Tuesday, March 15, 2011

उधारीचं हसू आणून...

१ 

.
विसरण्याचा प्रयत्न मी किती वेळा केला
तो हिशोब विसरलो..
पण तुला नाही विसरू शकलो
रडण्याचा प्रयत्नही मी किती वेळा केला
वाटलं रडून शांत होईन..
पण रडूच नाही शकलो
मी पुरुष आहे ना..
डोळ्यातल्या विहिरी आटलेल्या असतात
मी मोठा झालोय ना..
आता भावनांना प्रौढत्वाच्या सीमा असतात
कुणास ठाऊक कुणी आखल्या..?
आणि का आखल्या..??
पण कैद होतात माझ्यासारखे..
बोलताही येत नाही..
रडताही येत नाही..
बस.. कुढत बसायचं...
आतल्या आत,
कुणाला ऐकू न येऊ देता
रडत राहायचं
डोळे न भिजवता..
आणि सारं काही विसरण्याचा
केविलवाणा प्रयत्न करायचा
उधारीचं हसू आणून...


....रसप....
१५ मार्च २०११

.

.
.
मग इच्छा नसतानाही
मुखवटा चढवावा लागतो
झापडं बांधावी लागतात
आणि जन्म घेतो
एक बेमुर्वतखोर स्वभाव
काही केल्या ऐकणार नाही..
ऐकायचंच नाही..!
कुणाचंही.. अगदी स्वत:चंही!
अडूनच बसायचं उदासीन बनण्यासाठी!
काही आवडलं तर हसायचं नाही..
काही नावडलं तर चिडायचं नाही..
कुणी बोलावलं तर ऐकायचं नाही..
कुणी हटकलं तर बधायचंही नाही

कृत्रिम चाल..
त्रोटक संवाद..
शून्य नजर..
आणि खरा चेहरा..?
तो लपवायचा..
उधारीचं हसू आणून….


....रसप....
१६ मार्च २०११
.

.
.
तू ओरबाडलं नाहीस..
तरी ओरखडा उठला
मी अश्रू ढाळले नाहीत
पण हुंदका फुटला

काट्या-काट्यामध्ये फरक आहे
गुलाब आणि बाभळीचा
दु:खा-दु:खामध्ये फरक आहे
आवडीचा-नावडीचा

माझं दु:ख मी जपतो
प्रेम केलंय म्हणून
प्रेमाच्याच बदल्यात मिळालंय…
“अमूल्य ठेव” म्हणून!

आपणच आपले खरे सोबती
मला चुकलंय कळून
हीच जाणीव लपवत असतो…
उधारीचं हसू आणून

....रसप....
१६ मार्च २०११
.

.
.
हातावरच्या रेषांना काही अदृश्य वळणं असतात
किंवा ती फक्त मायक्रोस्कोपनेच दिसतात
कारण कसं शक्य आहे..
आयुष्य इतकं सरळसोट किंवा एकवळणी असणं?
वर्षानुवर्षांची कहाणी काही इंचांत लिहिणं..?
.
.
- असं मला पूर्वी वाटायचं
की सगळं खोटं असतं
पण आता पटतंय
एखादंच वळण असतं
तेव्हाच सावरायचं असतं
आणि जपून चालायचं असतं
तिथे तोल गेला की..
गडगडत खाली यावं लागतं
मग फक्त झाल्या जखमांना
भरून निघेपर्यंत सहन करायचं..
उधारीचं हसू आणून..

....रसप....
१६ मार्च २०११
.

.
.
अधाशी भुंग्यासारखं
सतत हुंगत राहा
म्हणजे तुम्हाला सुख मिळेल
हाच एक उपाय आहे आयुष्यात सुखी होण्याचा

सुख तुमच्याकडे येत नाही..
हुडकून काढावं लागतं
आणि दु:ख..?
कधीच चुकत नाही
बरोब्बर घाला घालतं….

पण तरीही…
आपण आपला शोध सुरूच ठेवायचा
अविरत हुंगत राहायचं..

आणि जे काही थोडंफार मधाळ मिळेल
त्याच्या क्षणैक माधुर्यात
आनंद मानायचा..
.
.
उधारीचं हसू आणून....



....रसप....
१७ मार्च २०११
.

