Thursday, April 07, 2011

छोटीसी बात

जैक्सन तोलाराम प्रा. लि. ची
फार जुनी परंपरा आहे
कंपनीतल्या प्रत्येकाने
प्रेमविवाहच केला आहे!

"अरुण"ची केस मात्र
जराशी वेगळी आहे
बोलायची हिंमतच नाही
सारं काही मनात आहे

सकाळ-संध्याकाळ "प्रभा"च्या
मागे-मागे जातो
तिने वळूनसुद्धा बघितलं तर
उलटा मागे फिरतो!

एकटाच आहे बिचारा
आई-बापाविना राहतो
सर्व काही चोख आहे
'विश्वासा'त मार खातो..

करता-करता हळूहळू
आपसूक ओळख वाढली
'प्रभा'च्याही मनामध्ये
अरुणचीच सावली!

पण बोलणार कसं समजेना
एक नंबर बावळट
दोघांच्या मध्ये घुसला
'नागेश' नामक चावट!

गुलाबाच्या काट्यासारखा
नागेश तिच्या सोबत असे
त्यासमोर गुमसुम गुमसुम
अरुण आणखीच बावळा दिसे

बाईक घेतली "फेल" झाली
अजून हसं झालं
मंत्र-तंत्र करूनदेखील
काहीच नाही झालं

शेवटचा उपाय म्हणून
खंडाळ्याला गेला
कर्नल जे. डब्ल्यू. एन. सिंगना
तडक जाउन भेटला

हा माणूस म्हणजे ना
अजब रसायन होतं
"ज्युलियस नगेन्द्रनाथ विल्फ्रेड" असं
विचित्र नाव होतं..

नावासारखीच ख्यातीसुद्धा
मोठी होती त्याची
स्मगलर, नेते, अभिनेते
मदत घेत त्याची

"व्यक्तीमत्त्व विकास" करण्यात
हातखंडा होता
सगळ्या समस्यांसाठी इथे
खास तोडगा होता

अरुणला यशस्वी करण्याचा
विडा त्याने उचलला
असा केला "ब्रेनवॉश", की
अरुण पूर्ण बदलला!

"कोर्स" पुरा करून अरुण
मुंबईला परतला
पावलोपावली "नागेश"ला
चीत करू लागला!

काहीतरी गडबड आहे
नागेशने जाणलं
'कर्नल'च्या फॉर्म्युलाला
त्याने अचूक ताडलं

"प्रभा"चे कान भरण्यास
त्याने सुरू केलं
पण प्रेम खरं होतं त्यांचं
तरीसुद्धा जिंकलं!

नागेशनेही धरली मग
खंडाळ्याची वाट
अरुण-प्रभाच्या प्रेमाची ही
"छोटीसी बात"!!


....रसप....
७ मार्च २०११

Wednesday, April 06, 2011

मी कधीच झालो नाही


मी कधीच झालो नाही
तव चित्र रंग भरलेले
माझे हे विश्वच अवघे
बेरंगी भरकटलेले

मी नव्हतो भिडला षड्ज,
बुडलेला खोल न खर्ज
मनव्याकुळ माझे गाणे
कणसुरात भरकटलेले..

मी अर्धा-मुर्धा पिकलो
अन फुलता फुलता थकलो
मी हिरवाई सरल्यावर
नि:शब्द पान गळलेले

मी गडगडणारे अभ्र,
जे दिसती नुसते शुभ्र
ओलावा वाऱ्यावरचा
आकाशी विखूरलेले

मी निर्झर झालो नाही
खळखळही जमली नाही
वाळूमधले मी पाणी
लाटांनी फसफसलेले

मी कधीच झालो नाही
कविता जी तू लिहिली ती
माझे हे असणे-नसणे,
शब्दांनी ओळखलेले...


....रसप....
६ मार्च २०११
(संपादित - ०७ जुलै २०१५)

दे घुमाके!

नको कोणती मिजास आता
नको कोणते उधार आता
चुकवून सारे आज टाकू दे
उडा के डंडी धूम मचा दे, दे घुमाके!

ध्येय एक जे मनी बाणले
स्वप्न लोचनी रोज पाहिले
सत्य करूया सर्व मनसुबे
जोर लगाके धूम मचा दे, दे घुमाके!

आज पणाला सर्व लावुया
जीव ओतुनी जीत खेचुया
देशाचीही शान वाढु दे
विकेट लेके धूम मचा दे, दे घुमाके

असो सामना कोणाशीही
हार मानणे मंजूर नाही
बाहूंना ह्या चेव चढू दे
जीत जीत के धूम मचा दे, दे घुमाके

....रसप....
६ मार्च २०११

Tuesday, April 05, 2011

नज़्म बहौत आसान थी पहले...(भावानुवाद)

कविता सुगम्य होती सहजीच मांडण्याला
जणु पालवी फुटावी बहरून पिंपळाला

मज भेटली कितीदा हस-या मुलाप्रमाणे
गलक्यास पाखरांच्या गजला म्हणावयाला

घरट्यात ह्याच माझ्या वसण्या कधी न आली
झटक्यात पूर्ण झाली बिलगून कागदाला

परि आज चित्र सारे बदलून भव्य झाले
गिळलेय भव्यतेने पुरते जुन्या जगाला

कविता अशीच आता असते मला अलिप्ता
तमसात ह्या विशादी ठिणग्या उजाळण्याला

सरकार-धर्म ह्यांची असली युतीच दैना
ममता पुरी पडेना नवजात अर्भकाला

शहरास पारखूनी कविता थकून येता
विटते, नकार देते रचनेत बंधण्याला

निघते, निघून जाते फुटपाथ गाठते ती
रडतोय वृद्ध जो त्यां नयनांत वाळण्याला

-
मूळ कविता: "नज्म बहौत आसान थी पहले..."
कवी: निदा फाजली
भावानुवाद: ....रसप....
५ एप्रिल २०११



मूळ कविता:

नज्म बहुत आसान थी पहले
घर के आगे
पीपल की शाखों से उछल के
आते-जाते बच्चों के बस्तों से निकल के
रंग बरंगी चिडयों के चेहकार में ढल के
नज्म मेरे घर जब आती थी
मेरे कलम से जल्दी-जल्दी खुद को पूरा लिख जाती थी,

अब सब मंजर बदल चुके हैं
छोटे-छोटे चौराहों से चौडे रस्ते निकल चुके हैं
बडे-बडे बाजार पुराने गली मुहल्ले निगल चुके हैं

नज्म से मुझ तक अब मीलों लंबी दूरी है
इन मीलों लंबी दूरी में कहीं अचानक बम फटते हैं
कोख में माओं के सोते बच्चे डरते हैं
मजहब और सियासत मिलकर नये-नये नारे रटते हैं

बहुत से शहरों-बहुत से मुल्कों से अब होकर
नज्म मेरे घर जब आती है.
इतनी ज्यादा थक जाती है
मेरी लिखने की टेबिल पर खाली कागज को खाली ही छोड के
रुख्सत हो जाती है और किसी फुटपाथ पे जाकर
शहर के सब से बूढे शहरी की पलकों पर
आँसू बन कर
सो जाती है।

..निदा फ़ाजली
Related Posts Plugin for WordPress, Blogger...