Sunday, January 25, 2009

कॉलेज....गेले ते दिवस

सहा चोपन्नची चर्चगेट
सात सव्वीस बान्द्र्याला
'मॉर्निंग मीटिंग' टपरीवर
भेटत असू चहाला
ग्रुपमध्ये आल्याबरोबर
चढे मस्तीची झिंग
गेले ते दिवस जेव्हा
चहाला म्हणायचो 'कटिंग'

इकोनॉमिक्सच्या लेक्चरला
वर्ग रिकामा करायचो
चार मुलं मागे ठेवून
'मास बंक' पाळायचो
गप्पाष्टकांत रंगवायचो
कँटीन आणि कट्टा
गेले ते दिवस जेव्हा
सिगरेटला म्हणायचो 'सुट्टा'

'भाई' नव्हतो कुणी तरी
तसं वागायला जमत होतं ..
कॉलेजमध्ये आमचंच तेव्हढं
नाणं खपत होतं..
नजर कुणी दिलीच तर -
"देखता क्या हैं? चल फूट..!!"
गेले ते दिवस जेव्हा
बावळ्यांना म्हणायचो 'चिरकूट'

एका हाकेसरशी सारे
कुठेही पोहोचत होतो
दोस्तीखातर कुणालाही
बिनधास्त 'भिडत' होतो
कधी दिले, कधी घेतले
आम्ही 'पाहुणचार'
गेले ते दिवस जेव्हा
दोस्ताला म्हणायचो 'यार'

सुट्टा विझला, कटिंग निवला
सुटले-तुटले यार
गेले ते दिवस आता
चुकावायचेत उधार..


....रसप....
२५ जानेवारी २००८

Friday, January 23, 2009

बंध पडतील तोकडे..



बेछूट मी बेफाम मी मजला कुणी रोखायचे
बंध पडतील तोकडे मजला कुणी बांधायचे

श्वासात स्वप्ने पाहतो मी
मुक्त जगणे जाणतो
वाट कुठली चालणे ना
निर्झरासम वाहतो
भावनांचे गाठोडे माझे कुणी सोडायचे
बंध पडतील तोकडे मजला कुणी बांधायचे

हातावरी जो आज आहे
तो सुखाने भोगतो
अन् उद्याच्या जीवनाची
मी तमा ना ठेवतो
तमस की उजळून आहे भाग्य ना जाणायचे
बंध पडतील तोकडे मजला कुणी बांधायचे

मी द्वेष ना केला कुणाचा
शत्रु ना झाले कुणी
तेथ जुळले सूर माझे
जेथ हो संवादही
गुंतणे ठाऊक ना जे जोडले राखायचे
बंध पडतील तोकडे मजला कुणी बांधायचे


....रसप....

Thursday, January 22, 2009

हे असे अन् ते तसे....


हे असे अन् ते तसे परि कोण जाणे का असे
वाहूनी जे जातसे परतूनी ना ते यायचे

जो न थांबे पळभरी तो काळ संगे चालतो
अडखळे पाऊल ज्याचे खेळ त्याचा संपतो
जो न जाणे सत्य हे तोचि भिकारी होतसे
वाहूनी जे जातसे परतूनी ना ते यायचे

वाल्मिकी देऊन गेला खुद्द अपुला दाखला
बदलतो तो जीव आहे हे मनासी जागवा
वैध जाणावे जे काज तेचि मोठे होतसे
वाहूनी जे जातसे परतूनी ना ते यायचे

जन्म मनुजाचा मिळाला भाग्य अपुले जाणतो
प्रेम-श्रद्धेला उराशी ठेवितो अन् वाटतो
तुच्छ ना लेखी कुणाला तो महंत होतसे
वाहूनी जे जातसे परतूनी ना ते यायचे


....रसप....
२२ जानेवारी २००८

Tuesday, January 20, 2009

सिगरेट उवाच


मला दु:ख जळण्याचे नाही
धुरामध्ये विरण्याचेही नाही
दु:ख एव्हढंच की,
तू मला फक्त जाळलेच नाहीस
जाणलेही नाहीस
आठव कधी मी तुझी साथ सोडली?
कधी मी तुझी कांस सोडली?
प्रेमात पडल्याच्या आनंदातही
तू माझी राख केलीस
प्रेमात आपटल्याच्या नैराश्याताही
तू माझीच राख केलीस..!!
धावपळीतला विसावा म्हणून
मला रोज जाळतोस
निश्चिंत शांत एकांतातही
फक्त मलाच जाळतोस
तो तुझा पेला कसा नेहमी विसळून स्वच्छ करतोस..
मला मात्र कुठेही बेदरकार भिरकावतोस..
मान मुरगाळून चुरगाळतोस..
गटांगळ्या खायला बुडवतोस..
काहीच नाही तर चक्क, चिरडूनही टाकतोस..
अरे, दुनियेत तुला ज्याने-त्याने फक्त 'बनवलं' आजवर
एक मीच जी जळायलाही तयार असते तुझा इशा-यांवर
मी जळले तेव्हढाच धूर तरी झाला
तुला तर लोकांनी धूर न काढताच जाळला..


