Monday, September 14, 2015

जवळजवळ झीरो (Movie Review - Hero)

मुंबई. मुंबईचा समुद्र. मुंबईचे लोक. रेल्वेगाड्या. मुंबईचा ट्राफिक. रस्ते आणि गल्ल्या.
चित्रपटाच्या सुरुवातीला, शीर्षकांसोबत कॅमेरा असं सगळं ओझरतं दाखवत फिरतो आणि स्थिरावतो तो एका गल्लीतल्या एका छुप्या अड्ड्यावर. इथे एक अर्ध्या माडाच्या उंचीचा खलपुरूष भल्या सकाळी चिकनच्या तंगड्या चावत बसला आहे. सोबत एक शरणागत व भेदरलेला गुजराती मनुष्य बसला आहे. पर्युषण काल कदाचित नसावा म्हणून त्याला त्या अभक्षभक्षणावर आक्षेप नसावा किंवा कदाचित तो जैनधर्मीय नसावा. तर अर्धा-माड-खलपुरुषाच्या फांद्या - अर्थात पंटर लोक - दोन तरुण पोरांना बखोटीला धरून तिथे घेऊन येतात आणि त्यांना पाहून शरणागत, भेदरलेल्या मनुष्याच्या पाचावर धारणच बसते ! का ? तर आता त्यांना सोडवायला त्यांचा बॉस कम मित्र व आपल्या चित्रपटाचा 'हीरो' येणार आहे, हे आपल्याला पुढील अर्थपूर्ण संवादांतून समजून येतं. मुंबईतल्या कुठल्याश्या किनाऱ्यावर आचरट व्यायाम करण्यात रमलेल्या 'हीरो'ला त्याचा एक पंटर टीप देतो आणि अपेक्षेनुसार तो 'त्या' गल्लीतल्या छुप्या अड्ड्यावर अवतरतो. अर्थात, गुंड असला तरी तो 'हीरो' असल्याने त्याची एन्ट्री धमाकेदार व्हायलाच हवी. ती तशी करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला जातो. त्याने कुठून तरी असा एक बुलडोझर आणलेला असतो की त्या बुलडोझरच्या चालण्याने सभोवताल भूकंपसदृश थरथरतो ! धरणीकंप झाला तरी, अर्धा-माड-खलपुरुष चिकन खाण्यात रममाण असतो. बुलडोझर आत शिरतो, अड्ड्याची एक बाजू चिरडतो आणि आतून आपला 'हीरो' पराकोटीची स्टाईल मारत उडी मारून बाहेर येतो. पण कितीही उंच झालं, तरी तगरीचं झाड माडाएव्हढं होत नाही. आणि हे तर अर्धा-माड-खलपुरुषाच्या समोरही 'बचकानं' वाटतं. त्यामुळे ही एन्ट्री धमाकेदार वगैरे काही न होता हास्यास्पद होते. ह्यानंतर एक अत्यंत ढिसाळ पद्धतीने चित्रित केलेली हाणामारी होते. जिच्या अखेरीस हीरो आपल्या दोघा साथीदारांसह विजयी मुद्रेने परत येतो आणि अर्धा-माड-खलपुरूष मान टाकून सपाट होतो.
गुंड असला, तरी 'हीरो' आहे. त्यामुळे त्याच्या 'हराम की कमाई' ला त्याने गरजूंमध्ये वाटलं पाहिजे. ही रॉबिनहुडी शिकवण चित्रपटातले गुंड हीरो वर्षानुवर्ष पाळत आलेले आहेत. हा 'हीरो'सुद्धा पाळत असतोच. पण तरी मित्रांच्या आग्रहास्तव, उर्वरित पैश्यांत तो एका महागड्या पबमध्ये जातो आणि शब्द गुदमरलेल्या एका घणाघाती गाण्यावर अनाकर्षक नृत्य करतो. इथेच तो चित्रपटाच्या 'हिरोईन'ले इम्प्रेसही करणार असतो आणि करतोच.


आता अश्या प्रकारे मी अख्खा चित्रपट इथे सीन-बाय-सीन मांडू शकतो आणि तो तसा मांडला, सारं काही उघड केलं, तरी काही बिघडणारही नाही. कारण न पाहिल्यास काही चांगलं हुकल्यासारखं किंवा आधीच सगळं काही सांगितलं गेल्याने रसभंग होण्यासारखं 'अथ' पासून 'इति' पर्यंत ह्या नव्या 'हीरो' मध्ये काहीच नाही. इथे 'हीरो' म्हणजे चित्रपट. चित्रपटाचा हीरो इतकाही 'झीरो' नाही.
हीरो 'सूरज'च्या भूमिकेतल्या 'सूरज पांचोली'ला १९८३ साली झळकलेल्या मूळ 'हीरो'मधल्या जॅकी श्रॉफची सर नाही. कारण त्याचा चेहरा आणि कपडे घातल्यावर जाणवणारी देहयष्टी अ‍ॅक्शन हीरोला साजेशी वाटत नाही. तो जेव्हा प्रियकर बनतो, तेव्हा चालून जातो म्हणून 'झीरो' नाही. अगदी पाप्याचं पितर असूनही 'वासेपूर' मधला नवाझुद्दिन सिद्दीकीचा 'फैझल खान' जशी दहशत निर्माण करतो, तशी छाप आपल्या पहिल्याच चित्रपटात हे स्टारकोकरू सोडू शकेल ही अपेक्षाच चुकीची आहे. ती अपेक्षा साहजिकच दिग्दर्शकानेही ठेवलेली नसावी, म्हणून जमेल तिथे त्याने सूरजचे कपडे उतरवून त्याच्या अंगावरचं गोंदण, पाच-पंचवीस पॅक्स आणि टरटरलेले स्नायू दाखवून त्याला 'शक्तिमान' दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा सगळा प्रयत्न तूप-साखरेत घोळवलेल्या चेहऱ्यामुळे अयशस्वीच ठरतो.

