Wednesday, November 04, 2009

....पाडा

एक काळा नाला
न वाहाणारा.. न तुंबणारा
मुठीतलं नाक सोडून श्वास घेणं अशक्य
तिथे दोन-दोन, तीन-तीन मजली खुराडी..
माणूस डुक्कर झाला की डुक्कर माणूस..
कुणास ठाऊक!
ढुंगण धुतल्यावर हात धुवायचे माहीत नाही
अत्तरांची दुकानं मांडून बसलेत
काय कपडे, काय भाषा
काय खाणं.... कसलं जीणं..!
संवेदनांची गाठोडी त्या नाल्याताच फेकलीत सा-यांनी

खोल शिरलेला विजेचा खांब सांगतो..
इथे आधी फूटपाथ होता
मग पलीकडची खाडी अजून बुजवून
फूटपाथच्या पुढ्यात फूटपाथ आला
पण तोही ह्यांच्या घश्यात गेला..
शेवटी हवेतच रस्ता बांधला
तर तिथे चरस-गांजा फुंकला..

झोपड्यांच्या पोटात काय काळं-पांढरं चालतं..
तो उपरवालाच जाणो..
लोक म्हणतात, इथे साबण बनतात..
कशापासून?
गायीच्या चरबीपासून..?
की नाल्याताल्या गाळापासून..??
काहीही असो..
एक मात्र नक्की..
एक दिवस इथेही एक SRA येईल
आणि नाकपुडीएव्हढ्या खुराड्यांचे कोट्यावधी देईल..


....रसप....
३ नोव्हेंबर २००९

प्रतिज्ञा

खांद्यावरले ओझे खाली ठेवणार नाही
ना मोडेन ना वाकेन, सहजी मरणार नाही

पाठुंगळी कालचा काळ बांधतो आहे
क्षितीजापलीकडे नजर ठेवून आहे
ठेचाळलो, भेंडाळलो, सरभरलो तरी
सावरून माझे होश उभा आहे


दगडांना, खळग्यांना जुमानलो नाही
डोंगरद-यांना पार करणार आहे
मनातल्या नभाला स्वप्नांचे कोंदण
सत्याच्या चौकटीत उतरवणार आहे


लेखणीस माझ्या धार लावणार आहे
लखलखत्या पात्याने रण जिंकणार आहे
गर्वाने माझा ऊर फुलणार आहे
मराठीत एकदा नोबेल आणणार आहे..!!




....रसप....
२६ ऑक्टोबर २००९

Sunday, September 27, 2009

शोध - २

शब्द शब्द गुंफलेला हार सांडला जिथे
रत्न रत्न तोलताना मी तिथे, तू कुठे?

सूर सूर ओतलेले गान गायिले जिथे
षड्ज षड्ज लावताना मी तिथे, तू कुठे

खोल खोल बोचणारे घाव लाभले जिथे
सुन्न सुन्न राहिलेला मी तिथे, तू कुठे?

पीळ पीळ सोडताना पाश तोडले जिथे
घाव घाव जाळलेला मी तिथे, तू कुठे?


....रसप....
२७ सप्टेंबर २००९

Friday, September 25, 2009

शोध

थेंब थेंब प्यायलेला अभ्र पांढरा जिथे
अंश अंश पोळलेला मी तिथे, तू कुठे?

उंच उंच खॆळणारा चंद्र वाहतो जिथे
स्वप्न स्वप्न वेचणारा मी तिथे, तू कुठे?

अंग अंग रंगलेली सांज थांबली जिथे
खंड खंड भंगलेला मी तिथे, तू कुठे?

रंग रंग माळलेला बाग हासतो जिथे
गंध गंध शोधणारा मी तिथे, तू कुठे?

दूर दूर धावणारी वाट संपते जिथे
श्वास श्वास मोजताना तू तिथे, मी कुठे?


....रसप....
२५ सप्टेंबर २००९
Related Posts Plugin for WordPress, Blogger...