Wednesday, June 19, 2013

कंटाळ्याचाही कंटाळा !

कधी तरी दु:खांनो माझेही घर टाळा
आता आला कंटाळ्याचाही कंटाळा

जळी स्थळी काष्ठी पाषाणी तुलाच बघणे
खिन्न मनाला सुन्न क्षणी हा सुचतो चाळा

एक दिवस नोकरी अचानक जेव्हा सुटली
छोट्या शिक्षा करणारी आठवली शाळा

जे म्हटले ना कळले, जे कळले ना म्हटले
नजर भिडवली नजरेला अन् हा घोटाळा ?

एकाही शेरातुन जेव्हा निघेल ज्वाला
तेव्हा माझ्या अवशेषांना खुशाल जाळा..

अर्धे खेळुन झाल्यावरती नियम बदलता
खेळातून मला ह्या देवा कृपया गाळा

एकदाच मी हवे तसे रस्त्यास वळवले
पुन्हा पुन्हा वळण्याला त्याच्या बसला आळा

शेर विठ्ठलाबद्दल होता, त्याचा नव्हता
तरी 'जितू' लोकांस दिसे माझ्यातच 'काळा'

....रसप....
१९ जून २०१३

-----------------------------------------------

अर्धे खेळुन झाल्यावरती नियम बदलता
देवा, तुमचा डाव रडीचा तुम्हीच खेळा

....रसप....

Saturday, June 15, 2013

पाऊस आवडत नाही

पाऊस आवडत नाही
तो मनास भिजवत नाही

सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही

ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही !

मैफल रंगत नसताना
अर्ध्यातुन उठवत नाही

मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही

ती अशी पाहते मजला
की स्वत:स पाहत नाही

बन देव, दगड वा श्वापद
माणुसपण सोसत नाही

....रसप....
१४ जून २०१३

Thursday, June 13, 2013

आठवणींची साठवण (अक्षरांचा अक्षर मेळावा, पुणे - ९ जून २०१३ - 'वृत्तांत')

'म. क. स.'च्या 'अक्षरांचा अक्षर मेळावा, पुणे' च्या रंगण्याला फार आधीपासून सुरुवात झाली होती. मेळाव्याची घोषणा झाल्यापासूनच ! समूहावर '९ जून' जाहीर झालं आणि अनेक लोकांनी कॅलेण्डरवर फुल्या मारून ठेवल्या. रोज त्या घोषणेच्या धाग्यावर कुणी ना कुणी तरी स्वत:च्या ओसंडणाऱ्या उत्साहास वाट करून देत होतं आणि अजून काही जणांच्या उत्साहात भर घालत होतं.
माझ्या बाबतीत म्हणाल, तर आठवड्याभरापूर्वीच 'लडाख'वारीसाठी ८ दिवस सुट्टी झालेली असल्याने आणि आम्ही निजामाच्या राज्यात असल्याने (शुक्रवार सुट्टी, शनि-रवि चालू !) कॅलेण्डरवर फुली मारणं खरं तर नकोसं वाटत होतं. पण रोज, अक्षरश: रोज, किमान एक जण तरी फोन करून किंवा चॅटवर विचारणा करत होतं - 'येणार आहेस ना ?' अनेक नवीन नावं धाग्यावर वाचली होती त्यामुळे सर्वांना भेटण्याचं एक वेगळंच औत्सुक्य होतं. एक मन म्हणत होतं, 'नको !!' आणि दुसरं मन म्हणत होतं, 'आत्ता नाही तर कधी ?'
शेवटी दुसऱ्या मनाला झुकतं माप मिळालं आणि अगदी आदल्या दिवशी सुट्टी टाकून कार्यक्रमाला जायचा निर्णय घेतला आणि रात्री उशीरा पुण्यात पोहोचलो.
सकाळी सभागृहात पोहोचलो. कार्यक्रम सुरु होईपर्यंत अनेक लोकांची पहिली भेट घडली. सगळे चेहरे ताजे आणि टवटवीत दिसत होते. मेळावा सुरु होण्याआधीच वाढती गर्दी यशाची हमी देत होती. 'विशाल सह्याद्री'च्या प्रवेशद्वारापासून उत्साहाचे पाट वाहात स्वारगेटपर्यंत एव्हाना पोहोचले असावेत. अत्यंत समर्पकपणे, सोहळ्याची सुरुवात 'ट्वेंटी फोर सेव्हन' उत्साहाने फसफसणाऱ्या मुंबापुरीने केली.

