Thursday, April 12, 2012

तुझी आठवण येते....


भिजऱ्या पाउलवाटा आणिक टपटप गळती पाने
दरवळ मृद्गंधाचा पाणी खळखळ झुळझुळवाणे
हळवी रिमझिम अंगणवेडी ठाव मनाचा घेते
धुंद लाघवी संध्याकाळी तुझी आठवण येते

मोत्यांनी चमचम करणारी हरिततृणांची पाती
सप्तसुरांची रंगसंगती तरळे क्षितिजावरती
गंधभारली झुळुक अनाहुत कानाशी गुणगुणते
नवी पालवी बघुन कोवळी तुझी आठवण येते

ओली वाळू फसफस लाटा अनवाणी पाऊले
भुरभुर पाऊस नकळत भिजवे थेंब-थेंब ओघळे
डबडबल्या डोळ्यातुन कविता गालावरून झरते
लोभसवाण्या कातरवेळी तुझी आठवण येते

चिंब चिंब तू चिंब चिंब मी आसमंत भिजलेला
गोजिरवाणा शब्द मनाचा ओठांवर थिजलेला
दोघांमधले अंतर क्षुल्लक तरी न सरले होते
असताना तू माझ्या जवळी.. तुझी आठवण येते....

....रसप....
१२ एप्रिल २०१२

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...