Monday, July 28, 2014

एक्स्ट्रा टाईमची पेनल्टी किक (Movie Review - Kick)

'माझं पोरगं कसलं व्रात्य आहे, उपद्व्यापी आहे ! जराही शांत बसत नाही आणि बसूही देत नाही.
प्रवासात तर डब्यातल्या प्रत्येकाला जाऊन छळायचं असतं ! एका जागी थांबत नाही.
शाळेतून रोजच तक्रार असते !
मनासारखं झालं नाही तर सगळं घर डोक्यावर घेतं.
हातात काहीही आलं की आधी ते फेकणारच !
आयटम सॉंग्स भारी आवडतात.. 'झंडू बाम'वर तर कसलं नाचतंय !'

- कशाचंही कौतुक असतं लोकांना. ज्यासाठी एक धपाटा द्यायला हवा, त्यासाठी एक गालगुच्चा घेतला जातो आजकाल. ह्या लाडोबांनी काहीही केलेलं चालतं आई-बापाला. ह्यांचा आनंद आणि बाकीच्यांना वैताग !
असंच काहीसं आपल्या फॅन मंडळींचं आहे. त्यांच्या लाडोबांनी काहीही केलं तरी चालतं. चालतं कसलं, ते 'लै भारी' असतं. मग तो 'किक'च्या सुरुवातीचा जवळजवळ तासभराचा वात आणणारा अस्सल मूर्खपणा का असेना !

मागे एकदा मोठ्या अपेक्षेने पंकज कपूर दिग्दर्शित 'मौसम' बघायला गेलो होतो. असह्य होऊन मध्यंतराला बाहेर पडलो. 'किक'च्या मध्यंतरापर्यंत तश्याच निर्णयाला पोहोचत होतो. एक तर 'टायटल्स'मध्ये 'म्युझिक - हिमेश रेशमिया' दिसलं होतं, तेव्हापासून पाचावर धारण बसली होती की त्याची काही तरी भूमिका असणारच. मी सश्याच्या बावरलेपणाने बरोबरच्या मित्राला माझी भीती कुठलाही आडपडदा न ठेवता बोलून दाखवली. तेव्हा समजलं की हिमेश दिसणार नाहीये. मध्यंतरानंतर तग धरण्याचं बळ त्या तीन-चार शब्दांत होतं आणि मी बाहेर न पडता तिथेच बसून राहिलो.

तर कहाणी अशी आहे की.....
'देवी लाल सिंग' (सलमान) हा एक सटकलेल्या डोक्याचा चाळीशीचा तरुण असतो. (चाळीशीचा तरुण म्हणजे 'गरमागरम बियर' म्हटल्यासारखं वाटत असेल. पण ते तसंच आहे.) हुशार व सुशिक्षित असूनही त्याच्या सतत काही तरी 'थ्रिलिंग' करण्याच्या चसक्यामुळे त्याने आत्तापर्यंत ३२ नोकऱ्या सोडलेल्या असतात. गावात देवाच्या नावाने जसा एखादा वळू सोडलेला असतो, तसा हा स्वत:च्या 'किक'साठी गावभर उधळत फिरत असतो. त्याला काय केल्याने 'किक' मिळेल, हे सांगता येत नसतं. एकीकडे मैत्रिणीच्या घरच्यांच्या मर्जीविरुद्ध तिचं लग्न करवून देत असतानाच दुसरीकडे त्याच लग्नाबद्दलचे अपडेट्ससुद्धा त्याच घरच्यांना देऊन, त्यांना लग्नाच्या ठिकाणी आणून, त्यांच्यासमोर लग्न लावून देतो, कारण त्यातून 'किक' मिळते !
एक बथ्थड चेहऱ्याची मानसोपचार तज्ञ 'शायना' (जॅकलिन फर्नांडीस) त्याला भेटते आणि त्याला एक वेगळीच 'किक' बसते. प्रेमाची. त्या प्रेमाखातर तो पुन्हा एकदा नोकरी करण्याचा प्रयत्न करतो. तो न जमल्याने नाराज झालेल्या शायनावर नाराज होऊन 'आजसे 'पैसा कमाना' यही मेरी नयी 'किक' है' असं ऐकवून देवी अंतर्धान पावतो. वर्षभर त्याची वाट पाहून अजून थोराड होत चाललेली शायना कदाचित गाल भरून येतील ह्या आशेने असेल, थेट पोलंडची राजधानी 'वॉर्सो'ला आई-वडील, बहिणीसह शिफ्ट होते ! (च्यायला ! मी ३ ब्रेक अप्स केले. कधी वर्सोव्यालाही जाऊ शकलो नाही. माझ्या प्रेमात 'किक'च नव्हती बहुतेक!)

