Tuesday, May 19, 2015

एक मी वगैरेंतला

वाद जन्मभर चालला
वाटतो नको मी मला

शांततेत कल्लोळतो
मंद नाद माझ्यातला

बोलतात डोळे तुझे
'एक मी वगैरेंतला'

वाहतूक ना थांबते
श्वास हायवे जाहला

मी तिचा असा की जशी
पंढरी तुझी विठ्ठला

सावली असे सावळी
सावळाच तू विठ्ठला

फूल थेंबुडे वाळले
पण तरी पसा गंधला

....रसप....
४ एप्रिल २०१५

Sunday, May 17, 2015

रणबीरचा फसलेला अमिताभ (Movie Review - Bombay Velvet)

प्रत्येक प्रसिद्ध नावाच्या भोवती त्या प्रसिद्धीच्या वलयाच्या आत अजून एक वलय असतं. अपेक्षांचं वलय. ते नाव डोळ्यांसमोर आलं की काय अपेक्षा करायची, हे आपल्याला समजत असतं. उदा. 'प्रीतम चक्रवर्ती' म्हटलं की 'ढापलेलं सुमधुर संगीत' किंवा 'सूरज बडजात्या' म्हटलं की 'अतिरंजित कौटुंबिक कंटाळा' किंवा 'आशुतोष गोवारीकर' म्हटलं की 'किमान सव्वा तीन तास' किंवा 'रोहित शेट्टी' म्हटलं की 'तडातड उडणाऱ्या गाड्या आणि माणसं' वगैरे. तद्वतच 'अनुराग कश्यप' म्हटलं की मी अपेक्षा करतो 'विस्कळीत तरी ऐटबाज, अंधारी पण वास्तववादी आणि अतिरंजित मात्र भेदक अशी मांडणी.' 'बॉम्बे वेलवेट' ह्या अपेक्षांच्या समीकरणाचा फक्त पहिला भाग पूर्ण करतो. 'विस्कळीत, अंधारी आणि अतिरंजित' मांडणी. अपेक्षाभंगाची निराशा सगळ्यात मोठी निराशा असते. हा अपेक्षाभंग, माझ्यासाठी तरी, ह्या वर्षातली आत्तापर्यंतची तरी सगळ्यात मोठी निराशा घेऊन आला. दिलासा इतकाच की अगदी सुरुवातीपासूनच आपल्या मनाची तयारी होत जाते की अखेरीस आपल्या खिश्यातून गेलेल्या पैश्यांची जागा निराशा घेणार आहे.

ह्या मानसिक तयारीची सुरुवात श्रेयनामावलीत होते. 'Introducing Karan Johar' असं आपण वाचतो आणि क्षणार्धात आपल्याला 'अरे ! मग 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मध्ये शाहरुख खानसोबत बागडणारा त्याचा टोपीवाला मित्र कोण होता ?' हा प्रश्न पडतो. अनुरागरावांचा अर्धा गुण ह्या अशुद्धलेखनासाठी आपण तडकाफडकी कापतो. (फराह खानने 'ओम शांती ओम' मध्ये शाहरुखसाठी 'Re-introducing' लिहिलं होतं, तसं तरी लिहायचं होतं ना !)

मग कहाणी सुरु होते.
१९४९ साली एका मुलाला घेऊन मुंबईत आलेली एक निराधार स्त्री. कामासाठी वणवण भटकते आहे. (लगेच आपल्या मनात १९७५ सालच्या 'दीवार'च्या आठवणी ताज्या होतात.) त्या स्त्रीला देहविक्रयाच्या धंद्यात जबरदस्ती ओढलं जातं. (कट - 'प्रहार' आठवतो.) तो मुलगा - बलराज - एका बिघडलेल्या मुलाच्या - चिमन - नादाला लागून चोऱ्यामाऱ्या करायला लागतो. (गेल्या ६० वर्षांतले अनेक चित्रपट).

