Tuesday, June 10, 2014

खुशनुमा सहर !!

सकाळी ९:४२ ते ९:४७ च्या दरम्यानची वेळ.
ठाण्याहून दादर अन् दादरहून महालक्ष्मी ट्रेनने आणि महालक्ष्मीहून वरळी बसने, अश्या उड्या मारत आणि नेहरू सेंटरच्या स्टॉपवर उतरून रस्ता क्रॉस करून पलीकडच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील ऑफिसकडे, लिफ्टचा नाद सोडून, धाव घेत कसं-बसं ९:४५ चं 'पंचिंग' गाठायचं किंवा एखाद्या मिनिटाने चुकल्याने चुकचुकत ऑफिसमध्ये, आपल्या डिपार्टमेंटमध्ये शिरायचं, की उजवीकडच्या कोपऱ्यातून आवाज यायचा -

"खुशनुमा सहर, रणजित भाई !"

व्होराजी.
साधारण माझ्या वडिलांच्या वयाचे असतील. पण गुजराती परंपरेप्रमाणे ते सगळ्यांना 'भाई'च म्हणत, अगदी आमच्या 'हेड'लाही.

प्रचंड धावपळ करून, कावलेल्या चेहऱ्याने आम्ही ऑफिसला पोहोचायचो आणि व्होराजींचा प्रसन्न चेहरा एका क्षणात आमचा सगळा वैताग दूर करायचा.
'खुशनुमा सहर' हे ते फक्त मलाच म्हणत. बाकी सर्वांना 'गुड मॉर्निंग'. मी किंचित कवी आणि गायक आहे, हेच त्यांना मला जराशी स्पेशल ट्रीटमेंट देण्यासाठी पुरेसं होतं.
व्होराजी खरं तर निवृत्तीचं वय गाठलेले होते. त्यांना निवृत्तही व्हायचं होतं. पण कंपनीतील एक सर्वात जुना माणूस होता तो. त्यांना मालकांनी फक्त येत जा, जितकं जमेल तितकं काम करा, अशी मुभा दिली होती. व्होराजींचं म्हणणं एकच होतं. 'सर, अब मुझे म्युझिक सुनना है. जी भर के मुकेश सुनुंगा और गाऊँगा. यहाँ आऊंगा तो वक़्त नहीं मिलेगा !' सरांनी आयटीला ताबडतोब आदेश सोडला की, व्होराजींना फुल्ल इंटरनेट, साउंड कार्ड वगैरे जे काही लागेल सगळं देणे.
बस्स. काम उरकल्यावर उरलेल्या वेळात इतर लोक टवाळक्या करत, व्होराजी युट्युबवर मुकेश ऐकत. ऐकता ऐकता गुणगुणत...

'संग तुम्हारे दो घडी बीत गयें जो पल
जल भर के मेरे नैन में आज हुएँ ओझल
सुख लेके दुःख दे गयी दो अँखियाँ चंचल'

सुंदर गात. एकदम 'व्हॉइस ऑफ मुकेश'च. त्यांचं गाणं, गाणी ऐकणं सर्वांना मान्य होतं. मालकाने अप्रूव्ह केलं होतं म्हणून नाही. मनापासून. आमचा हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यांच्या अर्ध्या वयाचा असेल. त्याने मुकेशच काय, कुमार सानुच्या आधीचं काही ऐकलेलंच नव्हतं आणि इतर बहुतेक जणांनीही. पण तरी, व्होराजींचा 'चार्म' असा काही होता की लोक त्यांचा आवाज कानात साठवून घ्यायचे.

खरं तर मला मुकेश कधीच आवडला नाही. पण मुकेश गाणारे व्होराजी आवडायचे. जीवापाड प्रेम होतं त्यांचं मुकेशवर. आणि मग कधी जरा फुरसत मिळाली, मीही मोकळा असलो की लगेच एखादा नग्मा मलाही ऐकवायचे. अधूनमधून बाबूजीही ऐकत असत ते. 'सखी मंद झाल्या तारका..' त्यांनी गुजराती उच्चारांत मला ऐकवलं आहे. 'बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे..' नंतरचं त्यांचं 'वाह, क्या बात है' नेहमी लक्षात राहील.

कुणाचा वाढदिवस वगैरे असेल, तर आम्ही केक आणायचो. तेव्हा व्होराजींचं गाणं ठरलेलंच असायचं. अश्या कुठल्या छोटेखानी फंक्शन, पार्टीमध्ये, केक कापण्यात त्यांना काही रस नसायचा. त्यांना नंतर एखादं गाणं ऐकवायचं असायचं आणि माझ्याकडून ऐकायचं असायचं, बस्स. मग मीही एखादा किशोर कुमार गाऊन घ्यायचो !

'ऐसे उजड़े आशियाने तिनके उड़ गयें
बस्तियों तक आते आते रस्ते मुड़ गयें'

व्होराजी खुश ! जागेवर परत आल्यावर लगेच मला त्यांनी गायलेलं आणि मी गायलेलं, अशी दोन्ही गाणी युट्युबवर ऐकवत. उरलेला अख्खा दिवस त्या गाण्यांतच जगत, जगवत.

पावणे दोन वर्षं तिथे काम केल्यावर मी नोकरी बदलली. औरंगाबादला आलो. पण तरी व्होराजी आठवत राहिले. कुणी 'गुड मॉर्निंग' म्हटलं की ते आठवत. कुठे मुकेश कानावर पडला की, व्होराजी आठवत.
त्यांचा नंबर मिळवला आणि परवाच, जवळजवळ साडे चार वर्षांनी त्यांना फोन केला. त्यांनीच उचलला. त्यांच्या 'हलो'ला मी 'खुशनुमा सहर, व्होराजी' इतकंच म्हटलं.
समोरून आवाज आला.. 'अरे कैसे हो रणजित भाई !!'
व्वाह ! मस्त वाटलं. तीन शब्दांत कुणी आपला आवाज इतक्या वर्षांनंतरही ओळखतंय. पुढची काही मिनिटं दिलखुलास गप्पांत गेली. त्यांनीही कंपनी सोडली आहे, हे मागेच एकदा कळलं होतं. आता त्यांचं 'रुटीन' त्यांच्या मनासारखं आहे. म्हणाले - 'अब सारा दिन सिस्टम पे गाने सुनता हूँ. वाईफ कभी कभी परेशान हो जाती हैं. मगर सह लेती हैं ! हाहाहाहा!'

काही वेळेस आपसांत काही नातं नसतं. मैत्रीही नसते. कुठलीही ओढ नसते. पण दोन व्यक्तींमध्ये एखादा असा बारीकसा धागा असतो, जो त्यांना जोडत असतो. पण हा बारीकसा धागा इतका मजबूत असतो की काळाचा ताण कितीही वाढला तरी तो जसाच्या तसाच राहतो. 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावक:' अश्या आत्म्याचाच तो धागा असावा बहुधा.
माझ्यात आणि व्होराजींत असाच एक धागा आहे. जो कधीच तुटणार नाही.
त्यांनी मला आग्रहाची विनंती किंवा विनंती वजा आज्ञा केली आहे की, 'रणजित भाई, अगली बार मुंबई आओ, तो एक पूरा दिन कांदिवली आना हैं, मेरे घर. पूरा दिन गायेंगे. महफ़िल जमायेंगे.'

ज़रूर व्होराजी.. मैं ज़रूर आउंगा. मुझे मुकेश पसंद नहीं मगर फिर भी सुनूंगा और हो सके तो एक-दो मुकेशी नग्मे मैं भी सुनाऊंगा !

- रणजित पराडकर

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...