Saturday, December 16, 2017

जगाला तू हवा आहेस बहुधा (तरही)

तरही - जगाला तू हवा आहेस बहुधा 
(ओळीसाठी श्री. भूषण कटककर 'बेफिकीर' ह्यांचे आभार)

गझलचा पाचवा आहेस बहुधा
जगाला तू हवा आहेस बहुधा

तुझा आवाजही संतृप्त करतो
यमन वा मारवा आहेस बहुधा

कशासाठी तुला त्यांनी निवडले ?
लुटारू, पण नवा आहेस बहुधा

जवळ येताच तू येतो शहारा
उन्हाळी गारवा आहेस बहुधा

तुझ्याहुन सर्व तेजस्वीच असती
चमकता काजवा आहेस बहुधा

कधी येणार तू नाहीस नक्की
उद्याचा तेरवा आहेस बहुधा

तुझ्या नशिबात बदनामीच दिसते
मराठा पेशवा आहेस बहुधा

....रसप....
१६ डिसेंबर २०१७

Monday, November 20, 2017

सत्यकाम - एक निखारा (Movie Review - Satyakam)

आजचं जग, आजचा काळ खूप वेगवान आहे. इंटरनेटमुळे माध्यमं सहज उपलब्ध आहेत. व्यक्त होणंही अतिशय सोपं झालेलं आहे. आज खूप सहजपणे आपणच आपली एखादी विचारधारा ठरवून मोकळे होतो. 'मी अमुक-एक-वादी आहे', असं फार लौकर मानतच नाही, तर तसा काळात नकळत प्रचारही करत सुटतो. पण कुठल्याही प्रकारचा 'वाद', म्हणजेच तत्वज्ञान, विचारपद्धती स्वीकारणं, अंगिकारणं म्हणजे 'पूर्ण सत्या'चा पुरस्कार, अंगिकार करण्यासारखं असतं. मात्र आपण मात्र नेहमीच सोयीस्कर सत्य स्वीकारत असतो. कारण पूर्ण सत्य हे 'अॅब्सोल्यूट अल्कोहोल'सारखं असतं. पचवायला कठीण किंवा अशक्य तर सोडाच, गिळायलाच असह्य. कुठलाही 'इझम'ही असाच. मग तो जात, धर्म, भाषा, प्रांत विषयक असो की लिंगविषयक. जितकं आपल्याला सोयीचं असतं, तितकंच आपण पाळत असतो. जर एखाद्याने फक्त पूर्ण सत्यच स्वीकारायचं ठरवलं, तर ते किती कठीण आहे, हे लक्षात येण्यासाठी 'सत्यकाम' पाहावा. 



१९६९ साली आलेला 'सत्यकाम' म्हणजे हृषीकेश मुखर्जींचा एक मास्टरपीस. हा सिनेमा 'सत्यप्रिय आचार्य' (धर्मेंद्र) ह्या तरुण इंजिनियरची कहाणी सांगतो. स्वातंत्र्याचे पडघम वाजत असतानाच्या दिवसांत शिक्षण संपवून बाहेर पडलेल्या, एका नवीन देशाला घडवण्याची प्रचंड मोठी जबाबदारी खांद्यावर असलेल्या पिढीचा 'सत्यप्रिय', त्याच्या पिढीच्या इतर मुलांसारखा कधीच नसतो. त्याचं पालनपोषण त्याच्या आजोबांनी - सत्यशरण आचार्य (अशोक कुमार) ह्यांनी - केलेलं असतं. लहानपणापासून त्याला नावाप्रमाणेच 'सत्यप्रिय' घडवलेलं असतं. हे संपूर्ण घराणंच सत्यशोधाच्या कार्यास वाहिलेलं असतं, म्हणूनच त्यांच्यापैकी सर्वांची नावं 'सत्य' पासूनच सुरु होत असतात. इंजिनियर झालेल्या 'सत्यप्रिय'ला त्याची पहिली नोकरी मुंबईच्या एका कंपनीत मिळते आणि पहिल्याच दिवशी त्याला कामानिमित्त 'भवानीगढ'ला पाठवण्यात येतं. 'भवानीगढ' हे भारतातल्या शेकडो संस्थानांपैकी एक. स्वतंत्र भारताच्या नवोदयाच्या वेळी संस्थानं खालसा होऊन अस्त पावत होती. अश्या एका नाजूक काळात, एका संशयास्पद मोहिमेसाठी 'भवानीगढ'ला आलेला सत्यप्रिय तिथल्या राजाच्या शोषणातून 'रंजना' (शर्मिला टागोर) ला मुक्त करून सोबत घेऊन येतो. एका वेश्येची मुलगी, जिला राजापासून एक मूलही होणार असतं, तिला तो स्वीकारतो. आपल्या घरी ह्याचा स्वीकार होणार नाही, हे माहित असतानाही तो काहीही लपवत नाही आणि घराशी संबंधही तुटतात.
इथून पुढे सुरु होतो एका संघर्षमय आयुष्याचा अविश्रांत प्रवास. ह्या प्रवासात 'सत्यप्रिय'सोबत त्याची पत्नी आणि मुलाचीही परवड होते. हे सगळं कथानक आपण 'नरेन शर्मा' (संजीव कुमार) ह्या 'सत्यप्रिय'च्या जिवलग मित्राकडूनच ऐकत असतो. एकाच वेळी इंजिनियर झालेले हे दोघे मित्र आपापल्या 'जुळवून घेण्या/ न घेण्याच्या' क्षमते व इच्छेमुळे अर्थातच परस्परविरुद्ध आयुष्य जगत असतात. 'सत्यप्रिय'ची स्वत:च्या तत्वनिष्ठतेपायी होणारी फरफट नरेन पाहत असतो, जाणत असतो. पण कुठल्याही परिस्थितीत स्वत:च्या सत्यनिष्ठतेशी आणि तत्वनिष्ठतेशी जराशीसुद्धा तडजोड न करू शकणारा सत्यप्रिय आपला हट्ट सोडणाऱ्यांतलाही नसतो. 
सततच्या संघर्ष, अस्थैर्य आणि ताणतणावामुळे 'सत्यप्रिय'ची आर्थिक आणि शारीरिक अवस्था दिवसेंदिवस बिकट होत जाते. 