....रसप....
२० जानेवारी २००८


Saturday, January 17, 2009

"तो"


असामान्य नव्हता तो
पण वेगळा मात्र होता
पहिला-दुसरा यायचा नाही
पण हुशार मात्र होता

संगीताचा छंद त्याला
बुद्धिबळाचा नाद
मी मात्र उडाणटप्पू
अंगात फक्त माज

मध्यमवर्गीय कुटुम्बातला
काकांकडे राही
काका होते अब्जाधीश
काहीच उणे नाही

दूजाभाव नव्हता तरी
बंधनं तर होती
चुलत भावा-बहिणीसोबत
तुलना होत होती

माझी सुद्धा व्यथा हीच
कथा वेगळी होती
घरीच होतो स्वत:च्या
पण तुलना 'मारत' होती..

पर्यावरण सहल आम्ही
'माथेरान'ला नेली
तिथंच जुळलं सूत आमचं
जवळीक निर्माण झाली..

कैंटीनमध्ये जोडगोळी
आमची फेमस झाली
हळूहळू स्वारी माझ्या
'कंपू'तही आली

माथेरानवर प्रेम त्याचं
अगदी जीवापाड
सहलींवर सहली केल्या
नव्हता पारावार

'फुंकणं-पिणं' आम्ही दोघं
एकत्रच शिकलो
कितीतरी बैठकिंना
मनसोक्त झिंगलो..

वर्ष होते चौदावीचे
मला पनौतीचे
हरवलेल्या प्रेमाचे अन्
भरकटलेल्या तारूचे..

इथून पुढे तो अन् मी
आयुष्याशी खेळलो
आत्ता कुठे कळतंय
जिंकलो की हरलो..

अभ्यासाच्या नावाखाली
कधी कट्टे झिजवले..
गुंड पोरांमधले सभ्य
एव्हढं नाव कमावलं

पदवीच्या निकालाने
पुन्हा सारे पालटले
काठावरती तरलो मी
त्याचे वर्ष बुडाले

व्यवसायाच्या निमित्ताने
मुंबई माझी सुटली
मैत्री राहिली कायम तरी
जोडी मात्र तुटली..

ऑक्टोबरला त्याने त्याची
पदवी पूर्ण केली
योग्य वेळी योग्य अशी
नोकरी सुद्धा 'धरली'

मला फक्त 'नाद' होते
व्यसनं नव्हती कसली
त्याच्या मात्र छंदांची
जागा व्यसनांनी घेतली

मला एक हात होता
उभं करण्यासाठी
त्याच्यासमोर पेला होता
बुडून राहण्यासाठी..

नोकरीत त्याने मेहनतीने
खूप प्रगती केली
पण गलेलठ्ठ पगाराची
फक्त दारू प्याली..

मित्राच्या ह्या अवस्थेने
मला अपराधी वाटे
त्याच्या दिवाळखोरीत मला
माझेच भांडवल दिसे

पाच वर्षे चालू होतं
त्याचं बेवडेपण
नसानसात दारूच त्याच्या
अगदी कण अन् कण

फलाटावर, ट्रेनमध्ये
जिन्यात कधी बारमध्ये
न्हाऊन न्हाऊन पडून राही
फक्त अन् फक्त दारूमध्ये

अनेक दिवस अनेक रात्री
"ब्लैक आउट" मध्ये गेल्या
माझ्यासकट सा-यांनी
सा-या आशा सोडल्या..

आई-बाबांचा एकुलता
मुलगा लाडका होता
पिळून गेल्या काळजामध्ये
नुसता गलका होता

अनेक महिन्यात त्याचा माझा
संवाद झाला नव्हता
मीच शेवटी फोन केला
चक्क शुद्धीत होता..!!

म्हटलं,"मी मुंबईला येतोय"
खूप खूष झाला
भेटण्याचा बेत ठरवून
फोन ठेवता झाला..

पोचल्या दिवशीच भेटलो त्याला
काय सांगू कथा..?
माझ्या डोळ्यासमोर त्याचा
नवाच अवतार होता

"मी दारू सोडली आता"
अभिमानानं बोलला
"कितीक वेळा सोडलीस अशी"
मी टोला हाणला

मंद स्मित करून त्याने
पुन्हा तसंच म्हटलं
'खरंच सोडली की काय'
मला सुद्धा वाटलं

खरंच माझा मित्र आता
त्यातून बाहेर पडला होता
पेल्यापाठचं जग आता
हासून पाहात होता

आनंदाने माझ्या अगदी
सीमा गाठली होती
मनामधाली उभारी त्याच्या
डोळ्यात साठली होती

डोक्यावरती कर्ज होतं
पण खांदे ताठ होते
मनामध्ये शल्य होतं
डोळ्यात पाट होते

दिसत होतं मला आता
नवं तांबडं फुटतंय
विश्वासाने बोलला "तो",
"आता जगावंसं वाटतंय.."




