Saturday, March 07, 2015

फिंगर्स क्रॉस्ड ! (India vs West Indies - World Cup 2015)

'वाका'वरील कालच्या सामन्याची नाणेफेक धोनी हरला आणि विंडीजचा कोवळा कर्णधार जेसन होल्डर मनातल्या मनात सुखावला कारण त्याला पहिली फलंदाजी करता येणार होती. ('विंडीजचा कोवळा कर्णधार' हे कदाचित उकळती बियर किंवा 'समाधानी नारायण राणे' सारखं असंबद्ध वाटू शकेल. पण मला खरोखर तो कोवळाच वाटतो. फक्त २३ वर्षे वय. केवळ ३० सामन्यांचा अनुभव. त्याच्या चेहऱ्यात एक प्रकारचा निरागस भाव दिसतो. त्यामुळे त्याच्यावर गेल, सॅम्युअल्स, स्मिथसारख्या धटिंगणांची जबाबदारी असणं म्हणजे अजूनही तीन आणि सहा लिहिताना गोंधळणाऱ्या लहानग्या बालकाला सत्तावीसचा पाढा विचारल्यासारखं वाटतं. असो.) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळणं म्हणजे ख्रिस गेल नामक घोड्याच्या डोळ्यांवरची झापडं काढून त्याला मोकळं सोडता येण्याची संधी मिळणं.

ख्रिस गेल आणि ड्वेन स्मिथ ही दोन अतिज्वलनशील व विस्फोटक रसायनं खेळपट्टीवर आली. मात्र पर्थच्या ह्या खेळपट्टीने तिचा रंग पहिल्या षटकापासूनच दाखवायला सुरुवात केला. त्या रंगात कुठलंही रसायन स्वत:चा रंग दाखवू शकणार नव्हतंच ! खरं तर शमीच्या तिसऱ्याच चेंडूवर स्मिथने जेव्हा प्रहार केला होता, तेव्हा काही वेगळंच वाटलं होतं. पण डुलकी लागून मान एका बाजूला पडल्यावर खाडकन जाग येते तशी खेळपट्टी पुढच्याच चेंडूंवर जागी झाली आणि त्यानंतर चेंडू टप्प्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने असा झेपावत होता जसा सूर्याला पाहून बालहनुमान झेपावला असावा. शमी-यादवने पहिली काही षटकं फलंदाजांची सत्वपरीक्षाच पाहिली. त्यात स्मिथ उत्तीर्ण झाला नाहीच. शमीच्या त्या चेंडूवर त्याची बॅट खाली येईपर्यंत चेंडू स्वत:च त्याच्या बॅटला स्पर्श करून धोनीच्या हाती विसावला. इथून सुरु झालेली पडझड थांबूच शकली नाही. एकानंतर एक फलंदाज बाद होत जाताना मला मात्र 'आज पुन्हा एक एकतर्फी सामना पाहावा लागणार' अशी हुरहूर लागली होती. विंडीजच्या फलंदाजीची बेजबाबदार फटके, सुमार रनिंग बिटवीन द विकेट्स, तंत्राचा सपशेल अभाव अशी सगळी अशोभनीय अंगं काल व्यवस्थितपणे दाखवली गेली. अखेरच्या टप्प्यात 'कोवळा कर्णधार' मदतीस धावून आला म्हणून जरा तरी सन्मानजनक धावसंख्या नोंदवता आली.

ज्या खेळपट्टीवर शमी-यादव-मोहितने फलंदाजांना नाचवलं, तिथे विंडीजची गोलंदाजी काही सोपी जाणार नव्हतीच. जेरोम टेलर, आंद्रे रसेल, केमार रोच ह्यांचे खांदे आणि शमी, यादव, मोहितचे खांदे ह्यांच्यात वडाच्या झाडाचा बुंधा आणि अशोकाच्या झाडाचा बुंधा ह्यांच्याइतका फरक आहे. तर, ऑफ स्टंप बाहेरील जलदगती, उसळती गोलंदाजी आणि धवन-रोहितच्या बॅट्स ह्यांच्यात चुंबकीय आकर्षण आहे. कोहली जसा परवा पत्रकाराला ओळखताना चुकला तसाच हूकसाठी चेंडू निवडताना फसला. रहाणेच्या विकेटने हॉकआय प्रणालीच्या मर्यादा विंडीजच्या फलंदाजीप्रमाणे उघड्या पडल्या. रैना समोर आला की निर्जीव चेंडूसुद्धा स्वत:च आखूड टप्पा घेत असावा, त्याची ही उणीव इतकी सुस्पष्ट झाली आहे. जडेजाने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की त्याच्या कुवतीपेक्षा मोठे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत. १३४ वर ६ गडी बाद झाल्यावर फॉर्मात नसलेल्या धोनीवर सर्व मदार होती आणि त्याने संघाची डूबती नैया पार केली.


