"प्यार की कोई 'एक्सपायरी डेट' नहीं होती." - असं एका दृश्यात जेव्हा बोमन इराणी म्हणतो तेव्हा म्हणावंसं वाटतं की "लेकीन, 'मॅन्युफॅक्चरिंग डेट' तो होती हैं ना ?" नक्कीच असते. किमान त्या-त्या वयात होणाऱ्या प्रेमाची जातकुळी तरी वेगळी असतेच आणि इथेच 'शिरीन-फरहाद..' कमी पडला. वयाची चाळीशी ओलांडलेल्या दोन अविवाहितांच्या भावविश्वास दाखविताना जरी एक हलका-फुलका सिनेमा बनवायचा दृष्टीकोन ठेवला असला, तरी केवळ एका दृश्याचा अपवाद वगळता - त्यातही सौजन्य, बोमन इराणी - कुठेच सिनेमा अपेक्षित भावनिक उंची गाठत नाही.
'फरहाद पस्ताकीया' (बोमन इराणी) एक ४५ वर्षांचा अविवाहित पारशी 'मुलगा', आई नर्गिस (हनी इराणी) आणि आजीसोबत राहात असतो. एका ब्रा-पँटी च्या शो-रूम मध्ये सेल्समनची नोकरी करणारा फरहाद खूप सरळसाधा असतो. त्याच्या लग्न न होण्यामागे त्याची ही 'भुक्कड' नोकरीही कारणीभूत असते. शेकडो मुली बघूनही त्याला त्याच्या नोकरीमुळे कुणी पसंत करत नसते. पण फरहाद आपल्या नोकरीशी प्रामाणिक असतो.
दुसरीकडे, 'शिरीन फुग्गावाला' (फराह खान) पारसी ट्रस्ट ची सचिव असते. पस्ताकीयांच्या घरात लावलेल्या बेकायदेशीर पाण्याच्या टाकीबद्दल ती नोटीस बजावते आणि फरहादच्या वडिलांनी २५ वर्षांपूर्वी बसवलेली ती टाकी पाडते.
शिरीन-फरहाद ची पहिली भेट शो-रूममध्ये झालेली असते आणि ती त्याला पहिल्या नजरेतच आवडलेली असते. टाकी पाडली, म्हणून नर्गिसचा शिरीनवर असलेला राग, फरहाद शिरीनला घरी घेऊन येतो तेव्हा शिरीनने 'त्या टाकीवाल्या बिनडोक बाईला' अनावधानाने घातलेल्या शिव्यांमुळे अजूनच वाढतो आणि ती फरहाद-शिरीनच्या लग्नाला साफ नकार देते.
लेकीन, प्यार को कौन रोक सकता हैं?? पुढची स्टोरी सांगायची आवश्यकता नसावी.
बाकी सर्व ठीक आहे, पण ही कहाणी प्रमुख व्यक्तिरेखांच्या वयाशी न्याय करत नाही. हे जे काही होतं, ते होण्यासाठी हिरो-हिरोईन २६-२७ वर्षांचेही चालले असते की ! - असो.
बोमन-फराह जोडी म्हणजे एका बाजूने ग्लेन मॅकग्रा आणि दुसऱ्या बाजूने जोगिंदर शर्मा ने गोलंदाजी करावी इतकी विजोड वाटते. फराह खान इंडिअन आयडॉलच्या परीक्षकाच्या खुर्चीत बसल्यासारखी त्याच टिपिकल एका सुरात संवाद 'फेकते'. दिसते चांगली आणि मध्यमवर्गीय पारसी स्त्री म्हणून शोभतेही पण पहिल्यापासून शेवटपर्यंत एकदाही तिच्यात 'फराह खान' सोडून इतर कुठल्याही व्यक्तिरेखेचा आभासही होत नाही, 'शिरीन'सुद्धा नाही. तिची कमजोरी बोमन इराणी च्या 'Flawless' अदाकारीसमोर जास्तच प्रकर्षाने जाणवते.
सिनेमाच्या उत्तरार्धात दोघांत होणारं भांडण आणि अगदी शेवटी फरहादला पोलिसांनी पकडणं वगैरे तर कृत्रिम नाट्यनिर्मितीचा साफ फसलेला प्रयोग आहे. कारण ह्या घडलेल्या रामायणांचा 'फॉलोअप' दृश्यांत काही संदर्भच येत नाही!
संगीतकार जीत गांगुली चे काम कर्णमधूर आहे. खासकरून 'कुकूडूकू' आणि 'राम्भा मे सांबा' ही गाणी छान जमली आहेत.
एकंदरीत, बासू चटर्जी वाल्या पारसी सिनेमांच्या समोर ह्या सिनेमाला ठेवणार असाल तर घरात बसूनसुद्धा पाहू नका. पण पुढे-मागे टीव्हीवर जेव्हा हा सिनेमा येईल, तेव्हा अगदीच काही बघण्यासारखं नसेल, तर त्या दाक्षिणात्य डब्डं सिनेमांपेक्षा निश्चितच सरस मनोरंजन आहे!
रेटिंग - * *