मग मोठे होतात. बलराज (रणबीर कपूर) आणि चिमन (सत्यदीप मिश्रा) दोघे जिगरी यार पार्टनरशिपमध्ये डल्ले मारायला लागलेले असतात आणि साईड बाय साईड गोव्याहून मुंबईला आलेली एक जाझ गायिका व सुंदरी सोझी नोरोन्हा (अनुष्का शर्मा) बलराजला आवडायला लागलेली असते. आता इथून पुढे एक कुणी तरी बडी असामी ह्या दोघांना पंखांखाली घेऊन, त्यांच्याकडून काम करवून घेऊन आपला फायदा करून घेणार, हे चित्रपटलिखित जसंच्या तसं घडतं ! इन कम्स 'कैझाद खंबाटा' (कारण जोहर). सुज्ञ प्रेक्षकाला पुढील कहाणी सांगायची आवश्यकताच नाही.

ह्या चौघांव्यतिरिक्त एका वृत्तपत्राच्या संपादकाच्या (जिमी मिस्त्री) भूमिकेत मनीष चौधरी, बॉम्बेच्या महापौराच्या (रोमी मेहता) भूमिकेत सिद्धार्थ बसू आणि पोलीस इन्स्पेक्टर कुलकर्णीच्या भूमिकेत के के मेनन झळकतात. अनुराग कश्यप तर दगडाकडूनही काम करवून घेऊ शकतो, हे तर मुरलेले, तगडे लोक ! त्यातही मनीष चौधरीचा संपादक मात्र भाव खाऊन जातो. जबरदस्त ऐटबाज मिस्त्री त्याने सुंदर उभा केला आहे. सिद्धार्थ बसू बेरकी राजकारणी मस्तच वठवतात. आणि दुर्दैवाने 'बेबी'नंतर पुन्हा एका चित्रपटात के के मेनन वाया गेला आहे. त्याच्या भूमिकेची लांबी आणि व्याप्ती खूपच सीमित आहे आणि तेव्हढ्यातही तो आपली छाप सोडत असला, तरी ते पुरेसं वाटत नाही.
करण जोहर मुख्य खलनायकाच्या भूमिकेला बऱ्यापैकी न्याय देतो. खंबाटा भयावह वाटत नाही, पण प्रभावी नक्कीच वाटतो. त्याच्यातल्या दिग्दर्शकाच्या सावलीत लपलेला त्याच्यातला अभिनेता अनुराग कश्यपने बाहेर काढला आहे.
सत्यदीप मिश्राने 'चिमन'च्या भूमिकेत जान ओतली आहे. हतबुद्ध, निराश, चिडलेला, सच्चा, सांभाळून घेणारा अशी एका मित्राची अनेक रूपं त्याने दाखवली आहेत. 'चिमन'शिवाय 'जॉनी बलराज' मध्ये मजा आली नसती आणि 'सत्यदीप'शिवाय 'रणबीर'सुद्धा कंटाळवाणा वाटला असता.
रणबीर कपूर 'रॉकस्टार'च्या पुढे जात नाही, हे खेदाने नमूद करावं लागतं. काय कमी किंवा काय जास्त झालं, हे सांगण्यापेक्षा 'त्याचा अमिताभ बनायचा प्रयत्न फसला आहे', ह्या सरळसाध्या शब्दांत नेमका सारांश सांगता येईल. बलराजच्या व्यक्तिरेखेच्या नाण्याच्या एक तडफदार प्रेमी आणि एक अँग्री यंग मॅन ह्या दोन बाजू आहेत. रणबीर ह्या दोन्हींपैकी कुठलीच चकचकीत करू शकला नाही.
रोझीच्या भूमिकेत अनुष्का शर्मा अतिशय सफाईदार वाटली. दिसलीही सुरेख आहे. सगळ्या मोठमोठ्या नावांत अनपेक्षितपणे ती सगळ्यांत जास्त उठून दिसते. NH10 नंतर पुन्हा एकदा तिने दमदार काम केलं आहे. गाण्यांवर ओठ हलवताना ती सूर समजून घेऊन काम करत आहे, हे चाणाक्ष प्रेक्षकाच्या नजरेतून सुटत नाही.

संवादलेखनात 'काहीच लक्षात न राहू शकणे' हीच एक लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. अमिताभचा अँग्री यंग मॅन यशस्वी होण्यामागे सलीम-जावेद जोडीचे दमदार संवाद खूप महत्वाचे होते. ती मदत इथे रणबीरला न मिळाल्याने त्याचा अमिताभ होऊ शकण्यात महत्वाचा अडसर आला आहे.