.
.
हात सुटल्याचं दु:ख
हात तुटण्याच्या वेदनेपेक्षा कमी नाही

मला असंच थोटं बनून जगायचंय..
मरायचा अधिकारच नाही
कारण दुस-या हातात काही हात आहेत..
तुझ्यासारखं, सोडू शकत नाही

त्यांना पर्वा आहे माझी
काळजी आहे
त्यांनी पाहीलेलं स्वप्न
मीच स्वत: आहे
मला ठेच लागली
तर त्यांच्या डोळ्यात पाणी येतं
कसं दावू त्यांना
हात 'तुटल्या'चं दु:ख?

शब्द न् शब्द बोलायचा
तोलून, मोजून, मापून..
मुकाट आसवांना प्यायचं
उधारीचं हसू आणून….


....रसप....
१८ मार्च २०११


७. 


"टाईम हील्स एव्हरीथिंग"
ती म्हणाली होती सोडून जाताना
स्वत:च केलेल्या घावावर फुंकर घालताना..
मी मूर्खच होतो..
आधी विश्वास ठेवला प्रेमावर
आणि नंतर ह्या फसव्या मलमावर !

तिने सिद्धांत मांडला.. तिचंही काय चुकलं?
"अपवादही आहेत" इतकंच सांगायचं राहिलं!
'आफ्टर ऑल, एक्सेप्शन्स प्रूव्ह अ लॉ !'

लाखातला एक मी
लाखातलंच माझं दु:ख...
उरलंय अपवाद बनून
काळाला पुरून
पण मी अजूनही प्रयत्न करणार आहे
.... उधारीचं हसू आणून.......


....रसप....
२१ डिसेंबर २०११


८.
.
अंगणातली रातराणी
चिंब दहिवरात न्हाली
अन् डोळ्यांत साखळलेल्या रक्ताला
आज पहिल्यांदाच जराशी ओल आली

वाटलं, तू नाहीस,
तर तुझा आभास तरी ओंजळीत घ्यावा
आज अंमळ जास्तच
हा सुवास रेंगाळावा

झुपका तोडून ओंजळीत घेतला
आणि एक शहारा उठला
तुझ्या केसांचा स्पर्श
परत एकदा स्मरला..

रातराणी ओंजळीत होती
पण गंध हरवला होता
कागदाच्या फुलांसारखा
एक झुपका समोर होता..

मीही बहुतेक ह्या फुलांसारखाच झालोय
तुझ्यापासून विलग होऊन गंधाला मुकलोय

हिरमुसलेली फुलं मला
पाहात होती टक लावून
मोठ्या मनाने त्यांनी माफ केलं
उधारीचं हसू आणून.....


....रसप....
२४ डिसेंबर २०११

९.


कवितांच्या जुन्या वहीतलं
'ते' पिंपळाचं पान
- मला आठवतंय, मी जेव्हा ठेवलं होतं
तेव्हा फक्त वाळलेलं होतं -
आज जाळीदार झालंय..

पानातून आरपार माझी कविता दिसतेय
अस्पष्टच.. नीट वाचता येत नाहीये..
पण ती 'तेव्हा'ही नीट वाचली गेली नव्हतीच !
तुला फक्त शब्दच दिसले होते..
भावना उमगली नव्हतीच !
माझी कविता तू हसण्यावारी नेलीस
आणि अजून लिहिण्यासाठी शुभेच्छा देऊन गेलीस

मीही लिहिल्या..
पाणीदार, जाळीदार कविता
प्रत्येक कवितेला 'तुझ्यासाठीच' म्हणून
आणि तू सगळ्या वाचल्यास -
उधारीचं हसू आणून....

....रसप....
१४ जानेवारी २०१२

१०.
घड्याळातला काटा पुढेच फिरतोय
दिवसामागून दिवस.. सूर्य बुडतोय
ऋतू बदलले
हवा बदलली
फुले कोमेजली..
पुन्हा उमलली
सांडलेला पाचोळा उडून गेला
पुन्हा नवा पसरून झाला
भिंतींचे रंग विटले
खिडक्यांना गंज चढले
तरी मी अजून तसाच आहे
तिथेच आहे..

पण आज मी येणार आहे, तुला बघायला
सुखी-समाधानी आयुष्याच्या शुभेच्छा द्यायला
पण तुला दिसणार नाही.. दूरच उभा राहीन
तुझी पाठ वळली की हात उंचावीन
लोकांच्या नजरा चुकवून आवंढे गिळीन
खुशीत असल्याचं भासवून देईन
.....उधारीचं हसू आणून....

