Saturday, July 21, 2018

संक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)

क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' असलेल्या 'सैराट'चं सुधारित मिश्रण 'धडक' नावाने सिनेमागृहांत धडकलं आहे. मात्र आचरट प्रादेशिक अस्मिता आणि भयाण जातवास्तवाच्या सत्यकथनाबाबत असलेला एक अनाठायी आग्रह, 'धडक'ला मारक ठरणार, ही रिमेकची घोषणा झाली तेव्हापासून वाटत असलेली भीती अगदी सेंट-पर्सेंट खरी ठरत आहे. प्रत्यक्षात जातीभेदाने पोखरलेल्या ग्रामीण भागातलं अत्यंत वास्तववादी चित्रण वगळता बाकी काहीही विशेष नसलेल्या 'सैराट'च्या तब्बल तीन तासांच्या पसरट आणि रटाळ मांडणीसमोर 'धडक'चं अडीच तासांचं कथन खूप नेमकं आणि संक्षिप्त वाटतं. जातविस्तवाचे चटके 'धडक' देत नाही, हे मात्र खरं. तरी, 'धर्मा'चा चित्रपट आहे म्हटल्यावर त्याला जरासा 'टोन डाऊन' केलं जाणार, हे अपेक्षित ठेवायलाच हवं होतं म्हणून नंतरच्या नाकं मुरडण्यालाही अर्थ उरत नाही. 'धडक'चा खरा लेट डाऊन आहे, तो म्हणजे 'त्या'च्या मित्रांचा एकंदर भाग. सल्या-लंगड्या हे 'सैराट'च्या पूर्वार्धाची जान होते. सहाय्यक भूमिकांत सहाय्यक भूमिकेत असूनही 'तानाजी गालगुंडे'ने साकारलेला लंगड्या प्रदीप आजही सगळ्यांच्याच लक्षात आहे. 'श्रीधर वत्सर' आणि 'अंकित बिश्त' ह्यांची कामं उत्तम झाली असली, तरी त्या मानाने लक्षात राहण्यासारखी नाहीत. कारण एकूणच त्यांच्या 'ट्रॅक'मध्ये 'सैराट'वाली मजाही नाही आणि वावही नाही.

मराठीतून हिंदीत आणताना हे कथानक महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये गेलेलं आहे. उदयपूरमधील एक मोठ्या खानदानातली मुलगी 'पार्थवी सिंग' (जान्हवी कपूर) आणि उदयपूरमधल्याच एक हॉटेलव्यावसायिकाचा मुलगा मधुकर बागला (इशान खट्टर) ह्यांचं हे प्रकरण आहे. चित्रपटात २-३ वेळा 'वो लोग ऊँची जात के हैं' असा उल्लेख येत असला, तरी संघर्षाचं मुख्य कारण निवडणूक, राजकीय स्थानाला लागलेला धक्का असं सगळं आहे. 'सैराट'चं कथानक महाराष्ट्रातून हैद्राबादपर्यंत पोहोचतं, तर 'धडक'चं कथानक उदयपूरहून मुंबई व नागपूर व्हाया कोलकात्यात स्थिरावतं. ह्या संपूर्ण कथानकात 'धडक'ची कथा कुठेही अनावश्यक रेंगाळत, घुटमळत नाही. हा वाढवलेला वेग 'धडक'चं मुख्य आणि पहिलं बलस्थान आहे. 

