Tuesday, June 11, 2013

बाहुला झपाटलेला, प्रेक्षक झोपाळलेला ! (Zapatlela 2 - Marathi Movie Review)

लोक उगाच म्हणतात की चित्रपटातून आपण नको ते उचलतो. खरं तर चित्रपट आपल्यातून हवं ते उचलतात. 'घरी कुणी तरी जेवायला येणार' म्हटल्यावर आजकाल काही लोक बाजारात 'रेडीमेड' काय मिळतं ते आधी पाहातात. अर्ध्या तासात घरपोच पिझ्झा मिळायचा हा जमाना आहे. त्याव्यतिरिक्त इडलीपासून बटर चिकनपर्यंत आणि पॉपकॉर्नपासून चिकन लॉलीपॉपपर्यंत स ग ळं 'फक्त पाण्यात मिसळलं/ उकळलं/ भाजलं/ तळलं की तयार' असं उपलब्ध आहे आणि जे पदार्थ असे सहज शक्य नाहीत, ते हळूहळू 'गायब' होत आहेत. तसंच बाजारात उपलब्ध असलेल्या एखाद्या स्वयंसिद्ध फॉर्म्युलाला पुन्हा पुन्हा सादर करणं किंवा जुन्याच एखाद्या चित्रपटाचा पुढचा भाग बनवणं, हा चित्रपटाने निवडलेला 'शॉर्ट कट' आहे, आपल्याकडूनच शिकलेला ! एका दिवसात पटकथा आणि संवाद तयार, दोन दिवसात कास्टिंग फायनल, आठवड्याभरात लोकेशन्स, सेट्स तयार आणि २ महिन्यात चित्रपट तयार आणि एक राहिलंच अर्ध्या तासात संगीतही तयार - असे चित्रपट बनत असावेत असं काहीसं काही चित्रपट पाहिल्यावर वाटतं. पण असे चित्रपट तिकीटबारीवर चांगला गल्ला जमवतानाही दिसतात, त्यामुळे हा 'दोष ना कुणाचा '! आपण तसे, म्हणून आपले चित्रपटही तसेच असा विचार करायचा !
महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डेच्या सुप्परहिट्ट जोडीचा नव्वदच्या दशकातील सुप्परहिट्ट 'झपाटलेला'चा दुसरा भाग असाच कामचुकार गृहिणीच्या स्वयंपाकाप्रमाणे आहे.    

मागील भागात दोन भुवयांच्या बरोब्बर मध्ये साध्या रिव्हॉल्वरने अचूक नेम साधून इन्स्पेक्टर महेश जाधवने भारताच्या अनेक नेमबाजपटूंना लाजवलं होतं (त्यानंतरच भारताला नेमबाजीत पदकं मिळायला लागली का ?) आणि 'तात्या विंचू'चा खातमा केला होता हे तुम्हाला लक्षात असेलच. आता हा इन्स्पेक्टर जाधव कमिशनर झाला आहे. पण अजूनही हातावर मूठ आपटून 'डॅम ईट' चालू आहे and why not ? तात्या परतला आहे ! का ? कशासाठी ? ते असो. मनुष्यदेह प्राप्त करण्यासाठी त्याला पुन्हा 'लक्ष्या'चा शोध आहे. पण लक्ष्या आता जिवंत नाही. मग ? कायद्यातील पळवाटेप्रमाणे मृत्युंजय मंत्रातही एक पळवाट आहे. 'बाप नाही, तर पोराला धर.' म्हणून हा तात्या, लक्ष्याचा पोरगा आदित्य (आदिनाथ कोठारे) च्या मागावर आहे.
पुढे काय होतं, होणार आहे ते सांगून काहीही उपयोग नाही. कारण ते इतकं बुळबुळीत आहे की सांगता सांगताही घसरायला होईल.


एकंदरीत पटकथा तर इतकी लंगडी आहे की फक्त तात्या आणि आदित्य ही दोनच पात्रंही चालली असती चित्रपटात. पण मरतुकड्या कथे-पटकथेला वजन येण्यासाठी मकरंद अनासपुरे (बोलक्या बाहुल्यांचे खेळ करणारा कलाकार म्हणून), सई ताम्हणकर (टिव्ही रिपोर्टर), सोनाली कुलकर्णी ज्यु. (तमाश्यात नाचणार्‍या बाईची सुशिक्षित नाचरी पोर) अश्या काही काही वजनदार नावांची स्टारकास्ट आहे. मधु कांबीकर आदित्यच्या आजीची (आधीच्या भागात लक्ष्याची आई) भूमिका करतात आणि आधी म्हटल्याप्रमाणे महेश कोठारे 'डॅम ईट' करतात. ह्या सर्वांचं अवतारकार्य ह्या दोन ओळींत जितकं लिहिलं तितकंच आहे.