१८३ धावांचं लक्ष्य माफक होतं, पण डावाच्या पहिल्या अर्ध्या भागात विंडीज गोलंदाजांनी त्या धावसंख्येत अजून १०० धावा जोडलेल्या असाव्यात असं भासवलं. पण नंतर मात्र स्वैरपणा वाढत गेला.
भारताने अकरा षटकं राखून लक्ष्य साध्य केलं, तेव्हा निश्चितच विंडीजच्या खेळाडूंना वाटलं असेल की आपण ४५ षटकांत गाशा न गुंडाळता पूर्ण पन्नास षटकं खेळून काढली असती, तर....?? तर कदाचित पाकिस्तानसाठी पुढील फेरीचा रस्ता अधिक जास्त कठीण असता आणि स्वत: विंडीजसाठी थोडासा सोपा.

ह्या विजयामुळे भारताचा मात्र पुढील फेरीतील प्रवेश निश्चित झाला. पण त्याचबरोबरच चांगल्या गोलंदाजीसमोर मोठे लक्ष्य गाठण्यासाठी खेळताना ही फलंदाजी ढेपाळू शकते, हेही समजून आलं. इथून पुढच्या सामन्यांसाठी एकच शुभेच्छा - 'पहिली फलंदाजी मिळो आणि तसे न झाल्यास २०० च्या आतले लक्ष्य असो !'
कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड !

- रणजित पराडकर


ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

Friday, March 06, 2015

आपला तोच बाब्या !

२४ फेब्रुवारी २०१०.
ग्वाल्हेरला सचिन तेंडूलकरने अजून एक इतिहासाचं पान स्वत:च्या नावाने लिहून घेतलं. वनडेमधलं पहिलं द्विशतक झळकावून. त्यानंतर बरोब्बर त्याच दिवशी पाच वर्षांनंतर ख्रिस गेलने इतिहासाचं एक पान स्वत:च्या नावाने लिहून घेतलं. वनडेत द्विशतक झळकावणारा पहिला अ-भारतीय खेळाडू बनून आणि वर्ल्डकपमधील सगळ्यात मोठी वैयक्तिक धावसंख्या नोंदवून. गेली दोन वर्षं निद्रिस्त असलेला ज्वालामुखी कॅनबेराच्या मानुका ओव्हल मैदानावर उफाळला आणि झिम्बाब्वेचा प्रत्येक गोलंदाज त्या लाव्ह्यात होरपळला. गेलच्या साथीने मार्लन सॅम्युअल्सने शतक झळकावलं. पण त्या १३३ धावांसाठी त्याने १५६ चेंडू घेतले. ह्या जास्तीच्या २३ चेंडूंपैकी जर अर्ध्या चेंडूंवरही त्याने एक धाव घेऊन गेलला स्ट्राईक दिला असता तर त्याने कदाचित पावणे तीनशे धावाही कुटल्या असत्या. एका फलंदाजाने द्विशतक करूनही संघाची धावसंख्या चारशेपर्यंत पोहोचत नाही, ही खरं तर फलंदाजीची कमजोरी मानायला हवी. पण तरी गेलला सूर गवसणे ही विश्वचषकातील इतर सर्व संघांसाठी ही एक धोक्याची घंटाच आहे. ख्रिस गेल हा असा एक खेळाडू आहे की जो संघाची धावसंख्या एकहाती उंचच उंच नेऊन ठेवू शकतो. झिम्बाब्वेनंतरच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मात्र गेल पुन्हा फेल झाला. ह्यावर विचार करायला हवा. मला असं वाटतं की गेल हा असा खेळाडू आहे जो सुमार गोलंदाजीची बेसुमार धुलाई करतो. मात्र भेदक जलदगती किंवा शिस्तबद्ध स्विंग किंवा अचूक फिरकी गोलंदाजी मात्र गेलला बांधून ठेवते. उत्कृष्ट चेंडूवर धावा जमवण्याची हातोटी त्याच्यात कमी असल्याचं नेहमीच जाणवतं. तसंच, दबावाखाली गेलने फार क्वचित चांगला खेळ दाखवला आहे. तो नेहमीच प्रथम फलंदाजी करताना जास्त आश्वासक वाटतो. भारतीय संघाने गेल्या दोन सामन्यात ज्या शिस्तीने गोलंदाजी व क्षेत्ररक्षण केले, तेच त्यांनी आजच्या विंडीजसोबतच्या सामन्यात दाखवलं तर गेलसाठी हा सामना सोपा नसेल.

