Sunday, September 06, 2015

लंगडा घोडा, रेस में दौडा (Movie Review - Welcome Back)

उत्तम दिग्दर्शक हा एक 'जॉकी' असतो. कलाकार, कथानक, पटकथा, संगीत, संवाद वगैरे सगळ्या बाबींचा एक घोडा करून तो त्यावर स्वार होतो आणि रेस करतो. तो रेस स्वत:साठी पळतो. त्याला माहित असतं की आपण कितपत मजल मारू शकतो आणि तो हमखास त्याच्यापुढेच जातो. त्यामुळे हरला तरी तोच जिंकतो आणि जिंकला तर तो जिंकलेला असतोच !
बाकी लोक स्टारकास्ट, कथानक किंवा विशिष्ट काळात 'चलती' असलेलं काहीही बकवास (उदा. - हिमेश रेशमिया, यो यो हनी सिंग किंवा रिमेक्स, सीक्वल इत्यादी) पैकी १-२ ला 'जॉकी' म्हणून बसवतात आणि बाकीच्याचा घोडा बनवून दौडवतात ! अर्थातच, त्या घोड्याचा एक पाय ते स्वत:सुद्धा असतात ! अल्लाह मेहरबान हो, तो गधा भी पहलवान होता है, तो घोडा क्यूँ नहीं ? त्यामुळे बऱ्याचदा रेस चांगली होतेही. पण ते प्रत्यक्षात मिथक असतं. एका कोपऱ्यात उभं राहून ज्याने ती रेस लौकिकार्थाने जिंकली असेल, तो हिंमतवान 'जॉकी' ह्या पुचाट जॉकीच्या बेगडी यशाला गालातल्या गालात हसत असावा.

'वेलकम' (पहिला भाग) आला तेव्हा अक्षय कुमारची चलती होती. कतरिना कैफलाही चांगला भाव मिळायला सुरुवात झाली होती आणि 'नाना पाटेकर + अनिल कपूर' ही दुकलीसुद्धा वेगळाच 'फ्लेवर' घेऊन येत होती. जोडीला शिखरावर पोहोचलेला परेश रावलसुद्धा होता ! बस्स ! अनीस बाजमींनी ही तगडी स्टारकास्ट 'जॉकी' बनवून इतर सगळ्याचा घोडा केला आणि 'वेलकम बॅक'ला रेस दौडवली ! घोडा अगदी तगडा नव्हता, तरी लंगडाही नव्हता. त्यामुळे रेस मनासारखी झाली. पण हे असं मिळालेलं यश नशेसारखं असतं. पुन्हा पुन्हा चाखावंसं वाटतं.
आता अनीस बाजमींनी 'नाना + अनिल + परेश रावल' च्या जोडीला जॉन अब्राहम, डिम्पल कापडिया आणि नसिरुद्दीन शाह आणून घोड्यावर बसवले. पण ह्यावेळी घोडा लंगडा निघाला ! बकवास कथानक, पोरकट पटकथा, भिकार अभिनय, चुकार संकलन, बंडल संगीत, सुमार छायाचित्रण वगैरे हाराकिरी एकत्र आली आणि घोडा पिचला !

तर त्याचं होतं काय की -
उदय शेट्टी (नाना पाटेकर) आणि मजनू (अनिल कपूर) हे पूर्वाश्रमीचे 'भाई'लोग आता 'शराफत की जिंदगी' गुजार रहेले होते है. त्यासाठी त्यांनी दुबईत स्वत:चं एक अलिशान हॉटेल सुरु कियेला होता है. पण वाढत्या वयासोबत उदय-मजनू आपापल्या लग्नासाठी अजूनच तरस रहेले होते है. 'नजफगढ'ची महाराणी (डिम्पल कापडिया) मुलगी राजकुमारी नंदिनी (अंकिता श्रीवास्तव) ला घेऊन त्यांच्या हॉटेलात येते आणि उदय-मजनूच्या दिलांमध्ये बोले तो शहनाई बजने लगती है ! पण आपण आपल्या बाईकवर मजेत जात असताना बाजूने जाणाऱ्या एष्टीतून कुणी तरी पचकन थुंकावं, तसा अचानक कुठून तरी उदय शेट्टीचा बाप (म्हातारा नाना) उदयची एक लहान बहिण (श्रुती हासन) सोबत घेऊन उभा ठाकतो आणि तिच्या लग्नाच्या जबाबदारीची माळ उदयच्या गळ्यात घालून उंडारायला निघून जातो !
जशी स्टोरीच्या सोयीसाठी उदयची एक बहिण पैदा केली गेली, तसाच डॉ. घुंगरू (परेश रावल) चा एक मुलगासुद्धा पैदा करणे आवश्यक आहेच. नाही तर अकाऊन्ट टॅली कसं होणार ? मग उपटसुंभ मुलाच्या भूमिकेत साचेबद्ध पॅक्सयुक्त बॉडी घेऊन 'अजय' (जॉन अब्राहम) प्रकट होतो. आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न ! पहिलाच 'वेलकम' नव्या चेहऱ्यांसह पुन्हा सुरु होतो ! हे अजून काही नवे चेहरे म्हणजे वॉण्टेड भाय (नसिरुद्दीन शाह) आणि त्याचा मुलगा हनी (शायनी आहुजा).