ओव्हर अ‍ॅक्टिंगसाठी जर एखादा पुरस्कार असेल, तर सो. कु. ज्यु. पेक्षा आदिनाथ कोठारे आणि मधु कांबीकर त्यासाठी जास्त लायक आहेत. आदिनाथ कोठारे वडिलांकडूनही जरासा अभिनय शिकू शकतो, असं म्हणावंसं वाटतं, इतका 'होपलेस' आहे. काही फ्रेम्समधला मक्या वगळला, तर पडद्यावर अभिनय म्हणून बाकी जे काही दाखवलं आहे ते निव्वळ 'बं ड ल' आहे. कुठल्याच प्रसंगात प्रेक्षक पडद्यावरील पात्राशी नातं जोडूच शकत नाही.

अवधूत गुप्ते ह्यांचं संगीत इतरांच्या फुसक्या कामाला साजेसं आहे. शीर्षक गीताची लावणी कैच्याकै गंडली आहे. ऑक्टेव्ह्जशी खेळ करावा तर तो बाळासाहेबांनीच, हे त्या गाण्यामुळे पटतं. 'मदनिके' गाणं बरं आहे. बाकी यथा तथाच.

सपक संवाद आणि केविलवाणी विनोदनिर्मिती चित्रपटाला हास्यास्पद करतात.
अख्खा चित्रपटभर दिलीप प्रभावळकर (तात्या विंचूचा आवाज) वगळता प्रत्येक जण 'जत्रा' मधील 'ज' 'जहाजा'चा उच्चारतो. पण आजकाल ह्यावर बोलणं म्हणजे मूर्खपणा असतो. कारण 'भावना पोहोचल्या ना? मग !' असा उलट प्रश्न होतो. आणि असंही अख्खा चित्रपट पांचटपणा आणि मूर्खपणाचा बाजार असल्यावर ह्या चुका तर अगदीच किरकोळ म्हणायला हव्या.

ह्या चित्रपटाची प्रसिद्धी 'पहिला मराठी थ्रीडी चित्रपट' म्हणून करण्यात आली, ते अगदी योग्य आहे. कारण चित्रपटाचा हा एकमेव 'यू. एस. पी.' आहे. हॅरी पॉटरचा शेवटचा भाग मी थ्रीडीत पाहिला होता. पण थ्रीडीची मजा मला तरी 'झपाटलेला - २' मध्ये जास्त आली. किमान ६-७ वेळा मी व आजूबाजूचे लोक व्यवस्थित दचकलो. अनेक कॅमेरा अँगल्स 'थ्रीडी'चा विचार करून प्रयत्नपूर्वक साधले असल्याचे जाणवते. ह्या एका गोष्टीसाठी चित्रपटकर्त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

थोडक्यात, हा 'झपाटलेला - २' पाहाताना प्रेक्षकाचा 'झोपाळलेला' होतो पण तितक्यात थ्रीडीमध्ये काही तरी अंगावर येऊन तो दचकून जागा होतो आणि इच्छा नसताना अख्खा चित्रपट पाहावा लागतो.

रेटिंग - * (केवळ थ्रीडी साठी.)   

Monday, June 10, 2013

लडाख

पर्वतरांगा
तुझ्याच सार्‍या
तुझी पठारे
तुझ्याच सरिता
वाळवंटही

तूच पसरल्या
शिखरांपासुन
पायथ्यांपुढे
शुभ्र हिमाच्या
अनंत शाली

धरणी भिडते
आकाशाला
असा अनोखा
संगमसुद्धा
तूच घडवला

वैविध्याचे
आश्चर्यांचे
अथांगतेचे
अनंततेचे
असे प्रदर्शन
कधी न दिसले

परंतु येथे
विशालतेच्या
परिसीमेला
मानवतेची
चाहुल नाही

असे भयंकर
रूप तुझे तर
कसे असावे
दानवतेचे
भीषण दर्शन ?

जेव्हा येतो
तुझ्या रुपाने
समोर मृत्यू
तुझ्याच निश्चल
शांतपणाने,
कशी तुझी ही
भीती झटकुन
पुन्हा एकदा
मनात माझ्या
विशुद्ध श्रद्धा
भरून यावी
आणि जुळावे
कर हे दोन्ही
निव्वळ, अस्सल
प्रेमापोटी ?

माझ्यामधल्या
तुझ्याच एका
ह्या अंशाला
सांग तुझ्या ह्या
विशालतेतुन
शोधुन काढुन
तूच स्वत:ला..!