दुसरी गोष्ट. हा सामना पर्थला खेळवला जातो आहे. पर्थ म्हणजे बाउन्स आणि गती. वनडेला शोभेल म्हणून त्या खेळपट्टीला कितीही सजवलं तरी ती आपला मूळ गुणधर्म सोडणार नाहीच. त्यामुळे तेज गोलंदाज शमी-यादव आणि विंडीजचे सगळेच, ह्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यासाठी असे काही उत्सुक असतील जसा सलमान खान उघडा होण्यासाठी असतो. उसळत्या चेंडूंसमोर अमिरातीसोबतच्या सामन्यात भारतीयांची परीक्षा पाहिली गेलीच नाही. तो सामना म्हणजे पेपर फुटल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पासापुरते मार्क्स दिल्यासारखा होता. पण धवन-रोहित-विराट-अजिंक्य-रैनाची आजच्या सामन्यात नक्कीच परीक्षा पाहिली जाईल. रोहित आणि विराटने अमिरातीसमोर 'रस्ते का माल सस्ते में' पाहून धावांची काही घाऊक खरेदी केली, पण आज मात्र त्यांना बाजारभाव समजू शकेल.

विराट कोहली पुन्हा एकदा खेळाव्यतिरिक्तच्या थेरांसाठी चर्चेत आलेला आहे. अजून एका विजयाने त्याचं चित्त थाऱ्यावर येवो. त्याचं वाचन वगैरे फार काही असेल असं त्याला पाहून वाटत नाही आणि मराठीचा तर त्याला निश्चितच गंधही नसावा. त्याच्यासाठी पुलंच्या अंतू बर्व्याने एक सुंदर वाक्य रत्नांग्रीच्या त्या सुप्रसिद्ध लोकोत्तर पुरुषांच्या आळीत पेरून ठेवलं आहे. 'गोठ्यात निजणारांना बैलाच्या मुताची घाण येऊन कसं चालेल ?' जर खेळाशिवाय इतरही काही क्षेत्रांत आपलं कर्तृत्व असेल, तर बातमी तर होणारच ना ? थयथयाट करणे, तमाशा करणे हा कोहलीचा स्वभावच आहे. पण लग्न झाल्यावर जबाबदारीने वागायचं असतं, तसंच कसोटी कर्णधार झाल्यावर गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्या उतावळ्या नवऱ्यासारखं वागणं शोभत नसतं.

वेस्ट इंडीजच्या संघावर भारतीय क्रिकेटप्रेमींनी नेहमीच मनसोक्त प्रेम केलं आहे. त्यांनी श्रीलंकेत ट्वेंटी२० विश्वचषक जिंकला, तेव्हा मुंबई-दिल्लीत सुद्धा जल्लोष झाला होता आणि विंडीज खेळाडूंसोबत अनेकांनी घरातल्या घरात गंगनम नृत्य केलं होतं. विश्वचषकाच्या सुरुवातीला आयर्लंडने विंडीजवर मात केली तेव्हा मला अतिशय वाईट वाटलं. आजचा सामना कदाचित त्यांच्यासाठी 'करा किंवा मरा' असणार आहे. आजच्या सामन्यातल्या जयपराजयावर त्यांचा पुढील फेरीतील प्रवेश बराच अवलंबून असणार आहे. पण म्हणून मी त्यांना जिंकण्याच्या शुभेच्छा देऊ शकत नाही ! कारण शेजारचा मुलगा कितीही लाडका असला, तरी आपला तोच बाब्या असतो ना ! एक चांगली लढत बघायला मिळो. उत्तम दर्ज्याचं क्रिकेट खेळलं जावो. कुणाच्या हरण्याचं कुणाला दु:ख नसावं, खेळ जिंकला असल्याचा आनंद असावा, असे काही आयडीयलिस्टीक विचार मनात येत आहेत. पण ह्या सगळ्याच्या मूळाशी एकच भावना आहे ती म्हणजे अजून एका भारतीय विजयाची इच्छा !