....रसप....
१७ जानेवारी २००८

Friday, January 16, 2009

छंद जमत नाही


चिलटाच्या प्रेमाबद्दल सारं माहित आहे
आगीमध्ये स्वत:हून जळलो सुद्धा आहे
पण प्रेमामध्ये 'पडणं' असतं, 'उठणं' असत नाही
पावलं आपली असली तरी चाल कळत नाही..
.
.
.
.
आजकाल लिहिताना यमक जुळत नाही
ताल कधी चुकतो, कधी छंद जमत नाही

शिवशिवणारे हात, त्यांना आवरणं होत नाही
शब्दांच्या कारंज्यांनी नेम साधत नाही

लिहायचं असतं एक, लिहितो मी भलतंच
विचारचक्र फिरून फिरून तुझ्यापाशी थांबतंच

खूप ठरवलं, तुझ्याबद्दल काहीच नाही लिहायचं
ह्रदय ठेवून बाजूला, डोक्यानं चालायचं

पण मेंदूसुद्धा फितूर, तुझाच विचार करतो
'नाही नाही' म्हणता सारा कागद भरून जातो

कुठून सुचलं, कसं लिहिलं; काहीच कळत नाही
ताल कधी चुकतो, कधी छंद जमत नाही



....रसप....
१६ जानेवारी २००८

Thursday, January 15, 2009

????????


भिजूनदेखील चंद्र उजळत का राहतो?
कुजून गेलं प्रेम तरी बोचत का राहतं?

सरून गेली मैफल तरी घुमत का राहते
सोडून गेलेली संगत भासत का राहते?

संपत आलेला प्रवास असा लांबत का जातो?
सादेविना प्रतिसाद कुठून ऐकू येतो?

ओसाड माळावरती गुरं काय चरतात?
हिरवीगार शिवारं मात्र टोळ फस्त करतात..



....रसप....
१५ जानेवारी २००८

भाऊ, ताण नको घेऊ


भाऊ, ताण नको घेऊ;
सोड चिंता कामाची, साडे-सातला जाऊ..!

कामाला "नाही" नाहीच कधी म्हणायचं
अरे, बॉसला नकार देणं कसल्या उपयोगाचं?
कारण एखादं काम नाकारणं
म्हणजे नंतर तेच जबरदस्तीने करणं!
म्हणूनच बरं असतं आधीच "हो" म्हणणं..
"हो" म्हणायचं आणि
आपलंच गाडं रेटत राहायचं
"मार धक्का बोलेश्वर" म्हणायचं

एकदा पाणी डोक्यावर गेलं
की काय फरक पडतो
दोन फूट गेलं की वीस फूट गेलं
ओतेनात का बापडे अजून चार-दोन बादल्या
बिनधास्त डूंबायचं

भाऊ, ताण नको घेऊ
प्रेशर कुकर बनायचं
वाढलेलं प्रेशर दाबून नाही ठेवायचं
शिट्टी मारून मोकळं व्हायचं
अगदीच आल्या डोक्याला मुंग्या
तर एकच सांगतो
डोक्यावरती हात अन् टेबलाखाली पाय..
एकशे अंशी अंशात यायचं
डोळे मिटून "खड्ड्यात गेली कंपनी" म्हणायचं..

भाऊ, प्रेशर कुकर बनायचं
एक्स्टर्नल प्रेशर मुळे इंटर्नल प्रेशर नाही वाढवायचं..


....रसप....
१५ जानेवारी २००८

Saturday, January 10, 2009

सांज-रागिणी


रंग रंग उधळले क्षितिज माखले
विसावली मनोमनी सांज-रागिणी

तप्त भूस शांतवूनि वृक्ष निजवुनी
मंद चाल चालली सांज-रागिणी

धुंद कुंद पश्चिमेशी खेळ खेळशी
स्वप्रकाशी उजळशी सांज-रागिणी

सौन्दर्य-परमोच्चता क्षणैक साधतां
मनमोहक दिलखेचक सांज-रागिणी

गडद शाल ओढूनी लुप्त होई ही
भैरवीस गाऊनी सांज-रागिणी


....रसप....
१० जानेवारी २००८

Friday, January 09, 2009

प्रवास..