आपल्या रोजच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यात एखादं बांधकाम दोन-चार स्लॅब्स झाल्यावर अचानक दृष्टीस पडतं आणि ते पाहून आपण चपापतो की, 'अरे ! इथे इतकी जागा होती ? कधी बांधलं हे सगळं ?' असंच काहीसं मला चित्रपट सिताऱ्यांची पोरं पडद्यावर झळकली की वाटतं. (शेखर सुमनचा मुलगा ? अनिल कपूरची मुलगी ? वगैरे)
अतिया शेट्टीला पाहून एकदम जाणवलं की सुनील शेट्टीसुद्धा किती मोठा झाला !
वय सरून गेलं तरी सुनील शेट्टी अभिनय शिकला नाही, अतिया शेट्टीसुद्धा वडिलांचा कित्ता गिरवते. ती सर्वतोपरी वडिलांवर गेली आहे. दिसतेही तशीच आणि कामही तसंच. तिच्या चेहरेपट्टीत मधूनच मला 'भूमिका चावला' चाही भास झाला आणि मनातल्या मनात मी भूमिका चावलाची क्षमाही मागितली. जुन्या 'हीरो'मधल्या मीनाक्षी शेषाद्रीशी अतियाची तुलना करणं मी प्रयत्नपूर्वक टाळलं आहे. मीनाक्षी शेषाद्री तर आजही कित्येक पटींनी सुंदर दिसते.

तिगमांशू धुलियाचा आयजी श्रीकांत माथुर थोडासा स्वच्छ व नीटनेटका दाखवता येऊ शकला असता. फार नाही, फक्त ती बोकडासारखी दाढी जरी काढली असती, तरी चाललं असतं. तारवटलेले डोळे, पिंजारलेले केस, अस्ताव्यस्त पेहराव, बेढब शरीर आणि दाढीचे बुरसट खुंट हा अवतार आयपीएस अधिकाऱ्याचा वाटत नाही.

शरद केळकर मात्र छोट्याश्या भूमिकेत लक्षात राहतो. कमावलेलं शरीर, आश्वासक देहबोली आणि वजनदार आवाज ह्याच्या जोरावर तो एक इन्स्पेक्टर म्हणून फिट्ट बसतो.

आदित्य पांचोली आपलं काम चोख निभावतो तर विवान भाटेना ('चक दे इंडिया' मधला क्रिकेटपटू) दुय्यम भूमिकेतही भाव खाऊन जातो.

निखिल अडवानी हा तसा चांगला दिग्दर्शक आहे. त्याचा हा एक चित्रपट आपण आणि त्यानेही विसरायला हवा. किंवा कदाचित बनवता बनवताच तो विसरला असावा. कारण काही ठिकाणी दिग्दर्शकाच्या गैरहजेरीचे सबळ पुरावे सापडतात ! ती शारीरिक गैरहजेरी की बौद्धिक, हे कुणास ठाऊक !

जुना हीरो आठवल्यावर पाकिस्तानी गायिका 'रेशमा' नी गायलेलं अजरामर 'लंबी जुदाई' आठवतं आणि तत्क्षणी अंगावर सरसरून काटा उभा राहतो. 'डिंग डॉंग', 'तू मेरा हीरो', 'प्यार करनेवाले..' वगैरे इतर गाणीही आठवतात आणि कानांची श्रीमंती वाढल्यासारखं वाटतं. जुन्या चित्रपटांचा रिमेक करताना हीच एक महत्वाची अडचण आजच्या जमान्यात जाणवत असावी. बहुतांश चित्रपटांच्या यशात संगीताचा महत्वाचा वाटा असायचा. आज त्या ताकदीचं संगीत देणारे मोजके लोकच उरलेत. अमाल मलिक, मित ब्रदर्स अनजान आणि सचिन-जिगर ह्या लोकांनी आपापल्या परीने उत्कृष्ट काम केलं असावं. पण रिमेकच्या बाबतीत ही तुलना 'पूर्वीचं विरुद्ध आत्ताचं' अशी थेट होते आणि तिथे हे उत्कृष्ट कामही निकृष्ट ठरतं. 'मैं हूँ हीरो तेरा', 'जब वी मेट', 'यादां तेरियां' अशी ही गाणी कंटाळा आणत नाहीत. तरी, चित्रपट संपल्यावर लक्षातही राहत नाहीत.

असे रिमेक्स हे बहुतकरुन त्यांच्या तांत्रिक सफाईत जुन्यापेक्षा सरस ठरतात. उदा. - डॉन. तसंही इथे जाणवलं नाही. सुरुवातीस उल्लेख केल्याप्रमाणे अतिशय ढिसाळपणे चित्रित केलेल्या हाणामाऱ्या तर आहेतच. पण कॅमेरावर्कही काही जादू करत नाही आणि संकलन तर बुचकळ्यात टाकणारं आहे.

रिमेकच्या नावाखाली एखाद्या चांगल्या अथवा सुपरहिट (अथवा दोन्ही) जुन्या चित्रपटाची माती कशी करावी, ह्याचं 'हीरो' हे एक ठळक उदाहरण आहे, असा विचार माझ्या मनाला स्पर्श करून गेला आणि लगेच मला 'जंजीर' व 'कर्ज' (कर्ज्ज्ज्ज !) आठवले.
मग मला हा 'हीरो' 'झीरो' न वाटता 'जवळजवळ झीरो' वाटला.

रेटिंग - * *


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये १३ सप्टेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...