त्याचा हा संघर्ष, त्याची तत्वनिष्ठता त्याला कुठेपर्यंत नेतात ? ह्या सगळ्या त्याच्या प्रवासात त्याची पत्नी आणि मुलाची भूमिका कशी असते ? त्याचे आजोबा आणि मित्र नरेन त्याला कशी साथ देतात ? ठिकठिकाणच्या नोकऱ्या करताना त्याने नाराज केलेले अनेक लोक कोण असतात ? नरेनशिवाय कुणीच त्याला समजून घेत नाही का ? अशी अनेक उत्तरं इथे देता येऊ शकतील. ती देण्या किंवा न देण्यामागे काही कारणही नाही. पण सिनेमाची शिकवण ह्या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. 
'सच्चाई एक अंगारे की तरह हैं, जिसे हाथ पर रखो और हाथ न जले ऐसा नहीं हो सकता' हे म्हणणारा 'सत्यप्रिय' हेच सांगत असतो की, सत्य नग्न, उष्ण, धारदार वगैरे असतं. त्यावर घट्ट पकड ठेवण्यासाठी प्रचंड वेदना, यातना सहन कराव्या लागतात. 


'नारायण सन्याल' ह्यांचं हे कथानक आहे, तर 'साजेन्द्र सिंग बेदी' ह्यांचे संवाद. खूप सहजपणे खूप मोठं तत्वज्ञान हे दोघे आपल्यासमोर मांडतात. ह्यातले संवाद टाळ्या घेणारे नाहीत, दाद घेणारे आहेत. ही कहाणी बॉक्स ऑफिसवर गल्ला भरणारीही नाही, पण डोळे भरून आणणारी आहे. हृषिदांच्या सिनेमांची ही एक खासियतही आहेच की कळसाध्याय गाठताना काळीज पिळवटलं जातं. 'आनंद' असो वा 'बावर्ची', शेवटी रडवतोच. 'सत्यकाम' त्याला अपवाद नाहीच. स्वत: हृषिदांचा आवडता असलेला हा सिनेमा धर्मेंद्रकडून त्याच्या आयुष्यातलं सर्वोत्कृष्ट काम करवून घेतो. 'धर्मेंद्रला अभिनय येत नाही' अश्या सर्वमान्य समजाला स्वत: धर्मेंद्र ह्या सिनेमात उभा छेद देतो. 'शर्मिला टागोर' व्यावसायिक पातळीवर जरी खूप नावाजली असली, तरी एक अभिनेत्री म्हणून माझ्या मते जरा दुर्लक्षित राहिली आहे. अनेक सिनेमांतून तिने स्वत:ची कुवत दाखवून दिली आहे. 'रंजना'ची ओढाताण, घुसमट तिने जबरदस्त सादर केली आहे. 'संजीव कुमार' तर सर्वोत्कृष्ट भारतीय अभिनेत्यांपैकी एक असावा. सहाय्यक असला, तरी छाप सोडतोच. अशोक कुमारची दाढी आणि केस अंमळ विनोदी वाटत असले, तरी he carries them with grace. शेवटच्या एका प्रसंगात हा माणूस स्वत:ची महानता सिद्ध करतो. 