दुसरं बलस्थान पात्रांची निवड आणि त्यांची कामं.
इशान खट्टर आणि जान्हवी कपूर, हे वशिल्याचे घोडे जरी असले तरी ठोकळे अजिबातच नाहीत. इशान खट्टर तर खूपच सहजाभिनय करणारा वाटला. मोठ्या भावाने सुरुवातीच्या सिनेमात जी चमक दाखवली होती, त्याची तुलना केली तर 'छोटे मियां भी सुभानअल्लाह' निघू शकतात, असा विश्वास वाटतो. चित्रपटातील बरेचसे प्रसंग मूळ चित्रपटातूनच घेतले असल्यामुळे त्या त्या जागी दोन कलाकारांची थेट तुलना नकळतच केली जाते. तिथे इशान आणि जान्हवी, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूपेक्षा खूप सरस ठरतात. (रिंकू राजगुरूला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आश्चर्यकारकच वाटला होता.) तरी, जान्हवी कपूरचा नवखेपणा जाणवत राहतो. खासकरून शेवटच्या प्रसंगात तिच्या मर्यादा स्पष्टपणे दिसून येतात. एरव्ही, दोघांची जोडी खूप टवटवीत आणि प्रभावीही वाटते.
आशुतोष राणाला ट्रेलर्समध्ये पाहताना खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. दुर्दैवाने, त्याच्या वाट्याला फारशी भूमिकाच नाही. मात्र वाट्याला आलेल्या काही मोजक्या प्रसंगांतही आतल्या गाठीचा, बेरक्या राजकारणी त्याने जबरदस्त वठवला आहेच. 
कहानी - १, कहानी - २, स्पेशल छब्बीस सारख्या चित्रपटांत सहाय्यक भूमिकांत दिसलेला 'खराज मुखर्जी' इथेही सहाय्यक भूमिकेत जान ओततो. 'सैराट'मध्ये छाया कदमनी साकारलेल्या कर्कश्य आक्काच्या जागी बंगाली बाबू 'सचिनदा' म्हणून खराज मुखर्जी आणणं, दोन चित्रपटांच्या उत्तरार्धांच्या तुलनेत 'धडक'चं पारडं जड करतं.
मधुकरचे मित्र म्हणून 'अंकित बिश्त' आणि 'श्रीधर वत्सर' विशेष लक्षात राहणार नाहीत, अशी काळजी बहुतेक लेखकाने घेतली आहे. कारण 'धडक' हा ठळकपणे दोन स्टारपुत्र व कन्येच्या लाँचिंगसाठीचाच चित्रपट आहे. (इशानचा ह्यापूर्वी येऊन गेलेला माजीद माजिदी दिग्दर्शित 'बिहाईंड द क्लाऊड्स' म्हणजे त्याचं व्यावसायिक हिंदी चित्रपटातलं 'लाँचिंग' नाहीच म्हणता येणार.) 



गाण्यांच्या पुनर्निर्मितीवरून खूप उलटसुलट मतप्रवाह आहेत. 'झिंगाट' आणि 'याड लागलं' ची नवीन वर्जन्स कानाला मराठी शब्दांची सवयच झालेली असल्यामुळे खटकत राहतात. मात्र विचार केल्यास, ही दोन्ही गाणी त्यांच्या गरजेनुसार अमिताभ भट्टाचार्यनी उत्तम लिहिलेली आहेत. 'ढूँढ गूगल पे जा के मेरे जैसा कोई मिलेगा कहाँ..' सारख्या ओळी कथानकाच्या ग्रामीण ते निमशहरी भागाकडे येण्याला साजेश्या आहेत. शीर्षक गीत 'धडक'ही उत्तम जमून आलं आहे. अजय-अतुलकडे असलेल्या येणाऱ्या चित्रपटांची यादी वजनदार आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तान, झीरो, सुपर 30, पानिपत आणि शमशेरा हे सगळे आगामी चित्रपट मोठ्या बॅनर्सचे आहेत. आत्तापर्यंतचं त्यांचं हिंदीतलं कामही दखलपात्र आहेच. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षाही जास्त आहेत.

'धडक'मध्ये ओरिजिनल जर काही असेल तर तो फक्त शेवट. 'सैराट'चाही तोच उच्चबिंदू होता. तो बिंदू बदलण्याची, तरी उंची कायम ठेवण्याची करामत शशांक खेताननी केली आहे. त्यांचे ह्या आधीचे चित्रपट काही विशेष दखलपात्र वाटले नव्हते आणि हाही चित्रपट जवळजवळ जसाच्या तसाच बनवलेला असल्याने फार काही प्रभाव मान्य करता येणार नाही. 

एकंदरीत, मूळ चित्रपटातील पसरटपणा वगळणारा, तसेच त्याला बऱ्यापैकी मवाळ करणारा 'धडक', एक स्वतंत्र चित्रपट म्हणून ठरवलं तरी पाहता येत नाही. 'सैराट'च्या प्रेमात पडलेल्या लोकांना प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमा जरी दाखवली, तरी ते आवडणार नाहीच, त्यामुळे उत्कटतेत नव्हे तर तीव्रतेत कमी असणारी ही प्रतिमा पसंतीस उतरणं कठीण आहे. मात्र, जर तुम्ही (माझ्याप्रमाणे) 'सैराट'ला 'एक बरा चित्रपट'हून जास्त काही मानत नसाल, तर 'धडक' नक्कीच पसंतीस उतरू शकतो. कारण जवळजवळ २० टक्क्यांनी कमी केलेली लांबी, हे 'धडक'चं बलस्थान खूप महत्वाचं आहे. 'धर्मा'चा असल्यामुळे निर्मितीमूल्यही वाढीव आहे. ते छायाचित्रणातून स्पष्ट जाणवतं. 

'सैराट' एकदा पाहून विसरून गेलेल्यांनी 'धडक'ही एकदा पाहून विसरून जाण्यास हरकत नसावी.

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...