- रणजित पराडकर 

Tuesday, March 03, 2015

कोई ताज़ा हवा चली हैं (World Cup 2015)

पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी बदडून काढलेली आणि दुसऱ्या सराव सामन्यात अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाचेही पूर्ण १० बळी घेता आले नाहीत, भारतीय गोलंदाजीची गेल्या काही महिन्यांतली कामगिरी पाहता, सराव सामन्यांमधली ही किमया आश्चर्यकारक नक्कीच नव्हती. हे दोन्ही सराव सामने भारतासमोर विश्वचषक स्पर्धेत पुढे काय वाढून ठेवलं आहे, ह्याची कल्पना देणारे होते. सराव सामन्यांतून कसलाही जास्तीचा आत्मविश्वास न मिळवता आणि त्याऐवजी एक जोरदार 'फॅक्ट चेक' घेऊनच साखळी फेरीतील पाकिस्तानसोबतच्या पहिल्या सामन्यासाठी भारत आला. कुठल्याही सामान्य भारतीय क्रिकेटरसिकाप्रमाणे 'एव्हढा सामना जिंका, नंतर सगळे हरलात तरी चालेल' हीच भावना माझ्या मनात सामन्यापूर्वी होती.
पण सामना संपल्यानंतर त्या सामन्यावर लिहिण्यासाठी योजून ठेवलेले शब्द जल्लोषाच्या गदारोळात माझेच मला मिळेनासे झाले. भारतभर दिवाळी साजरी होत होती आणि फटाक्याच्या आवाजाने भेदरलेली निष्पाप गरीब पाखरं जशी 'धडाम्' झाल्याबरोबर फांद्यां-फांद्यांतून फुर्रकन् उडून जातात, तसंच काहीसं माझ्या शब्दांचं झालं होतं.

