Monday, November 02, 2015

अंधारात हरवलेला चार्ल्स (Movie Review - Main Aur Charles)

चार्ल्स शोभराज.
जगभरातल्या सगळ्यात सुप्रसिद्ध गुन्हेगारांपैकी एक आणि भारतातला तर बहुतेक सर्वाधिक सुप्रसिद्ध गुन्हेगार. सहसा गुन्हेगार कुप्रसिद्ध असतात, पण चार्ल्स सुप्रसिद्धच होता. ऐंशीच्या दशकात जेव्हा त्याच्या बातम्या वृत्तपत्रांचे मथळे बनत होत्या, तेव्हा त्या प्रत्येक बातमीगणिक तो लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनत होता. त्या काळातल्या अपरिपक्व लहान व तरुण मुलांना तर 'चार्ल्स शोभराज' ह्या नावाभोवतीचं वलय वेगळंच वाटत होतं. मला आठवतंय, जेव्हा मी हे नाव पहिल्यांदा ऐकलं होतं, तेव्हा किती तरी दिवस मला ही व्यक्ती कुणी तरी गुप्तहेर किंवा राजकुमार वगैरे आहे असं वाटत होतं ! सामान्य लोकांत बनलेल्या त्याच्या ह्या प्रतिमेसाठी पूर्णपणे 'श्रेय' माध्यमांना देण्यापेक्षा मी असं म्हणीन की चार्ल्सने माध्यमांचा उत्तमप्रकारे, चाणाक्षपणे वापर करून घेतला होता. 'मैं और चार्ल्स' मध्ये जेव्हा एक वरिष्ठ माध्यम प्रतिनिधी चार्ल्सविषयी बोलताना म्हणतो, 'चार्ल्स वोह कहानियाँ लिखता हैं जिन्हें वोह बेच सके' तेव्हा त्यातून हेच समजून येतं की हा गुन्हेगार इतर गुन्हेगारांपेक्षा खूप वेगळा होता. तो अभ्यासू, अतिशय चतुर, निडर, प्रचंड आत्मविश्वास असलेला आणि खूप संयमही असलेला - त्या 'वरिष्ठ माध्यम प्रतिनिधी' च्याच शब्दांत - एक असा लेखक होता, जो लिहिण्यासाठी पेन व कागद वापरत नव्हता, तर स्वत:चं आयुष्यच वापरत होता !

चार्ल्स शोभराजच्या करामतींवरून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपापला कार्यभाग उरकला. अनेक चित्रपटांतही त्याच्या क्लृप्त्या बेमालूमपणे वापरल्या गेल्या आणि काही व्यक्तिरेखाही ढोबळपणे त्याच्यावर आधारून उभ्या केल्या गेल्या. मात्र थेट चार्ल्सवरच चित्रपट बनवणे आजपर्यंत शक्य झालं नव्हतं कारण चाणाक्ष चार्ल्सने आपल्या जीवनकहाणीचे हक्क विकत घेण्यासाठी लावलेली बोलीच तोंडचं पाणी पळवणारी होती. मात्र 'मैं और चार्ल्स' बनवताना हे हक्क घेण्यात आले तत्कालीन दिल्ली पोलीस कमिशनर 'आमोद कांत' ह्यांच्याकडून. पण चित्रपट काही श्री. कांत ह्यांच्या दृष्टीकोनातून कहाणी सांगत नाही. तो पूर्णपणे चार्ल्सचाच चित्रपट आहे. तो 'मैं और चार्ल्स' नसून ' मैं और कांत' आहे.

'प्रवाल रामन' हे रामगोपाल वर्माच्या 'फॅक्टरी'चं एक उत्कृष्ट प्रोडक्ट आहे. 'डरना मना है', 'डरना जरुरी है' आणि '404' हे त्यांचे चित्रपट पाहण्यासारखे आहेत. पण 'चार्ल्स'ची कहाणी सांगताना त्यांनी वेगळीच धाटणी निवडली आहे. हे जे कथन आहे ते काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेल्या दिबाकर बॅनर्जींच्या 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' च्या सादरीकरणाशी थोड्याफार प्रमाणात साधर्म्य सांगतं. हा चित्रपट पहिल्यांदा बघतानाच दुसऱ्यांदा पाहिला पाहिजे. नाही तर दुसऱ्यांदा बघूनही पहिल्यांदा पाहिल्यासारखा वाटेल. म्हणजे, तो बघण्यापूर्वी चार्ल्सविषयीची माहिती असणं आवश्यक आहे आणि तिला एक उजळणी देणंही. ही एक परीक्षा आहे. ह्या पेपरला बसण्यापूर्वी अभ्यास करणे गरजेचं आहे. (आणि ते केलं नसेल, तर कॉपी करण्यासाठी सोबत कुणी तरी असणं तरी आवश्यक !)
किंचित कर्कश्य पार्श्वसंगीत, हळू आवाजातले संवाद, संवादात इंग्रजीचा भरपूर वापर आणि संपूर्ण चित्रपटात सतत असलेला अंधार ह्यामुळे आधीच अंमळ क्लिष्ट सादरीकरण आणखी क्लिष्ट वाटायला लागतं. चित्रपट उरकतो, आपल्याला काही तरी वेगळं, नवीन पाहिल्यासारखं वाटतं, पण त्याने समाधान झालेलं नसतं. म्हणूनच 'मैं और चार्ल्स' सर्वांच्या पसंतीला उतरेल, ह्याची शक्यता कमी आहे.