....रसप....
८ जून २०१३

Tuesday, June 04, 2013

साडे अठरा हजार फूटांवरचं एक फूट....... !! (Unforgettable Ladakh)

'सुमूर' गावातली मॉनेस्ट्री पाहून आमची क्वालीस डिस्किट नदीच्या आजूबाजूच्या रेताड वाळवंटातून काढलेल्या डांबरी रस्त्याने कॅम्पकडे निघाली. आमचा रस्ता पर्वतातून उतरला होता आणि पर्वताकडेच चालला होता. ह्या मधल्या काही किलोमीटरच्या पट्ट्यात डिस्किट नदी आणि तिचं वाळवंट.

दुरून, ह्या रस्त्यावर उतरण्याआधी आम्हाला वाटत होतं की हवा ढगाळ आहे. समोरच्या पर्वतावर ढग उतरले आहेत आणि म्हणून तो अतिप्रचंड पर्वत लपला आहे. पण रस्त्यावर येताच जाणवलं की इथे वादळसदृश हवा वाहत आहे. हवेत रेती इतकी उंच उडत आहे की तिने पर्वताला स्वत:ची चादर पांघरली आहे. गाडी दमदार होती, ड्रायव्हर 'दोर्जे' तरबेज होता आणि रस्ता फार लांबचा नव्हता, त्यामुळे आम्ही कुठलाही त्रास न होता समोरच्या पर्वतावर पोहोचलो आणि उंचीवरून त्या घो-घो हवेला न्याहाळू लागलो. गंमत वाटत होती. एकीकडे उंचच उंच पर्वतरांगा. त्यांच्या डोक्यावर बर्फ आणि त्यांच्या पुढ्यात रेती ! पण लडाख असंच आहे.


संध्याकाळी ४:३० - ५:०० च्या आसपास आम्ही 'नुब्रा' व्हॅलीतल्या 'हंडर' गावातल्या आमच्या कॅम्पमध्ये पोहोचलो. आमचा कॅम्प एका डोंगराच्या पायथ्याशी होता. फार उंच डोंगर नव्हता. हजार एक फुटांचा सलग दगडच म्हणा हवा तर. पण त्याच्या बाजूला आणि मागे काही अंतर सोडून मोठे मोठे पर्वत होते. लडाखमध्ये पर्वतांच्या रांगांमागे रांगा असतात. नजर थिजते पण रांगा संपत नाहीत. कॅम्पच्या मधून एक चार-पाच फूट रुंदीचा झुळझुळ ओहोळ वाहात होता. त्या, मागल्या बाजूला असलेल्या उंच पर्वताच्या शिखरावर पोह्यांवर खोबरं भुरभुरावं तसं बर्फ होतं. हे पाणी त्या पर्वतातूनच वाहात येत ह्या कॅम्पचे दोन भाग करत होतं. पाण्याच्या दोन्ही बाजूंना, एका रांगेत वॉटरप्रुफ तंबू होते.


रात्री साधारण ८:०० वाजल्यापासून नुब्रामध्ये पावसाने हजेरी लावली. रिमझिम रिमझिम, टिपटिप टिपटिप रात्रभर सुरूच होतं. संध्याकाळच्या वादळानंतर हवा पूर्णपणे बदलली होती. पावसामुळे थंडी अधिकच बोचरी झाली होती. ४-५ अंशाच्या आसपास तापमान असावं. दात वाजवणारी थंडी होती, तरी त्या तंबूंत पांघरुणाची व्यवस्था अतिशय उबदार होती. जाडजूड पश्मीना दुलयांच्या आत शिरल्यावर बाहेर निघावंसंच वाटत नव्हतं. पण रात्रभर तंबूवर पडणाऱ्या थेंबांनी शांतता लाभू दिली नाही आणि झोपही लागू दिली नाही.

सकाळी ७:०० वाजताच आम्ही सगळे उठून निघायची तयारी करायला लागलो. लेहकडे परतण्याच्या रस्त्याचा खर्दुंग घाटातला ३० एक कि.मी. रस्ता खूपच खराब होता. म्हणून लौकर निघावं असा आम्ही विचार केला होता. पण दोर्जे म्हणाला, 'ओ नॉर्थ पुल्लू चेक पोस्ट से आर्मी आगे जाने देगा नई. पहले ओ साईड का गाडी इधर आयेगा, एक बजे तक. फिर इधर का गाडी छोडताय ओ. हम ९:०० बजे को निकलेंगे ?' (हे शेवटचं प्रश्नचिन्ह उत्तरातदेखील असतंच. ते खरं तर विधान असतं, पण चौकशी केल्यासारखं केलं जातं. सगळे लडाखी असंच प्रश्नार्थक हिंदी बोलतात.)