ह्या सामन्यापूर्वी विश्वचषकातील पाकविरुद्धच्या '५ - ०' ह्या विजयी सांख्यिकीला मिरवून भारतीय क्रिकेटरसिकांनी खूप गमजा मारल्या होत्या. त्यावेळी माझ्या मनात मात्र सतत राजकुमारचा 'वक़्त'मधला गाजलेला 'जिनके अपने घर शीशे के होते हैं, वोह दूसरों के घरों पे पत्थर फेंका नहीं करतें..' हा डायलॉग घुमत होता.
नाणेफेक जिंकून धोनीने साहजिकच प्रथम फलंदाजी स्वीकारली. सातफुटी मोहम्मद इरफान आणि सोहेल खानच्या पहिल्या २-२ षटकांना रोहित-धवन जोडीने सुयोग्य सन्मान दिला. ह्या सावध सुरूवातीनंतर दोघांनीही काही आश्वासक फटके मारले आणि गुदगुल्यांची जाणीव होत असतानाच रोहित शर्मामधला 'रोहित शर्मा' जागा झाला आणि तो क्षणभर विसरला की ही खेळपट्टी भारतातली नसून ऑस्ट्रेलियातली आहे. पुरेसा अंदाज न घेता, योग्य दिशेने पाय न हलवता त्याने मारलेला मरतुकडा पुल मिड-ऑनला मिसबाहच्या हातात जाऊन विसावला. खाटकासमोर बकऱ्याने स्वत:च मान ठेवावी आणि खाटकाला तेव्हाच झोप अनावर व्हावी, तसं काहीसं चित्र ह्यानंतर पाहायला मिळालं.
ढिल्या पडलेल्या पाक गोलंदाजीसमोर कोहली, रैना आणि धवनने भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेलं. कोहलीची ही शतकी खेळी त्याच्या व भारतीय क्रिकेटरसिकांच्या दीर्घ काळ स्मरणात राहील. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ह्यापेक्षा अनेक नेत्रदीपक शतकं झळकावली आहेत. त्या मानाने ही खेळी तशी सामान्यच. पण विश्वचषकात पाकिस्तानसमोर भारताकडून पहिलं शतक त्याने केलं आणि जो संघ सामना सुरु होण्यापूर्वीपासूनच निकालाच्या अनिश्चित सावटाखाली वाटत होता, त्याला सुस्थितीत नेण्यात एक महत्वाची भूमिका बजावणं, त्याने करून दाखवलं. रैनाने साकारलेली खेळी तितकीच महत्वाची होती. त्याच्या समायोचित फटकेबाजीने धावसंख्येला एक आकार दिला. कदाचित तो आकार बराच विशाल होऊ शकला असता पण अखेरच्या षटकांत पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी धडाधडा कोसळली आणि किमान ३०-३५ धावा कमी झाल्या. बरोब्बर ३०० वर धावसंख्या पोहोचली.
इथून पुढचा सामना कमकुवत फलंदाजी विरुद्ध कमकुवत गोलंदाजीचा होता. ही दोन गरीबींमधली भाग्यवान तुलना होती. त्यात गोलंदाजी कमी गरीब ठरली. सलामीला युनुस खान येणं पाहुन मला ९० च्या दशकात ऋषी कपूरने हीरोच्या भूमिकेत काम केल्याची आठवण झाली. पाकिस्तानच्या फलंदाजीच्या गरीबीची ही परिसीमा असावी. ही फलंदाजीची फळी युनुस आणि मिसबाह ह्यांच्या अनुभवावरच अवलंबून आहे. त्यातील एक नको तितक्या लौकर आल्याने वाया गेला आणि दुसरा नेहमीच नको तितक्या उशीरा येऊन वाया जात असतो. शहजाद व हॅरिस सोहेलच्या भागीदारीने काही काळ आशा दाखवली होती, पण दोघांनाही अननुभव नडला आणि पुन्हा एकदा मिसबाहच्या डोक्यावर असा भार आला की जो पेलणे अशक्यच होते. आफ्रिदीची धडपड आणि विझणाऱ्या वातीची फडफड सारखीच. तो येईपर्यंत पाकिस्तानचा पराभव जवळजवळ अटळ झालाच होता.
उमेश यादवने पहिल्या स्पेलमध्ये जितकी वाईट गोलंदाजी केली, तितकीच वाईट गोलंदाजी दुसऱ्या स्पेलमध्येही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण त्याला नशीबाने साथ दिली नाही आणि दोन विकेट्स त्याच्या गळ्यात पडल्याच !
दबावाखाली पाकने असंख्य चुका केल्या आणि त्या चुकांमुळे भारताच्या बऱ्याच चुका झाकल्या गेल्या. चुकांच्या तुलनांचं पारडं पाककडे झुकलं आणि त्यांना त्याची किंमत पराभवाने मोजायला लागली. पाकसोबतचा हा विजय गुदगुल्या करणारा होता, पण त्याच वेळी लगेच पुढचा सामना समोर दिसायला लागला.
पाकनंतर गाठ होती दक्षिण आफ्रिकेशी. तिथे गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्हींत काही दैत्य फुरफुरणारे बाहू घेउन बसले होते. स्टेन-मॉर्कल-फिलेंडरचा तेज तर्रार मारा, डीव्हिलियर्स-आमला-मिलर-डी कॉक ची भक्कम फलंदाजी आणि ११ चित्त्यांचं चौफेर क्षेत्ररक्षण ह्यासमोर ताठ उभं राहण्यासाठी सैरभैर पाकिस्तानवर मिळवलेला विजय कितपत आत्मविश्वास देणार, हे पाहायचं होतं.

पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून धोनीने प्रथम फलंदाजी घेतली.
अपेक्षेप्रमाणे स्टेनच्या पहिल्या षटकात चेंडू बंदुकीच्या गोळीसारखा वाटला. रोहित-धवन बऱ्यापैकी शांतपणे खेळत आहेत असं वाटत असतानाच डीव्हिलियर्सच्या अंगात अर्जुन शिरला आणि त्याने मिड ऑनवरून थेट फेक करून रोहितला माघारी पाठवलं. एका झटक्यात भारतीयांना जाणीव झाली की आपण पाकसोबत खेळत नसून आफ्रिकेशी दोन हात करतो आहोत. पण धवन बहुतेक सचिनकडून आशीर्वाद घेउनच उतरला होता. कारण कधी नाही इतका आश्वासक वाटत होता. खेळायला येतानाच तो शतकाचा पोस्ट डेटेड चेक खिश्यात घेउन आला होता, जो त्याने पस्तिसाव्या षटकात एनकॅश केला. तोपर्यंत कोहली त्याचा शतकी चेक जसाच्या तसा परत घेउन गेला होता. रहाणेच्या नेत्रदीपक फटकेबाजीने मात्र खर्या अर्थाने पर्वणी दिली. तोडफोड, चिरफाड करणाऱ्या फटकेबाज फलंदाजांचं एक बेसुमार पीक सगळीकडे आलं आहे. त्यात एखादाच रहाणेसारखा असतो की ज्याचे चौकार, षटकार पोटात गोळा आणणारे नसतात तर मोरपीस फिरवल्यासारखे असतात. रहाणे खेळतो तेव्हा सभोवताली वसंत असतो. हा वसंत २२ तारखेला पूर्ण बहरला होता आणि आफ्रिकेचे गोलंदाज मोरपिसाच्या हळुवार स्पर्शात हरवून राहिले असताना त्याने धावफलकावर हिरवळ फुलवली.
परंपरा अबाधित राखत अखेरच्या षटकांत पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी ढेपाळली आणि ३०८ धावांचं लक्ष्य त्यांनी आफ्रिकेला दिलं. आमला, डी कॉक, ड्यू प्लेसीस, डी व्हिलियर्स, ड्युमिनी, मिलर ह्या फलंदाजीसाठी खरं तर कुठलंच लक्ष्य अवघड नाही. पण कधी नव्हे इतक्या अचूक भारतीय गोलंदाजीने व चपळ क्षेत्ररक्षणाने धावा क्रूड तेलापेक्षा महाग केल्या. ह्या सामन्याने सट्टेबाजांचे अंदाज पूर्णपणे चुकवले असावेत. तब्बल १३० धावांनी भारत आफ्रिकेला धूळ चारेल, हे भाकीत जर सामन्यापूर्वी कुणी वर्तवलं असतं तर स्वत: भारतीय खेळाडूंनीही त्याला वेड्यात काढलं असतं. पण असंच झालं आणि केवळ १७७ धावांत आफ्रिकेचा संपूर्ण संघ तंबूत खाली माना घालून परतला.

