Tuesday, April 24, 2018

ओघळता अव्यक्त प्राजक्त - ऑक्टोबर (Movie Review - October)

पत्नी सत्यभामेच्या आग्रहाखातर भगवान श्रीकृष्णाने पारिजातक स्वत:च्या महालात लावला होता. पण त्याच्या फुलांचा सडा मात्र श्रीकृष्णाची लाडकी पत्नी रुक्मिणीच्या महालात, जो शेजारीच होता तिथे सांडत असे. प्रेमाचं प्रतिक म्हणून असं एक गंमतीशीर महत्व पारिजातकाला आहे.
कवींच्या आवडीच्या पाऊस, चंद्र, मोगरा अश्या विषयांपैकी एक 'पारिजातक'सुद्धा आहेच. 

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला
(बालकवी)

मैं टहनी हूँ पारिजात की
प्रथम-प्रथम मुझको ही चूमे अरुण किरण स्वर्णिम प्रभात की
मैं टहनी हूँ पारिजात की
(विमल राजस्थानी)

झाडावरून प्राजक्त ओघळतो
त्याचा आवाज होत नाही
ह्याचा अर्थ असा नाही
की त्याला इजा होत नाही
(चंद्रशेखर गोखले)

अश्या वेगवेगळ्या आशयरूपांनी पारिजातक कवितेत ओघळला आहे. त्याचं कवितेत येणं मात्र त्याच्या स्वत:सारखंच हळुवार असतं. ज्याप्रमाणे पहाटेच्या नीरव शांत वेळी पारिजातकाची फुलं मूकपणे ओघळतात आणि इतर घमघमाटी, बटबटीत फुलांच्या आक्रमणाच्या आतच त्याच शांतपणे कोमेजतातही, तसंच ह्या पारिजातकाचं कवितांमधून प्रकट होणं आहे, असं जाणवतं.
फारच कमी काळासाठी उमलणारं हे अत्यंत नाजूक, गोंडस फूल त्याच्या सुगंधाची मोहिनी घालतं. हा सुगंध ओढ लावणारा असतो. फार लगेच कोमेजण्यामुळे चुटपूट लावून जाणाराही असतो. असफल प्रेमासारखा. असफलता लक्षात येईपर्यंत ती प्रेमभावना मोरपिसासारखी मनावर फिरत असते आणि नंतर उरणारी पोकळी दु:खाची असली, तरी ते दु:ख आपण आवडीने मनात जपतच असतो, त्याची एक विचित्र अशी ओढच असते.
हे पारिजातक आणि प्रेम ह्यांच्यातलं असं एक वेगळंच नातं आहे.

ऑक्टोबर महिन्यात बहरणाऱ्या पारिजातकाच्या फुलांवर प्रेम करणाऱ्या 'शिउली' (बनिता संधू) ची कहाणीसुद्धा ह्या फुलांसारखीच चुटपूट लावणारी आहे. स्वत:च्या टवटवीतपणाने सगळ्यांत उठून दिसणारी शिउली. एक हॉटेल मॅनेजमेन्ट ट्रेनींच्या एका बॅचमधली ज्युनियर, तरीही खूप हुशार मुलगी. त्याच बॅचमध्ये असलेला तिला सिनियर असलेला 'डॅन' (वरुण धवन). डॅनला झटपट यश हवं आहे. मेहनत करायची नाहीय. त्याला ज्युनियर असूनही मेहनत आणि हुशारीच्या जोरावर शिउली ह्या बॅचची सगळ्यांची आवडती आहे, तर डॅन म्हणजे एक 'ब्लॅक शीप' आहे.
हे दोघे एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न. पण दोघांमध्ये एक हळुवार नातं निर्माण होतं. पारिजातकाच्या मूक ओघळण्यासारखंच एक अव्यक्त नातं. एकमेकांशी कधी चार वाक्यंसुद्धा धड न बोलेलेले हे दोघे जण एका अपघातामुळे आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत बांधले जातात. बेमुर्वत, बेजबाबदार, असंवेदनशील डॅन स्वत:च्याही नकळत आमुलाग्र बदलत जातो. ह्या बदलाला सकारात्मकही म्हणता येणार नाही कारण स्वत:लाच न समजणाऱ्या आणि त्यामुळे न रोखता येणाऱ्या ओढीमुळे तो विक्षिप्त वागत जाऊन स्वत:च्या करियरला बरबाद करून घेतो.
पण हा काही कुणी मूर्ख आत्मघातकी देवदास नाहीय. तो 'डॅन' आहे. तुमच्या-आमच्यासारखा. अधूनमधून सावरतो आणि भानावरही येत राहतो. डॅन आणि शिउलीची हे कहाणी कुठलाही फिल्मीपणा करत नाही.