कॅम्पच्या नयनमनोहर परिसरात फोटोग्राफीची हौस भागवून, बोअरिंग नाश्ता करून आम्ही बरोब्बर ९:०० वाजता 'गणपती बाप्पा........ मोरया !!' केलं आणि रस्त्याला लागलो. आदल्या दिवशीच्या कार्यक्रमातील 'डिस्किट मॉनेस्ट्री' पाहायची बाकी होती, पण रोज एक मॉनेस्ट्री पाहाण्याचा आणि सोबत गाईड नसल्याने त्यातलं काहीच न कळण्याचा कंटाळा आला होता, त्यामुळे आम्ही दोर्जेला थेट लेहकडेच चलायला सांगितलं.

समुद्रसपाटीपासून साधारण ३००० फूट उंचीकडून आम्ही ४५०० फूट उंचीकडे चाललो होतो, पण मधला रस्ता आम्हाला गाडीसह गाठता येऊ शकणार्‍या जगातल्या सर्वाधिक उंचीवर नेणार होता. 'खर्दुंग ला' - उंची १८५०० फूट आमची वाट पाहात होता.

काल दुपारी ह्या भागातून येत असताना आजूबाजूच्या बोडख्या डोंगरांतून विविध रंगी दगड लक्ष वेधून घेत होते. हिरवे, लाल, काळे, पिवळे रंगाचे दगड.... अख्खे डोंगरच्या डोंगर भरून ! पण आता मात्र सगळ्या डोंगर-पर्वतांनी बर्फाची पांढरी शुभ्र, चमचमती पश्मीना शाल पांघरली होती. काल संध्याकाळी उशीरापासून बदललेल्या हवामानामुळे इथे भरपूर बर्फवृष्टी झाली होती. प्रत्येक पर्वतात वेगवगळे आकार, चेहरे दिसत होते. कुठे पांढऱ्या पानांचा विशाल वृक्ष असल्याचा भास होत होता, तर कुठे अर्घ्य देणारी ओंजळ दिसत होती. कुठे चित्रविचित्र वाढलेल्या पांढऱ्या दाढीचा खडूस म्हातारा बारीक डोळे करून पाहात होता, तर कुठे मान खाली घालून घळाघळा अश्रू वाहाणारी दु:खी प्रेयसी लक्ष वेधून घेत होती.


प्रत्येक वळणासरशी आमची गाडी अधिकाधिक उंची गाठत होती.
'खर्दुंग ला' - जगातला सर्वाधिक उंचीचा, गाडी जाऊ शकणारा रस्ता आम्हाला पार करायचा होता.
खोऱ्यात पाऊस पडला म्हणजे शिखरावर बर्फवृष्टी झाली असणार, असं कॅम्पातून निघतानाच तिथल्या लोकांनी सांगितलं होतं. 'खर्दुंग ला' साधारण १८५०० फुटांपर्यंत नेतो. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळणावर रस्त्याच्या खाली मोकळ्या मैदानात भरपूर बर्फ होता. तिथून एक नदीही वाहत असावी, जी आता गोठली होती. आमच्या आधीच ४-५ गाड्या तिथे पोहोचल्या होत्या आणि सगळे लोक त्या शुभ्र बर्फात खेळत होते. दोर्जेला तिथेच गाडी बाजूला घ्यायला सांगून आम्ही जाकिटं, ग्लोव्ह्ज, मफलर, टोप्या ई. आयुधं चढवून गाडीतून उड्या मारल्या आणि इतर लोक खेळत होते, त्या जागेपासून थोडं अजून पुढे, अजून जास्त बर्फात जाऊन दंगा सुरु केला. आयुष्यात पहिल्यांदाच बर्फ पाहात होतो. तोही असा ताजा-ताजा, काही तासांपूर्वीच भुरभुरवलेला ! अर्धा तास मनसोक्त खेळल्यावर तिथून निघालो.


पुढे आमच्यासाठी काय वाढून ठेवलं होतं, ह्याची कल्पना नव्हती; त्यामुळे आमचा आनंद अजूनही आमच्या चेहऱ्यांवरून ओसंडत होता. तासाभरात आम्ही नॉर्थ पुल्लू (उंची १६००० फूट) आर्मी चेक पोस्टला पोहोचलो आणि लगेच आनंद आटला. ५० च्या आसपास गाड्या तिथे आधीच उभ्या होत्या. 'खर्दुंग ला' ला प्रचंड बर्फवृष्टी झाली होती व त्यामुळे जागोजाग दरडी कोसळल्या होत्या. रस्ता सकाळपासून बंदच होता. लोक तिथे ५-६ तासांपासून अडकले होते. दु. १२ चा सुमार होता. दोर्जे माहिती काढून आला.
'अभी इधरी रुकनेकाय. ओ छोड नई रहे. रस्ता बंद हैं. आराम करो !'

