Saturday, April 07, 2012

फुल्ल गोंधळ 'हाउसफुल्ल - २' - (Review -House full -2)

कितीही मोठे झालो तरी कधी कधी मोठ्ठ्या आकाशपाळण्यात बसल्यावर मजा येतेच ना? तस्संच, कितीही कळत असलं तरी कधी कधी काही सिनेमे लॉजिक-फिजीक.. डोकं-बिकं.. समज-बिमज.. बाजूला ठेवून पाहिले ना की सॉल्लिड मज्जा येते बुवा.. "हाउसफुल्ल -२" त्यातलाच एक..!
आजकाल विनोदी सिनेमा म्हटलं की प्रचंड गुंतागुंतीचं कथानक हे एक समीकरणच झालं आहे. इथेही तोच प्रकार आहे. 
चिंटू कपूर (ऋषी कपूर) आणि डब्बू कपूर (रणधीर कपूर) हे सावत्र भाऊ. चिंटू 'रिअल सन' आणि डब्बू 'नाजायाझ!' पण त्यांच्या वडिलांनी त्यांची ब्रिटनमधील कंपनी व इतर मिळकत दोघांच्याही नावावर समसमान केली असते. ह्यामुळे 'रिअल सन' चिंटू चा डब्बूवर  फार राग असतो. त्याची घृणा असते. आणि अर्थातच दोन्ही कुटुंबात हे वितुष्ट असते. भावजय-भावजय, बहिण-बहिण एकमेकांवर खार खाऊन असतात. असंच एका बाचाबाचीत चिंटू-डब्बू एकमेकांना आव्हान देतात की, "मी माझ्या मुलीचं लग्न ब्रिटनमधील 'सबसे अमीर खानदान में' करीन...!!" 
ईन कम्स 'पास्ता'! 
खाण्याचा नाही हो! 'आखरी पास्ता' (चंकी पांडे) हा 'लग्न जुळवायची कामं' करत असतो.. हो हो.. वधु-वर सूचन ! 'पास्ता' चिंटूकडे 'जय' (श्रेयस तळपदे)चं स्थळ घेऊन येतो. पण मस्तवाल चिंटू अद्वातद्वा बोलून जयच्या आईवडिलांचा असा काही अपमान करतो की आधीच 'कमजोर दिल के' जयचे वडील हृदयविकाराचा झटका येऊन थेट इस्पितळ गाठतात..
ईन कम्स 'जय'! 
वडिलांची ही अवस्था पाहून 'जय' पेटून उठतो. आणि ठरवतो की 'चिंटू'लाही असाच झटका देणार.. चिंटूला अतिश्रीमंत घरचं स्थळ हवं असतं ना? ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंतांपैकी एक 'जे.डी.' (मिथुन) चा मुलगा 'जॉली' (रितेश) त्याचा जिगरी दोस्त असतो. हे दोघे कॉलेजातल्या अस्सल बदमाश दोस्त ॅक्स (जॉन अब्राहम) सोबत मिळून चिंटूला धडा शिकविण्यासाठी एक प्लान आखतात. 'जे.डी.'चा मुलगा अशी ओळख सांगून लग्न ठरवायचं आणि अगदी ऐन वेळी स्वत:ची खरी ओळख सांगायची.. अस्सा झटका की डायरेक्ट हॉस्पिटलातच पोहोचवेल! ॅक्स खोटा 'जॉली - जे.डी.चा मुलगा' आणि जय त्याचा ड्रायव्हर बनतात. पण चुकून चिंटूऐवजी डब्बूकडे पोहोचतात! आता?
ईन कम्स 'सनी' (अक्षय कुमार)!
जय -जॉली चा कॉलेजातला अजून एक बदमाश दोस्त आणि ॅक्सचा जानी दुश्मन.. प्लान तोच.. टार्गेट - चिंटू. सनी खोटा जॉली बनून आणि जॉली त्याचा खोटा अंगरक्षक बनून चिंटूकडे दाखल होतात. 
ह्या कहाणीत हळूहळू करत गुंता वाढतच जातो.. खुमासदार संवाद, शाब्दिक कोट्या, यमकायमकी आणि प्रासंगिक विनोदातून हा गुंता तुम्हालाही गुरफटवून टाकतो आणि सरतेशेवटी सगळा गोंधळ कसाबसा उरकून गोड शेवट होतो! इतका पसारा मांडल्यावर अखेरीस घाई-घाईने उरक णं अपेक्षितच होतं.
काही ठिकाणी खो-खो हसवणारा हा सिनेमा काही ठिकाणी रेंगाळला आहेच आणि काही ठिकाणी गुंडाळलाही आहे. एकंदरीत हा विनोदाचा प्रयत्न आधीच्या 'हाउसफुल्ल' पेक्षा तरी बरा जमला आहे. पण मी अजूनही निखळ विनोदी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे, जो हृषीकेश मुखर्जी नंतर काही प्रमाणात प्रियदर्शनने केलाय आणि दिबाकर बानर्जीसारख्या अजून काहींनी एखाद सिनेमात (खोसला का घोसला) ती झलक दाखवली. पण साजीद खान कडून दर्जेदार विनोदाची अपेक्षा करणं हे जॉन अब्राहम कडून चांगल्या अभिनयाची अपेक्षा करण्यासारखंच! 
संगीताच्या (साजिद-वाजीद) नावाने खरोखरच अक्षरश: बोंबाबोंब आहे. इतकी की शब्दच कळू नयेत. कुठलीच चाल 'ओरिजिनल' वाटत नाही, इतकं हे संगीत घीसं पीटं आहे.  

ह्या सिनेमात 'नॉट टू मिस' म्हणावं असं काहीच नाही, पण बघितलाच तर डोकं आपटून घ्याल असाही काहीच नाही. (अपवाद - संगीत) पाचपैकी अडीच तारे देण्यास हरकत नसावी! 



No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...