आम्ही मुंबईकर :

'मुंबई टीम' - शिवाजी सावंत, उमेश वैद्य, वैशाली शेंबेकर, बागेश्री देशमुख आणि मनीषा सिलम - ने व्यासपिठाचा ताबा घेतला. मुंबईचा पाऊस छत्र्या, रेनकोट आणि छपरांनाही भेदून तुम्हाला कसा भिजवतो, ह्याचा एक प्रत्यय त्यांनी पावसाच्या विविधरंगी, विविधढंगी कविता, कधी सादर करून, तर कधी गाऊन; उपस्थितांना मोबाईल, लॅपटॉप, मित्र आणि अगदी बायका-पोरांतूनही बाहेर काढून, काव्यसरींत चिंब भिजवून दिला. वैशाली शेंबेकर ह्यांनी अत्यंत व्यावसायिक सफाईने आणि ओघवते सूत्रसंचालन केले. सगळ्यांचा आपसांतला समन्वय वाखाणण्याजोगा होता. एकामागून एक कविता, मुंबईच्या सागराच्या लाटांप्रमाणे एका विशिष्ट लयीत येत होत्या. कुठेही घाई-गडबड नव्हती. शिवाजी सावंत ह्यांचं काव्यगायन, उमेश वैद्य ह्यांचं संयत भावपूर्ण सादरीकरण, वैशाली शेंबेकर ह्यांचे स्पष्ट उच्चार व खणखणीत आवाज, बागेश्रीचा हळुवार व 'जरासा 'हस्की' आवाज आणि मनीषा सिलम ह्यांचा एखाद्या सुरेल गायिकेसारखा गोड आवाज; अशी प्रत्येकाची एक वेगळी शैली मला जाणवली. शिवाजी सावंत ह्यांनी गाऊन सादर केलेलं आणि सहकाऱ्यांनी 'कोरस' दिलेलं एक बालगीत, उमेश वैद्य आणि बागेश्रीने जोडीने सादर केलेल्या दोन कविता आणि बागेश्रीची 'सुख दरवाज्यावर आलं'वाली कविता मला प्रचंड आवडल्या.

प्रकाशली 'प्रिया' :

एका अतिशय आटोपशीर व मनोरंजक कार्यक्रमानंतर सोहळ्याच्या पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. रमेश ठोंबरे ह्यांच्या 'प्रियेचे अभंग' ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर जहागिरदार, ज्यांच्या शुभहस्ते प्रकाशन होणार होतं त्या क्रांति ताई आणि विशेष अतिथी म्हणून सारंगदा कवी रमेश ठोंबरे ह्यांच्यासह विराजमान झाले. सूत्र संचालनाची जबाबदारी अस्मादिकांना देण्यात आली होती. सुरुवातीलाच रमेशने, ह्या पुस्तकात समाविष्ट असलेले काही 'प्रियेचे श्लोक' सादर केले. त्या खुसखुशीत श्लोकांनी प्रेक्षकांत पुन्हा पुन्हा हशा पिकवला ! पुस्तकाच्या प्रतींचे अनावरण करून क्रांति ताईंनी अधिकृतरित्या प्रकाशन केले आणि त्यानंतर सारंगदाने 'कवी रमेश ठोंबरे' काय चीज आहे, ह्याची थोडक्यात ओळख करून दिली. त्याकरिता त्याने रमेशच्या ब्लॉगवरील इतर कविता आणि त्याचा आगामी कविता संग्रह 'महात्म्याच्या देशात' मधील कविता तुकड्यांत सादर केल्या. क्रांति ताईंनी 'प्रियेचे अभंग' वर अत्यंत मार्मिक विचार मांडले. संपूर्ण पुस्तकात राखलेला एक विशिष्ट दर्जा त्यांना खूप भावल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. स्वत:च्या मनोगतात रमेशने त्याला कशा कविता आवडतात, हे सांगताना अनेक उपस्थितांच्या मनातली गोष्ट मांडली. - 'एकदा वाचून जी कविता अजिबात समजत नाही, तिला मी पुन्हा पुन्हा वाचत नाही.'
ह्या सोहळ्यादरम्यान क्रांति ताई व श्री. काकांनी, 'समूहाच्या मेळाव्यांत समूह सदस्यांसाठी पुस्तक प्रकाशनाकरिता व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल', असे जाहीर करून मराठी कवी व कविता ह्यांच्या विकासासाठी व अधिकाधिक लोकाभिमुखतेसाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले.