दोन तगड्या संघांना अगदी एकतर्फी हरवल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीशी 'गाठ होती' असं म्हणणं खरं तर अतिशयोक्ती वाटावी. हा सामना डावखुऱ्यांनी उजव्या हाताने आणि उजव्या हाताच्यांनी डावखुरं खेळूनही जिंकू, असा फाजील आत्मविश्वास घेउन भारत ह्या सामन्यात येतो की काय, अशी भीती वाटत होती. सुदैवाने भारताला धोनीच्या रुपात असा कर्णधार लाभला आहे की ज्याच्या पायात सिमेंटचे बूट असावेत आणि डोक्यात चलाख मेंदूसोबत थोडासा बर्फही. (पायात सिमेंटचे बूट नक्कीच असावेत, हे त्याची फलंदाजीही सांगतेच !)
नाणेफेक अमिरातीचा कर्णधार मोहम्मद तौकीरने जिंकली आणि संपूर्ण दिवसात तेव्हढी एकच घटना अमिरातीसाठी सकारात्मक ठरली. दुसऱ्याच षटकात डावाला जे खिंडार पडलं, ते शेवटपर्यंत बुजलंच नाही आणि प्रत्येक येणारा नवीन फलंदाज आधीच बुजलेला वाटत होता. उमेश यादवकडे भन्नाट वेग आहे, ह्याची जाणीव प्रथमच कुणा फलंदाजांना झाली होती आणि आपण चेंडूला उंचीही देऊ शकतो ह्याची जाणीव अनेक दिवसानंतर अश्विनला झाली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेऊन सन्मानजनक धावसंख्या उभारून भारतीय फलंदाजांवर दबाव टाकून आपण लिंबू-टिंबू नाही आहोत असं छातीठोकपणे सांगायचं अरबी स्वप्न यादव-अश्विनने धुळीस मिळवलं. स्पर्धेत प्रथमच एक नवखा संघ, एका नवख्या संघासारखा खेळला आणि १०२ धावांत गाशा गुंडाळून शहाण्यासारखा लगेच गोलंदाजीसाठी उतरला. हे लक्ष्य जर भारताला कठीण गेलं असतं, तर ती फलंदाजी कसली !

