Tuesday, February 26, 2013

एक पंचतारांकित पतंग - कायपो छे ! (Movie Review - Kai Po Che!)


पतंग....
हा असा खेळ/ करमणूक/ कला (नक्की काय असतं पतंग उडवणं ? हा प्रश्न मला कधीचा पडलेला आहे.....) आहे की एकदा त्यात रमलेला माणूस तहान-भूक, काळ-वेळ, शत्रू-मित्र सगळं विसरूनच जातो. संक्रांतीला, खासकरून गुजरातेत, पतंगांनी भरून गेलेलं आभाळ पाहाणं, हा एक अद्भुत अनुभव! आबालवृद्ध गच्ची, माड्या गाठून दिवसभर पतंग उडवतात. लहान-मोठे, शेपटी असलेले/ नसलेले, जाड-पातळ, स्वस्त-महाग..... आणि निरनिराळ्या रंगांचेही.... जसं, भगवा-हिरवा ? अमुक रंगाचा पतंग माझा, तमुक रंगाचा तुझा.... दोस्ती गेली तेल लावत, मला तुझा पतंग कापायचाय आणि ओरडायचंय.... 'कायपो छे !!' [(तुझा पतंग) कापला रे !! (बस बोंबलंत आता !)] अशी ईर्ष्या मी पाहिली आहे, अनुभवली आहे.
पतंगांची ही चढाओढ आपण खरं तर सगळीकडेच पाहात, करत असतो ना? शाळेत, कॉलेजात, नोकरीत, व्यवसायात.. आणि नात्यांतही ! मनात आपल्याच नकळत एक सुप्त इच्छा असते, आपलाच पतंग उंच असावा अशी... आणि जवळपास येणाऱ्याचा मांजा कापून 'कायपो छे!!' ओरडायची !

'कायपो छे' ची कहाणी २०००-०१ मधली. आयुष्यातली बहुतांश चढाओढ (शिक्षणाची!) गुण्यागोविंदाने पार करून, जबाबदारीची जाणीव होऊ लागण्याच्या वयात आलेले तिघे जिगरी मित्र - इशान/ ईश (सुशांतसिंग राजपूत), गोविंद/ गोवी (राजकुमार यादव) आणि ओम्कार/ ओमी (अमित सध). इशान जिल्हा पातळीपर्यंत क्रिकेट खेळलेला असतो. पण बेभरवश्याच्या स्वभावामुळे पुढे काही करत नाही आणि नाकर्ता म्हणवला जात असतो. किंबहुना, कमी-अधिक प्रमाणात तिघंही, आयुष्यात 'लूजर्स'च ! इशान शीघ्रकोपी, तर गोविंद शांत. आणि ओम्कार दोघांचा मध्य ! तिघे मिळून, खेळाच्या वस्तूंचे दुकान आणि स्पोर्ट्स अकादमी सुरू करायचं ठरवतात. त्यासाठी लागणारे पैसे, नाईलाजाने, ओमीच्या राजकारणी मामाकडून घेतात. दुकान, अकादमी सुरळित चालू असते. ईशानच्या टॅलेण्ट हंटला 'अली हाश्मी' हा अल्पवयीन मुलगा सापडतो. तडाखेबंद फलंदाज!

पुढे, एका मोठ्ठ्या दुकानासाठी पैसे घालणं, मग भूकंपात सगळं काही गमावणं, त्यातूनही पुन्हा उभं राहाणं आणि अखेरीस गोध्रा हत्याकांड व धार्मिक दंगलींच्या पार्श्वभूमीवर ईश-गोवी-ओमी ची दोस्ती वेगवेगळ्या ओढाताणींना अनुभवते. ह्याहून अधिक कहाणी सांगणं कदाचित बरोबर नसेल. पण त्यांचे वाद, भांडणं, पुन्हा एकत्र येणं, एकमेकांसाठी काहीही करायची तयारी असणं, बदलते राजकीय व सामाजिक वातावरण हा सगळा प्रवास अतिशय अप्रतिम मांडण्यात आला आहे.
दोस्तीवर 'य' सिनेमे झाले आहेत. राजकीय/ सामाजिक भाष्य करणारे 'क्ष' सिनेमे झाले आहेत. पण व्यक्तिरेखांचे सामान्यत्व ग्राह्य धरून, ते टिकवून, संयतपणे नाजूक विषय कसा मांडावा, तर 'कायपो छे' सारखा. (माझ्या गुजराथी मित्राने सांगितलं की मूळ शब्द 'काय पो छे' असा नसून 'कायपो छे' असा आहे.) कुठेही अवास्तव रंजकता, उदात्तीकरण नाही. पांचटपणा, चावटपणा नाही, शिवराळपणा नाही. एका संवादात जेव्हा ओमी 'झाटभर' हा असभ्य शब्द वापरतो, तेव्हा त्याने शिवी दिल्याचं आपल्याला जरा वेळाने जाणवतं, इतकं ते ओघवतं आहे.