इंदौर का जोर :

आत्तापर्यंत इंदूरहून आलेले वरिष्ठ कविमित्र पुढील कार्यक्रमासाठी सज्ज झाले होते. व्यासपीठावर सुधीर बापट, अलकनंदा साने, अर्चना शेवडे, सुषमा अवधूत स्थानापन्न झाले. अलकनंदा साने ह्यांनी सूत्रसंचालन केले. प्रस्तावनेत त्यांनी 'बृहन्महाराष्ट्रीय' असे म्हणवले जात असल्याची व्यथा मांडली. खूप भिडलं त्यांचं बोलणं. पण मनात आलं, मराठी माणसाने भौगोलिक एकात्मतेलाही छेदून कोकणी, पश्चिम महाराष्ट्रीय, खान्देशी, वैदर्भीय असे आपणच आपले तुकडे पाडले आहेत. काय करणार ! असो. सादरीकरणास सुरुवात झाली आणि इंदूरकरांनी जादू करण्यास चालू केले ! एकेका कवितेनिशी उपस्थित असे काही रंगत होते जणु ते स्वत:सुद्धा व्यासपीठावर असावेत. (माझा तरी असाच अनुभव होता !) सर्वांच्याच कविता खास होत्या. अर्चना शेवडे ह्यांच्या सुरेल काव्यगायनाने मैफलीत सुंदर रंग भरला. अलकनंदा साने ह्यांची द्विपदी संरचनेतील गझलेप्रमाणे कवाफी पाळलेली एक रचना (सॉरी.... मी लिहून घेतले नव्हते आणि आता काही केल्या ती कविता आठवत नाही. आठवलं की लिहीनच.) आणि सुधीर बापट ह्यांच्या चारोळ्या अप्रतिमच होत्या. बऱ्याच दिवसांनी 'चारोळी' हा प्रकार मला आवडला. नाही तर आजकाल 'चारोळी' ह्या नावाखाली चार-चार ओळींच्या ज्या जुड्या बांधल्या जातात, त्या वाचणे तर मी बंद केलेच आहे, पण त्यामुळे बासुंदीतली चारोळीही नकोशी झालीय !! अर्चना शेवडे आणि सुषमा अवधूत ह्यांच्या कवितांशी माझी नवीन ओळख झाली. त्यांच्या कविताही खूप ताकदीच्या होत्या. अलकनंदा साने आणि सुषमा अवधूत ह्यांची पुस्तकंही मला मिळाली आहेत त्यामुळे त्यांच्या रचनांचा अधिक आस्वाद मी घेईनच.

पोटोबा !! - 

This much was more than enough for starters ! त्यामुळे आता सर्वांना जेवणाची आठवण झाली होती. घड्याळही तेच खुणावत होते. पण अजून 'मांडणी' होत होती. त्यामुळे पुढील सत्राची सुरुवात करून घ्यावी असा विचार केला गेला आणि आता कवितांचं 'जॅमिंग सेशन' रंगणार होतं. विनायकने सर्वांना गोलाकार खुर्च्या मांडून बसण्यास सांगितले. पण लोक इतके होते की त्या गोलाचा व्यास हॉलमध्ये मावेना ! शेवटी गोलाच्या आत अजून एक अर्धगोल करून सगळे स्थिरस्थावर झाले. सत्राची सुरुवात अशोक काकांनी केली. त्यांनी त्यांचे एक रेकॉर्डेड गीत, जे त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'तुझी आठवण' ह्या संग्रहातदेखील समाविष्ट आहे, मोबाईलवरून सर्वांना ऐकवले. त्यानंतर निशिकांत देशपांडे काकांनी एक सुंदर गझल सादर केली.
जेवणाची तयारी झाली होती त्यामुळे इथे एक 'ब्रेक' घेण्यात आला. मंडळींनी स्वादिष्ट पुणेकरी जेवणावर यथेच्छ ताव मारला. 'लंच ब्रेक' हा गप्पांसाठी एक सुवर्णसंधी असतो. त्यामुळे मघाशी महत्प्रयासाने मांडलेली आसनव्यवस्था नकळतच बदलली गेली आणि आता लोक छोटे छोटे ग्रुप करून बसले होते. कुणी प्रत्येक ग्रुपपाशी जाऊन ओळखपाळख करून घेत होते, इंदूर व मुंबई संघांच्या सादरकर्त्यांचे अभिनंदन करत होते, तर कुणी 'कुठली कविता सादर करायची' हे आधी ठरवून घेत होते.  


