Monday, March 03, 2014

सावलीचा राहिलो नाही

रात्र झाली, सावलीचा राहिलो नाही
आपल्याही मालकीचा राहिलो नाही

कृष्ण झालो देवकीचा राहिलो नाही
राम झालो जानकीचा राहिलो नाही

एकटेपण वाढले गर्दी जशी वाढे
मीच माझ्या ओळखीचा राहिलो नाही

एव्हढी तर पातळी मी गाठली आहे
की जगाच्या पातळीचा राहिलो नाही

चार भिंतीआत माझी धावपळ चाले
पहुडलेल्या ओसरीचा राहिलो नाही

जाहला आहेस तू बंदिस्त गाभारी
मी म्हणूनच पायरीचा राहिलो नाही

तूच घे माझ्या प्रियेची काळजी आता
सागरा, मी मुंबईचा राहिलो नाही

चेहरा झाकायचा तर पाउले उघडी
तू दिलेल्या चादरीचा राहिलो नाही

....रसप....
१ मार्च २०१४

2 comments:

  1. रणजीत,
    'राहिलो नाही' ही गझल खूप आवडली. तू मराठी माध्यमात शिकला असशील तर तुझ्या आई-बाबांना धन्यवाद दे. तू मराठी साहित्यात योगदान देशील असं वाटलं नव्हतं तु लहानपणी पाहिलं तेव्हा. तुला कदाचित् आठवणार नाही, मी बांद्र्याला आईकडे गाणं शिकायला येत असे. रश्मीनेही शालेय कवितांना छान चाली लावून असाच गोड़ धक्का दिला होता. मध्यंतरी आई भेटली होती तिच्याकडून तुझी development कळली. रसप लक्षात ठेवलं होतं. इथे टांझानियात मुलाकडे़ भरपूर मोकळा वेळ मिळाल्यावर browse करू म्हटलं आणि तुझं साईटच मिळालं. आता सर्व काही वाचेन. तुला खूप खूप शुभेच्छा !

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...