प्रस्तुत लेखात सिनेमाच्या शेवटाचा उल्लेख टाळायचा अजिबात प्रयत्न केलेला नाही. जुनाच सिनेमा असल्याने तशी आवश्यकता वाटली नाही. तरी, जर कुणाला सिनेमाचा शेवट आत्ता जाणून घ्यायचा नसेल, तर आधी सिनेमा पाहावा आणि मगच लेख वाचावा, ही विनंती !
गली के मोड़ पे सूना सा कोई दरवाज़ा
तरसती आँखों से रस्ता किसी का देखेगा
निगाह दूर तलक जा के लौट आएगी
- बशर नवाज़
अशी एक अबोल, घुसमटलेली व्यथा. एका घराची, एका कुटुंबाची नव्हे, तर एका समाजाची, एका शहराचीच ! 'बाजार' ह्या व्यथेला वाचा देण्याचा प्रयत्न करतो.
हैदराबाद संस्थान भारतीय प्रजासत्ताकात विलीन झालं. निजामी गेली, नवाबी गेली. निजामाने कुचकामी करून अजगरासारखं सुस्त बनवून ठेवलेल्या कामचुकार लोकांनी आपल्याकडे असलेली संपत्ती आळसात राहून, ऐशारामात बेजबाबदार खर्च करून संपवली आणि मग उरलेल्या पुंजीत दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत ह्यांना पडली. हाता-पायाला अन् स्वभावाला कामाची सवय नाही आणि त्याच वेळी पोटालाही भुकेची सवय नाही; अशी एक कधी विचार न केलेली समस्या ह्या लोकांसमोर 'आ' वासून उभी राहिली.
हे नव-गरीब जरा वेगळ्या प्रकारचे होते. ह्यांच्याकडे राहण्यासाठी बऱ्यापैकी मोठी घरं तर होती, पण त्यांच्या डागडुजी, दुरुस्तीसाठी पैसा नव्हता. ह्यांच्या आवडी-निवडी, अभिरुची उच्च दर्ज्याच्या होत्या, पण त्या पुरवणे त्यांच्या खिश्यासाठी महाग होते. ह्यांचे कपडे कळकट, फाटके नव्हते, पण मोजकेच होते. ह्यांच्या खिश्यात मुखशुद्धीसाठी पान, विडा होतं, पण पोटाची खळगी एक तर रिकामी होती किंवा अर्धीच भरलेली.
असं म्हणता येईल की, आपल्या ह्या वाताहतीस ते स्वत:च जबाबदार होते.
मात्र, पुरुषांच्या नाकर्तेपणामुळे ओढवलेल्या ह्या दुर्दशेच्या गाड्याखाली भरडली गेली ती 'स्त्री'. हे कोणे एके काळचे सुखवस्तू लोक नोकरी वगैरेची लाचारी करण्यापेक्षा घरच्या स्त्रीची विक्री करणे, योग्य समजू लागले. काही वेळी तर स्वत: स्त्रियासुद्धा 'हाच एक तरणोपाय आहे', असं समजू लागल्या आणि स्त्री-शरीराचा एक मोठा बाजार 'निकाह, शादी' ह्या प्रतिष्ठित, गोंडस नावांच्या आड सुरु झाला.
विलीनीकरण झाल्यानंतरची काही वर्षं हैदराबादची अवस्था कशी होती, हे मला निश्चित माहित नाही. ती खरोखरच इतकी भयंकर होती का ? की 'बाजार' मधून दाखवलेली परिस्थिती अतिशयोक्तीपूर्ण आहे, कुणास ठाऊक ! पण एरव्ही, इतर चित्रपटांत केलं गेलेलं गरिबीचं उदात्तीकरण इथे दिसून येत नाही. इथला गरीब आपली भूक भागवण्यासाठी व स्वत:चे आयुष्य सुखी करण्यासाठी नाती, माणुसकी, तत्वमूल्यं ह्या सगळ्या श्रीमंत आभूषणांना चक्क अडगळीत फेकून देतो. तो आपली बहिण, मुलगी, बायको कुणाचाही सौदा करायला तयार होतो. हे सगळं अतिरंजित वाटू शकतं. पण तरी, अगदीच अविश्वासार्ह नाही. आजही ग्रामीण भागांत मुली विकत मिळतातच. किंबहुना, ज्या प्रकारे उत्तर भारतातील काही भागांतला स्त्री-पुरुष संख्येचा समतोल बिघडत चालला आहे, त्याचा विचार करता भविष्यात असे 'बाजार' भरणं आणखी खुलेआम सुरु होऊ शकेल ! (ह्यावरुन २००३ सालचा 'मातृभूमी' हा एक जबरदस्त सिनेमा मला आठवला. युट्युबवर आहे. पाहू शकता.)