'जॅमिंग सेशन' - 

भरल्या पोटी कविजनांना अधिकच जोर चढला आणि 'जॅमिंग सेशन' पुढे सुरु झाले. ज्यांचे स्वतंत्र कार्यक्रम होते, त्यांच्याव्यतिरिक्त सर्वांनी 'जॅमिंग सेशन'मध्ये कविता सादर केल्या. म्हणजे साधारण २५-३० जण तरी असतील. मला आठवतात ती नावं मी इथे देतो.

१. प्रसन्ना जोशी
२. अनिल आठलेकर
३. गोविंद नाईक
४. उमेश मुरुमकर
५. सचिन कुलकर्णी
६. अजित परळकर
७. अमेय पंडित
८. श्वेता रानडे
९. वर्षा बेन्डीगेरी कुलकर्णी
१०. मीना त्रिवेदी
११. मयुरेश साने
१२. स्वाती शेंबेकर
१३. अलका गांधी आसेरकर
१४. सुनीती साने कोपरकर
१५. चंद्र बंडमंत्री
१६. विशाल कुलकर्णी
१७. डॉ. कैलास गायकवाड
१८. आनंद पेंढारकर
१९. शिरीन अर्श
२०. उमेश कोठीकर
२१. उमेश मुरुमकरची मैत्रीण
२२. माधुरी  गयावळ

काही नावं सुटली असल्याचा मला दाट संशय आहे, तसे झाल्यास क्षमा करावी.
एकानंतर एक सुंदर सुंदर कविता आणि सादर करणारे बहुतेक जण पहिल्यांदाच भेटत असल्याने कुणी काय सादर केलं, हे टिपून घ्यायचं भान खरं तर कुणालाच राहिलं नाही. त्यामुळे मी विनंती करतो की, प्रत्येकाने स्वत:च इथे, प्रतिसादात आपण सादर केलेली कविता डकवावी.
ह्या सत्रात सचिन कुलकर्णी अर्थात कवी श्रीकुल आणि मयुरेश साने ह्यांचे सादरीकरण अफलातून होते. कवी श्रीकुल ह्यांच्या पावसावरील कवितेमुळे तर उपस्थित प्रत्येक जण अक्षरश: हेलावला. कविता सादर करताना स्वत: कवी 'काव्य' कसा होतो, हे त्यांना पाहून समजलं. मयुरेशने आधी ज्येष्ठ कवी श्री. वा. न. सरदेसाई ह्यांच्या एका पावसावरील कवितेला सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि मग रसिकांच्या आग्रहास्तव स्वत:चीही पावसावरील एक ताजी ताजी कविता केली. मयुरेशचे सादरीकरण म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. दोन्ही कविता त्याने अश्या काही सादर केल्या की जणू त्या मूर्त स्वरूपात स्वत:च समोर उभ्या होत्या!
वेळेअभावी उपस्थित संचालक - विनायक, क्रांति ताई, सोनम, रमेश आणि श्री. काकांनी ह्या 'जॅमिंग सेशन' मधून स्वत:ला वगळले. अन्यथा हा हे सत्र झाल्यावर लगेच कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला असता कारण कवितांची जादू वेळेवर होत असली तरी घड्याळावर होत नव्हती !!