बर्फवृष्टी सुरूच होती. आजूबाजूच्या हिमाच्छादित पर्वतांची शिखरं मधूनच थोड्या वेळासाठी दर्शन द्यायची. आम्हाला वाटायचं, आता हवा सुधारली. पण काही मिनिटातच ती पुन्हा धुक्यात आणि ढगांत लपायची. इथेच थांबायला लागणार की काय ? ही भीती मन पोखरत होती. 'मेकमायट्रीप'च्या माणसांना पुढे काय करायचे आहे, हे माहितही नव्हतं आणि त्याची त्यांना पर्वा असल्याचंही दिसत नव्हतं आणि हे पाहून आमची बेचैनी वाढतच जात होती.  


बाजूलाच एक टपरी वजा हॉटेल होतं, वेळ आहे तर काही तरी खाऊन घेणं महत्वाचं होतं. गरमगरम 'मॅगी'शिवाय तिथे काहीच खाणेबल नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यावरच भागवलं आणि आर्मीकडून पुढील 'ऑर्डर्स'ची वाट पाहात बसलो.
पुढचे साडे तीन तास आम्ही तिथेच थांबून होतो. दमट थंड हवा छातीत बाष्प जमवत आहे की काय असं वाटत होतं. ऑक्सिजन विरळ होणे, म्हणजे नेमकं काय, हेही जाणवायला लागलं होतं. ८-१० वाक्यं बोलण्यानेही दम लागत होता.
अखेरीस साधारण सव्वा तीनच्या सुमारास तिथून गाड्यांना पुढे जाण्यासाठी हिरवा सिग्नल मिळाला. सैनिकांनी चढाई करावी, तश्या सगळ्या गाड्या त्वेषाने समोरच्या महाकाय पर्वताकडे धावत सुटल्या. दोन वळणं घेतल्यावरच सगळ्या एका रांगेत शांतपणे जायल्या लागल्या.

जिथवर नजर जाईल तिथवर बर्फ दिसत होता. पर्वतांची पांढरी शुभ्र शिखरं कुठे संपत आहेत आणि आभाळ कुठे सुरु होत आहे हे कळत नव्हतं !



ठिकठिकाणी मातीचे ढिगारे, दगड-धोंडे आणि बर्फ होते. काल इथून येताना आम्ही पाहिलं होतं की हा रस्ता इतका लहान होता की जेमतेम गाडीला गाडी पास होई. त्यात ह्या मलिद्यामुळे तो आणखीच लहान झाला होता. 'खर्दुंग ला'चा हा सगळा भाग 'रस्ता' म्हणत असले तरी 'रस्ताहिन' होता. जिथे-तिथे फूट-फूटभराचे खड्डे होते. 'इथे कोणे एके काळी रस्ता असावा' असे म्हणता येईल इतपत डांबराचे अवशेष उरलेले होते. (पण इतक्या उंचीवर, कसा का होईना रस्ता आहे, हेही नसे थोडके ! अर्थात, आर्मी असल्यामुळेच इतपत तरी शक्य झालं असावं. अन्यथा सरकार हे काम करूच शकत नाही !) अश्यात झालेल्या बर्फवृष्टीमुळे हा रस्ता निसरडा झाला होता. सतत एका बाजूला पर्वत आणि दुसऱ्या बाजूला काही हजार फूट खोल दरी, निसरडा खड्डेमय रस्ता ह्यातून दोर्जे अत्यंत शांतपणे व हळूहळू गाडी पुढे नेत होता. दर १००-२०० मी.नंतर काही मिनिटं थांबावं लागत होतं. पुढचा अंदाज घेऊन, तिथे असलेल्या हेल्परकडून सिग्नल मिळाल्यावर पुढे जाणं सुरु होतं.

