Saturday, December 01, 2012

वर्तमानात घेतलेला भविष्याचा शोध (Talaash - Movie Review)


अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली
कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. नसेल पटत तर एकदा रीमा कागती दिग्दर्शित 'तलाश' पाहा, कदाचित पटेल आणि तरीही नाही पटलं तर हरकत नाही. ओघ चालू आहे, कधी ना कधी पटेलच; अशी मला - रणजितला - एक वेडी खात्री आहे.

सुर्जनसिंह शेखावत उर्फ सूरी (आमीर खान) मुंबई पोलीसदलातील एक निरीक्षक असतो. नव्यानेच ह्या शहरात दाखल झालेल्या 'सूरी'कडे केस येते एका विचित्र अपघाताची. हा अपघात साधासुधा नसतो, कारण  तो फिल्म सुपरस्टार अरमान कपूरच्या गाडीला झालेला असतो आणि त्यात अरमान कपूर जागीच ठारही होतो. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वत:च्या घरापासून बरंच दूर, एका वेश्यावस्तीजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर, कुठलीही नशा केलेली नसताना, कधीच स्वत: गाडी न चालवणारा अरमान त्याच रात्री भरधाव गाडी का चालवत असतो? अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने त्याच्या अकौंटन्टकडून मोठी रक्कम का घेतलेली असते ? रस्त्यावर कुणीही नसताना अचानक रस्ता सोडून, त्याची गाडी समुद्रात का उडी घेते ? असे अनेक विचित्र प्रश्न ह्या केसला क्लिष्ट बनवत असतात. काहीच विशेष हाती लागत नसल्याने एक अन्सोल्वेबल केस म्हणून ही फाईल बंद करावी, असंही वाटत असतं.
दुसरीकडे, एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून नाव कमावलेला सूरी स्वत:ला एक कर्तव्यशून्य पिता मानत असतो. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याच्या अपरोक्ष अपघाती मरण पावलेला असतो. ह्या अकस्मात धक्क्यामुळे सूरी आणि त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) खूप अस्थिर असतात. दोघांतला संवाद खुंटलेला असतो. मनातल्या अपराधी भावनेमुळे सूरी अबोल, एकलकोंडा झालेला असतो. ह्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रात्रीची झोप हरवलेला सूरी बहुतेकवेळा रात्र-रात्र घराबाहेरच राहत असल्याने त्याचे व त्याच्या पत्नीचे नाते अजून बिघडत चाललेले असते.
अश्या विचित्र मानसिक व कौटुंबिक कोंडीत असलेल्या सूरीला एक अनाहूत वेश्या रोझी (करीना कपूर) अपघाताची केस सोडविण्यासाठी काही मदत करते आणि त्याला मानसिक आधारही देते. तो केसच्या मुळापर्यंत जाण्याच्या दिशेने झटू लागतो. हळूहळू गुंते उलगडत जातात आणि उघडकीस आलेले सत्य त्याचा वैयक्तिक आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही बदलते.

'तलाश' म्हणजे केवळ कुठली रहस्यकथा नाही किंवा फक्त एक भावनिक नाट्यही नाही. ही तलाश, हा शोध केवळ एका पोलिसाचा नसून एका पतीचा, पित्याचा आणि एका वेश्येचाही आहे. काही वेळी म्हणूनच आपल्याला असं वाटत राहातं की दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे ? थरारनाट्य की भावनाट्य ? उत्तर आहे - दोन्ही. फलित आहे - अप्रतिम !



सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच ! पण त्याने रंगवलेला सूरी व इन्स्पेक्टर शेखावत लाजवाब.
करीना व राणी, दोघींना मर्यादित वाव असला तरी दोघीही चोख काम करतात. राणी मुखर्जी खूप आकर्षक दिसते.
छोट्याश्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी परत एकदा आपली छाप पाडतो. त्याचा पाठलाग होत असतानाचा संपूर्ण भाग अतिशय थरारक झाला आहे.
पटकथा अजून जराशी आवळता आली असती, पण जशी आहे तशीही छानच !
दिग्दर्शिका रीमा कागती, दुसऱ्याच सिनेमात खूप प्रभावी पकड दाखवते.
बऱ्याच दिवसानंतर एका सिनेमात गाणी कानांवर बलात्कार करत नाहीत. त्यासाठी राम संपत ह्यांचे विशेष आभार !
हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!