पुणे, नसे उणे -

दुसऱ्या सत्राचा आणि अर्थातच मेळाव्याचाही समारोपाचा कार्यक्रम पुणे चमूने करायचा होता. प्राजक्ता पटवर्धन, मनीषा नाईक, नचिकेत जोशी, भूषण कटककर अर्थात 'बेफिकीर', सुप्रिया जाधव आणि वैभव कुलकर्णी ह्यांचा गझल मुशायरा सुरू झाला. आत्तापर्यंत अत्यंत उच्च पातळी राखलेला हा कार्यक्रम त्याच पातळीवर किंवा त्याहूनही वर नेऊन समाप्त करायचे आव्हान त्यांच्यासमोर होते आणि ते त्यांनी अप्रतिमरित्या पेलले. एकेक गझल रसिकांकडून खुली दाद मिळवत होती आणि ही मैफल शेवटाकडे अधिकाधिक रंगत चालली होती. वैभव कुलकर्णीने 'माझे हे पहिलेच सादरीकरण आहे' ह्याची सुरुवातीसच कबुली दिली आणि लोक काहीही म्हणोत, किमान पहिल्या गझलेच्या वेळी तरी ते स्पष्टपणे जाणवले. ती गझल त्यामुळे रसिकांपर्यंत कमी पोहोचली पण दुसऱ्या गझलेच्या सादरीकरणात वैभवने उपस्थितांना असं काही खूश केले की प्रत्येक शेर त्याला 'वन्स मोअर' मुळे दोनदोन वेळा सादर करावा लागला. नचिकेत जोशी ह्यांनी सूत्र संचालन केले, पण त्यांनी तो भाग अगदी औपचारिकच ठेवला होता. त्यांच्या स्वत:च्या आणि सुप्रिया जाधव ह्यांच्या गझला रसिकांनी खूप उचलून धरल्या. प्राजक्ता पटवर्धन आणि मनीषा नाईक ह्यांनीही मैफलीचा रंग कुठेही ओसरू न देता आपापल्या गझला ताकदीनिशी सादर केल्या. पाच जणांच्या प्रत्येकी दोन गझला सादर झाल्यावर मुशायऱ्याचा समारोप करण्यासाठी नचिकेत जोशी ह्यांनी 'बेफिकीर' ह्यांच्याकडे सूत्रं सोपवली. हातात माईक आल्याबरोबर बेफ़ीजींनी उशीरा आल्याबद्दल माफी मागून उपस्थितांचे मन जिंकले. (मी तर मनातल्या मनात व्यासपीठावरील सर्वांनाच उशीरा आल्याबद्दल माफ करून टाकले ! - अपवाद वैवकु. तो एकटाच पहिल्यापासून आला होता.) बेफीजींनी आजचे अनेक नवोदित गझलकार त्यांना का मानतात, ह्याचे प्रात्यक्षिक एकेका शेरातून देण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंतचा मुशायरा एकीकडे होता आणि हे सादरीकरण एकीकडे होतं !! प्रत्येक शेर काळजात घुसत होता, उपस्थितांना छलनी-छलनी करत होता. दोन गझला सादर झाल्या, पण कुणाचेच समाधान झाले नाही आणि लोकांच्या आग्रही विनंतीस मान देऊन त्यांनी आणखी दोन गझला सादर केल्या. त्यांच्या गझला मोठ्या बहराच्या होत्या आणि धारदार टोकांच्या होत्या ! माहोल गझलमय झाला आणि अखेरीस घड्याळाचा काटा ठरलेल्या वेळेच्याही पुढे सरकल्याने नाईलाजास्तव थांबावे लागले.

आठवणींची साठवण - 
 
विशाल सह्याद्री दुमदुमले होते, दरवळले होते, गुणगुणले होते, बागडले होते आणि मुसमुसलेही होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेकविध रंगांची मनसोक्त उधळण झाली होती. बाहेर पडणारा प्रत्येक जण काव्यसरींत चिंब झाला होताच, पण काही थेंब मनात, ओठांवर, डोळ्यांत, ओंजळीत ठेवून घेऊन बाहेर येत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचा भाव होता. एक मंतरलेला दिवस सरला होता आणि मागे उरल्या होत्या अनेक पाऊलखुणा, त्या लोकांच्या ज्यांच्या फक्त शब्दखुणा आजवर अनुभवल्या होत्या.
'पुन्हा भेटूच' असा दिलासा नव्हे तर आश्वासन प्रत्येक जण स्वत:लाच देत होता आणि आनंदी मन व जड पावलांनी परतत होता................
 