सुन्नाट वाटेवरी अंधार दाटलेला
मोकाट या मनीचा अंगार सोबतीला

निर्जीव प्रवाहाला आकार लाभलेला
ओसाड किना-याचा श्रुंगार सोबतीला

माझ्याच भावनांचा बाजार मांडलेला
ही लाख राख स्वप्ने लाचार सोबतीला

उत्तुंग पोचूनीही उद्धार राहिलेला
भन्नाट वादळान्ची झनकार सोबतीला

हा प्रश्न-उत्तरांचा भडिमार चाललेला
कधी मूक स्पंदनांचे हुंकार सोबतीला


....रसप....
०९ जानेवारी २००८

शब्द

उरी साठलेले जुने शब्द होते
जुन्या भावनांना नवे शब्द होते

मस्त प्रीतवेडा बेधुंद जाहलो
रूप वर्णियाला कुठे शब्द होते?

शब्दखेळ सारा हात फक्त माझे
गीत जाहले जे तुझे शब्द होते

चंद्र लाज लाजे रात सुस्त वाटे
नाभी तारकांच्या सवे शब्द होते..


....रसप....
०९ जानेवारी २००८

Sunday, January 04, 2009

पुन्हा एकदा..


बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा
पुन्हा एक चेहरा खुणावतोय

डोळे मिटले की
पापण्यांमध्ये लपतोय
डोळे उघडले की
नजरेसमोर तरळतोय..
हसरा, लाजरा, साजिरा
मूकपणे बोलणारा...
.. हरवून टाकणारा

सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ डोळे
त्यावर लपलपणाऱ्या पापण्या
गुलाबाच्या पाकळ्याच..
बाकी काहीच नाही
मी इतकंच पाहिलं.. 
मला इतकंच दिसलं..
इतकंच पुरलं.. पुरून उरलं..!!

पुन्हा एकदा..
काळजाचा ठेका काही मात्रा थांबलाच
आणि नंतर लागली लग्गी
दिडपट की दुप्पट..
तालात आहे की नाही..
माहीत नाही
पण मी मुग्ध आहे
मी धुंद आहे.. पुन्हा एकदा.

पुन्हा एकदा साचलेल्या डोहाला
वाट मिळाली आहे..
वाहायला, खळखळायला
.. मनसोक्त नाचायला
आता मी वाहणारच,
प्रश्न इतकाच..
असाच वाहाणार की पुन्हा एकदा..
साचणार..
आटणार..
शेवाळणार..
हिरवटणार.
बघू या..!!

एक मात्र नक्की.
माझी जागा बदलणार
अन् मागे एक खळगा राहणार..
.. इथे मी साचलो होतो....


....रसप....
०३ डिसेंबर २००८

Saturday, January 03, 2009

असे शब्द होते

असे शब्द होते
तसे शब्द होते
जसा अर्थ घ्यावा
तसे शब्द होते

कुणा ना कळावे
खरे काय होते
असे मुक्त वेडे
तुझे शब्द होते

श्रवून जाहले ते
लिहून घेतले ते
जपून ठेवले ते
खुळे शब्द होते

जगी जाणकार
कुणी ही असू दे
कविता म्हणाया
खुजे शब्द होते

प्रतिभेस माझे
साष्टांग नमन
समजलेच नाही
कसे शब्द होते

अनुवाद व्हावा
जरा इंग्रजीत
मराठीत बहुदा
न हे शब्द होते

ऐकता वाचता
जाहलो "आडवा"
तरीही उरावर 
उभे शब्द होते..!!


....रसप....
०३ जानेवारी २००९  

माझ्यात वेगळे काय..??

दोन डोळे दोन कान
एक तोंड एक नाक
दोन हात दोन पाय
माझ्यात वेगळे काय?

कधी थंड कधी तप्त
धमन्यांमध्ये माझ्याही रक्त
हाडा-मांसाचा गोळा फक्त
अजून दुसरं काय?

मित्रांमध्ये रमतो तसा
एकट्याने दंगतो
आला दिवस जगतो
अन् स्वप्नांमध्ये रंगतो
जगणं माझं ओघानेच
दुधावरची साय

मातीचाच बनलो तरी
रोज अंघोळ करतो
अस्ताव्यस्त आतून तरी
कपडे इस्त्री करतो
काय करतो कशास करतो
मलाच ठाऊक कुठाय?

चष्मा लावून बघतो जणू
चष्म्याविना दिसत नाही
रक्त जरी उसळलं तरी
डोळ्यांमधून पाझरत नाही
आवळलेल्या मुठी माझ्या
ठोसे मारत नाहीत
बुरसटलेले शब्द माझे
क्रांती आणतील काय??

.....जगणं माझं ओघानेच
दुधावरची साय
......हाडा-मांसाचा गोळा फक्त
माझ्यात वेगळे काय..??



....रसप....
३० डिसेंबर २००८
Related Posts Plugin for WordPress, Blogger...