Tuesday, June 19, 2012

मी कधी बोललो नाही..


जा दूर कितीही तू पण, असशील तरीही जवळी
ना सूर्य कधीही विझतो, किरणांस जरी तो उधळी
मी असाच तळपत होतो, पण तुलाच दिसले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही

भिरभिरता नीलाकाशी मी एकलकोंडा मेघ
वा तांबुस क्षितिजावरची मी क्षणात पुसली रेघ
गहिवरलेल्या धरणीला मी कधी भिजवले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही

पानांना झाडुन साऱ्या गुलमोहर मी मोहरलो
झेलून झळा दु:खाच्या मी मनासारखा फुललो
मी चाफा बनून माझ्या गंधास उधळले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही

तू हसताना मी माझ्या डोळ्यांचा सागर प्यालो
तू चिंब चिंब भिजताना मी मनात माझ्या न्हालो
माझ्या कविताही हसल्या, दु:खास उधळले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही

धगधगता लाव्हा माझ्या छातीत कोंडला आहे
एकेक निखारा माझ्या डोळ्यांत पेरला आहे
बेचिराख झालो आहे, पण तू पेटवले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही

आरोप कधी ना केले, ना दिला तुला मी दोष
तू मित्र मानले होते, ह्याच्यात मला संतोष
मन माझे झोके घेते, पण कधी उलटले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही

एकेक तुझ्या अश्रूला टिपण्यास धावलो होतो
मी तुला घडवण्यासाठी शून्यात संपलो होतो
पण माझ्या अस्तित्वाला माझ्यात रुजवले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही..

मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही....!

....रसप....
१९ जून २०१२

5 comments:

  1. Beautifully written Ranjeet. Having been in MH for over 3-4 years, I've been able to understand Marathi and of late, have started reading poetry. Your poems are awesome and I could understand most of it. I like the coherence of thoughts. Great work. Keep writing. Hopefully, someday I would love to pen a poem in Marathi, for the love of language. :) Will give it to you for reviews. :)

    Thanks
    Kundanscribbbles.blogspot.com

    ReplyDelete
  2. wow!

    Thats a great compliment! If poetry inspires someone to learn the language, then it is like the mother getting honored because of her son! I am really overwhelmed with this comment of yours, Kundan sir.

    Thanks a ton!

    - Ranjeet Paradkar

    ReplyDelete
  3. मी pan कधीch बोलले नाही!

    Khupach saglyanchi kavita ahe!

    Thanks.

    ReplyDelete
  4. Reading your poems give a feeling which I can not express in words. I wonder how would you be feeling while creating one.!!!!
    - Amit Pal.

    ReplyDelete
  5. मला ही कविता दोन कारणानी आवडली
    १. खूप खूप प्रामाणिक भाव
    २. आणि रणरणत्या उन्हात अचानक पाऊस येतो तसं "चंदनी दुख्खः " जाणवलं ....

    जगत अनकंडीशनल काहीच नसत पण काही गोष्टी अश्या असतात की त्या पल्याडच्या असतात त्या अपेक्षा नसतात पण ती दुसर्यातल्या स्वताची जाणीव असते काळजी असते ( मला नीट मांडता आलं नाहीये ).....

    आणि कविता त्या जाणीवेचा प्रतिध्वनी आहे ...... ती एक प्रसन्न खिन्नता आहे ....एक मनात जपलेल मखमली दुख्खः आहे ...जे बोचर नाही हळवं आहे ....ती एक अमर्याद मर्यादा आहे ..... दुसर्याच्या अस्तित्वात विरघळून गेलेली ती आर्तता आहे .....

    ही अपेक्षा नाही हे स्वप्नही नाही हा प्रचंड कल्लोळ आहे .....नाजूक हळुवार अश्रू आहे ...खारा आहे पण सच्चा आहे खरा आहे .....

    खूप वेगळ्या वेदनांच्या प्रवासाला नेणारा हा प्रवास आहे ....

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...