लक्ष्मी-प्यारेंचं संगीत आणि पार्श्वसंगीत अर्थातच सुमधुर आहे. गाणी फारशी गाजली नाहीत, सिनेमाही व्यावसायिक पातळीवर अपयशीच होता. 
सुरुवातीचा बराचसा भाग जरा अनावश्यक आणि रेंगाळलेला आहे. पण त्या काळातल्या सिनेमांचा विचार करता ते साहजिकही आहेच. 'बिमल रॉय' स्कूलमधून हृषिदा पुढे आले आहेत. स्वत: बिमलदांचे मास्टरपीसही धीमे आणि पसरट होतेच. मात्र हा अनावश्यक व रेंगाळलेला भागही अगदीच निरर्थकही नाहीय. 

'सत्यकाम' एक असा सिनेमा आहे, जो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवा. दुनियेत फक्त चांगलं आणि वाईट अश्या दोनच गोष्टी नसतात. आयुष्य हे काही कुठलं नाणं नाहीय ज्याचा एक तर छापाच पडेल किंवा काटाच. त्याला अनेक बाजू आहेत पैलू आहेत. काळा आणि पांढरा ह्या दोघांच्या दरम्यान अगणित रंगछटा असतात. पूर्ण सत्य, सत्य, सोयीस्कर सत्य, सोयीस्कर खोटं, खोटं आणि पूर्ण खोटं अश्याही अनेक पायऱ्या असू शकतात. आपण ह्यांपैकी कुठल्या पायरीवर आहोत, आपला रंग कोणता आहे हे एखादा सिनेमा चुटकीसरशी आपल्याला जाणवून देणार नाहीच. मात्र त्याचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करायला असा एखादा सिनेमा निमित्त ठरू शकतो.

सत्यास शोधले होते, सत्यास मांडलेसुद्धा
पण सत्य नग्न असते हे आवडणे बाकी आहे


- रणजित पराडकर 

Friday, November 17, 2017

अतर्क्य, अचाट तरीही सपाट जन्म (Movie Review - Baapjanma)

( टीप - सिनेमा प्रदर्शित होऊन जवळजवळ दीड महिना उलटून गेला आहे. त्यामुळे प्रस्तुत लेखात कथानक उलगडताना हात आखडता घेतलेला नाहीय. )

पन्नास षटकांचा क्रिकेट सामना. निर्जीव खेळपट्टी. बोथट गोलंदाजी. पाच फलंदाज प्रत्येकी पन्नास धावा करतात आणि तेसुद्धा दर षटकाला बरोब्बर पाच एकेरी धावा धावून. संपूर्ण पन्नास षटकांत एकसुद्धा चौकार किंवा षटकार नाही. इतकंच काय, चेंडू जोरात किंवा उंचावरून फटकावण्याचाही प्रयत्न नाही. सगळं कसं 'ऑल अलाँग द ग्राऊण्ड', कॉपी-बुक शॉट्स, प्लेईंग इन द 'व्ही' वगैरे. जणू काही हा क्रिकेट सामना नसून नेट प्रॅक्टीसच चालली असावी.
कोण खेळतं असं ? सुनील गावस्करनी एकदा पूर्ण साठ षटकं खेळपट्टीवर उभं राहून छत्तीस धावा केल्या होत्या. But, gone are those days now.
पण मराठी चित्रपटांना मात्र असा सपाट खेळ करायची आवडच जडलेली दिसतेय सध्या. सिनेमाभर काहीही विशेष न घडणाऱ्या कथानकांचे सिनेमे बनवायचं एक 'फॅड'च आलंय बहुतेक. असं सपाट काही तरी बनवलं की ते कलात्मक वगैरे मानलं जात असावं. जितकं जास्त सपाट, तितकं जास्त कलात्मक !


