Wednesday, November 14, 2012

ताण.. जब तक हैं जान ! (Jab Tak Hain Jaan - Movie Review)


मी शहाणा आहे, असं समजण्यात काही वावगं नाही. समोरचा मूर्ख आहे, असंही कधी कधी समजण्यात काही गैर नाही. पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं आणि तिच्या केंद्रस्थानी शाहरुख खान येतो.. तो दाढीचे ओंगळवाणे खुंट वाढवून फिरणारा आर्मी मेजर असतो.. तो आणि त्याचे सहकारी सैनिक, सैनिकाची पहिली ओळख - त्याची केशरचना - सुद्धा पाळत नसतात.. ह्या टीमचं काम फक्त बॉम्ब डिफ्युज करणं असतं आणि रोज त्यांना एक तरी बॉम्ब उदरनिर्वाहाकरता मिळतच असतो.. वगैरे, वगैरे..
मग अश्या निर्मितीसाठी काम करता करता ए. आर. रहमानसुद्धा साजिद-वाजीद भासतो, गुलजारचे शब्द एक तर कळतच नाहीत अन कळले तर ते समीर-छाप वाटतात आणि हिंदी सिनेजगताला वेगवेगळ्या उंचीवर नेणारे यश चोप्रांसारखे दिग्गज दिग्दर्शक स्वत:च्या शेवटच्या चित्रपटात सपशेल जमिनीवर आपटतात.

सिनेमाची सुरुवात होते 'लेह'च्या एका मार्केटमध्ये. तिथे एक 'बॉम्ब' सापडला असतो. एक जण त्याला निकामी करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला जमणार नसतंच. कारण हिरोची एन्ट्री करवायची असते. इन कम्स मेजर 'समर आनंद' (शाहरुख), त्याने आजपर्यंत ९७ बॉम्ब्स निकामी केले असतात. तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो आणि समस्त शाहरुख भक्त बोंब मारतात! हा राउडी मेजर बॉम्ब प्रोटेक्शन सूट न घालता ह्या करामती करत असतो, हे विशेष. (आर्मीवाले असं कसं काय करू देतात ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.) तर बॉम्ब निकामी केल्यावर तो नेहमी कुठल्याश्या शांत जागी जाऊन बसत असतो. तसा तो एका तळ्याकाठी बसलेला असताना तिथे येते 'अकीरा' (अनुष्का शर्मा). ती सगळे कपडे काढते, थंडगार पाण्यात उडी मारते आणि बुडते. अर्थातच हिरो तिला वाचवतो आणि स्वत:चं जाकीट तिला देतो. त्या जाकीटात त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारी डायरी असते.
कट. फ्लॅशबॅक सुरू..
समर आनंद लंडनमध्ये रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमावणारा, हातगाड्या ढकलून माल पोचवणारा, हॉटेलात वेटरचे काम करणारा एक दरिद्री तरूण(??) असतो. तिथे त्याची ओळख एका गडगंज श्रीमंत बापाच्या (अनुपम खेर) एकुलत्या एक मुलीशी - मीरा थापर (कतरिना) - होते. तिचं लग्न ठरलेलं असतं. पण ती व तो प्रेमात पडतात. स्वत:वर बंधन लादून घेण्यासाठी हे दोघं हिंदू, मंदिरात न जाता चर्चमध्ये जाऊन एकमेकांपासून 'सुरक्षित अंतर ठेवा'वाली शप्पथ घेतात. (चर्चमध्ये का? असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.)
लेकीन इश्क़ रोके रूकता नहीं! ते जवळ येतात.. झोंबाझोंबी करतात.. आणि मग समरचा अपघात होतो. तो मृत्यूच्या जबड्यातून परत येतो. इथे मीराला समजून येतं की तिने तिची येशूसमोर घेतलेली शप्पथ तोडल्याची ही शिक्षा आहे. म्हणून ती समर जिवंत राहावा म्हणून नातं तोडते आणि त्याला लंडन सोडून जायला सांगते. (लॉल!!) २२ व्या शतकात हे समजून घेणे म्हणजे आपल्या मूर्खपणाचा कळस असतो. तरी आपण समजून घेतो कारण आपण खरोखरच मूर्ख आहोत.
बास्स... मीराच्या अंधश्रद्धेला देवाचा चॅलेंज समजून 'रोज मौत से खेलूंगा.. या तो तुम्हे मुझे मारना होगा या उसके (मीरा के) विश्वास को हराना होगा..' असली पोरकटशिरोमणी शप्पथ घेऊन समर वयाच्या २८ व्या वर्षी भारतात परततो. इथे भारतीय सैन्य दलाने त्याच्यासाठी रेड कार्पेटच अंथरलेलं असतं. त्यामुळे तो थेट सैन्यात दाखलही होतो.... मेजरही बनतो आणि 'बॉम्ब स्क्वाड'चा प्रमुखही! (कैच्याकै ! असं कसं शक्य आहे ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. का. आ. मू. आ.)
हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये चालू आहे... विसरलात ना की 'अकीरा' त्याची डायरी वाचतेय ? असंच दिग्दर्शकाचंही होतं. डायरी संपेपर्यंत त्याला आठवतच नाही की हा फ्लॅशबॅक आहे. असो.

