Tuesday, July 22, 2014

कौन जीता, कौन हारा ?

२ एप्रिल २०११. भारताने विश्वचषक जिंकला. २८ वर्षांनंतर. त्याआधी तो चषक त्यांनी उंचावला होता लॉर्ड्सवर.
२१ जुलै २०१४. काल त्याच लॉर्ड्सवर भारताने कसोटी सामना जिंकला. पुन्हा एकदा, २८ वर्षांनतर मिळालेलं एक यश.
२०११ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने २७५ चं लक्ष्य समोर ठेवलं होतं आणि झटपट दोन महत्वाचे बळीही मिळवले होते. तेव्हा विश्वविजय मुंबईहून लॉर्ड्सइतकाच दूर वाटत होता. पण धोनीने कमाल केली.
कालच्या सामन्यात 'जो रूट' खेळपट्टीवर खोलवर रूट्स (मुळं) रोवल्यासारखा ठाण मांडून बसला होता आणि मोईन अलीही हाताला येत नव्हता, तेव्हाही विजय लॉर्ड्सहून मुंबईइतकाच दूर वाटत होता. पण पुन्हा एकदा धोनीने कमाल केली. सुंदर चेहऱ्याला झाकणाऱ्या केसांना बाजूला करावं, त्याप्रमाणे त्याने केशसंभाराखाली दबलेल्या इशांत शर्माच्या बुद्धीला चालना दिली आणि त्याला आखूड मारा करण्यास भाग पाडलं. ह्या अनपेक्षित हल्ल्याने बावचळलेला मोईन अली लंचपूर्वीच्या अखेरच्या चेंडूवर शॉर्ट लेगच्या हाती हळुवार पिसासारखा अलगद विसावला आणि सकाळचे सत्र भारतासाठी अगदीच विफल ठरले नाही.
अचानक इशांतच्या चेंडूची गती १३५ कि.मी. च्या पुढे गेली. अधून मधून १४० की.मी.लाही तो पोहोचला. लंचनंतर इशांतच्या आखूड माऱ्यावर प्रायर व रूट फावड्याने माती ओढल्यासारखे धावा वसूल करायला लागल्यावर पुन्हा एकदा पराभवाचं सावट आलं. पण धोनी ठाम होता. आखूड मारा चालूच राहिला आणि मग एकामागून एक आणखी ४ विकेट्स मिळाल्या आणि पुन्हा एकदा क्रिकेटची पंढरी भारताच्या जयजयकाराने दुमदुमली.


चित्रपट जसं दिग्दर्शकाचं माध्यम आहे, तसं क्रिकेट हा कर्णधाराचा खेळ आहे. एक उत्कृष्ट कर्णधार साधारण खेळाडूंकडूनही सर्वोत्कृष्ट कामगिरी करवून घेऊ शकतो आणि एक निकृष्ट कर्णधार सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाही साधारण भासवू शकतो. सगळं काही केवळ 'नीती' आणि 'नीयत'च्या जोरावर.
ब्रिटीश, ऑस्ट्रेलियन, विंडीज, आफ्रिकन वगैरे जलदगती गोलंदाजांपुढे भारतीय जलदगती गोलंदाज (इशांत वगळल्यास) म्हणजे काय हे स्ट्युअर्ट ब्रॉड आणि भुवनेश्वर कुमारला बाजू-बाजूला उभं केल्यावर समजेल. पण खेळपट्टीवर हिरवळ असतानाही तिचा तितका लाभ इंग्लंडचे गोलंदाज उठवू शकले नाहीत, जितका ती हिरवळ वाळल्यावर भारतीयांनी उठवला. ह्याला कारण कूक व धोनी ह्यांच्या कप्तानीतील धोरणात्मक फरक. आक्रमक क्षेत्ररचना, जेव्हढी धोनीने लावली, तेव्हढी कूकने का लावली नसावी, हे कळत नाही. कदाचित फलंदाजीतील सुमार फॉर्ममुळे त्याच्यातील कर्णधारही बचावात्मक झाला असावा.

