Sunday, March 31, 2013

जेव्हा म्हणतो राजा, "आजचा दिवस माझा" (Aajcha Divas Majha - Movie Review)


आर्थिक वर्षाखेरीचे दिवस आहेत. नक्कीच ऑफिसमध्ये अनेकांच्या फुल्ल नाईट्स, लेट नाईट्स चालू असतील. हे दिवसच असे असतात की 'लोड' घेतल्याशिवाय काम होणारच नसतं. करोडोंचे पुस्तकी आणि प्रत्यक्ष हिशेब जुळवताना गद्धेमजुरी आणि मगजमारी कुठलाही मागचा-पुढचा, 'हे माझे काम आहे की नाही' वगैरेसारखा विचार न करता, करावीच लागते. ती करत असताना डोकं फिरतं, वैताग येतो, संताप येतो, चीडचीड होते पण अचूक ठोकताळा लागल्यावर, मेहनतीचं चीज झाल्यावर मिळणारा आनंदही अपूर्व असतो. तो पराकोटीचा मानसिक आणि शारीरिक थकवा एक वेगळंच समाधान देतो. कारण कुठे तरी, आत, आपण स्वत:च्याही नकळत एकदा तरी ठरवलेलं असतं की, 'आजचा दिवस (रात्र?) माझा' आहे !
पण काही वेळी, वर्षअखेर नसताना किंवा कुठलीही तातडी नसतानाही, उगाचच एखादं काम एखादी अवास्तव 'डेड लाईन' घेऊन केलं जातं. त्यात बहुतकरून केवळ साहेबी हट्ट असतो, दुसरं काही नाही. पण समजा एखादं 'नेक' कारण असेल तर ? ('नेक' कारणासाठी कॉर्पोरेटमध्ये झिजायला क्वचितच मिळत असावं, पण शासकीय नोकरीत, मनात असेल तर, अक्षरश: रोज अशी नेकी करता येईल, नाही?)

असाच एक दिवस उगवतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते (सचिन खेडेकर), पक्षांतर्गत बंडाळीवर मात करून, राज्यपालांच्या राजकारणावर कुरघोडी करून, आपली खुर्ची कायम ठेवण्यात यशस्वी होऊन दिल्लीहून परततात. अख्खा दिवस अभिनंदन, सत्कार, सदिच्छा भेटी ह्यात सरून जातो आणि संध्याकाळी एका महत्वाच्या व्यक्तीकडे, पत्नीसह (अश्विनी भावे), लग्नाच्या स्वागत समारंभास ते जातात. उपस्थित इतर प्रतिष्ठित व्यक्तींशी सोहळ्याचे यजमान मुख्यमंत्र्यांची ओळख करून देतात. त्यावेळी त्यांच्याकडून एका ज्येष्ठ अंध कलावंताचा अवमान घडतो. कर्तव्यदक्ष राज्यकर्ता असलेल्या विश्वासरावांच्या मनात अपराधी भावना येते. मन खाऊ लागते. आपल्या ह्या उन्मत्त वर्तणुकीचे प्रायश्चित्त करायलाच हवे, असं ते ठरवतात. पण काय करता येईल?
पं. गुंजकरांनी आठ वर्षांपूर्वी कलावंत म्हणून मुंबईत सदनिका मिळावी ह्यासाठी अर्ज केलेला असतो, असे समजते. बास्स.. सदनिकेची किल्ली पहाटेच्या सूर्याच्या किरणांसोबत गुंजकरांना मिळालीच पाहिजे, अश्या राजहट्टास मुख्यमत्री पेटतात आणि रात्री अकरापासून पहाटेपर्यंत मंत्रालय जागं राहातं. फायली उपसल्या जातात, कागदपत्रं बनवली जातात, आदेश काढले जातात.

गोष्ट छोटीशी, पण उत्कृष्ट सादरीकरण म्हणजे काय तर "आजचा दिवस माझा" !



आ ए एस ऑफिसर रहिमतपूरकर च्या भूमिकेत महेश मांजरेकर, मुख्यमत्र्यांच्या पत्नीच्या (छोट्याश्या) भूमिकेत अश्विनी भावे आणि खाजगी सचिव 'पी. डी. शिंदे'च्या भूमिकेत हृषीकेश जोशी अप्रतिम काम करतात. रहिमतपूरकर आणि विश्वासरावांमधली खडाजंगी रंगतदार झाली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील आजपर्यंतच्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांत सचिन खेडेकर हे नाव समाविष्ट होण्यास हरकत नसावी. अप्रतिम देहबोली, अचूक संवादफेक, संयत अभिनय आणि कॅमेरासमोर अगदी सहज वावर ह्या सगळ्यामुळे खेडेकरांचा मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते संस्मरणीय झाला आहे.

'रिमेक'साठी सिनेमा निवडतानाही, एखादा मुळातच भिक्कार दळभद्री सिनेमा निवडण्याची वैचारिक दिवाळखोरी, खिश्यात करोडो रुपये असतानाही दाखवणारा एक ओंगळवाणा सिनेमा दुसऱ्या पडद्यावर चालू असताना, मी एक सुंदर मराठी सिनेमा पाहात आहे, ही भावना सिनेमाभर मला मनातल्या मनात गुदगुल्या करत होती. ह्या उच्च वैचारिक गुदगुल्या अनुभवायच्या असतील, तर 'आजचा दिवस माझा' म्हणा आणि लावा लाईन तिकीटबारीवर !

रेटिंग - * * * *    

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...