हे एकंदर चित्र फार भीषण आहे. पण ह्या सगळ्याची मांडणी मात्र त्या भीषणतेला प्रभावी करत नाही. कारण 'बाजार' मधली कुठलीच व्यक्तिरेखा पूर्णपणे पटतच नाही. प्रसंगांची वीण आणि संवादांची पेरणी कथानकातलं वजन खूप हलकं करून टाकते.
कथानकाच्या केंद्रस्थानी स्मिता पाटीलची 'नजमा' आहे. ही प्रमुख व्यक्तिरेखा प्रचंड गोंधळलेली आहे. तिचं बहुतांश वागणं तर्कविसंगत आहे. एका 'अख्तर' नामक (भरत कपूर) तद्दन भुक्कड मनुष्यासाठी ती आपलं घर सोडून मुंबईला पळून जाते. एका अर्थी ते बरोबरच असतं, कारण घरच्यांनी तर असाही तिचा बाजार मांडलेलाच असतो. मात्र ह्या मनुष्याकडे स्वत:चं काही एक कर्तृत्व नाही, तो तिला त्याच्या एका मित्राच्या रिकाम्या घरी आश्रितासारखं ठेवतो आहे आणि लग्न न करता रोज रात्री शय्यासोबत करून जातो आहे. त्याच्याकडे ना धड नोकरी, ना धड व्यवसाय. तो स्वत: इतका तत्वशून्य व लाचार आहे की त्या अमीरजाद्या वयस्कर मित्राच्या हातातलं खेळणं बनला आहे. आणि दुसरीकडे हैद्राबादला असतानापासून तिच्यावर मनापासून प्रेम करणारा सलीम (नसीरुद्दीन शाह) आहे. जो कमावता, जबाबदार आहेच, पण कवी, लेखकही आहे. जो तिला वारंवार हे समजावतो आहे की अख्तर तिला फसवतो आहे. पण तिला ते पटत नाही ! अश्यातच त्या म्हाताऱ्या मित्राच्या मनात स्वत:च्या शरीरसुखाच्या सोयीसाठी एक मादी लग्न करून करून विकत घेण्याचं डोक्यात येतं. ह्यासाठी त्याला मदत करायला लाचार अख्तर तयार होतोच, त्यात काही आश्चर्य नाही. पण तो नजमालाही ह्यासाठी तयार करतो, तेव्हा मात्र ते पटतच नाही.
मग तो वयस्कर मित्र, अख्तर, नजमा, सलीम, नजमाची एक मैत्रीण असं सगळं लटांबर मुंबईहून हैद्राबादला मुलगी विकत घेण्यासाठी येतं. एका फालतू मनुष्याच्या त्याहून फालतू दोस्तासाठी नजमा, जी स्वत:सुद्धा कधी तरी विकली गेलेली आहे, माद्यांचा बाजार भरवते आणि अजून दोन आयुष्यांना बरबादीच्या रस्त्यावर ओढते. तिला जशी आहे तशी स्वीकारायला सदैव तयार असलेलं एक खरं प्रेम २४ तास डोळ्यांसमोर असताना ही बाई असं का वागते आहे, ह्याचं तर्कसंगत स्पष्टीकरण मिळता मिळत नाही. कारण अख्तरमध्ये त्याच्यावर जीवापाड प्रेम करावं, असं काहीच नाही आणि नजमा त्यात असं काय पाहत असते, तेही स्पष्ट होत नाही. ह्या सगळ्या ठिसूळपणामुळे कथानकात प्रचंड ताकद असूनही 'बाजार' हवा तितका प्रभावी होत नाही.