अमित त्रिवेदीचं संगीत कर्णमधुर आहे. सगळीच गाणी श्रवणीय झालेली आहेत. 'चित्रपटात श्रवणीय संगीत असू शकते', हा समज मागे सोडणाऱ्या जमान्यात अमित त्रिवेदी, शंतनू मोईत्रा ह्यांच्यासारखी काही नावं माझ्यासारख्या चित्रपटसंगीतप्रेम्याला दिलासा देतात.

अखेरीस, एखाद्या दिवशीच्या मळभाने सूर्य लपत नसतो, तसंच एखाद्या अपयशाने कुणी गुणी कलावंत खचतही नसतो. एका चित्रपटात रणबीर अमिताभ बनू शकला नाही आणि अनुराग कश्यप प्रकाश मेहरा बनू शकला नाही. पण त्यांच्या पुढील कामांतून 'बॉम्बे वेलवेट'ची पुटं नक्कीच झटकली जातील. तोपर्यत चाहते ह्या आधीचे चित्रपट बघू शकतील.

रेटिंग - * *


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (१७ मे २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-

Sunday, May 10, 2015

चित्रपटत्रस्तांसाठीचं 'पिकूटॉनिक' (Movie Review - Piku)

संपूर्ण दिवस धावपळीत जातो, मग ट्रेनमधल्या गर्दीमुळे किंवा मोठ्ठ्या ट्राफिक जाममुळे उरला-सुरला संयमसुद्धा कापरासारखा उडून जातो. पोटात कावळे कोकलत आणि डोक्यात रातकिडे किरकिरत असताना घरी आल्यावर गरमागरम वरणभात समोर यावा आणि टीव्ही किंवा रेडीओवर आपल्या अत्यंत आवडत्या गायक/गायिकेचं आवडतं जुनं गाणं लागावं की कसं वाटतं ? रणरणत्या उन्हात अचानक एखादी थंड हवेची झुळूक आल्यासारखं वाटतं. त्या थोड्याश्याच वेळात आपण अजून एक दिवस लढवायची हिंमत गोळा करतो आणि शांतपणे निजतो.
तसंच काहीसं, एकामागोमाग एक रद्दड चित्रपट डोक्यावर आदळत असताना, त्याच त्या बातम्या आणि त्याच त्या सिरियल्स उरल्या-सुरल्या संयमाचाही कापूर करत असताना, एखादा असा चित्रपट - जो थोड्या गुदगुल्या करतो, थोडं हळवं करतो आणि बराचसा आपलाच वाटतो - आल्यावर वाटतं. त्या दोन-अडीच तासांत आपण (म्हणजे, मी तरी) अजून काही रोहित शेट्टी, प्रभुदेवा वगैरे सहन करू शकण्याची हिंमत गोळा करतो आणि शांतपणे चित्रपटगृहातून बाहेर पडतो.

'पिकू' हे नाव जितकं छोटंसं आहे, तितकीच चित्रपटाची कहाणीसुद्धा. ही कहाणी आहे एक बाप आणि एका मुलीची आणि ह्या दोघांची कहाणी बदलणाऱ्या एका तिऱ्हाईताची.

'पिकू' (दीपिका पदुकोण) एक स्वतंत्र विचारांची तरुण व्यावसायिक. बोलण्यात इतकी फटकळ की तिला कस्टमर्ससमोर नेताना तिच्या पार्टनरला भीती वाटते की ही कुणाला काय सुनावेल ! आणि वागण्यात इतकी खडूस की टॅक्सी ड्रायव्हर तिचं भाडं आल्यावर टाळाटाळ करतात. भास्कर बॅनर्जी (अमिताभ बच्चन), तिचे वडील म्हणजे तिचा हर तऱ्हेने 'बाप'. स्वत:शी सोडून इतर कुणाशीही सरळ न बोलणारा आणि आजारी पडण्याची प्रचंड इच्छा असणारा. असे हे एकापेक्षा एक विक्षिप्त बाप-लेक दिल्लीत एकमेकांवर व कक्षेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर डाफरत एक आयुष्य जगत आहेत.
आणि दुसरीकडे राणा चौधरी (इरफान खान) हा एक टॅक्सी एजन्सीचा मालक, व्यावसायिक अपयशाशी झुंजत आणि विक्षिप्त आई व बहिणीमुळे वैतागलेला, स्वत:चं एक आयुष्य जगत आहे.

