Monday, March 28, 2011

दे घुमाके!! (World Cup 2011 Special)

बांगलादेश आणि इंग्लंड विरुद्ध....

.
पहिलाच सामना 'बांगला'शी
तोही त्यांच्या गल्लीत
न्यूझीलंडला खडे चारले
होते त्यांनी हल्लीच

विसरलो नव्हतो अजून
मागल्या वेळचा धक्का
भारताने 'बांगला'चा
घेतला होता धसका

पण सेहवागसमोर बांगलाचा
निभाव नाही लागला
गेल्या वेळच्या पराभवाचा
असा वचपा काढला

पुढचा सामना 'साहेबा'शी
'चिन्नास्वामी'त खेळला
सचिनने षटकारांचा
मस्त पाउस पाडला

डावाच्या शेवटी मात्र
आपण नांगी टाकली
कशीबशी ३३८
धावसंख्या गाठली

गोरा 'स्ट्रोस ' नेमका तेव्हाच
फॉर्मामध्ये आला
इंग्लंडचा पाठलाग
जोर घेउ लागला

"आता हरलो" वाटताच
झहीर धावून आला
तीन बळी घेउन त्याने
नूर पालटून टाकला

'साहेबा'नेही मनाशी
जिद्द होती केली
स्वान आणि शेह्झादने
चांगलीच झुंज दिली

शेवटच्या चेंडूला
श्वास रोखले होते
१ चेंडू दोन धावा
असे गणित होते

शंभर षटकी थराराचा
सार्थ शेवट झाला
रोमहर्षक सामना तो
बरोबरीत सुटला..



....रसप....
२८ मार्च २०११

आयर्लंड विरुद्ध....

आयरिश आर्मी 'साहेबा'चं
नाक कापून आली
मोठ्या जोशात भारतासमोर
येउन उभी झाली

नाणेफेक जिंकून त्यांनी
फलंदाजी घेतली
२ बाद ९ नंतर
शतकी भागी रचली

युवराजच्या फिरकीने
मग जादूच केली
पाच गडी बाद करून
"आयरीश" कंबर मोडली!!

सुस्थितीतला डाव त्यांचा
कोसळून गेला पार
तरीसुद्धा दोनशेचा
आकडा केला पार

कागदी शेर भारताचे
पुन्हा ढेर झाले
ठराविक अंतराने
बाद होऊ लागले

सचिन-विराट-युवराज-धोनी
थोडे थोडे खेळले
पठाणने फिरवला दांडपट्टा
गंगेत घोडे न्हाले

धापा टाकत भारताने
सामना जिंकला होता
"मजा नहीं आया यार"
प्रेक्षक बोलला होता..


....रसप....
२८ मार्च २०११


नेदरलंड विरुद्ध..

.
पहिल्या तिन्ही सामन्यांत
पियुष 'चा*वला' होता
तरीसुद्धा चौथ्यामध्ये
त्याला ठेवला होता

"डचां"चं आव्हान तसं
विशेष काही नव्हतं
पण आपलंही घोडं
कुठे भरवश्याचं होतं?

पहिली बैटिंग त्यांची होती
सुरुवात बरी केली
पुढच्या खेळाडूंनी मात्र
अगदी निराशा केली

१८९ मध्येच
डाव पुरा झाला
सहेचाळीस षटकांमध्ये
संघ बाद झाला

भारताची सुरुवात
धडाकेबाज होती
सचिन-सेहवागच्या लौकिकास
साजेशीच होती

पण दिमाखदार विजय काही
साधता आला नाही
पाच विकेट गेल्या
अती केली घाई

पुन्हा एकदा युवराज
उपयुक्त खेळला
धोनीच्या साथीने
बेडा पार केला


....रसप....
२८ मार्च २०११
* च चंद्राचा नव्हे

द. आफ्रिकेविरुद्ध....

चार सामन्यात सात गुण
असे होते कमावले
आफ्रिकेशी दोन हात
करण्यासाठी सरसावले

कर्णधार धोनीने
नाणेफेक जिंकली
खुषी-खुषी ताबडतोब
पहिली बैटिंग घेतली

सेहवाग-सचिनची जोडी
पुन्हा एकदा 'पेटली'
आफ्रिकेची गोलंदाजी
धू-धू धुतली

तिस-या पॉवरप्लेने
आपला घात केला
पत्त्यांच्या बंगल्यासारखा
सारा डाव पडला

३५०-४०० चं
स्वप्न गेलं धुळीत
२९६ मध्येच झाले
अकरा वीर चीत!

आफ्रिकेची सुरुवातही
आश्वासक झाली
आघाडीच्या सगळ्यांनी
डाव-बांधणी केली

भज्जीच्या तीन बळींनी
पारडं हलकं कललं
मुनाफलाही दोन बळींचं
फुक्कट घबाड लाभलं

आयत्या वेळी भज्जीने
शेपूट पायात घातली
शेवटचं षटक टाकण्याला
चक्क माघार घेतली!

६ चेंडू १३ धावा
समोर गडी नववा
फार कठीण नव्हतं
की 'हरभजन'च हवा

विचार करून शेवटी
चेंडू नेहराकडे दिला
माझा तरी हात तेव्हा
कपाळाकडे गेला

तुडतुड्या नेहराने
डोकं गहाण ठेवलं
"चार चेंडूत सोळा" चं
धर्मादाय केलं..!


....रसप....
२९ मार्च २०११

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...