वाचवलेले-साठवलेले पैसे ईशान परस्पर भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी देतो, त्यानंतर क्वचितच बिथरणारा गोवी थयथयाट करतो तो प्रसंग आणि शेवटाकडची काही दृश्यं मनात घर करून राहातात. 'शेवट' इज सर्टनली नॉट फॉर वीक हार्ट्स. तो ताण सहन न होऊन माझ्या समोर ४-५ जण चित्रपटगृहातून शेवटाआधीच बाहेर निघून गेले !



एकही अभिनेता/ अभिनेत्री परिचयाची नाही. पण पहिल्या काही मिनिटातच सगळी पात्रं आपलीशी वाटतात. त्यांच्याशी आपली नाळ जुळते. शितावरून भाताची परीक्षा होते, तसं पहिल्या काही मिनिटातच आपण जे काही पाहाणार आहोत, ते दर्जेदार असणार आहे, हे समजूनच येतं ! तिघा प्रमुख अभिनेत्यांपैकी कुणी सगळ्यात चांगलं काम केलंय, हे ठरवणं निव्वळ अशक्य ! तिघंही आपापली छाप सोडतात. मनाला स्पर्श करतात. चित्रपटाच्या पोस्टरवरूनही त्या तिघांच्या व्यक्तिरेखा समजून येतात, ह्यावरूनच त्यांचं सादरीकरण किती ताकदीचं आहे/ करवून घेतलं आहे, हे समजावं !

अमित त्रिवेदीचं संगीत कर्णमधूर आहे. पण त्याकडे विशेष लक्ष जात नाही, इतकी ताकद पडद्यावरील नाट्यात, व्यक्तिरेखांत व त्या साकारणाऱ्या कलाकारांत आहे. तरी, मन लावून अभ्यास करणाऱ्या मुलाला कुणी तरी टपली मारून छळावं, तसं चित्रपटात रमलेल्या प्रेक्षकाला, कहाणीत जागा असताना वाजणाऱ्या गाण्यानेही छळावं, असं संगीत देण्याची चढाओढ आजकाल दिसते, तसं तरी जाणवलं नाही. गुड जॉब डन !

चेतन भगत ह्यांच्या 'थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ' ह्या पुस्तकावर आधारलेली ही कहाणी. पण मूळ कहाणीत काही मोक्याच्या ठिकाणी महत्वाचे बदल केले गेले आहेत. पटकथा अगदी बांधीव आहे. अजिबात फुटकळ गप्पांना स्थान नाही !

एकंदरीत, शोधूनही काही वावगं न सापडावं असा चित्रपट हिंदीत बनला आहे, हे मी सानंदाश्रू नयनाने म्हणत आहे ! आत्ताच्या आत्ता, ताबडतोब, मिळेल त्या शोचं तिकिट काढून बघावा असा हा 'कायपो छे' कुणीही चुकवू नये, असं मनापासून वाटतं.

हॅट्स ऑफ अभिषेक कपूर ! (होप युवर सिस्टर लर्न्स अ लेसन फ्रॉम यू !! 'कायपो छे !!' ;-) )

रेटिंग - * * * * * (इट कान्ट गेट बेटर दॅन धिस !)
 

2 comments:

  1. "कंदरीत, शोधूनही काही वावगं न सापडावं असा चित्रपट हिंदीत बनला आहे, हे मी सानंदाश्रू नयनाने म्हणत आहे !" वा अतिशय छान लिहील आहे . खूपच सुंदर आवाहन आहे हे .... पाहीन आज हा पिक्चर -प्रसन्न जोशी

    ReplyDelete
  2. sry... but i disagree... ofcourse its my opinion... aso... u liked it.. very good...

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...