Thursday, April 07, 2011

छोटीसी बात

जैक्सन तोलाराम प्रा. लि. ची
फार जुनी परंपरा आहे
कंपनीतल्या प्रत्येकाने
प्रेमविवाहच केला आहे!

"अरुण"ची केस मात्र
जराशी वेगळी आहे
बोलायची हिंमतच नाही
सारं काही मनात आहे

सकाळ-संध्याकाळ "प्रभा"च्या
मागे-मागे जातो
तिने वळूनसुद्धा बघितलं तर
उलटा मागे फिरतो!

एकटाच आहे बिचारा
आई-बापाविना राहतो
सर्व काही चोख आहे
'विश्वासा'त मार खातो..

करता-करता हळूहळू
आपसूक ओळख वाढली
'प्रभा'च्याही मनामध्ये
अरुणचीच सावली!

पण बोलणार कसं समजेना
एक नंबर बावळट
दोघांच्या मध्ये घुसला
'नागेश' नामक चावट!

गुलाबाच्या काट्यासारखा
नागेश तिच्या सोबत असे
त्यासमोर गुमसुम गुमसुम
अरुण आणखीच बावळा दिसे

बाईक घेतली "फेल" झाली
अजून हसं झालं
मंत्र-तंत्र करूनदेखील
काहीच नाही झालं

शेवटचा उपाय म्हणून
खंडाळ्याला गेला
कर्नल जे. डब्ल्यू. एन. सिंगना
तडक जाउन भेटला

हा माणूस म्हणजे ना
अजब रसायन होतं
"ज्युलियस नगेन्द्रनाथ विल्फ्रेड" असं
विचित्र नाव होतं..

नावासारखीच ख्यातीसुद्धा
मोठी होती त्याची
स्मगलर, नेते, अभिनेते
मदत घेत त्याची

"व्यक्तीमत्त्व विकास" करण्यात
हातखंडा होता
सगळ्या समस्यांसाठी इथे
खास तोडगा होता

अरुणला यशस्वी करण्याचा
विडा त्याने उचलला
असा केला "ब्रेनवॉश", की
अरुण पूर्ण बदलला!

"कोर्स" पुरा करून अरुण
मुंबईला परतला
पावलोपावली "नागेश"ला
चीत करू लागला!

काहीतरी गडबड आहे
नागेशने जाणलं
'कर्नल'च्या फॉर्म्युलाला
त्याने अचूक ताडलं

"प्रभा"चे कान भरण्यास
त्याने सुरू केलं
पण प्रेम खरं होतं त्यांचं
तरीसुद्धा जिंकलं!

नागेशनेही धरली मग
खंडाळ्याची वाट
अरुण-प्रभाच्या प्रेमाची ही
"छोटीसी बात"!!


....रसप....
७ मार्च २०११

1 comment:

  1. Hi Ranjeet

    Very glad to come across your blog.

    Ha majha fav movie aahe aani hi kavita majhi fav kavita jhali aahe.

    Hats off to you...

    Baaap Kavita aahe

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...