हे तिघे वैतागलेले एकत्र येतात, जेव्हा भास्कर बॅनर्जी आपल्या माथेफिरू स्वभावानुरूप दिल्लीहून कोलकात्याला टॅक्सीने जायचं ठरवतो. हा तीस-चाळीस तासांचा प्रवास तिघांसाठी गेल्या तीसेक वर्षांचे संस्कार बदलणारा ठरतो. चित्रपटाचा शेवट अनेक उत्तरं, प्रश्न न विचारता देतो. 

एक रोड ट्रीप 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये होती, जी तीन मित्रांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलते.
एक रोड ट्रीप 'फाईण्डिंग फॅनी' मध्ये होती, जी कुणाला कुणापर्यंत घेऊन गेली नाही, पण तरी खूप काही दाखवणारी होती.
आणि एक रोड ट्रीप 'पिकू' ची आहे, जी फक्त दिल्ली ते कोलकाता जात नाही, तर 'पिकू'पासून 'पिकू'पर्यंत 'भास्कर'पासून 'भास्कर'पर्यंत आणि 'राणा'पासून 'राणा'पर्यंत जाते. 

'जिंनामिदो' आणि 'फाफॅ' काहींना खूप आवडले होते, तर काहींना ते सपशेल कंटाळवाणेही वाटले होते. 'पिकू'चं नक्कीच तसं नाही आहे कारण इथली 'रोड ट्रीप' हा सगळ्यात महत्वाचा भाग असला तरी त्याला खूप जास्त वेळ दिलेला नाही आणि दीपिका-अमिताभमधली धुसफूस आपण रोज पाहत, अनुभवत असतो, त्यामुळे एक तार जुळतेच.

'पिकू' असं नाव का आहे, मूळ नाव नक्कीच वेगळं असणार, पण ते सांगणं किंवा ह्या विक्षिप्तांच्या विक्षिप्तपणाची कुठलीही स्पष्ट कारणमीमांसा देत बसणं आणि अश्याच काही कमी किंवा बिन महत्वाच्या गोष्टी पूर्णपणे टाळून, त्यांना समजून घेता येईल इतपत पार्श्वभूमी, तीही ओघातच, मांडणं दिग्दर्शक शूजीत सरकारांनी खुबीने केलं आहे. भास्कर बॅनर्जीचं अपचन व बद्धकोष्ठाने त्रस्त असणं आणि सतत त्याचाच विचार करत राहणं, हा त्याच्या व्यक्तित्वाचा पैलू एकंदर मांडणीला थिल्लर किंवा चावट बनवण्याकडे नेऊ शकला असता. मात्र, ते होण्या न होण्यामधली छोटीशी सीमारेषाही सरकारांनी अचूक हेरली आणि पाळली आहे, हे विशेष. हा चित्रपट कुठल्याही व्यक्तिरेखेचं उदात्तीकरण किंवा खच्चीकरणही करण्याच्या फंदात पडत नाही. खरं तर अशी पात्रं इथे आहेत. जसं की बॅनर्जीचा डॉक्टर मित्र श्रीवास्तव (रघुवीर यादव), जो त्याला त्याच्या अवास्तव आजाराग्रहाबद्दल कधी बोलत नाही आणि ३-४ लग्नं करणारी पिकूची बिनधास्त मावशी (मौशुमी चटर्जी). 

दीपिका आणि 'पिकू' इतक्या एकरूप झाल्या आहेत की कुठेही पुसटसासुद्धा उल्लेख न येताही 'पिकू' हा 'दीपिका'चाच शॉर्ट फॉर्म असणार हे आपण नकळतच ठरवून टाकतो. वडिलांच्या विचित्र वागण्याला अतिशय कंटाळलेली, त्यांच्याशी भांडणारी आणि तरीही कुठल्याही मुलीसारखीच आपल्या बापासाठी प्रचंड हळवीही असणारी, 'माझ्याशी लग्न करणाऱ्याला माझ्या ह्या सत्तर वर्षाच्या बाळाचीही जबाबदारी घ्यावी लागेल' असं म्हणणारी 'पिकू' तिने सुंदर साकारली आहे. बिना मेकअपची दीपिकाचं 'गर्ल नेक्स्ट डोअर' दिसणं, हे वेगळंच !

