Wednesday, July 30, 2008

माणसं

खोक्यांसारखी माणसं
एकावर एक रचलेली
गंज चढलेले मेंदू
आणि अक्कल पुसलेली

मेंढरांसारखी माणसं
मागे-मागे चालणारी
कंटाळवाणी मंदगती
पडणाऱ्यावर पडणारी..

बगळयांसारखी माणसं
ध्यान लावून बसलेली
दिसतात स्थितप्रज्ञ
मोडता घालण्या टपलेली

गेंड़यांसारखी माणसं
निगरगट्ट बनलेली
सोयर ना सूतक काही
मस्तवाल फुललेली

माणसासारखी माणसं
नावापुरती उरलेली
चिमणीच्या जातीसारखी
दुर्मीळ होत चाललेली.....


....रसप...
१३ जुलै २००८

दे मला संजीवनी

दे मला संजीवनी
तुकड्यात मी
श्वास कोंडले मनी
तुकड्यात मी ||धऋ.||

आसवांचे कुंभ प्यालो
भोगीले दू:शाप मी
काय माझे पाप होते
....... तुटलो मनी,
तुकड्यात मी ||१||

रात येई रात जाई
चंद्र जाळतो मला
तांबडी पहाट होते
....... वीझलो मनी,
तुकड्यात मी ||२||

शब्द खूंटतात जेथे
गाठले वळण मी
इथूनची मागे फीरावे..
...... दुवीधेत मी,
तुकड्यात मी ||३||




....रसप....
२६ जुलै २००८

व्यथा

खर सांगू , आज काल मी काहीच लिहित नाही
भावनांचा शब्दांशी मेळच जुळत नाही

काहूर आहे मनात अनेक प्रश्नांचे
एकाही प्रश्नाला माझ्या
उत्तरच मिळत नाही

परिस्थिती बदललीय ,
मलाही कळतंय
पण कळलेले सगळेच
अंगी वळत नाही .

आठवांच्या सरींनी
अंग चिंब भिजते
तरीही वास्तव भोवताली जळते
कधी वेळे आधी कधी वेळे नंतर
सगळेच पळून जातात
काही केल्या माझी
हूरहूर पळत नाही

उमलत्या कळ्या, फुललेली फुले
कुणाला आवडत नाहीत ?
खुडून टाकलेल्या फुलांना मात्र
कुणीच माळत नाही

म्हणूनच आज काल मी काहीच लिहित नाही
म्हणूनच आज काल मी काहीच बोलत नाही

....रसप....
६ फेब्रु. २००८

अथांग आहे....

मन - कलह
तन - विरह
धन - संग्रह
अजाणताही

कर्म - फलन
धर्म - पालन
जन्म - मरण
मनुष्यासी

बंध - मुक्ती
भोग - वीरक्ती
भक्ती - शक्ती
ये उदयासी

हात जयाचे
हाकीती गाडा
भक्तीभाववेडा
सर्वांतरी

जाण तयासी
मान तयासी
दयासागरासी
अथांग आहे....

....रसप....
Related Posts Plugin for WordPress, Blogger...