खास ह्या मेळाव्यासाठी अमेय पंडित दिल्लीहून तर प्रसन्न जोशी बंगलोरहून आले होते. इंदूरहूनही मंडळी आली होती. माझ्या मते ही ह्या मेळाव्याची खरी कमाई होती. एका अनौपचारिक व हौशी कार्यक्रमासाठी लोक आवर्जून इतक्या लांबवरून येतात, ह्यातून त्यांच्या Passion चं दर्शन होतं. ह्या सर्व मंडळींचे आभार मानावेत, कौतुक करावे की कृतज्ञतेने त्यांना वंदन करावे की सगळंच ?  


....रसप....

Tuesday, June 11, 2013

बाहुला झपाटलेला, प्रेक्षक झोपाळलेला ! (Zapatlela 2 - Marathi Movie Review)

लोक उगाच म्हणतात की चित्रपटातून आपण नको ते उचलतो. खरं तर चित्रपट आपल्यातून हवं ते उचलतात. 'घरी कुणी तरी जेवायला येणार' म्हटल्यावर आजकाल काही लोक बाजारात 'रेडीमेड' काय मिळतं ते आधी पाहातात. अर्ध्या तासात घरपोच पिझ्झा मिळायचा हा जमाना आहे. त्याव्यतिरिक्त इडलीपासून बटर चिकनपर्यंत आणि पॉपकॉर्नपासून चिकन लॉलीपॉपपर्यंत स ग ळं 'फक्त पाण्यात मिसळलं/ उकळलं/ भाजलं/ तळलं की तयार' असं उपलब्ध आहे आणि जे पदार्थ असे सहज शक्य नाहीत, ते हळूहळू 'गायब' होत आहेत. तसंच बाजारात उपलब्ध असलेल्या एखाद्या स्वयंसिद्ध फॉर्म्युलाला पुन्हा पुन्हा सादर करणं किंवा जुन्याच एखाद्या चित्रपटाचा पुढचा भाग बनवणं, हा चित्रपटाने निवडलेला 'शॉर्ट कट' आहे, आपल्याकडूनच शिकलेला ! एका दिवसात पटकथा आणि संवाद तयार, दोन दिवसात कास्टिंग फायनल, आठवड्याभरात लोकेशन्स, सेट्स तयार आणि २ महिन्यात चित्रपट तयार आणि एक राहिलंच अर्ध्या तासात संगीतही तयार - असे चित्रपट बनत असावेत असं काहीसं काही चित्रपट पाहिल्यावर वाटतं. पण असे चित्रपट तिकीटबारीवर चांगला गल्ला जमवतानाही दिसतात, त्यामुळे हा 'दोष ना कुणाचा '! आपण तसे, म्हणून आपले चित्रपटही तसेच असा विचार करायचा !
महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डेच्या सुप्परहिट्ट जोडीचा नव्वदच्या दशकातील सुप्परहिट्ट 'झपाटलेला'चा दुसरा भाग असाच कामचुकार गृहिणीच्या स्वयंपाकाप्रमाणे आहे.    

मागील भागात दोन भुवयांच्या बरोब्बर मध्ये साध्या रिव्हॉल्वरने अचूक नेम साधून इन्स्पेक्टर महेश जाधवने भारताच्या अनेक नेमबाजपटूंना लाजवलं होतं (त्यानंतरच भारताला नेमबाजीत पदकं मिळायला लागली का ?) आणि 'तात्या विंचू'चा खातमा केला होता हे तुम्हाला लक्षात असेलच. आता हा इन्स्पेक्टर जाधव कमिशनर झाला आहे. पण अजूनही हातावर मूठ आपटून 'डॅम ईट' चालू आहे and why not ? तात्या परतला आहे ! का ? कशासाठी ? ते असो. मनुष्यदेह प्राप्त करण्यासाठी त्याला पुन्हा 'लक्ष्या'चा शोध आहे. पण लक्ष्या आता जिवंत नाही. मग ? कायद्यातील पळवाटेप्रमाणे मृत्युंजय मंत्रातही एक पळवाट आहे. 'बाप नाही, तर पोराला धर.' म्हणून हा तात्या, लक्ष्याचा पोरगा आदित्य (आदिनाथ कोठारे) च्या मागावर आहे.
पुढे काय होतं, होणार आहे ते सांगून काहीही उपयोग नाही. कारण ते इतकं बुळबुळीत आहे की सांगता सांगताही घसरायला होईल.