अमिताभने आयुष्यात दुसऱ्यांदा 'भास्कर बॅनर्जी' नावाचं पात्र साकारलं आहे. १९७१ साली आलेल्या, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक 'आनंद' मधला त्याचा भास्कर बॅनर्जी, एक बुजरा, थोडासा निराश डॉक्टर त्याने ज्या सहजतेने उभा केला होता, त्याच सहजतेने ४४ वर्षानंतर हा दुसरा विक्षिप्त भास्कर बॅनर्जी त्याने उभा केला आहे. बोलण्यातली बंगाली ढब त्याने अशी काही राखली आहे की एखादा अस्सल 'बाबू मोशाय'च वाटावा. अमिताभ आता एक चालतं-फिरतं अभिनयाचं गुरुकुल झाला आहे, ह्याबद्दल वादच नाही. त्याच्या सहजतेने बॅनर्जीच्या अत्यंत त्रासदायक विक्षिप्तपणावरही माया करावीशी वाटते. 

ही कहाणी, हा चित्रपट पिकू आणि बॅनर्जीचा असला तरी जिथे जिथे इरफान खान पडद्यावर येतो, तिथे तिथे पडदा त्याच्यासाठीच आहे, असं वाटतं. केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर चांगले दिसणारे मोजके अभिनेते आहेत, त्यांत इरफान खान नक्कीच येतो. एरव्ही हे बटबटीत डोळे व ओबडधोबड सुजलेला चेहरा आपण कधीच पाहणार नाही. पण ह्या चेहऱ्यामागे दडलेला एक कलंदर अभिनेता जेव्हा समोर येतो, तेव्हा हाच चेहरा जगातला सगळ्यात सुंदर चेहरा बनत असावा. हे मी अगदी विचारपूर्वक सांगतो की अमिताभसमोरही इरफान आपलं नाणं खणखणीत वाजवतो.

ह्या चित्रपटाला नितांत आवश्यकता होती आणि तशी संधीही होती, श्रवणीय, गोड चालीच्या संगीताची. ती काही म्हणावी तशी पूर्ण झाली नाही. एक तर असलेली गाणी तुकड्या-तुकड्यांत आहेत आणि ती विशेष लक्षातही राहत नाही. 'पिकू'ला २-३ 'सवार लूँ'ची जोड मिळाली असती, तर गालबोट लावायलाही जागा उरली नसती. तरी, माझ्यातल्या चित्रपटत्रस्तासाठी एक अत्यावश्यक 'पिकूटॉनिक' मला नक्कीच मिळालं आहे.

रेटिंग - * * * १/२

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (१० मे २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-


Sunday, May 03, 2015

कॉपी करून पास (Movie Review - Gabbar Is Back)

आदल्या दिवशीच्या उरलेल्या पोळ्यांचे बारिक तुकडे करायचे. मिरची, कढीपत्त्याची फोडणी करून त्यात भरपूर कांदा परतायचा. त्यावर हे पोळ्यांचे तुकडे घालून हळद, तिखट, मीठ टाकून तयार होणारं पक्वान्न म्हणजे ‘फोडणीची पोळी.’ कुणी त्याला कुसकरा म्हणतं, मध्य प्रदेशात तर ह्याला एक गोंडस नाव आहे, ‘मनोहरा’! तर ही फोडणीची पोळी माझ्या मध्यमवर्गीय पोट व जिभेचा अत्यंत आवडता नाश्ता. रानोमाळ भटकणाऱ्या गब्बरसिंगलासुद्धा नाश्त्यासाठी ह्यावरच समाधान मानावं लागत असावं, असा माझा एक कयास आहे. गब्बरच्या नावाने चित्रपट करताना फोडणीच्या पोळीचीच रेसिपी वापरणं, हा निव्वळ योगायोग आहे की गब्बरच्या आवडत्या नाश्त्याला दिलेली एक मानवंदना ते माहित नाही, मात्र जे काही जुळून आलं आहे, ते जर त्याने पाहिलं असतं तर नक्कीच ‘सरदार खुस हुआ’ होता आणि ‘सबासी’ भी दिया होता !
‘गब्बर इज बॅक’मधल्या आदल्या दिवशीच्या उरलेल्या पोळ्या म्हणजे २००२ साली तमिळमध्ये बनलेला ‘रामण्णा’ हा चित्रपट आणि पुढील १३ वर्षांत त्याचे तेलुगु, कन्नड, बंगालीमध्ये झालेले रिमेक्स. ह्या सगळ्यांना एकत्र कुसकरून त्याला थोडासा ‘बॉलीवूडी’ तडका देऊन गब्बर हॅज कम बॅक! संजय लीला भन्साळीला जेव्हा गल्ला भरायचा असतो, तेव्हा तो एक दक्षिणायन करतो. मागे एकदा त्याने असंच दक्षिणायन केलं आणि ‘विक्रमार्कुडू’ घेउन आला अन् ‘राउडी राठोड’ निर्मित केला. आता भन्साळी इज बॅक विथ ‘रामण्णा’ उर्फ ‘गब्बर’.

