Monday, March 23, 2015

करा एल्गार ! (INDIA vs AUSTRALIA - Semi Final Cricket World Cup 2015 - Preview)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानने फलंदाजांनी पत्करलेल्या शरणागतीमुळे पराभव पत्करला. सर्व बाद पाकिस्तान झाला आणि ऑस्ट्रेलियाचे फक्त चारच गाडी बाद झाले पण सामना गाजला पाकिस्तानच्या वहाब रियाझच्या गोलंदाजीमुळे. त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खास करून शेन वॉटसनला ज्याप्रकारे नाचवलं ते पाहून त्यांचं 'कांगारू' नाव सार्थ वाटावं. वॉटसनला आणि त्याच्या बॅटला वहाबचे अनेक चेंडू अगदी जवळून वारा घालून गेले. काहींनी तर त्याचं हेल्मेटच्या आतलं डोकंही हलवलं. सुदैव आणि पाकच्या राहत अलीच्या मदतीच्या जोरावर वॉटसन टिकला आणि कांगारूंना विजय मिळवता आला.
सुनील गावस्करने म्हटलं आहे की, 'जेव्हा एखादा गोलंदाज भेदक जलद मारा करत असतो, तेव्हा त्याला खेळायची सगळ्यात उत्तम पद्धत म्हणजे नॉन-स्ट्रायकर एंडला पोहोचणे !'
पण वहाबच्या त्या स्पेलदरम्यान वॉटसनला तेसुद्धा सहजपणे करता येत नव्हतं. जेव्हा दोन ऑस्ट्रेलियन फलंदाज पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांकडून एक धाव चोरू शकत नाहीत, तेव्हा त्याचा अर्थ एकच होतो की त्यांच्या बॅटला क्वचितच चेंडू लागतो आहे ! वहाबला अजून एखाद्या गोलंदाजाची तोडीस तोड साथ मिळाली असती किंवा क्षेत्ररक्षकांनी आंतरराष्ट्रीय पातळीला साजेसं प्रदर्शन केलं असतं तर कदाचित भारतासमोर पुन्हा एकदा पाकिस्तानचं आव्हान असतं. पण तसं झालं नाही आणि कांगारूंनी सुटकेची उडी मारली.

ह्या विश्वचषकात आत्तापर्यंत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या दहात केवळ एकच फिरकी गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहीर. बाकी सगळे जलदगती गोलंदाजच. ह्या यादीत आत्ताच्या घडीला भारताचा मोहम्मद शमी तिसऱ्या स्थानावर आहे. पण गोलंदाजीचे जबरदस्त स्पेल्स आठवायचे झाले तर मला न्यू झीलंडचे टीम साउदी, ट्रेंट बोल्ट, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, पाकचे मोहम्मद इरफान, वहाब रियाझ आठवतात. खरं तर जी किमया भारतीय गोलंदाजांनी केली आहे ती न्यू झीलंडव्यतिरिक्त इतर कुणालाच जमलेली नाही. आत्तापर्यंतच्या सातही सामन्यांत त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला सर्व बाद केलं आहे.
इथे एक गंमतीशीर आणि आश्चर्यकारक बाब लक्षात घ्यायला हवी. विश्वचषक सुरु होण्यापूर्वी इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे भारतीय गोलंदाजीचे दोन प्रमुख आधारस्तंभ होते. इशांत शर्मासारख्या अत्यंत बेभरवश्याच्या व प्रसंगी अति-सामान्य वाटणाऱ्या गोलंदाजावर एखाद्या संघाची भिस्त असणं ही खरं तर हास्यास्पद बाब, पण कटू सत्य. भुवनेश्वर कुमार विश्वासू वाटत असला, तरी अजून तसा नवखाच. तसेच गेल्या वर्षभरातील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त बळी मोहम्मद शमीच्या नावावर होते. ह्या तीन प्रमुख गोलंदाजांपैकी फक्त शमी ह्या विश्वचषकात खेळतो आहे. भुवनेश्वर आहे, पण चक्क बाहेर बसला आहे आणि इशांत तर स्पर्धेपूर्वीच दुखापतग्रस्त झाला आहे. अश्या स्थितीत, जे वेस्ट इंडीज बाबत रवी रामपॉल आणि सुनील नारायणच्या अनुपस्थितीमुळे आणि पाकिस्तानबाबत सईद अजमल, उमर गुल, जुनैद खानच्या अनुपस्थितीमुळे झालं, तसं भारताबाबत झालं नाही. गोलंदाजी थिटी पडली नाही, उलटपक्षी आश्चर्यकारकपणे सुधारली ! ह्याचा अर्थ हाच की इशांत शर्मावर भारतीय गोलंदाजी अवलंबून आहे, हा भारताचाच गैरसमज होता. डोलारा पेलण्यासाठी बांबूची ताकद लागते, वेलीची लवचिकता नाही. इशांत शर्मा दिसत बांबूसारखा असला, तरी त्यात ती ताकदच नसावी. अन्यथा शेकडो जाणकारांनी अनेक वेळा केलेल्या सामन्याआधी व नंतरच्या चर्चांत कुठे तरी कुणी तरी हा मुद्दा मांडला असता की, 'ही कमाल भारतीय गोलंदाज त्यांचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्माच्या अनुपस्थितीत दाखवत आहेत!'
तर एकाही भारतीय गोलंदाजाने एकही झणझणीत तिखट स्पेल टाकलेला नसतानाही सात सामन्यांत सत्तर बळी आणि एक गोलंदाज सर्वाधिक बळींच्या यादीत तिसरा कसा ? ह्याचं उत्तर ह्या गोलंदाजीच्या पूर्वकर्तृत्वात मिळावं. गेले कित्येक महिने ही गोलंदाजी विविध खेळपट्ट्यांवर फक्त धडपडतच आहे. विश्वचषक सुरु होतेवेळी अगदी अफगाणिस्तान किंवा अमिरातीसारख्या देशांच्या फलंदाजांनीही भारतीय गोलंदाजीला फारसं गांभीर्यानं घेतलं नसावं. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीतून तर ते अगदी स्पष्टपणे जाणवलं. त्यांनी ह्या गोलंदाजांना अगदी तुच्छ लेखलं आणि हाराकिरी केली. प्रतिस्पर्ध्याच्या बेसावधपणाचा पुरेपूर फायदा भारतीय गोलंदाज व क्षेत्ररक्षकांनी उठवला. मिळालेल्या बहुतांश संधींचं सोनं केलं.