'ऑक्टोबर' जमिनीवरचा सिनेमा आहे. तो उगाच मोठमोठ्या बाता मारत नाही की आभाळाशी गप्पा हाणत नाही. तो आपल्याला त्या कहाणीचा एक भाग बनवत जातो. कुणी 'डॅन' चा जिवलग यार 'मनजीत' बनतो, कुणी 'आदी'; तर कुणी 'शिउली' ची जवळची मैत्रीण बनते तर कुणी तिची आई. कुणी 'डॅन'सुद्धा बनतात. कुठल्या न कुठल्या कोनातून ही कहाणी आपल्याला येऊन भिडते.
तिचा वेग धीमा आहे, नव्हे खूपच धीमा आहे. पण ती लांबवलेली नाहीय. कारण एकेक फ्रेम, एकेक प्रसंग खूप विचारपूर्वक आखलेला, बांधलेला आहे. विषय गंभीर असला, तरी सिनेमा त्या गंभीरपणाचं ओझं सतत खांद्यावर वागवत नाही. मांडणीत नेमका समतोल साधला गेला आहे. एक भयंकर घटना घडली आहे, मान्य. पण आयुष्य पुढे चालूच राहणार आहे. ते तसं चालू राहतं. मैत्री, प्रेम, ममता अशी कुठलीही उत्कट नाती अंगावर येणाऱ्या प्रसंगांतून किंवा काळीज पिळवटणाऱ्या संवादांतून मांडली जात नाहीत. ती ओघानेच व्यक्त आणि विकसित होत जातात. शिउलीच्या घरच्यांसाठी पूर्णपणे अनोळखी असणारा डॅन त्यांच्या कुटुंबाचा एक भाग कधी बनतो, ते आपल्यालाही समजत नाही. तर दुसरीकडे, डॅनला शेअर्ड रूम सोडायला लावल्यानंतरसुद्धा मैत्रीत जरासुद्धा फूट पडत नाही, हेदेखील आश्चर्याचं वाटत नाही. बेशिस्त डॅनला अनेकदा शिक्षा करूनही अखेरीस त्याच्याविषयी मनात सहानुभूती असणारा आणि त्याला मदत करणारा हॉटेल मॅनेजरही असाच सहजपणे आपल्यासमोर मांडला जातो. 'देख यार..' म्हणून त्याचं  डॅनला समजावणं खूप ओळखीचं वाटतं. कधी तरी आपल्यालाही कुणी तरी असं सांगितलं होतं, असं जाणवतं.

'ऑक्टोबर' मनाला भावतो कारण सिनेमाने स्वत:चंच मन ओळखलेलं आहे. सुजित सरकार, जुही चतुर्वेदी आणि वरुण धवन ह्या तिघांना ह्या कहाणीचा आत्मा गवसला असावा, असं वाटतं. सरकार आणि चतुर्वेदींबद्दल इतकं आश्चर्य वाटत नाही कारण त्यांनी ह्यापूर्वी अनेकदा (पिकू, विकी डोनर, मद्रास कॅफे इ.) स्वत:ला सिद्ध केलंच आहे. पण वरुण धवन हे एक सरप्राईज पॅकेज आहे. 'बदलापूर'नंतर पुन्हा एकदा त्याने त्याच्यातला ठहराव दाखवला आहे. 'डॅन' ही व्यक्तिरेखा वेगळ्याच गुंत्यातली आहे. 'डॅन' एकीकडे उथळ, अपरिपक्व आहे आणि दुसरीकडे हळवा, इतरांना आधार देण्याइतका खंबीरसुद्धा. तो मॅनेजरला खोटं कारण सांगून सुट्टीसुद्धा मागणारा आहे आणि निराशाजनक परिस्थितीतही सकारात्मकता बाळगणारा आहे. त्याच्या संतापाचा उद्रेक होतो पण त्याच्या भावनिकतेचा कडेलोट कधी होत नाही. तो त्याच्या सध्याच्या आयुष्याने नाखूष जरी असला तरी नंतर आलेल्या अपयशातून शिकवणीही घेतो. हे सगळे काही वरुण धवन खूप समजूतदारपणे साकार करतो.

एकंदरीत 'ऑक्टोबर' एकदा अनुभवण्यासारखा आहेच. 'मीही प्रेम केलं होतं..', 'ते खरंच प्रेम होतं का..?', 'मी उगाच प्रेम केलं होतं..' अश्या अनेक हळव्या आठवणी ज्यांनी खपलीआड जपल्या आहेत, त्या सगळ्यांना 'ऑक्टोबर' स्वत:चा नाही, तरी आपलासा वाटेल. कारण सगळेच 'डॅन' किंवा 'शिउली' नसले, तरी सगळ्यांनी पारिजातक पाहिला आहे. त्याचा चुटपूट लावणारा सुगंध श्वासांत भरला आहे.

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर

1 comment:

  1. सुंदर. पारिजातक खरच फार मोहक वृक्ष आहे. त्याची हळुवार पडणारी फुलं जमिनीवर यायच्या आत ओंजळीत झेलण्याचा लहानपणीचा खेळ अजूनही आठवतो.

    पहावा लागेल हा पिक्चर.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...