काही ठिकाणी जराशी गती मंदावली असली, शेवट झाल्यानंतरही शेवट चालू ठेवला असला, तरी 'तलाश' नक्कीच ह्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहेच.

(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !)

रेटिंग - * * * 

3 comments:

  1. रणजीत !
    सर्वप्रथम सांगू इच्छितो कि तुझ्या चित्रपट परीक्षणाचा आपण पंखा आहे !
    त्यातून तुझी एक वेगळी शैली दिसून येते, त्यात तुझ्यातला समीक्षक जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त होतो, इतर स्वयंघोषित कविराजांच्या भिकार आणि टुकार कवितांना सुधारण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुझे हि लिखाण नक्कीच दर्जेदार आहे. चित्रपट परीक्षण हे प्रासंगिक / कालमर्यादित असले तरी इतिहास बनू पाहणाऱ्या काही अभिजात कलाकृतीचा तू साक्षदार असणार आहेस. तू या चित्रपटांचा पहिला शो पाहून त्यावर तुझे मत दिलेले आहे तेंव्हा ..... पुढील काळात तू किती खरा आहेस हे तुला या कलाकृतींचा आढावा घेतल्यानंतर नक्कीच दिसेल. प्रत्येक चित्रपटाचे परीक्षण लिहिताना तू ज्या पद्धतीने त्याची सुरवात करतो आहेत त्यातील उणीवा आणि जमेच्या बाजू मांडतो तो आहेत त्यात नक्कीच नाविन्य आहे आणि साहित्यिक मूल्य हि, मला तरी हे वाचायला आवडते आणि बरेच लोक हे वाचतात ... कदाचित हे लोक साहित्यिक लिखान वाचणारे नसतील ते मनोरंजन म्हणून वाचत असतील, पण जे मनोरंजन करते ते साहित्य नाही काय ? रंजीत्च्या चित्रपट परीक्षणाला त्याच्या बोलोग वर मिळणाऱ्या प्रतिसादाचे आकडे पाहता वेगळे सांगावे लागत नाही.

    चित्रपट पत्रकारित किंव्हा चित्रपट परीक्षण लिहिणाऱ्या लोकांची बरीच मोठी फळी मराठी / हिंदीत आहे. कदाचित एक दिवस असा असेल कि रणजीत ला चित्रपट परीक्षणासाठी 'निमंत्रण' येईल आणि लोक त्याच चित्रपट परीक्षण वाचून चित्रपट पाहावा कि नाही हे ठरवतील, इतकी विश्वहर्ता त्यात असेल. रणजीतला कवितांची जितकी आवड आहे तितकच वेड त्याला चित्रपटांच आहे, आणि त्यासाठी तो तितकीच मेहनत घेतो. सुट्टीच्या दिवशी चांगली ताणून देण्याचा मूड असताना 'पहिला शो' चुकेल म्हणून तो बाकी सगळ दूर ठेवून तो पहिला शो पाहतो (यात सोनमचा हात किती हा वादाचा विषय ठरेल :)) पण हे सातत्य टिकवणं साधी गोष्ट नाही.

    तुझे "जब तक है जान" या हिट चित्रपटाचे परीक्षण हि चांगलेच हिट झाले आहे हे आकडेवारी वरून दिसून येते आहे.
    तलाश चे हि परीक्षण ची छान जमले आहे ..... मला वाटते तसे पहिले तर सस्पेन्स चित्रपटांच्या समीक्षणात हात थोडा बांधला जातोच.

    ReplyDelete
  2. jabari chaluye karyakram...Rajeev Masand chya site sarkhi ekhadi jhakass site banav an tithehi post karat jaa..carry on...

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...