....रसप....
१९ जानेवारी २०१२

११.

तो फसफसत होता
दात विचकून खदखदत होता
पावलांना खेचत होता..
पण मी शांत होतो
अजून पुढे जायचं टाळत होतो
पूर्वी खाल्लेल्या गटांगळ्या आठवत होतो


मला हा खारट स्पर्श आवडतच नाही
म्हणून मी कधीच ह्याला जवळ केलं नाही
पण आज...
आज मावळत्या सूर्याच्या लालीला भुललो..
आणि कळलंच नाही कधी इथे आलो..
एक मात्र कळलं..
खारट स्पर्शात वेगळीच मजा आहे..
नुसतंच खदखदण्यात वेगळीच मजा आहे


मनातल्या मनात मावळताना
डोळ्यातली लाली झाकायची आहे
विरघळणाऱ्या सूर्यासोबत
आज मलाही जरासं वाहायचं आहे
....उधारीचं हसू आणून....


....रसप....
१ फेब्रुवारी २०१२

१२.


पळवून पळवून काळाने
पुरती दमछाक केली
पायांना पडलेल्या छाल्यांकडे
मीही डोळेझाक केली

आज कळतंय, वेडेपणा होता
तुझ्यापासून दूर जातोय,
हा विचारच चुकीचा होता

कारण तू नेहमीच क्षितीज होतीस
जवळ असूनही दूरच होतीस
मी वेड्यासारखा पळतोय
क्षितिजापासून दूर जाण्यासाठी
आणि तू तिथेच आहेस,
मला फक्त खुणावण्यासाठी

उशीरा का होईना पण मला शहाणपण सुचलंय
फार दूरचं न पाहायचं आज मी ठरवलंय
रोज नवा सूर्य पोटात जाईल,
रोज नवा बाहेर येईल..
पण मी क्षितिजाकडे न बघता आकाशालाच बघीन
स्वत:च्या नजरेत पडलोय, तरी मान वर करीन

माझ्याच वेदनेला छळीन खोटं खोटं नाकारून
पायाच्या छाल्यांकडे बघीन,
उधारीचं हसू आणून....

....रसप....
५ फेब्रुवारी २०१२

१३.


आताशा,
काळवंडलेली संध्याकाळ फारच अंगावर येते
असं वाटतं की भिंती जवळ-जवळ येत आहेत
आणि छत खाली-खाली..
दरवाजे, खिडक्या लहान-लहान होत आहेत..
मी मनातल्या मनात मुटकुळं करून तोंड लपवून घेतो...
डोळे गच्च मिटून घेतो..
वर्तुळातून वर्तुळं बाहेर येताना दिसतात..
निश्चल डोहात तरंग उठावेत तशी...

ही घुसमट सहन होत नाही..
थरथरत्या हातांनी मी पुन्हा ग्लास भरतो..
ह्यावेळी आकंठ बुडतो..
त्याच निश्चल डोहात...

मी बाहेर येतो तेव्हा
इतका काळोख असतो... की
भिंती.. छत... दरवाजे... खिडक्या काहीच दिसत नसतात..
मला घाबरवत नसतात..
अजून एक काळवंडलेली संध्याकाळ सरून गेलेली असते
आणि मी, माझ्या आवडत्या काळोखात
मला हवं ते बघत बसतो..!
उधारीचं हसू आणून.....

....रसप....
१८ फेब्रुवारी २०१२


१४.

माझी वेदना अशी आहे की
जखम कुठे आहे तेच कळत नाही
मला नक्की काय हवंय..
शोधूनसुद्धा मिळत नाही

कदाचित तुझ्या मागोमाग निघून गेली,
ती मन:शांती हवी आहे
कदाचित तुझ्या नकाराने डिवचलेला
स्वाभिमान हवा आहे
कदाचित तुझ्यासाठी लिहिलेली
प्रत्येक कविता हवी आहे
कदाचित हवेतच विरून गेलेले
ते सोनेरी स्वप्न हवं आहे
किंवा
कदाचित मला मीच हवा आहे पूर्वीचा..
जो आरश्यात हसायचा
जो मित्रांत रमायचा
एकटाच गुणगुणायचा
आणि शांत निजायचा..