एकंदरीत पटकथा तर इतकी लंगडी आहे की फक्त तात्या आणि आदित्य ही दोनच पात्रंही चालली असती चित्रपटात. पण मरतुकड्या कथे-पटकथेला वजन येण्यासाठी मकरंद अनासपुरे (बोलक्या बाहुल्यांचे खेळ करणारा कलाकार म्हणून), सई ताम्हणकर (टिव्ही रिपोर्टर), सोनाली कुलकर्णी ज्यु. (तमाश्यात नाचणार्‍या बाईची सुशिक्षित नाचरी पोर) अश्या काही काही वजनदार नावांची स्टारकास्ट आहे. मधु कांबीकर आदित्यच्या आजीची (आधीच्या भागात लक्ष्याची आई) भूमिका करतात आणि आधी म्हटल्याप्रमाणे महेश कोठारे 'डॅम ईट' करतात. ह्या सर्वांचं अवतारकार्य ह्या दोन ओळींत जितकं लिहिलं तितकंच आहे.

ओव्हर अ‍ॅक्टिंगसाठी जर एखादा पुरस्कार असेल, तर सो. कु. ज्यु. पेक्षा आदिनाथ कोठारे आणि मधु कांबीकर त्यासाठी जास्त लायक आहेत. आदिनाथ कोठारे वडिलांकडूनही जरासा अभिनय शिकू शकतो, असं म्हणावंसं वाटतं, इतका 'होपलेस' आहे. काही फ्रेम्समधला मक्या वगळला, तर पडद्यावर अभिनय म्हणून बाकी जे काही दाखवलं आहे ते निव्वळ 'बं ड ल' आहे. कुठल्याच प्रसंगात प्रेक्षक पडद्यावरील पात्राशी नातं जोडूच शकत नाही.

अवधूत गुप्ते ह्यांचं संगीत इतरांच्या फुसक्या कामाला साजेसं आहे. शीर्षक गीताची लावणी कैच्याकै गंडली आहे. ऑक्टेव्ह्जशी खेळ करावा तर तो बाळासाहेबांनीच, हे त्या गाण्यामुळे पटतं. 'मदनिके' गाणं बरं आहे. बाकी यथा तथाच.

सपक संवाद आणि केविलवाणी विनोदनिर्मिती चित्रपटाला हास्यास्पद करतात.
अख्खा चित्रपटभर दिलीप प्रभावळकर (तात्या विंचूचा आवाज) वगळता प्रत्येक जण 'जत्रा' मधील 'ज' 'जहाजा'चा उच्चारतो. पण आजकाल ह्यावर बोलणं म्हणजे मूर्खपणा असतो. कारण 'भावना पोहोचल्या ना? मग !' असा उलट प्रश्न होतो. आणि असंही अख्खा चित्रपट पांचटपणा आणि मूर्खपणाचा बाजार असल्यावर ह्या चुका तर अगदीच किरकोळ म्हणायला हव्या.

ह्या चित्रपटाची प्रसिद्धी 'पहिला मराठी थ्रीडी चित्रपट' म्हणून करण्यात आली, ते अगदी योग्य आहे. कारण चित्रपटाचा हा एकमेव 'यू. एस. पी.' आहे. हॅरी पॉटरचा शेवटचा भाग मी थ्रीडीत पाहिला होता. पण थ्रीडीची मजा मला तरी 'झपाटलेला - २' मध्ये जास्त आली. किमान ६-७ वेळा मी व आजूबाजूचे लोक व्यवस्थित दचकलो. अनेक कॅमेरा अँगल्स 'थ्रीडी'चा विचार करून प्रयत्नपूर्वक साधले असल्याचे जाणवते. ह्या एका गोष्टीसाठी चित्रपटकर्त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

थोडक्यात, हा 'झपाटलेला - २' पाहाताना प्रेक्षकाचा 'झोपाळलेला' होतो पण तितक्यात थ्रीडीमध्ये काही तरी अंगावर येऊन तो दचकून जागा होतो आणि इच्छा नसताना अख्खा चित्रपट पाहावा लागतो.

रेटिंग - * (केवळ थ्रीडी साठी.)   
Related Posts Plugin for WordPress, Blogger...