आतापर्यंत आम्हाला ह्या बर्फाच्या भीषणतेची जाणीव झाली होती. बाहेरचं तापमान शून्याच्या खाली होतं. गाडीच्या चाकांपुरता रस्ता वगळता आजूबाजूला अर्धा ते एक फूट बर्फ होता. बाहेर इतकी थंड हवा वाहात होती की गाडीच्या काचा उतरवणं अशक्य होतं. दर अर्ध्या तासाने लघवीला लागत होती. त्यामुळे सोबतच्या बायकांची अवस्था अजूनच बिकट होती. दार उघडून बाहेर पडलं किंवा थोड्या वेळासाठीही काच उतरवली की त्या बोचऱ्या थंडीने डोकं भणभणायला लागे. अगदी किरकोळ सूर्यप्रकाश होता तरी चमकदार बर्फावरून तो इतका परावर्तीत व्हायचा की प्रचंड त्रास होई. जसजसं आम्ही उंच जात होतो, ऑक्सिजन अधिकाधिक विरळच होत होता. त्यामुळे दर दोन तीन श्वासानंतर तोंड उघडुन एक मोठा श्वास घ्यायला लागत होता. सगळ्यांना भुका लागल्या होत्या, पण काही खाण्याची इच्छाही होत नव्हती. कमी ऑक्सिजनचा हळूहळू आमच्यावर परिणाम होत होता. पहिलं लक्षण - जांभया येणं - सुरु झालं होतं.
पण अश्याही परिस्थितीत दोर्जे एक साधंसं जाकिट घालून, कानालाही काही न बांधता प्रत्येक वेळी गाडी थांबवायला लागल्यावर लगबगीने खाली उतरत होता. कधी रस्त्यात आलेल्या लहान मोठ्या दगडांना इतर ड्रायव्हरांच्या मदतीने बाजूला करत होता, तर कधी पुढच्या गाड्यांना धक्का देऊन पुढे जाण्यास मदत करत होता.                  


तीन-चार तासांनंतर आम्ही 'खर्दुंग ला' च्या सर्वोच्च पातळीच्या जवळ पोहोचलो. आणखी तीन वळणं पार केली की घाट उतरायला सुरु ! गाडीच्या बंद काचांच्या आत गुदमरून कासावीस झालेल्या आम्हाला दोर्जेने 'ला' च्या सर्वोच्च जागेवरचा टॉवर दुरून दाखवून 'ओ आ गया.... बस उसके बाद नीचे उतरना शुरु करेंगे. उसको जादा टाईम नहीं लगेगा' म्हटलं, तेव्हा एक वेगळीच उभारी मिळाली. पण हे पुढचं वळण आत्तापर्यंतच्या असंख्य वळणांपैकी सगळ्यात धोक्याचं होतं. ह्या वळणावर बर्फ असा काही घट्ट जमला होता की तो काढण्यासाठी खड्डाच करावा लागला असता ! त्यामुळे दोन हेल्पर ह्या वळणावरच उभे होते.
इथून गाडी पुढे नेणं म्हणजे एक जीवघेणी कसरतच होती. गाडीचे चाक बर्फावर आल्याने ते जागच्या जागीच फिरायचं आणि समोर थोडासा चढ असल्याने गाडी जागेवरच वळायची ! मग रिव्हर्स घेऊन पुन्हा, मोशन न तोडता गाडी तिथून काढता येते का पाहायचं ! एखादा गाडीवाला पहिल्याच झटक्यात निघूनही जाई. पण जवळजवळ प्रत्येक गाडी दोन-तीन प्रयत्नांनंतरच तिथून निघू शकत होती.
एका बाजूला कडा आणि दुसऱ्या बाजूला साधारण ८००० फूट खोल दरी, अश्या त्या वळणावर आमची गाडी आली. जोरात 'घ्रुम्म्म्....' असा आवाज झाला, चाकं जागेवरच फिरली आणि गाडी जराशी वळली. पहिला प्रयत्न फसला होता. आता गाडी रिव्हर्स घ्यायची ! आमच्या छातीत धडधड वाढली होती. दोर्जेने सफाईने रिव्हर्स गियर टाकून गाडी मागे घेण्यास सुरु केली. दरीच्या कडेपासून जेमतेम एक फूट अंतर ठेवून तो गाडी उलटी मागे घेत होता.....! हे आधी आम्हाला माहित नव्हतं. पण खिडकीतून बाहेर जेव्हा ती हजारो फूट दरी आ वासल्यासारखी दिसली, तेव्हा मात्र पोटात गोळा आला.. गाडीतील बायकांनी डोळे मिटून जोरात आरडाओरडा केला. आमचीही टंपरली होती, पण आम्ही आमचा आरडाओरडा मनातल्या मनात केला.
दोर्जे आणि बाहेरचे दोघे हेल्पर शांत होते.
'कुछ नई.. कुछ नई.. सब ठीक हैं. डरो मत !!'
सगळेच इतके घाबरलो होतो की 'ठीक हैं' म्हणण्याइतपतही जीवात जीव नव्हता. वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली ! मनातल्या मनात कुणी राम-राम करत होतं, कुणी भीमरूपी म्हणत होतं.
दुसरा प्रयत्न.. दोर्जेची क्वालीस पुन्हा गोळाफेकपटू धावत येऊन गोळा फेकतो, तशी रन-अप घेतल्यासारखी त्या वळणाकडे धावत गेली आणि पुन्हा चाकं जागेवर फिरली, गाडी जराशी वळली; पण बाहेरच्या दोघा हेल्पर्सनी धक्का दिला आणि ह्यावेळी गाडी तिथून निघाली.
मृत्यूचं वळण मागे पडलं होतं.. पुढचा तासभर कुणीही कुणाशी काहीच बोलायच्याही मनस्थितीत नव्हतं. पाचावर धारण बसली होती! मृत्यू काळोखा असतो, हा गैरसमजही दूर झाला होता. कारण आम्ही पांढरा शुभ्र मृत्यू पाहिला होता, अगदी जवळून.......... एका फूटावरून !!    