चार्ल्सचा गुन्हेगारी जगतातला प्रवास हा भारतासह जवळजवळ १०-१२ देशांतला आहे. मात्र चित्रपट भारत व थायलंडव्यतिरिक्त इतर देशांना स्पर्श करत नाही. तो त्याच्या आयुष्यातल्या त्याच टप्प्याबद्दल सांगतो ज्या टप्प्यात श्री. आमोद कांत त्याच्याशी संबंधित होते. मात्र ह्यामुळे चार्ल्स पूर्णपणे उभा राहत नाही आणि मुख्य व्यक्तिरेखेचाच आगा-पिच्छा समजून घ्यावा लागत असल्याने चित्रपटच अपूर्ण ठरतो.

ही मुख्य व्यक्तिरेखा कितीही अपूर्ण असली, तरी रणदीप हुडा कमाल करतो. त्याचा चेहरा चार्ल्स शोभराजशी किती मिळता जुळता आहे, हे चित्रपट पाहताना जाणवतं. अर्थात, त्याचा मेक अप व गेट अप त्याला हुबेहूब 'चार्ल्स' बनवतो, पण मूळ चेहराही बऱ्यापैकी साम्य सांगणारा आहे. त्यामुळे ह्या भूमिकेसाठी इतर कुणीही अभिनेता  इतका फिट्ट ठरला असता का, ह्याचा संशय वाटतो. बोलण्याची अ-भारतीय ढब (बहुतेक फ्रेंच) त्याने अप्रतिम निभावली आहे. शोभराजच्या ज्या 'चार्म' बद्दल सगळे बोलतात, तो 'चार्म'सुद्धा त्याने दाखवला आहे. त्याचं व्यक्तिमत्व कुणालाही भुरळ पाडेल असं खरोखर वाटतं, त्यामुळे त्याच्यावर पूर्णपणे भाळलेल्या 'मीरा शर्मा'ची आपल्याला दयाच येते.



'मीरा'ला साकारणारी रिचा चढ्ढासुद्धा लक्षात राहते. तिचं 'मसान'मधलं काम मला तरी पूर्ण मनासारखं वाटलं नव्हतं, पण इथे मात्र ती 'मीरा' म्हणून कम्फर्टेबल वाटते.

आमोद कांत ह्यांच्या भूमिकेत अजून एक गुणी अभिनेता 'आदिल हुसेन' दिसून येतो. कर्तव्यदक्ष आणि चार्ल्सला अचूक ओळखणारा त्याच्याच इतका चलाख व अभ्यासू पोलीस ऑफिसर आदिल हुसेननी उत्तम वठवला आहे. चित्रपटाच्या कहाणीचं वलय चार्ल्सभोवती आणि पर्यायाने रणदीप हुडाभोवती असल्याने आमोद कांत व पर्यायाने आदिल हुसेन सहाय्यक किंवा दुय्यम ठरतात, हे दुर्दैवच.

टिस्का चोप्रा कांतच्या पत्नीची तिय्यम भूमिकेत मर्यादित दिसते आणि त्यामुळे विस्मृतीत जागा मिळवते.

इन्स्पेक्टर सुधाकर झेंडे, ज्यांनी प्रत्यक्षात चार्ल्सला गोव्यात जाऊन पकडून मुंबईला आणलं होतं, 'नंदू माधव' ह्यांनी साकारला आहे. अजून एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर, ज्याला कुठे तरी बहुतेक ह्याची जाणीव असते की त्याने चार्ल्सला पकडलेलं नसून, चार्ल्सने स्वत:च स्वत:ला पकडवलं आहे, त्यांनी सफाईने साकारला आहे. 'चार्ल्स'सोबतच्या त्यांच्या अनेक नजरानजर त्यांनी आपलं अभिनय कौशल्य सिद्ध करण्याच्या संधी समजून अक्षरश: जिंकल्या आहेत.

आजकालच्या बहुतांश चित्रपटांप्रमाणे, संगीत कुठलेही मूल्यवर्धन करत नाही. उलटपक्षी पार्श्वसंगीत अधूनमधून त्रासच देतं.

कथा-पटकथालेखन (प्रवाल रामन) बहुतेक जिकिरीचं होतं. कारण २ तासांत चार्ल्सची पूर्ण कहाणी सांगणं अशक्यच असावं. त्याचं आयुष्य खरोखर इतक्या नाट्यमयतेने भरलेलं आहे, म्हणूनच तर त्याने त्याचे हक्क विकण्यासाठी भरमसाठ बोली लावली आहे ! कदाचित हा विषय दोन-तीन भागांत सांगण्याचा असावा. तरी थोडा सुटसुटीतपणा असता, तर आणखी मजा आली असती, हे मात्र नक्कीच.
काही संवाद चुरचुरीत आहेत आणि एकंदरीतच जितके ऐकू येतात तितके सगळेच लक्षवेधक आहेतच ! ह्यासाठी रामन ह्यांचं अभिनंदन !



एकंदरीत, 'मैं और चार्ल्स' हा काही एन्टरटेनर नाही. हा चित्रपट प्रायोगिकतेच्या सीमारेषेवर 'मुख्य धारा' व 'डॉक्युमेंटरी' ह्यांच्यात 'सी-सॉ' खेळतो. ही खेळ जे एन्जॉय करू शकतात, त्यांना चित्रपट पाहवतो. बाकी लोक मात्र, दुर्दैवाने 'The End' ची वाट पाहत बसतात. कारण ह्या चित्रपटाच्या अंधारात कहाणीचा गुंता सोडवणं कठीणच आहे !

रेटिंग - * *

हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्हमध्ये ०१ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे.

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...