सामन्यानंतरच्या समारंभात इशांत, धोनीच्या मुलाखतींतून पुन्हा एकदा हे प्रतीत झालं की धोनी हा एक अतिशय चलाख, धोरणी व धूर्त खेळाडू आहे. त्याची विचार करण्याची पद्धती, कुठल्याही परिस्थितीचे वेगळ्याच प्रकारे पण अचूक मूल्यमापन करत असावी. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेरीस त्याने आपल्या संघसहकाऱ्यांना म्हटलं की, गेल्या पाच कसोटी सामन्यांच्या तोडीचा खेळ आपण ह्याही कसोटीत केला, तर आपण नक्कीच जिंकू. अजून एक खूप साधीशी गोष्ट तो त्याच्या मुलाखतीत म्हणाला. 'कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेरपर्यंत समाधानकारक परिस्थितीत असणे, आमच्यासाठी महत्वाचं आहे कारण तिथून पुढे आमचे फिरकीपटू प्रभाव टाकू शकणार असतात.' अत्यंत सोप्या पद्धतीने मांडलेल्या अतिशय कठीण गोष्टी. एका चांगल्या नेतृत्वासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. कठीण आव्हानं अश्या पद्धतीने समोर मांडणं, की ती सोपी वाटली पाहिजेत.

एक चिंतेची गोष्ट हीच आहे की ह्या विजयानंतर इशांत शर्माचा आत्मशोध संपू नये. अजूनही रिकी पाँटिंगला ऑफ स्टंपबाहेरच्या तिखट जलद माऱ्याने अस्वस्थ करणाऱ्या सुरुवातीच्या इशांत शर्मापासून हा आजचा इशांत शर्मा खूप दूर आहे. पर्थपासून मुंबईइतका दूर. आपल्या उंचीचा उपयोग आपण करून घेऊ शकतो, हे त्याला कर्णधाराने सांगायला लागतं हे बरोबर नाही. पंचविशीचाच असला तरी ७-८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव थोडाथोडका नाही. आपली बलस्थानं आपल्याला उमजावीत, इतक्यासाठी तरी हा अनुभव नक्कीच पुरेसा आहे. आशा आहे की विकेट मिळवणं आणि विकेट मिळणं ह्यातील फरक त्याला कळत असेल.

अजून एक महत्वाची बाब ही की मालिकेतील अजून ३ सामने खेळायचे बाकी आहेत. शांतपणे विचार केल्यास भारताने हा सामना जिंकला, ह्यापेक्षा इंग्लंडने तो हरला असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. कारण जितके चेंडू एकट्या मुरली विजयने यष्टीरक्षकासाठी सोडले त्याच्या एक चतुर्थांश चेंडू जरी इंग्लंडने लंचनंतर सोडले असते तर निकाल वेगळा लागू शकला असता. किंवा जितके आखूड चेंडू एकट्या इशांत शर्माने अखेरच्या दिवशी टाकले, तितके चेंडू जर स्ट्युअर्ट ब्रॉडने गुड लेंग्थवर टाकले असते, तरी सामन्याचे पारडे दुसऱ्या बाजूला सहज झुकू शकले असते. त्यामुळे इंग्लंडसाठी मालिकेत पुनरागमन करणे फार अवघड नाही. त्यांना फक्त त्यांच्या चुका सुधारायच्या आहेत.

सामन्यानंतर माईक आथरटनने अ‍ॅलिस्टर कूकची मुलाखत पोलीस चौकशी करावी, इतक्या आक्रमकपणे घेतली. काही अतिशय अवघड प्रश्न विचारले. पण धोनीशी मात्र शेजाऱ्याच्या मुलाला समजवावं अश्या पवित्र्यात संवाद साधला. बिन्नीला एकही षटक द्यावेसे का वाटले नाही, असा अवघड प्रश्न त्याने टाकला नाही. त्यामुळे मुलाखतीसाठी पडलेल्या चेहऱ्याने आलेला कूक चढलेल्या आठ्यांसह परतला आणि शांत चेहऱ्याने आलेला धोनी हसऱ्या चेहऱ्याने परतला.

कुणाच्या का कोंबड्याने असो, सूर्योदय झाला आहे; ह्यावर आपण जितका काळ समाधानी राहू शकतो तितकाच काळ ह्या विजयाने आनंदी राहावं, असं वाटतं.

उर्वरित मालिकेसाठी धोनी ब्रिगेडला मन:पूर्वक शुभेच्छा !

- रणजित पराडकर 

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...