Tuesday, March 08, 2011

अगतिक पुरुषांचं काय?

जागतिक महिला दिनाचं ठिक आहे हो..
अगतिक पुरुषांचं काय?

म्हणे, महिलांवर अत्याचार होतो..!
च्यायला, हे बरं आहे..
आम्ही केला तो अत्याचार
तुम्ही केला तो चमत्कार?

अहो, कंटाळा आलाय मला ह्या जगण्याचा
रोज घाबरत घरात शिरण्याचा
“आज काय झालं असेल ?
कामवाली आली नसेल?
की शेजारीण भांडली असेल..?
माझ्याशी नीट वागेल ना?
उखडलेली नसेल ना?”

आता होतं कधी कधी माणसाकडून
कामाच्या व्यापात जातो काही विसरून
दिवसभरात फोन केला नाही
म्हणून इतकं का चिडायचं?
"तुझं माझ्यावर प्रेम नाही" म्हणून
डोळ्यात पाणी आणायचं?
फारच अवघड काम आहे
लग्न करणंच हराम आहे

बारा तास ऑफिसात सडल्यानंतर
थोडा विरंगुळा लागतो
कधी एखादी मॅच
कधी ॲक्शन सिनेमा असतो
पण रोज हिची कोणती तरी
फालतू सीरियल असते
ब्रेकमध्येसुद्धा चॅनल बदलायला
मला मनाई असते

ऑफिस मध्ये बॉस बसू देत नाही
घरी आल्यावर ही झोपू देत नाही
जरा डोळा लागायचा अवकाश
कर्कश्श घोरायाला लागते
जागं करून सांगितलं तर–
“मी कुठे घोरते…!!”
डोक्याखालची उशी मी
कानावरती घेतो
मलाच माहीत कसा मी
झोपेत गुदमरतो!!

तरी अजून तुम्हाला
भांडणांचं सांगितलं नाही
कटकट, भुणभुण करण्यासाठी
कारणही लागत नाही..!
"चादरीची घडी केली नाही..
पेपर उचलून ठेवला नाही..
पंखा बंद केला नाही..
दूधवाला आला नाही..(??)
माझ्या भावाने याँव केलं
माझ्या “जीज्जू”ने त्याँव केलं
माझंच असलं नशीब फुटकं
वाट्यास आलंय ध्यान मेलं..!!”

वीकेंडलाच घेतो मी
एखाद-दोन पेग
त्याच्यावरून हिची
आदळआपट.. फेकाफेक..
मोठेमोठे डोळे तिचे
आणखी मोठे करते
माझ्या अख्ख्या खानदानाचा
उगाच उद्धार करते!
तरी मी बिचारा सगळं सहन करतो
प्रत्येक अपमान पचवतो अन् तोंड बंद ठेवतो..

आजकाल मला प्रत्येक पुरुष दीनवाणा दिसतो
'बायको' नावाच्या भुताने पछाडलेला वाटतो !!
आणि तुम्ही म्हणता
महिलांवर अत्याचार होतो..?

च्यायला, हे बरं आहे!!


....रसप....
८ मार्च २०११
(महिला दिन - पुरुष 'दीन')

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...