अशी सगळी कहाणी वाचणारी अकीरा डिस्कव्हरी वाहिनीत किरकोळ नोकरीला असते. तिचं एक स्वप्न असतं की एक आर्मी, युद्ध, बॉम्ब्स इ. वर डॉक्युमेंटरी बनवायची. ती त्यासाठी मान्यता मिळवते आणि थेट 'बॉम्ब स्क्वाड' सोबत कॅमेरा घेऊन दाखल ! प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा असतानाही ती एका फुटावरून बॉम्ब निकामी करणाऱ्या समरला चित्रित वगैरे करते, तेव्हा मात्र तीसुद्धा आपल्यासारखीच मूर्ख आहे का? अशी शंका येते. आपण कितीही बिनडोक असलो तरी आपल्याला आधीच कळलेलं की आता ही बया ह्या गालावर निवडुंग आणि डोक्यावर खुरटी झुडपं घेऊन फिरणाऱ्या मेजरच्या प्रेमात डुबकी मारणार आहे, मारतेच. पण तमाशा इथे संपत नाही. अकीरा समरवरच डॉक्युमेंटरी बनवते - 'A man who can not die! ती डिस्कव्हरीवाल्यांना आवडते.. ते रडतात ! आणि ते समरला लंडनला घेऊन ये, असं तिला सांगतात. १० वर्षांपूर्वी मीराला वचन दिलेलं असतानाही, ते तोडून समर अकीरासाठी परत लंडनला येतो. पुन्हा त्याचा अपघात होतो आणि तो ही मधली १० वर्षं पूर्णपणे विसरून आयुष्यात रिवाइंड होतो. (हे शक्य आहे, का. आ. मू. आ.) मग त्याला 'नॉर्मल' करण्यासाठी त्याची डॉक्टर, अकीरा, मीरा आणि त्याचा लंडनमधला एक लाहोरी मित्र असे सगळे मिळून नाटक करतात. भरपूर मेलोड्रामा आणि शाहरुखगिरी झाल्यावर शेवटी 'जान छुट'ते आणि सिनेमा संपतो.

त्याची स्मृती परत आणण्यासाठी त्याच्यावर बनवलेली डॉक्युमेंटरी त्याला दाखवावी, इतकी साधी गोष्ट कुणाच्याही डोक्यात येत नाही, पण ते आपण समजून घ्यायचं. का. आ. मू. आ.    



वाईट वाटतं पण बोलायला लागतंय की, यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे.
आदित्य चोप्राची पटकथा व कथा, त्याने शाळेत लिहिली असावी.
गुलजार साहेब आणि रहमानने ह्या सिनेमातील सर्वच्या सर्व गाणी ताबडतोब 'हक्कसोड पत्रा'वर सही करून विमुक्त करावीत.
शाहरुख खान जितक्या लौकर स्वत:च्या प्रेमातून बाहेर पडेल तितकं त्याच्या भक्तांचं भलं होईल.
कतरिनाकडून अभिनयाची अपेक्षा करणे फोलच.
अनुष्का शर्मा लक्षात राहाते.
छायाचित्रण नेत्रसुखद आहे.

रा-वन पाहिल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं असेल की ह्याहून वाईट शाहरुखपट असणार नाही, तर आपलं चुकलंच.. कारण..........?
का. आ. मू. आ. !!

रेटिंग - *  

36 comments:

  1. हाहाहा :D खुसखुशीत लिहिलंय...! बरं झालं हां सिनेमा असा पुच्कावणी आहे. त्यामुळे हे वाचता आलं. Fun aparts, पण आपली इतर परीक्षणेही वाचली. छान लिहिता, जाण उत्तम आहे! अभिनंदन ! धन्यवाद!

    ReplyDelete
  2. हा हा हा...पिक्चर कसाही असो, परिक्षण फ़र्मास झालंय..

    बाकी का.आ.मू.आ. हे एकंदरित बर्‍याच बॉलिवूड चित्रपटांना लागू होतं म्हणून मी इतके कमी चित्रपट पाहते ना?? का. मी मू. ना. ... ;)

    मस्त पोस्ट....:)

    ReplyDelete
  3. हाहाहा! खूप पोट धरून हसलो पोस्ट वाचताना !! खूप उत्तम लिहिलंय ! आणि हो वयाचा २५ वर्षानंतर भारतीय सेनेत ऑफिसर होता येत नाही ही गोष्ट स्वर्गीय यश चोप्रांच्या लक्षातच आली नाही... ओ सॉरी असा प्रश्न मला पडायला नाही पाहिजे कारण मी. मु. आ. :)))

    ReplyDelete
  4. झकास लिहिलंयंस! मला वाटलं होतं त्याहूनही वाईट्ट हा सिनेमा आहे तर. शाहरूख खान कायम स्वतःच्या प्रेमात असतो, हे मात्र खरंच! मी वीर जारा पाहिल्यावर देखील वैतागले होते. मित्र-मंडळींना आवडला होता. बोलायची सोय नव्हती कारण सिनेमा शाहरूखचा होता.