एकाच दिवशी १० तहसीलदारांचं अपहरण आणि त्यांपैकी एकाचा खून झाल्यावर सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या होतात. मृत तहसिलदाराच्या शरीरासोबत गब्बरच्या आवाजातली ऑडीओ सीडी आणि त्या तहसिलदाराच्या भ्रष्टाचाराचा संपूर्ण लेखाजोखा असतो. इथून सुरु होतो एक शोधमोहिमेचा, अपहरण-हत्यांचा, सूडाचा आणि जनजागृतीचा प्रवास.
एका कॉलेजात प्रोफेसर असलेल्या ‘आदित्य’ची (अक्षय कुमार) दोन रूपं असतात. एक जे जगाला दिसतंय ते एका प्रोफेसरचं आणि दुसरं जे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय ते, ‘गब्बर’चं. मुलांशी मुलांच्याच भाषेत संवाद साधणारा, त्याचा वर्ग खुल्या मैदानात भरवणारा, प्रात्यक्षिकं दाखवून मजा-मस्करी करत शिकवणारा आदित्य विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असतो. विद्यार्थ्यांचीच ताकद वापरून तो ‘गब्बर’ टोळी चालवत असतो. महाराष्ट्राच्या विविध भागांतून एखाद्या विशिष्ट विभागाच्या १० भ्रष्ट अधिकाऱ्यांना अपहृत करायचं आणि त्यांच्यातल्या सगळ्यात भ्रष्ट अधिकाऱ्याला सजा-ए-मौत देऊन पाचावर धारण बसलेल्या बाकीच्या ९ जणांना मुक्त करायचं, हा त्याचा शिरस्ता.
ह्या कहाणीच्या जोडीला - पोलीस विभागाच्या उच्चाधिकाऱ्यांना जे जमत नाही ते करून दाखवणारा, पण पात्रता असूनही केवळ लाच न दिल्यामुळे निरीक्षकाच्या ऐवजी हवालदार बनून राहिलेला एक इमानदार व तडफदार तरुण 'साधुराम' (सुनील ग्रोव्हर) आणि ‘आदित्य’ला ‘आदित्य’पासून ‘गब्बर’ बनवण्यात मोलाचा वाटा उचलणारा एक उद्योजक 'पाटील' (सुमन)– सुद्धा आहेत. मध्येच अकारण लुडबुड करवायची, गाणी घुसडायची सोय म्हणून एक बावळट मुलगी 'श्रुती'सुद्धा (श्रुती हासन) आहे. हा सगळा माल-मसाला मिळून बनणारा पदार्थ मात्र दोन घटिका जीभेवर एक बरी चव रेंगाळवतो.