इथपर्यंत थेटरात बसलेले सगळे पकलेले असतात. थेटरात जांभयांची साथ आलेली असते. पण कोमात गेलेला पेशंट शुद्धीत यावा, तसे अचानक लेखक, दिग्दर्शक शुद्धीत आल्याची लक्षणं दाखवायला लागतात.

कुठल्याही कर्तव्यदक्ष पालकांना असते, तशी शायनाच्या घरच्यांनाही तिच्या लग्नाची काळजी असतेच. त्यामुळे वडिलांच्या मित्राचा मुलगा 'हिमांशु' (रणदीप हुडा) कहाणीत येतो. सुपरकॉप हिमांशु एका 'डेव्हिल' नावाच्या चोराच्या करामतींनी बेजार झालेला असतो. पुढची चोरी 'वॉर्सो'मध्ये होणार असा एक खत्तरनाक डोकेबाज शोध लावून तो इथे आलेला असतो. 'डेव्हिल' म्हणजे पूर्वीचा 'देवी' असणारच असतो. अश्याप्रकारे कहाणीची 'त्रिकोणीय' गरज पूर्ण होते.
ह्यानंतर नेहमीची थरारनाट्यं यथासांग पार पडतात. कहाणी आणखी पुढेही उलगडत जाते. 'नवाझुद्दिन सिद्दिकी'ने जबरदस्त साकारलेला खलनायक 'शिव' येतो. आणि इतर कुठल्याही सलमानपटाच्या ठराविक वळणावर चित्रपट 'इतिश्री' करतो.


चित्रण, छायाचित्रण तर आजकाल सुंदर असतंच. इथेही ते सफाईदार आहे. मध्यंतराच्या जरा आधीपासून कहाणी चांगला वेगही पकडते. पण हिमेश रेशमियाची गाणी वेगाला बाधा आणायचं काम सतत करत राहतात. खासकरून 'नर्गिस फाक्री' असलेलं एक गाणं तर पराकोटीचा अत्याचार करतं.

'जॅकलिन फर्नांडीस' खप्पड चेहरा आणि विझलेल्या डोळ्यांनी अख्ख्या चित्रपटभर अभिनयाचा अत्यंत केविलवाणा अयशस्वी प्रयत्न करते.

सौरभ शुक्ला, रजित कपूर व मिथुन चक्रवर्ती ह्यांना फारसं काही काम नसल्याने ते वायाच गेले आहेत. नवाझुद्दिनच्या भूमिकेचीही लांबी तशी कमीच आहे. पण महत्वाची तरी आहे. त्याचं ते 'ट्टॉक्' करून विकृत हसणं जबराट आहे. पण म्हणून 'मै १५ मिनिट तक अपनी सांस रोक सकता हूँ' हे काही पटत नाही.

रणदीप हुडा हा मला नेहमी एक गुणी अभिनेता वाटतो. त्याचा वावर अगदी सहज आहे. कोणत्याही खानपटात दुसऱ्या कुठल्या नटाने छाप सोडणे म्हणजे दुसऱ्याच्या बगीच्यात शिरून तिथलं गुलाबाचं फूल डोळ्यांदेखत तोडून आणण्यासारखं आहे.

खरं तर तेलुगु सिनेमाचा रिमेक असल्याने सगळा मसाला मिला-मिलाया आणि बना-बनायाच होता. फक्त चकाचक भांड्यांत सजवून समोर ठेवायचं होतं. ते ठेवलंच आहे. त्यामुळे एकदा बघायला हरकत नसावी.
असं करा.... खणखणीत एसी असलेल्या चित्रपटगृहात, पोट मस्तपैकी टम्म फुगेस्तोवर खादाडी करून जा आणि पहिला एक तास झक्कपैकी झोप काढा. मग मध्यंतरात गरमागरम चहा-कॉफी घेऊन पॉपकॉर्न चिवडत उर्वरित अर्धा भागच पहा. मज्जा नि लाईफ !

रेटिंग - * *

1 comment:

  1. Vachayla maja aali. Fakt ek correction. 3 sangit-karancha music aahe. Nargis Fakri cha gaana Shriyut Yo Yo H Singhaani dila aahe. :)

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...