असो.
पण आता परिस्थिती बदलली आहे. विश्वचषक दोनच पावलं दूर आहे. पण तो फक्त भारतासाठीच नव्हे तर इतरही तीन संघांसाठी दोनच पावलं दूर आहे. ही शेवटची दोन पावलं टाकत असताना नक्कीच कुणाला डुलकी लागणार नाही. आता फलंदाजांनी बेसावधपणी चूक करण्याची वाट बघत राहिल्यास पूर्वीसारखं घवघवीत यश मिळेल असं वाटत नाही. उपांत्य फेरीत भारतासमोर जेव्हा ऑस्ट्रेलिया असेल, तेव्हा सामना जर फलंदाज विरुद्ध फलंदाज झाला तर भारताचं पारडं नक्कीच जड असेल. मात्र जर गोलंदाज विरुद्ध गोलंदाज झाला तर शमी-यादव-मोहित-अश्विनला स्टार्क-हेजलवूड-जॉन्सन-फॉकनरच्या पातळीपर्यंत स्वत:ला उचलणं कठीण जाऊ शकतं.
इथे दोन गोष्टी आहेत. एक तर भारताचा जलदगती मारा एकसमान आहे. तिन्ही गोलंदाज उजव्या हाताचेच आहेत. तर ऑस्ट्रेलियाकडे उजव्या व डाव्या हाताच्या गोलंदाजीचे सुयोग्य मिश्रण आहे. मात्र चांगल्या फिरकी गोलंदाजाची त्यांच्याकडे उणीव आहे. गेल्या सामन्यात त्यांनी झेवियर डोहर्टीला खेळवलं नव्हतं. झेवियर डोहर्टी हा रवींद्र जडेजापेक्षा बरा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे, इतपतच त्याला सन्मान मिळू शकतो. त्यामुळे भारतासाठी अश्विन-रैना- जडेजाची षटकं, त्यातही विशेषकरून अश्विनची कामगिरी सगळ्यात जास्त महत्वाची ठरेल. तर ऑस्ट्रेलियासाठी त्यांच्या गोलंदाजांची पहिली दहा षटकं रोहित-धवन कशी खेळतात हे महत्वाचं ठरेल. ह्या दहा षटकांत जर धवनला तो धवन असल्याची आणि रोहितला तो रोहित असल्याची जाणीव झाली नाही, तर कोहलीला तो विराट असल्याची आणि रहाणेला तो अजिंक्य असल्याची जाणीव होईल. रैना-धोनी-जडेजा शेवटची दहा षटकं सांभाळू शकतील.



सामन्याच्या आधीपासूनच अपेक्षेप्रमाणे कांगारुंकडून वाग्युद्धाला सुरुवात झाली आहेच. ग्लेन मॅक्सवेलने गेल्या तीन महिन्यांत भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयाची चव चाखलेलीच नसल्याची आठवण करून दिली आहे. हे चांगलं झालं. 'आपण काय मिळवू शकलो नाही आहोत', ह्याची प्रखर जाणीव झाली म्हणजे 'आपल्याला काय मिळवायचं आहे', ह्याची प्रबळ इच्छाशक्ती निर्माण होते. तशी ती धोनी आणि त्याच्या ठरलेल्या इतर दहांना होवो. एल्गार होवो. हल्लाबोल होवो. बाहूंत हजार मॅक्सवेलांचे बळ संचारो आणि सिडनी क्रिकेट ग्राउंडमधून कांगारूंना उड्या मारत बाहेर पडायला लागो, हीच सचिन-द्रविडचरणी प्रार्थना !

- रणजित पराडकर



ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...