दाक्षिणात्य मारधाडपटाचा रिमेक आणि त्यात अक्षय कुमार, सलमान खान किंवा अजय देवगण असले की चित्रपटगृहात शिरतेवेळीच विचारप्रक्रियेचा ‘लॉजिक’ मोड बंद करायचा असतो, हे मला 'चिंगम', 'खिक' व 'रद्दड राठोड' ह्यांच्या अविस्मरणीय अनुभवांतून शिकायला मिळालं आहे. त्यामुळे पडद्यावर ‘व्हूफ्.. व्हूफ्..’ करून शीर्षक आदळत असतानाच मी जाणीवपूर्वक माझा ‘लॉजिक’ मोड बंद केला होता. त्यामुळे ‘हे सगळं करण्यासाठी पैसे कुठून आले?’ किंवा ‘यूपीएससीमध्ये इतका आभाळ फाडणारा स्कोअर करून किंबहुना युपिएससी झाल्यावर कुणी हवालदार कसा राहील ?’ किंवा ‘गाडीच्या छोट्याश्या सीटवर त्यातही अर्ध्या भागात दुसरी व्यक्ती बसलेली असताना एक स्त्री प्रसवू कशी शकते?’ किंवा ‘ह्याच्या एकाच ठोश्यात हेल्यासारखा दिसणारा गुंड गपगार कसा पडतो ?’ किंवा ‘ह्याने उचलून आपटल्यावर माणूस चेंडूसारखा टप्पा कसा काय घेऊ शकतो? हा भौतिकशास्त्राचा प्रोफेसर आहे की न्यूटनचा बाप ?’ असले डोकॅलिटीवाले प्रश्न मला पडले नाहीत. ते तुम्हाला पडणार असतील, ‘लॉजिक’ मोड ऑन-ऑफचं बटन कुठे असतं, हे जर माहित नसेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी निश्चितच नाही.

अ‍ॅक्शन हीरो म्हणून अक्षय कुमार सध्या तरी सर्वोत्तम असावा, असं मला वाटतं. त्याचा फिटनेस आणि मार्शल आर्ट्समधील निर्विवाद प्राविण्य केवळ जबरदस्त आहे. सनी देओलला आवरायला जेव्हा १५ लोक कमी पडायचे आणि तो उजव्या हाताने ७-८ आणि डाव्या हाता ७-८ जणांना झुलवायचा, तेव्हा त्याचा आवेश पाहून तो हे खरंच करू शकतो असं वाटायचं. अक्षय कुमारने सप्पकन् फिरवलेल्या किकने किंवा दिलेल्या जोरदार ठोश्याने भलेभले भेंडाळताना पाहून हे अगदीच अशक्य नाही, असं वाटतं. अर्थात, ह्यामागे मी बंद केलेल्या 'लॉजिक' मोडचा हातही असू शकतो, पण तरी !
अभिनय नावाच्या चिमणीला इथे चिवचिवायला वाव नाही, हे चोखंदळांनी लक्षात घ्यावे. जो काही अभिनय करायचा आहे, तो हवालदाराच्या भूमिकेतला सुनील ग्रोव्हर करतो आणि लक्षात राहतो.
उद्योजक पाटीलच्या भूमिकेतल्या 'सुमन'ला फक्त गुरगुरण्याचं काम आहे, ते तो बऱ्यापैकी करतो.
'श्रुती हासन' रस्त्यात नको तिथे बांधलेल्या स्पीड ब्रेकरसारखी उगाच आणि त्रासदायक आहे.
संगीत नावाची काही गोष्ट हिंदी चित्रपटांत कधी काळी असायची. आजकाल डबे, पराती, ताटल्या, तांबे बडवले जातात आणि त्या तालावर कोंबडे, बैल, घोडे इ. सुरेल प्राणी आरवत किंवा हंबरत किंवा रेकत असतात. डोक्याला पोचे पडेपर्यंतची सांगीतिक सोय इथे व्यवस्थित लावलेली आहे.

कॉलेजमध्ये कट्ट्यावर बसून पूर्णवेळ टवाळक्या करणारा पण तसा अगदीच डफ्फळशंख नसल्याने परीक्षेच्या आधी रट्टा मारून आणि पेपरमध्ये कॉपी करून पास झालेला एखादा मित्र प्रत्येकाचा असतो. बहुतेकदा कॉलेजनंतरच्या आयुष्यात तो आपल्यापेक्षा चांगला कमवतही असतो. 'गब्बर इज बॅक' म्हणजे असाच एक मारलेला रट्टा आणि केलेली कॉपी आहे. ही कॉपी करून दिग्दर्शक 'क्रिश' नक्कीच पास होईल. पण तुम्ही मात्र चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर आपला 'लॉजिक' मोड पुन्हा सुरु करायचं मात्र विसरू नका, नाही तर नापास व्हाल !

रेटिंग - * * १/२


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (०३ मे २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-

Related Posts Plugin for WordPress, Blogger...