'बापजन्म' ह्या सपाटपणाच्या मोजपट्टीवर साधारणपणे मध्याच्या थोडंसं पुढे वगैरे असावा. 'रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग' अर्थात 'रॉ'साठी आयुष्यभर यशस्वीपणे काम करून निवृत्त झालेला एक सीक्रेट एजंट 'भास्कर पंडित' (सचिन खेडेकर) पत्नीच्या निधनानंतर पुण्यात एकटाच राहतो आहे. आयुष्यभर जाणीवपूर्वक कमीत कमी भावनिक ओढ ठेवल्याने मुलांशी संबंध संपुष्टातच आल्यात जमा. आपल्याला कॅन्सर असून फार तर वर्षभराचं आयुष्यच आता हाती उरलं आहे, हे समजल्यावर त्याच्या मनात कालवाकालव सुरु होते. मुलांना भेटायची ओढ लागते. पण मुलांशी संबंध इतके वाईट असतात की त्याने नुसतं बोलावल्याने ती येणार नाहीत, ह्याचीही खात्री असते.
प्रश्न - अश्या वेळी तो काय करतो ?
उत्तर - आचरटपणा.
प्रश्न - कसा ?
उत्तर - स्वत:च्या मृत्यूचं नाटक रचतो. जेणेकरून मुलं नक्की येतील.
प्रश्न - मग ती येतात आणि सारं काही सुरळीत होतं का ?
उत्तर - येतात की ! पण तरीही तो त्यांना सोडून एकta राहायला दूर अज्ञातवासात निघून जातो !
प्रश्न - म्हणजे त्यांच्यासाठी मेलेलाच राहतो ?
उत्तर - मुलाला सगळं सांगतो, मुलीला नाही सांगत !
प्रश्न - अरे मग हेच आधी का नाही करत ? किंवा जर निघूनच जायचं होतं तर इतकी नौटंकी का करतो ? केलीच आहे तर थांबत का नाही ? मुलाला सांगतो, तसं मुलीलाही का सांगत नाही ?
उत्तर - आवरा !!

एका अस्सल अचाट आणि अतर्क्य कथानकात भरपूर पाणी घालून एक अत्यंत पांचट सिनेमा कसा बनवावा, त्याचा हा परिपाठ !
मुलं नाराज आहेत, त्यांना एकदा पाहायचंय वगैरे कुठल्याही कारणाने कुणी स्वत:च्या मृत्यूचं नाटक का रचेल ? मी देशाच्या सेवेत इतकी वर्षं अमुक अमुक करत होतो, हे सांगितल्यावर ती मुलं समजून घेणार नाहीत का ? मुलगा घेतोच की ! बरं, नसतीलच जर घेणार आणि समजून घेतल्यावरही सारं काही सोडून निघून जाणंच फायनल असेल तर मग ही जबरदस्तीची सगळी जुळवाजुळव कशासाठी ?
मग हा सगळा भावनिक मूर्खपणा जस्टीफाय करण्यासाठी भास्कर पंडितला कॅन्सर वगैरे झाला असल्याचं एक ठिगळ जोडणं. घरात कॅमेरे लावून सगळ्यांना पाहू, त्यांनी घरी यावं म्हणून मेल्याचं नाटक करू असल्या आयडिया डोक्यात येण्यासाठी शेजारच्या 'आपटे' काकांच्या पात्राचं अजून एक ठिगळ !
मेलेल्या व्यक्तीच्या पायाला हात लावल्यावर 'शरीर थंड का लागत नाहीय?' असा प्राथमिक प्रश्नही कुणाला पडत नाही.
आईच्या बाजूला निजलेल्या दीड-दोन वर्षांच्या लहान बाळाला आजोबा उचलून घेऊन जातो. त्याआधी ते लहान बाळ चुळबूळ करतं, आवाजही करतं. काही तास ते बाळ तिथे नसतं, त्या काळात आई कूसही बदलते. पण तिला अजिबात जाणवतही नाही की आपलं बाळ आपल्या जवळ नाहीय ! अशी कुठली आई असते ?
हे असे साधे प्रश्न कुणाला पडूही नयेत, ह्याचं वैषम्य वाटतं.
त्याहून वैषम्य ह्याचं वाटतं की अश्या आचरट सिनेमावर अनेक लोक स्तुतीसुमनांचा वर्षाव करत आहेत. का बरं ? मराठी आहे म्हणून ? ह्या फडतूस अस्मितांमधून बाहेर पडून एखाद्या कलाकृतीचा 'एक कलाकृती' म्हणून आपण कधी आस्वाद घेणार ?

