Friday, November 17, 2017

अतर्क्य, अचाट तरीही सपाट जन्म (Movie Review - Baapjanma)

( टीप - सिनेमा प्रदर्शित होऊन जवळजवळ दीड महिना उलटून गेला आहे. त्यामुळे प्रस्तुत लेखात कथानक उलगडताना हात आखडता घेतलेला नाहीय. )

पन्नास षटकांचा क्रिकेट सामना. निर्जीव खेळपट्टी. बोथट गोलंदाजी. पाच फलंदाज प्रत्येकी पन्नास धावा करतात आणि तेसुद्धा दर षटकाला बरोब्बर पाच एकेरी धावा धावून. संपूर्ण पन्नास षटकांत एकसुद्धा चौकार किंवा षटकार नाही. इतकंच काय, चेंडू जोरात किंवा उंचावरून फटकावण्याचाही प्रयत्न नाही. सगळं कसं 'ऑल अलाँग द ग्राऊण्ड', कॉपी-बुक शॉट्स, प्लेईंग इन द 'व्ही' वगैरे. जणू काही हा क्रिकेट सामना नसून नेट प्रॅक्टीसच चालली असावी.
कोण खेळतं असं ? सुनील गावस्करनी एकदा पूर्ण साठ षटकं खेळपट्टीवर उभं राहून छत्तीस धावा केल्या होत्या. But, gone are those days now.
पण मराठी चित्रपटांना मात्र असा सपाट खेळ करायची आवडच जडलेली दिसतेय सध्या. सिनेमाभर काहीही विशेष न घडणाऱ्या कथानकांचे सिनेमे बनवायचं एक 'फॅड'च आलंय बहुतेक. असं सपाट काही तरी बनवलं की ते कलात्मक वगैरे मानलं जात असावं. जितकं जास्त सपाट, तितकं जास्त कलात्मक !


'बापजन्म' ह्या सपाटपणाच्या मोजपट्टीवर साधारणपणे मध्याच्या थोडंसं पुढे वगैरे असावा. 'रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग' अर्थात 'रॉ'साठी आयुष्यभर यशस्वीपणे काम करून निवृत्त झालेला एक सीक्रेट एजंट 'भास्कर पंडित' (सचिन खेडेकर) पत्नीच्या निधनानंतर पुण्यात एकटाच राहतो आहे. आयुष्यभर जाणीवपूर्वक कमीत कमी भावनिक ओढ ठेवल्याने मुलांशी संबंध संपुष्टातच आल्यात जमा. आपल्याला कॅन्सर असून फार तर वर्षभराचं आयुष्यच आता हाती उरलं आहे, हे समजल्यावर त्याच्या मनात कालवाकालव सुरु होते. मुलांना भेटायची ओढ लागते. पण मुलांशी संबंध इतके वाईट असतात की त्याने नुसतं बोलावल्याने ती येणार नाहीत, ह्याचीही खात्री असते.
प्रश्न - अश्या वेळी तो काय करतो ?
उत्तर - आचरटपणा.
प्रश्न - कसा ?
उत्तर - स्वत:च्या मृत्यूचं नाटक रचतो. जेणेकरून मुलं नक्की येतील.
प्रश्न - मग ती येतात आणि सारं काही सुरळीत होतं का ?
उत्तर - येतात की ! पण तरीही तो त्यांना सोडून एकta राहायला दूर अज्ञातवासात निघून जातो !
प्रश्न - म्हणजे त्यांच्यासाठी मेलेलाच राहतो ?
उत्तर - मुलाला सगळं सांगतो, मुलीला नाही सांगत !
प्रश्न - अरे मग हेच आधी का नाही करत ? किंवा जर निघूनच जायचं होतं तर इतकी नौटंकी का करतो ? केलीच आहे तर थांबत का नाही ? मुलाला सांगतो, तसं मुलीलाही का सांगत नाही ?
उत्तर - आवरा !!