    ReplyDelete
  5. kharach agdi barobar .... mast writing aahe exactly we feel d same while we r watching d movie best review ever best 1 ranjeet dada ...

    ReplyDelete
  6. भन्नाट लिहिलयेस. एक .."आदित्य चोप्राची पटकथा व कथा, त्याने शाळेत लिहिली असावी".....या वाक्याद्वारे निष्कारण केलेला निरागस शाळांचा माफक अपमान सोडला ;-) तर बाकी सगळं झ्याक....

    ReplyDelete
  7. hehehe... picture na baghta "na baghitylacha samadhan" dilyabaddal dhanyavad!

    ReplyDelete
  8. सही है, बॉस ! पण काय करू रे ? लेकीसाठी या वीकेंडला बघावाच लागणार आहे . लेट नाईट शोला जावं म्हणतो , झोप काढता येईल .

    ReplyDelete
    Replies
    1. हो.. लेट नाईट शो वुड बी अ स्मार्ट चोइस... कारण १००% अनावर झोप येणार आहे...

      Delete
  9. अ...फ़ा...ट.....जबरा परीक्षण लिहलय. एक नंबर!!

    ReplyDelete
  10. Ek number review, kharach kadhi changlee cinema bhagyalaa miltil Bollywood madhee mahit nahi..

    ReplyDelete
  11. Chitrapat Parikshan agadi sundar aahe,....
    Baki Ka.Aa.Mu.Aa. hi "Mhan" aavdli aaplyala...!!:D

    ReplyDelete
  12. अगदी मनातल बोललास रणजित, वाचताना इतका हसलो की डोळ्यातून पाणी येऊ लागले..
    तळटिप......
    तो दाढीचे खुंट वाढ्वून हिंडणारा शाहरुख खान तसा भंगारच आहे.
    संजय जोशी

    ReplyDelete
  13. kadachit ha review cinema baghnya adhi wachla asta tar majhe 300 rupaye wachle aste

    Appreciate your writing.

    ReplyDelete
  14. शाहरुख चे वय = कतरीना चे वय + अनुष्का चे वय :)

    ReplyDelete
  15. review vachun man jinkalas mitra :) one of the favorite lines from ur review was
    " झोंबाझोंबी करतात"

    ReplyDelete
  16. Mi ha chitrpat baghitalach nahi karan mi murkh nahi!

    ReplyDelete
  17. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  18. म्हणूनच bollywood ला कुणीहि विचारात नाही. आणि आता त्या शाहरुख खान चा as a hero म्हणून कंटाळाच येतो. थोडक्यात त्याच्या अनेक फालतू movies पैकी हा एक आहे तर.

    बाकी चित्रपट फालतू असला तरी हे परीक्षण मात्र उत्तम आणि real entertaining आहे. हा हा हा हा हा .......

    विश्वजीत वेलणकर

    ReplyDelete
  19. नमस्कार रणजीत,
    तुमची शैली सुंदर आहे. परीक्षण वाचल्यावर कुतूहलापोटी हा पिच्चर पहिला.
    मला काय वाटते हे मी माझ्या ब्लॉग वर टाकले आहे.
    http://mylifemyreviews.blogspot.in/2012/11/blog-post_24.html
    विडंबन हे मूळ कलाकृतीला लोकप्रिय करू शकते आणखी काय.. :)
    पण कलाकृतीमुळे विडंबन आहे त्याच्यामुळे कलाकृती नाही हे पण तितकेच खरे. :)

    ReplyDelete
  20. रणजीत,

    आजपर्यंत कमीत कमी २० वेळा मी तुमचा ज.त.है.ज़ा. वरचा हा review वाचला असेल पण प्रत्येक वेळेस मी या review च्या अजूनच प्रेमात पडलो आहे.

    Hats Off Man!

    काय भारी लिहिलंय राव… प्रशंसा करायला शब्द कमी आहेत माझ्याकडे…

    तुमचे सर्व च्या सर्व review वाचले… पण जसे सर्व movies चा बाप शोले… तसा सर्व reviews चा बाप तुमचा ज.त.है.ज़ा. वरचा हा review आहे… या review वर इश्क रोके रूकता नही!

    हा review वाचायच्या अगोदर मी या चित्रपटाचा trailer देखील पाहिला नव्हता आणि आता तो पाहावा अशी बिलकुल देखील इच्छा नाही…
    अगदीच इच्छा झालीच तर मी पुन्हा हा review च वाचेन यात काही शंका नाही…

    अजून नवनवीन चित्रपट परीक्षण लेख आपल्या ब्लॉग च्या वाचकांच्या भेटीला यावेत आणि वाचकांना ते चित्रपटापेक्षाही जास्त आवडावेत :P

    धन्यवाद !

    --मंगेश देशपांडे

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...