टीचभर कथेवर रचलेली सुमार पटकथा असली तरी सचिन खेडेकर, शर्वरी लोहकरे आणि सत्यजित पटवर्धन ह्या
तिघा मुख्य कलाकारांची कामं अप्रतिम वाटली. पण पुष्कराज चिरपुटकरचा नोकर 'माउली' प्रचंड कंटाळवाणा आहे. गाणी श्रवणीय आहेत आणि पार्श्वसंगीतही आवडलं.

माझ्यासारखे अनेक सिनेरसिक मराठी सिनेमाकडे एक 'प्रायोगिक सिनेमा' म्हणून पाहतात. मात्र गेल्या काही काळापासून हे 'काहीही न घडणाऱ्या' सिनेमांचं जे पीक आलं आहे, त्यामुळे ही प्रायोगिकता नकोशी वाटायला लागेल, अशी भीतीही वाटते आहे. मराठी सिनेमा तमाश्याच्या फडातून बाहेर पडला, त्यानंतर थिल्लर विनोद करत बसला आणि आता ह्या सपाटपणात रमला आहे, असं वाटतंय. जर सिनेमा प्रेक्षकांना गुंतवणार, आकर्षित करणार नसेल तर प्रेक्षकाने त्याला टाळल्याचीही त्याला तक्रार नसावी.


रेटिंग - * *

- रणजित पराडकर 

Tuesday, October 03, 2017

एक परफेक्ट नॉनसेन्स ! - जुडवा - २ (Movie Review - Judwaa 2)

व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला होता - 'Sins are like Credit Card. Enjoy now, pay later!'
एन्जॉय करून झालं आहे, आता पे-बॅक करतो !


पहिला जुडवा खूप पूर्वी पाहिला होता. इतका फरगेटेबल की, तो एकसलग पाहिला होता की तुकड्या-तुकड्यांत तेही आठवत नाहीय आता ! त्यावेळी तर सलमान जामच सुमार होता, त्यामुळे असह्यही होता. पुन्हा कधी तो पाहायची हिंमत करावीशीच वाटली नव्हती. (सलमान आता पुन्हा सुमार झाला आहे. 'सुमार -> अतिसुमार -> बरा -> सहनीय -> सुमार' असा ग्राफ असलेला हा एकमेव 'अ‍ॅक्टर(?)' असावा बहुतेक !)
रिमेकसुद्धा पाहिला नसताच पण, स्त्री-हट्टापुढे कुणाचे काय चालणार ? मॅडमनी हुकुम सोडला आणि मी गपगुमान तिच्यासोबत गेलो. खरं तर तिने हट्टाने पाहायला लावलेल्या काही सिनेमांच्या आठवणी भयाण आहेत. उदा. - जब तक हैं जान, हॅप्पी न्यू इयर, तीस मार खान, दिलवाले, वगैरे. अर्थात, चेन्नई एक्स्प्रेस, फॅन, रईस अश्या शाहरुखपटांनी जरासा बॅलन्सही केला होता. पण तरी भयाण आठवणी स्वत:चा भयाणपणा कधी कमी होऊ देत नसतातच. त्यामुळे मनात धाकधूक घेऊनच गेलो 'जुडवा-२' ला.
ह्या धाकधुकीचं दुसरं कारण म्हणजे धवनपुत्र ! 'वरुण धवन' हा वरून, खालून, डावी-उजवीकडून सगळीकडूनच सल्लूइतका उल्लू नसला, तरी ती दोन गरीबांमधली भाग्यवान तुलनाच आहे. 'बदलापूर'मध्ये तो मला आवडला होता. अगदी, 'ढिशुम'मध्येही आवडला होता. पण तसा तर सल्लूसुद्धा 'दबंग' आणि 'वॉण्टेड' मध्ये आवडला आहेच.
असो.

तर 'जुडवा-२' पाहिला आणि चक्क आवडलाही !
फार ताणला आहे आणि शेवटाकडे अगदीच रिडीक्युलसोत्तम वगैरे लेव्हल गाठली आहे, पण तरी ओव्हरऑल मजा आलीच ! अनेक वेळा खळखळून हसलो.. अनेक वेळा गडगडाटीसुद्धा हसलो ! जुन्या 'जुडवा'मधल्या सल्लूच्या टुकार आठवणी वरुणने पुसून टाकल्या आहेत. अर्थात, सिनेमा संपल्यावर सल्लू पडद्यावर डोकावून जातोच आणि मजबूत पीळतोच. पण ते 'सिनेमा संपल्यावर' असल्यामुळे तेव्हढा भाग आपण नाही पाहिला तरी चालतंय.