लेहच्या हॉटेलमध्ये पोहोचायला रात्री ९:०० वाजले होते. पाय इतके गारठले होते की बधीर झाले होते. डोक्यात घण वाजत होते. डोळे अतिशय थकले होते. कढत पाण्याने सगळं अंग शेकून काढून, बेचव जेवणाचे दोन घास कसेबसे गिळून आम्ही आपापल्या ब्लँकेटांत व दुलयांत अंगाची मुटकुळी करून शिरलो.

डोळ्यासमोरून ती जीवघेणी दरी काही केल्या जातच नव्हती. मनात विचारांचे आवर्त उठत होते. वाटत होतं,  तेव्हढा एक फुटाचा भाग फक्त बर्फच असला असता तर..........??


....रसप....
३ जून २०१३  

Sunday, June 02, 2013

एक 'न्यूट्रल' दिवानेपण (Yeh Jawani Hai Deewani - Movie Review)

'प्यार दिवाना होता हैं..' हे शब्द दस्तुरखुद्द आनंद बक्षी साहेबांनीही जितक्या गांभीर्याने लिहिले नसतील, तितक्या गांभीर्याने हिंदी चित्रपटकर्ते वर्षानुवर्षं घेत आले आहेत. किंबहुना, हे शब्द लिहिले जाण्याआधीपासूनच ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. सुरुवातीला हे फक्त 'दिवाना' असावं आणि नंतर नकळतच त्यापुढे 'च' लागला आणि 'प्यार दिवाना'च' होता हैं..' असं समस्त वुड बी गुल-बुलबुलांचं मत झालं असावं. अनेक दशकांच्या इतिहासातील कुठलाही हिंदी चित्रपट काढावा, त्यातील प्रेमाने 'दिवाने'पणाची झलक दाखवलीच असते किंवा बऱ्याचदा त्याची मर्यादाही ओलांडलेली असते.
हे इतकं बिंबवलं गेलं आहे की पडद्याबाहेर खरंखुरं आयुष्य जगणाऱ्या तुमच्या-आमच्यासारख्यांनाही 'दिवानेपण' ही प्रेमाची मूलभूत आवश्यकता असते, असंच वाटत असतं. कुठे तरी ह्याच 'दिवाने'पणातून विजोड जोड्या जोडल्या जात असाव्यात.
पण मित्रांनो, बहुतेक चित्रपट अर्धवट शिक्षण देतात. ते फक्त लग्न ठरेपर्यंत किंवा फार तर होईपर्यंतची कहाणी सांगतात. क्वचित प्रसंगी लग्नानंतरचं एखाद-दुसरं भांडण दाखवतात. बंद दरवाज्याच्या आड घडणाऱ्या शाब्दिक, वैचारिक व मानसिक कुस्त्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा 'दिवाने'पण करावं लागतं. घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून !

असो. तर असंच अर्धवट शिक्षण देतो 'यह जवानी हैं दिवानी'.