कहाणीतला दर्द जसा स्मिता पाटीलच्या 'नजमा'मध्ये आहे, तसाच तो सुप्रिया पाठकच्या 'शबनम' आणि फारुख शेखच्या 'सज्जो'च्या प्रेमात आहे. हे प्रेम -
नज़रें मिलती हैं जाम मिलते हैं
मिल रही है हयात फूलों की
- असं गोडगोजिरं राहत नाही. तर ते ह्या गोंडसपणापासून -
बहुत आरजू थी गली की तेरी
सो यास-ए-लहू में नहा कर चले
- अश्या शोकांतिकेपर्यंत पोहोचतं. खरं तर हा प्रवास मन चुरगाळणारा आहे. कुठे तरी आपल्याला आधीच जाणवलेलंही असतं की 'हा स्वच्छ, गुळगुळीत कागद आणि त्यावरचं टापटीप, मोत्यांसारखं अक्षर' हे काही शाश्वत ठरणार नाही. ह्याची नासाडी अटळ आहे. ते तसंच होतं.
देख लो आज हमको जी भरके
कोई आता नहीं है फिर मरके
हे म्हणणारी सुप्रिया पाठक खूप गोड दिसते, कामही मस्तच करते. तिच्यासोबत फारुख शेखही नेहमीप्रमाणेच सहजाभिनय करतो. मात्र ठिगळं-ठिगळं जोडलेलं कथानक एकसंधपणे समोर येत नाही. काही न काही कमी राहतेच राहते.
नसीरुद्दीन शाहचा सलीम मात्र सगळ्यांत जास्त लक्षात राहतो. अजून एक बाजार भरवला जातो आहे, हे जेव्हा त्याला समजतं त्या वेळचा त्याचा मोनोलॉग तर पुन्हा पुन्हा पाहावा असा आहे. ही एक व्यक्तिरेखाच मला तरी मनापासून पटली. तरी त्याचा उद्रेक होतच नाही, हेही जरासं अविश्वसनीय वाटतं.
'निशा सिंग'चाही एक लहानसा रोल आहे. जो तिने मनापासून निभावला आहे. एकाच वेळी तिच्या डोळ्यांत समंजसपणा आणि खट्याळपणा जाणवतात.
'बाजार' हा 'सागर सरहदी' दिग्दर्शित (बहुतेक) एकमेव चित्रपट. 'सागर सरहदी' हे खरं तर लघुकथालेखक. त्यांनी यश चोप्रांच्या काही सिनेमांचे पटकथा, संवाद लेखनही केलं होतं. 'बाजार'ची कथा, पटकथा, संवादही त्यांचेच. पण स्वत: लिहिलेली ही कथा त्यांना स्वत:लाच दिग्दर्शक म्हणून पेलताना कसरत करावी लागली आहे. खूप विचित्र प्रकारे चित्रित केलेले अनेक प्रसंग जाणवतात.
उदाहरणार्थ -
१. 'शबनम'च्या आईकडे (सुलभा देशपांडे) शबनमच्या लग्नासाठी स्थळं घेऊन येणारी एक वृद्ध बाई व्हरांडा/ ओसरीत बसून स्थळ सांगत असताना बाजूला एका अर्धपारदर्शक पडद्याआड शबनम आणि तिची बहिण/ मैत्रीण उभ्या राहून सगळं ऐकत आहेत. त्यांचं तिथे उभं राहणं, एकमेकांशी कुजबुजणं खूपच कृत्रिम, अवघडलेलं वाटतं.
२. नजमा 'सज्जो'ला (फारुख शेख) घरी पार्टीसाठी आमंत्रण देते, तेव्हा ती म्हणते की, 'आज शाम को दावत हैं.' त्या 'दावत'साठी सज्जो आणि शबनम जातात. तिथे शबनम गाणं गाते. ती गात असताना मागे काळाकुट्ट अंधार आहे. म्हणजे रात्र झालेली दाखवली आहे. तर पुढच्याच दृश्यात सज्जो आणि शबनम जेव्हा रस्त्यावर बाहेर पडतात, तेव्हा बाहेर उजेडही असतो आणि मशिदीतली 'अजान'ही ऐकू येते ! इथे वेळेचं गणित गडबडलंय बहुतेक.