चित्रपटात सरळसरळ दोन गट पडलेले आहेत. नाना + अनिल + डिम्पल + नसीर विरुद्ध जॉन + श्रुती + अंकिता + शायनी आहुजा. नाना + अनिलचा गट जे काही करेल, त्यावर बोळा फिरवणे हा एककलमी कार्यक्रम जॉन + श्रुतीचा गट यशस्वीपणे राबवतो. पहिल्या भागात मूर्ख बहिणीची बिनडोक भूमिका जितक्या ठोकळेबाजपणे कतरिना कैफने केली होती होती, तितक्याच किंवा त्याहूनही चांगल्या ठोकळेबाजपणे श्रुती हासन दुसऱ्या भागात करते. ती पडद्यावर आल्यावर प्रत्येक वेळेस आपल्याला कमल हासनबद्दल अतीव सहानुभूती वाटते. जॉन अब्राहमकडून कुठलीही अपेक्षा ठेवण्यापेक्षा मी सलमान, कतरिना वगैरेंकडून ठेवीन. त्यामुळे त्याचा 'ठोकळा' अपेक्षितच होता.
नसिरुद्दीन शाहचा प्रवेश मध्यंतराच्याही नंतर आहे. अश्या किरकोळ आणि तोकड्या लांबीच्या भूमिका हा महान अभिनेता का करतो, हे समजत नाही.
वर उल्लेखलेल्या दोन गटांत 'परेश रावल' येत नाहीत. कारण ते दोन्हीकडून काम करतात !
आता परेश रावल ह्यांनी जरा वेगळं काही तरी करायला हवं, असं वाटायला लागलं आहे. अगदी सुरुवातीच्या काळात ज्याप्रकारे एका पाठोपाठ एक चित्रपटांत त्यांना एकसारख्याच नकारात्मक भूमिका मिळत गेल्या होत्या, तसंच काहीसं आता परत होऊ नये, अशी एक प्रामाणिक इच्छा आहे.
नाना पाटेकर आणि अनिल कपूरची जोडी मात्र धमाल करते. दोघांपैकी एक जरी चित्रपटात नसता, तर कदाचित मध्यंतरापर्यंतसुद्धा सहन झालं नसतं ! ह्या दोघांनंतर 'राज शांडिल्य' ह्यांचे खुसखुशीत संवाद हीच एक चांगली गोष्ट चित्रपटात आहे. त्यांच्या प्रत्येक ओळीला बरोब्बर न्याय नाना आणि अनिलने दिला आहे. दोघे पूर्ण वेळ 'ट्वेंटी२०' मूडमध्ये जबरदस्त फटकेबाजी करतात, एकही चेंडू वाया घालवत नाहीत !

'टाईम लगा रै कायको..' हे 'टपोरी सॉंग' त्यातल्या त्यात बरं जमून आलं आहे. बाकी सगळा गोंधळ डोक्याचा बाजार उठवणारा आहे. (ह्या 'टपोरी सॉंग' मध्ये 'जॉन'चं सोंग बघण्यासारखं आहे. गोविंदाची नक्कल करण्याचा त्याचा प्रयत्न हास्यास्पद झाला आहे. एकूणच त्याला हा 'टपोरी' बाज झेपलाच नाहीय, हेच खरं.)

कथा-पटकथेत इतकी प्रचंड मोठी भगदाडं क्वचितच पाहायला मिळतात. ६० च्या दशकात चित्रपट केवळ गाण्यासांठी असायचे. त्या गाण्यांना पडद्यावर दाखवण्यासाठी कथानक असायचं. तेव्हा असली भगदाडं असत. आज ती बुजवायला कुणी एस डी, ओ पी, मदन मोहन, शंकर-जयकिशन, रवी, नौशाद, सज्जाद वगैरे राहिलेले नाहीत. आता तर लहानश्या छिद्रालाही लपता/ लपवता येत नाही.
भोकं बुजवायला ठिगळसुद्दा न लावण्याचा कामचुकारपणा केल्याबद्दल ह्या चित्रपटाला तिकीट खिडकीवर 'कडी से कडी सजा' मिळावी आणि 'वेलकम बॅक'ला 'गेट लॉस्ट' सुनावलं जावं, अशी मनापासून इच्छा आहे. पण चित्रपटगृहातून बाहेर पडताना, लोकांच्या ज्या गप्पा कानांवर पडल्या, त्यावरून तरी असंच वाटतंय की हा घोडा लंगडा असला, तर रेस 'फिक्स्ड' असावी !

रेटिंग - *


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये ०६ सप्टेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...