नयना (दीपिका पदुकोन) एक हुश्शार मुलगी. मेडिकलच्या अभ्यासात नाकावरच्या चश्म्यापर्यंत बुडालेली आणि गुदमरणारी. आदिती (कल्की कोच्लीन) एक टिपिकल 'टॉम बॉय', कबीर उर्फ बनी (रणबीर कपूर) एक टिपिकल बॅकबेंच टॅलेण्ट आणि अवि (आदित्य रॉय कपूर) त्याची टिपिकल 'सप्लिमेण्ट'; ह्या त्रिकुटासोबत एका ट्रेकिंग कॅम्पसाठी नयना मनालीला जाते. कॅम्पदरम्यान मनमौजी बनीची तिला जबरदस्त भुरळ पडते आणि एक मेडिकलची विद्यार्थिनी एका सडाफटिंगच्या प्रेमात पडते. ती पडणार आहे, हे आपल्याला आधीच माहित असतं पण पडेपर्यंतचा प्रवास खूप मजेशीर केला आहे. काही प्रसिद्ध वक्तव्यांची हिंदी भाषांतरं, ठसकेबाज गाणी आणि चौघांचाही सहज वावर गुंतवून ठेवतो.
पण मध्यंतराच्या जरासं आधी महत्वाकांक्षी 'बनी'तला जबाबदार 'कबीर' जागा होतो आणि कुठल्याश्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी तो अमेरिकेला जाणार असल्याचं कळतं. तो मध्यमवर्गीय घरातला असल्याने त्याच्या परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची आवश्यकता असणार, हे चाणाक्ष कथालेखकाने ताडलं होतं म्हणून तीदेखील त्याला मिळालेली असते. त्याच्यासारख्या कॉपी करून पास होणाऱ्या डफ्फळशंखाला शिष्यवृत्ती कशी काय मिळते, ह्याचा विचार चाणाक्षमती करत नाही.
बनी, त्याला आयुष्याकडून हव्या असलेल्या 'रफ्तार'साठी निघून जातो, नयना अव्यक्त राहते आणि आदिती-अवि मागे पडतात. इथे मध्यंतर होतं आणि मध्यंतरानंतरचा बहुतेक भाग आपल्याला एक लग्नाची सीडी दाखवली जाते. आदितीचं लग्न. 'तरण'शी (कुणाल रॉय कपूर). एका मोठ्या च्यानलचा एक महत्वाचा कॅमेरामन बनलेला बनी, जगाच्या कुठल्याश्या कोपऱ्यातून जिवलग मैत्रिणीच्या लग्नाला येतो आणि पुन्हा नयनाला भेटतो. 'सोये अरमान' जागे होतात आणि व्हायचं ते होतं. ते होणार असतं हे आपल्याला माहित असतं पण होईपर्यंतचा प्रवास उगाच वेळकाढूपणा करत राहातो.
अखेरीस पाच जणांत दोन जोड्या बनतात आणि एक बेवडा उरतो. पण सगळे खुश होतात. लग्न लागल्या लागल्या उपस्थितांना जेवणाची ओढ लागते आणि सगळे पंगतीकडे पळतात तसं चित्रपट संपून श्रेयनामावली सुरु होईपर्यंत अर्धं थेटर रिकामं झालेलं असतं.



श्रवणीय संगीत कुणाचं आहे, ही उत्सुकता शमविण्यासाठी आपण श्रेयनामावली पाहातो आणि तिथे 'प्रीतम' वाचल्यावर भ्रमाचा भोपळा फुटतो.
आटोपशीर 'वेक अप सिड' च्या तुलनेत 'यजहैंदि' त अयान मुखर्जी जरा अघळपघळच झाला आहे.
'कल्की' हळूहळू रमायला आणि रमवायला लागली आहे. तिच्यातला अतिसाधारणपणा आपलासा वाटतो.
दोघे 'रॉय कपूर' एकदम फिट्ट !
'दीपिका' इतकी गोड दिसते की बनी तिच्या प्रेमात पडला नसता तर काही तरी गडबड वाटली असती. अजूनही तिची ती भुवया आवळून बोलण्याची सवय काही जात नाही. पण तिचं गोंडस हसू आवळलेल्या भुवयांकडे लक्ष जाऊ देत नाही.
चित्रपट रणबीरचा आहे. बाकी सगळे सपोर्ट कास्ट असावेत. कुठेही तो त्याच्यावरील जबाबदारीसाठी कमी पडत नाही. 'बदतमीज दिल' मधला त्याचा नाच असला दिलखेचक वाटला की कधी तरी त्याला आणि हृतिकला एकत्र नाचताना पाहायला मिळेल का? असं काही तरी मनात आलं.
बनी-आदिती-अवि मधल्या मैत्रीची काही दृष्यं खूप भावतात. त्यांच्यातली घट्ट वीण अदृश्य असली तरी जाणवत राहाते.
माधुरीची 'मोहिनी' अजून कायम आहे. पन्नाशीच्या कंबरेत आजही जबरी दम आहे. तिचं गाणं अगदी म्हणजे अगदी उपरं असलं तरी ती असल्यामुळे मजा येते, हे विशेष !

पाण्यात बुडवल्यावर लिटमस कागद रंग न बदलता उदासीन राहातो, तसा हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षक जसा आत जातो, तसाच बाहेर येतो. हा चित्रपट काळजात घुसत नाही पण डोक्यातही जात नाही. तो जादू करत नाही पण अत्याचारही करत नाही.
अडीच तास निरागस चेहऱ्याच्या रणबीरला आणि गोंडस चेहऱ्याच्या दीपिकाला पाहून वेळ नक्कीच वाया जात नाही !

रेटिंग - * * १/२   
Related Posts Plugin for WordPress, Blogger...