अश्या अजूनही काही गोष्टी खटकतात. ह्या फक्त वानगीदाखल.
शेवट तर अगदीच अतर्क्य आहे. जर शबनमला जीवच द्यायचा होता, तर ती लग्न करतेच का ? इतकी पराकोटीची कृती करण्यापेक्षा पळून जाण्याचा प्रयत्न का करत नाही किंवा लग्नाआधीच जीव का देत नाही किंवा तसा प्रयत्न तरी का करत नाही ? केवळ एक शोकांतिका लांबवण्यासाठी, जेणेकरून ती अधिकाधिक बोचावी, लग्न होऊ दिलं आहे असं वाटतं.
शबनमच्या मृत्युनंतर सज्जो एक किंकाळी फोडतो. त्याचं ते किंकाळी फोडण्याचं दृश्य म्हणजे नुसतंच एक ठिगळ जोडल्यासारखं झालं आहे. म्हणजे, >ती मरते + सज्जोच्या आजूबाजूला चार-पाच माणसं आहेत, तो किंचाळतो + पुढचं ठिगळ< असा सगळा प्रकार आहे.
'बाजार'ची सगळ्यात मोठी ताकद आहे 'खय्याम'चं संगीत. ह्या संगीताची आणि 'उमराव जान'च्या संगीताची जातकूळ एकच. ह्या सर्व गाण्यांसाठीही लता मंगेशकरांपेक्षा आशा भोसले हव्या होत्या, असं माझं आधीपासूनचंच मत आहे. गाणी पडद्यावर पाहत असताना ते अजून ठाम झालं. 'तलत अजीझ'चा 'फिर छिडी रात..' मधला आवाज मला तरी आवडत नाही. त्यांचा हा विशिष्ट आवाज, जो अनेक गाण्यांत आहे, तो मला एका कपात १० चमचे साखर घातलेल्या चहासारखा वाटतो. सुरेश वाडकरांशी मिळताजुळता. (वाडकरांचा जो दमदार आवाज 'हुजूर इस कदर भी..', 'साँझ ढ़ले गगन तले..' सारख्या काही गाण्यांत आहे, तसा नाही, इतर काही गाण्यांत आहे तसा.) हा आवाज गुळगुळीत, मिळमिळीत वाटतो. 'दिखाई दिए यूँ..' हे माझं अत्यंत आवडतं गाणं. पडद्यावर पाहताना ते अंमळ अजून आवडलं, कारण सुप्रिया पाठक !
'उमराव जान' ची गाणी 'शहरयार'नी लिहिली होती, तर इथे बशर नवाज, मीर तकी मीर, मिर्झा शौक़, मखदूम मोहीउद्दीन असे वेगवेगळे शायर आहेत. सगळ्यांनी वजनदार लिहिलं आहे आणि म्हणूनच आजही ही गाणी आपल्या ओठांवर आहेत, उद्याही असणार आहेत.
'बाजार' खूप अपेक्षा ठेवून पाहिला. चांगला आहे, पण महान वगैरे वाटला नाही. एक अप्रतिम काव्य बनता बनता राहून गेलं, ह्याची हुरहूर मनाला लागली आहे. अर्थात, काव्याची अनुभूती ही व्यक्तीसापेक्ष असते. एकाला जे आवडेल, ते सगळ्यांना आवडेलच असं नाहीच आणि जे एकाला आवडणार नाही, ते सर्वांना आवडलेलं असूही शकतं. त्यामुळे ही 'बाजार' नावाची चित्रपट कविता मला जरी खूप आवडली नसली, तरी इतरांना आवडू शकेलच.
- रणजित पराडकर
Wow, an awesome story.
ReplyDeleteHave heard the songs 100s of times, but never saw the movie...Good one
ReplyDeleteHave heard the songs 100s of times, but never saw the movie...Good one
ReplyDelete