एकूणात पहिल्या तीन सामन्यांत भारतीय संघाने केवळ क्रिकेटरसिक, पंडित व समीक्षकांनाच नव्हे तर स्वत:लाही चकित केलं असावं. स्पर्धेपूर्वी धडपडत वाटचाल करणारा हा संघ स्पर्धेत दाखल होताच अचानक राजहंसाच्या डौलात चालायला लागला आहे. वाऱ्यावर उडणाऱ्या पाचोळ्याप्रमाणे स्वैर, सैरभैर वाटणारी गोलंदाजी अचानक स्वत:च हवा बनून फलंदाजीच्या फळ्या पाचोळ्यासारख्या विखरू लागली आहे. लेझीम किंवा आंधळी कोशिंबीर खेळणारे फलंदाज अचानक 'दीवार' मधल्या अमिताभसारखे ताडताड् पावलं टाकायला लागले आहेत. सगळंच कसं स्वप्नवत वाटतंय ! १९८३ चा असो की २०११ चा चषक जिंकणारा भारतीय संघ असो, दोन्ही संघ साखळी फेरीत जरासे धडपडतच होते. 'लांबी रेस का घोडा शुरू में पीछे पीछे दौडता है..' हे इफ़्तिक़ारच्या 'डावर'ने म्हटलेलं जर इथे लागू केलं, तर मनात शंकेची पाल चुकचुकते आहे की have they really picked up at the right time की जरा लौकरच आहे ?
येणारे सामने काय ते ठरवतीलच. एक मात्र निश्चित हाच आत्मविश्वास व हीच कामगिरी कायम ठेवली तर ह्या वर्षी भारतात दोनदा दिवाळी साजरी होईल एक मार्चच्या शेवटी आणि दुसरी नोव्हेंबरमध्ये ! तोपर्यंत 'कोई ताज़ा हवा चली हैं अभी' असं म्हणून ह्या आनंददायी हवापालटाचा मज़ा घेऊ !

- रणजित पराडकर



ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

Monday, March 02, 2015

अब तक..... पहिलाच ! (Movie Review - Ab Tak Chhappan 2)

एखादा पदार्थ खूप आवडला की आपण हौशीने तो पुन्हा ताटात वाढून घेतो किंवा कुणी तरी आग्रह करुन वाढतं. काही वेळेस ही हौस किंवा आग्रह सहज फिटतो किंवा पचतो, तर काही वेळेस तो पचण्यापेक्षा 'पचवला' जातो आणि काही वेळेस तर तेही झेपतच नाही.
हिंदी चित्रपटात रिमेक व सीक्वेलचे प्रयत्न मला असेच हौसाग्रहास्तव वाटतात. ते कधी झेपतात कधी नाही.
'अब तक छप्पन्न - २' वरीलपैकी दुस-या प्रकारातला. जरा जबरदस्तीनेच गळी उरवलेला आणि पचवलेला वाटला.

सिस्टमने केलेल्या अन्यायाला कंटाळून मुंबई सोडून आपल्या गावात जाऊन राहणाऱ्या निलंबित एन्काऊन्टर स्पेश्यालिस्ट साधू आगाशेला (नाना) पुन्हा एकदा सरकारकडून बोलावणं येतं. मुंबईत बोकाळलेल्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा एन्काऊण्टर स्क्वाड सुरु करायचा असतो आणि त्याचा प्रमुख म्हणून साधूशिवाय योग्य कुणी असूच शकत नाही, असं सरकारचे सल्लागार प्रधान (मोहन आगाशे) मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना ठासून सांगतात. साधू मुलासह मुंबईत येतो आणि पुन्हा एकदा सुरु होतो एन्काउण्टर्सचा सिलसिला. पण साधूचं नेमकं काम, त्याचा रोल काही तरी वेगळाच असतो. तो पूर्ण झाल्यावर तो एका विचित्र वळणावर पोहोचतो आणि पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही एक अनिश्चित भविष्य गाठीला बांधतो.