पण हा बदललेला 'मी'ही माझाच आहे
जसा कसा आहे, आवडता आहे

ह्या वेदनेच्या गाण्याला गायचंय आळवून
त्या अज्ञात जखमेला नकळत कुरवाळून
मी परत एकदा पूर्वीसारखा गुणगुणणार आहे
तुलासुद्धा भुलवून..
उधारीचं हसू आणून....

....रसप....
२२ फेब्रुवारी २०१२


१५.

आयुष्यात कमतरता कशाचीच नव्हती,
पण म्हटलं तुला जरा अजून श्रीमंत करावं..!
 तुझ्यावर प्रेम करावं..
 मनाचं सोनं उधळावं..

 .... उधळलं.........

 तू दिलेलं काहीच मी माझ्याकडे ठेवलं नाही
 - दु:ख सोडून
 मी दिलेलं काहीच तू तुझ्याकडे ठेवलं नाहीस
 - मन सोडून

 माझं दु:ख आणि माझं मन..
 दोन्ही हट्टी आहेत.. चिवट आहेत
 त्यांना नकार कळत नाही
 ते खरं सोनं आहे
 जाळूनही जळत नाही

 तुला मी दिलेल्या मनाची किंमत नसेल,
 पण मला तू दिलेल्या दु:खाची किंमत आहे
 म्हणूनच,
 उराशी जपलंय..
 घट्ट कवटाळून
 मी खराखुरा 'जगतोय'
 उधारीचं हसू आणून....


 ....रसप....
 २५ फेब्रुवारी २०१२



१६.

तांबूस संध्याकाळच्या निवांत वेळी
ओलसर वाळूत
तू माझं नाव लिहिलं होतंस
"सागरासारखाच मोठ्ठ्या मनाचा आहेस"
असंही म्हटलं होतंस
ते नाव तर लगेच पुसलं गेलं
पण -
खवळलेल्या सागरलाटांसारखं
पुन्हा पुन्हा काही तरी उचंबळून येतं

निश्चल किनाऱ्यासारखं माझं मन
भिजून भिजून वाळतं...
 कधी ठिक्कर काळ्या मध्यरात्री
 पापण्या पेटून तांबूस प्रकाश होतो
 आणि कधी फटफटीत उजाडलं तरी
 दिवस उंबऱ्याबाहेरच थांबतो

 बहुधा माझ्यासाठी ही दिनचक्रं आणि ऋतूचक्रं
 एका वेगळ्याच परीघाची झाली आहेत
 उज्ज्वल भविष्याच्या ओढीने
 कधीकाळी मनात किलबिलणारी निरागस पाखरं
 कधीच उडून गेली आहेत
 पण मी त्या सागरकिनाऱ्यासारखाच शांत आहे

 वठलेल्या झाडालाही पालवी फुटेल
 हीच आशा मनात जपून
 रोज खारं पाणी देतोय
 उधारीचं हसू आणून....

 ....रसप....
 २९ फेब्रुवारी २०१२


१७.


सुखाच्या मल्मली वेषात आली बोचरी दु:खे
उधारीचे हसू आणून झाली साजरी दु:खे

सराईताप्रमाणे मी सुखांना चोरले होते
सुखे सारीच ती खोटी निघाली ही खरी दु:खे

मनाचे मी किती कप्पे करावे अन् किती वेळा?
इथे जागा नसे पाहून झाली बावरी दु:खे

तुझ्या माझ्या शिळ्या ताज्या क्षणांचे सोहळे झाले
मनापासून सजवावी अशी ती लाजरी दु:खे

जरी अंधारल्या वाटा मनाला लाभल्या होत्या
विसाव्याच्या क्षणी बनली घराची ओसरी दु:खे

मला प्रेमाविना काही तुझ्याकडचे नको होते
तुझे समजून नजराणे जपावी मी तरी दु:खे

तुला पाहून 'जीतू' आरसाही बोलला नाही
लपवली काय त्यानेही स्वत:च्या अंतरी दु:खे


...रसप....
३ एप्रिल २०१२

उधारीचं हसू आणून.... (भाग - २)

1 comment:

  1. Onkar Deshpande24 April 2011 at 13:46

    सुंदर...
    अप्रतिम...

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...