या चित्रपटाची कहाणी चांगली असेलच असं नाही आणि प्रत्येक चांगल्या कहाणीचा चांगला चित्रपट बनेलच असंही नाही. 'ब्लॅक होम'ची ह्याआधीही सांगितली गेलेली कहाणी दमदार आहे. मात्र चित्रपटाचं वर्णन एका शब्दात करायचं झालं तर 'सुमार' म्हणता येईल. ह्युमन ट्रॅफिकिंग, सेक्स रॅकेट्स हे सगळं ह्यापूर्वी 'य' चित्रपटांतून आपण पाहिलेलं आहे. 'ब्लॅक होम' त्याच पठडीतला 'य + १' वा चित्रपट आहे.

रेटिंग - *


हे परीक्षण आज (१५ मार्च २०१५) मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये प्रकाशित झाले आहे :-

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...