हा चित्रपट प्रत्येक अर्थाने पहिल्या 'अब तक छप्पन्न'चाच पुढचा भाग आहे. खरं तर पहिल्या चित्रपटाच्या अखेरीस साधू देशाबाहेर निघून गेलेला असतो आणि प्रधानांशी त्याच्या बोलण्यातून त्याचा पुढील प्रवास बराच सकारात्मक होणार असतो. पण त्यानंतर तो अचानक परत भारतात येऊन नैराश्याने ग्रासलेलं आयुष्य का जगत असतो, हा प्रश्न आपल्याला सुरुवातीसच पडतो आणि शेवटपर्यंत सुटत नाही.
चाणाक्ष किंवा माझ्यासारख्या दर आठवड्याला एक पिक्चर टाकणाऱ्या प्रेक्षकाला पहिल्या काही मिनिटांतच चित्रपट कुठे आणि कसा जाणार आहे, हे समजतं. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जोरदार धक्का बसायची अपेक्षा असावी, त्या त्या ठिकाणी 'मला वाटलंच होतं' इतकंच वाटतं.
चित्रपट पहिल्या भागाची वळणा-वळणावर नक्कल करण्याचा प्रयत्न करत राहतो. पण कसं आहे, सचिन तेंडूलकरची नक्कल करून एखादा सचिन'सारखा' होऊ शकतो, पण 'सचिन' होऊ शकत नाही. त्यामुळे एक स्वतंत्र चित्रपट म्हणून तो जितकी अनुभूती देतो, त्यापेक्षा जास्त पहिल्या भागाची आठवण करून देतो.
निश्चितच थिल्लर विनोद, हास्यास्पद हाणामाऱ्या, फुसके थरार, पांचट भावनिक नाट्यं वगैरेंच्या जोडीला घणाघाती किंवा कंटाळवाणी गाणी अश्या टिपिकल स्वस्तातल्या फॉर्म्युलावाल्या बऱ्याच चित्रपटांच्या तुलनेत 'अ.त.छ.-२' खूप उजवा आहे. (किंबहुना ही तुलनाच होऊ शकत नाही.) पण तरी पूर्ण चित्रपट वेगवेगळी ठिगळं जोडल्यासारखा वाटत राहतो. साधू मुंबईत परतल्यावर, कामावर रुजू झाल्यावर फार विशेष असं काही करतो, असंही वाटत नाही आणि त्याच वेळी तो जे काही करतो ते एन्काऊण्टर स्पेश्यालिस्टपेक्षा सुपारी गुंडाचं काम जास्त वाटतं. तसंच उघडपणे, जाहीर, लोकांसमोर 'एन्काऊण्टर स्क्वाड' असा उल्लेख ह्या स्क्वाडचा होत नसतो. मानवाधिकार आयोग व मानवाधिकार संघटना ह्यांच्या अस्तित्वावरच असे उल्लेख प्रश्न उभे करतात. अश्या काही, वरवर किरकोळ वाटू शकणाऱ्या खबरदाऱ्या घ्यायला हव्या होत्या.

'नाना पाटेकरचं काम केवळ अप्रतिम आहे', असं म्हणणं म्हणजे 'पाणी ओलं आहे' किंवा 'आग गरम आहे' किंवा 'बर्फ थंड आहे' ह्यासारखं विधान आहे. नानाने वाईट काम केलेला चित्रपट माझ्या तरी स्मरणात नाहीच आणि ही भूमिका तर नाना ह्याआधीही जगून झाला आहे. चित्रपट साधू आगाशेचा आहे आणि तो नानाचाच राहतो.
इतर भूमिकांत आशुतोष राणा, पहिल्या भागात साधूवर खार खाणाऱ्या 'इम्तियाज'ची जागा घेतो. भेदक नजर, वजनदार संवादफेक आणि आक्रमक देहबोली ह्यांतून आशुतोष राणाने आजवर प्रत्येक भूमिकेत जान ओतली आहे, इथेही ओततोच. गुल पनाग ही गुणी अभिनेत्री तिला मिळालेल्या मर्यादित वेळेचं सोनं करते आणि गोविंद नामदेव सारख्या ताकदीच्या अभिनेत्याला फारसं काही कामच नाहीये ! गृहमंत्री जहागिरदारच्या भूमिकेत विक्रम गोखले आणि मुख्यमंत्री अण्णासाहेबांच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर हे एक उत्तम कास्टिंग आहे. प्रभावळकरांच्या भूमिकेची लांबी कमी आहे. पण विक्रम गोखलेंचा जहागिरदार मात्र जबरदस्त !

चित्रपटाच्या नामावलीवरून तरी ह्याचा रामगोपाल वर्माशी संबंध नाही, असं दिसलं म्हणून मी पाहायची हिंमत केली. कारण रा.गो.व.च्या गेल्या काही चित्रपटांमुळे मी त्याच्या नावाचा धसकाच घेतला आहे. पण तरी, हे पीक त्याच जमिनीत घेण्यात आलं असावं असं सतत जाणवत राहतं.
चित्रपटात बऱ्याच गोष्टी बऱ्याच अंशी समाधानकारक आहेत. पण तरीही मला जर 'साधू आगाशे' पाहावासा वाटला तर मी 'अ. त. छ. - १' च पाहीन, 'अ. त. छ. - २' नाहीच, हे मात्र नक्की.
कारण शेवटी ओरिजिनल, तो ओरिजिनलच !

रेटिंग - * * १/२

------------------------------------

दर रविवारी ह्या वृत्तपत्रात मी 'मी मराठी लाईव्ह' ह्या मुंबई व ठाणे येथे प्रकाशित होणाऱ्या दैनिकात चित्रपट परीक्षण लिहिणार आहे .ह्या लेखाचा संपादित भाग कालच्या अंकात छापून आला आहे.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...