सिनेमाचं कथानक सर्वांना माहित असावंच. त्यामुळे त्यावर रेंगाळत बसत नाहीय. डायरेक्ट काय आवडलं, काय नाही, ह्यावरच येतो.

'जॅकलिन फर्नांडीस' ही मला पूर्वी अजिबात आवडायची नाही. (Yes ! I am sorry for this !) पण आता हळूहळू आपुन का उस पे दिल आ रैलाय. जामच खट्याळ सौंदर्य आहे हे ! तिचा स्क्रीन प्रेझेन्स चिल्ड बियरच्या पहिल्या घोटासारखा असतो. अतिशय बोलका चेहरा, जबरदस्त आत्मविश्वास, दिलखेचक अदा आणि डवरलेल्या मोगऱ्याचं सौंदर्य असं डेडली कॉम्बिनेशन असलेली ही गुलबदन नशिल्या नजरेने सटासट बाण सोडून घायाळ करते !
ऑन द अदर हॅण्ड, 'तापसी पन्नू' म्हणजे उकडलेल्या भाज्यांच्या सलाडसारखी अळणी, बेचव वाटते. तिने बेबी, नाम शबाना, पिंक सारखे सिनेमेच करावेत. रोमॅण्टिक वगैरे रोल्समध्ये तिचा खप्पड मरतुकडेपणा फारच खटकतो. जोडीला जॅकलिन असल्यामुळे तर ती जास्तच मिसफिट वाटते.
राजपाल यादवने शक्ती कपूरची इरिटेटिंग उणीव भरून काढली आहे. प्रचंड बोअर करतो !
खेडेकर, खेर, झाकीर हुसेन वगैरे मंडळी मस्तच, पण सपोर्ट कास्टमध्ये भाव खाललाय तो लंडनमधला पोलीस ऑफिसरच्या भूमिकेतल्या 'पवन मल्होत्रा'ने !

'म्युझिक' नावाचा भिकार प्रयत्न चांगला जमून आलाय. कारण ते उच्चतम भिकार बनलं आहे. पण आत्तापर्यंत आपण सुमार संगीताला सहन करण्याची दुर्दैवी सवय करून घेतलेली आहे, त्यामुळे ह्या भिकारपणाबद्दल काही वाईट वाटत नाही.

'डेव्हिड धवन' हे एक अजब रसायन आहे. पंचवीस वर्षं झाली, हा माणूस प्रेक्षकांची नस पकडून आहे. प्रेक्षक बदलतो, तसा हा पुन्हा नव्याने नस पकडतो आहे. वीस वर्षांपूर्वीच्या 'जुडवा'ला पुन्हा घेऊन येताना त्याने योग्य तो मसाला वाढवला आहे आणि नको तो कमीही केला आहे. बिनडोक सिनेमा बनवावा, तर तो डेव्हिड धवनने. बाकी कुणाचं काम नाही ते. कारण प्रत्येक जण, स्वत:च्याच नकळत असेल पण, कुठे न कुठे तरी जरासा सेन्सिबल वगैरे होतो आणि मग सगळं मिसमॅच होतं. 'अथ:'पासून 'इति'पर्यंत 'नॉट-टू-मेक-सेन्स' हे सूत्र जपणं, नक्कीच सोपं नसावं. जाणीवपूर्वक आउटराईट नॉनसेन्स करण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता लागते, हे निश्चितच.
इथेच भन्साळीसारखे लोक कमी पडतात. कारण त्यांच्या स्वत:च्या नकळत 'नॉनसेन्स' बनत असतो आणि डेव्हिड धवनसारखे लोक विचारपूर्वक 'नॉनसेन्स' बनवतात. हाच परफेक्शनचा फरक असावा. 'जुडवा' हा एक परफेक्ट नॉनसेन्स आहे. ह्या कहाणीची मुळं 'जॅकी चॅन' च्या 'ट्विन ड्रॅगोन' नामक सिनेमापर्यंत जातात असं म्हणतात. जातही असतील, अपने को क्या ! तूर्तास तरी 'मॅडम'चा हट्ट पुरवण्यापूर्वी जी धाकधूक मनात होती, तिच्या जागी 'रिफ्रेश' झाल्याचं फिलिंग आलं आहे. कारण आपल्या रटाळ रुटीनमधून बाहेर पडण्यासाठी कधी कधी एखादा आउटराईट नॉनसेन्स असलेला मूव्ही रामबाण उपाय ठरत असतो !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...