एका अस्सल अचाट आणि अतर्क्य कथानकात भरपूर पाणी घालून एक अत्यंत पांचट सिनेमा कसा बनवावा, त्याचा हा परिपाठ !
मुलं नाराज आहेत, त्यांना एकदा पाहायचंय वगैरे कुठल्याही कारणाने कुणी स्वत:च्या मृत्यूचं नाटक का रचेल ? मी देशाच्या सेवेत इतकी वर्षं अमुक अमुक करत होतो, हे सांगितल्यावर ती मुलं समजून घेणार नाहीत का ? मुलगा घेतोच की ! बरं, नसतीलच जर घेणार आणि समजून घेतल्यावरही सारं काही सोडून निघून जाणंच फायनल असेल तर मग ही जबरदस्तीची सगळी जुळवाजुळव कशासाठी ?
मग हा सगळा भावनिक मूर्खपणा जस्टीफाय करण्यासाठी भास्कर पंडितला कॅन्सर वगैरे झाला असल्याचं एक ठिगळ जोडणं. घरात कॅमेरे लावून सगळ्यांना पाहू, त्यांनी घरी यावं म्हणून मेल्याचं नाटक करू असल्या आयडिया डोक्यात येण्यासाठी शेजारच्या 'आपटे' काकांच्या पात्राचं अजून एक ठिगळ !
मेलेल्या व्यक्तीच्या पायाला हात लावल्यावर 'शरीर थंड का लागत नाहीय?' असा प्राथमिक प्रश्नही कुणाला पडत नाही.
आईच्या बाजूला निजलेल्या दीड-दोन वर्षांच्या लहान बाळाला आजोबा उचलून घेऊन जातो. त्याआधी ते लहान बाळ चुळबूळ करतं, आवाजही करतं. काही तास ते बाळ तिथे नसतं, त्या काळात आई कूसही बदलते. पण तिला अजिबात जाणवतही नाही की आपलं बाळ आपल्या जवळ नाहीय ! अशी कुठली आई असते ?
हे असे साधे प्रश्न कुणाला पडूही नयेत, ह्याचं वैषम्य वाटतं.
त्याहून वैषम्य ह्याचं वाटतं की अश्या आचरट सिनेमावर अनेक लोक स्तुतीसुमनांचा वर्षाव करत आहेत. का बरं ? मराठी आहे म्हणून ? ह्या फडतूस अस्मितांमधून बाहेर पडून एखाद्या कलाकृतीचा 'एक कलाकृती' म्हणून आपण कधी आस्वाद घेणार ?

टीचभर कथेवर रचलेली सुमार पटकथा असली तरी सचिन खेडेकर, शर्वरी लोहकरे आणि सत्यजित पटवर्धन ह्या
तिघा मुख्य कलाकारांची कामं अप्रतिम वाटली. पण पुष्कराज चिरपुटकरचा नोकर 'माउली' प्रचंड कंटाळवाणा आहे. गाणी श्रवणीय आहेत आणि पार्श्वसंगीतही आवडलं.

माझ्यासारखे अनेक सिनेरसिक मराठी सिनेमाकडे एक 'प्रायोगिक सिनेमा' म्हणून पाहतात. मात्र गेल्या काही काळापासून हे 'काहीही न घडणाऱ्या' सिनेमांचं जे पीक आलं आहे, त्यामुळे ही प्रायोगिकता नकोशी वाटायला लागेल, अशी भीतीही वाटते आहे. मराठी सिनेमा तमाश्याच्या फडातून बाहेर पडला, त्यानंतर थिल्लर विनोद करत बसला आणि आता ह्या सपाटपणात रमला आहे, असं वाटतंय. जर सिनेमा प्रेक्षकांना गुंतवणार, आकर्षित करणार नसेल तर प्रेक्षकाने त्याला टाळल्याचीही त्याला तक्रार नसावी.


रेटिंग - * *

- रणजित पराडकर 

2 comments:

  1. I must get full marks for guessing 'which movie is at the link?'
    :D :D :D

    ReplyDelete
    Replies
    1. तुला 'शून्याचं महत्व' समजलंच आहे ! :D :D

      Delete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...