Wednesday, March 30, 2011

"बस चंद करोडों सालों में...." (भावानुवाद - ८)

तुझ्यावरच्या प्रेमालाही कधी तरी ओहोटी लागेल
आणि संचिताचा कोरडा तळ दिसेल
दु:खाची वेदना जाणवणंही बंद होईल
सुखोपभोगाची वासनाही मरून जाईल
छातीतला निखारा विझून थंड होईल
काळ्याकभिन्न कोळश्यासारखा षंढ होईल

इतक्यात कुठूनसं ऐकू येईल..
"मेरी आवाज ही पेहचान हैं, गर याद रहें.."
आणि पुन्हा एकदा मनात
प्रेमाला भरते येईल..!!

-
मूळ कविता: "बस चंद करोडों सालों में...."
कवी: गुलजार
भावानुवाद: ....रसप....
३० मार्च २०११
मूळ कविता:

बस चंद करोडों सालों में
सूरज कि आग बुझेगी जब
और राख उडेगी सूरज से
जब कोई चाँद न डूबेगा
और कोई ज़मीं न उभरेगी
तब ठंडा बुझा इक कोयला सा टुकड़ा यह जमीं का
घूमेगा भटका भटका
मद्धम खाकीस्तरी रोशनी में

मैं सोचता हूँ उस वक़्त अगर
कागज़ पे लिखी इक नज़्म कहीं उडते उडते सूरज में गिरे
तो सूरज फिर से जलने लगे!!

.
- गुलजार

"बस चंद करोडों सालों में...." (भावानुवाद - ७)

अजून काही युगांतरांनंतर
देवाचीही ताकद संपेल
आणि उरेल फक्त भाकडकथांचा प्रसाद
मग नैराश्याचा काळोख अंतहीन भासेल
अन आशेचे किरण विरळाच..
वास्तवाच्या अंतराळात भविष्याची स्वप्नं
विझलेल्या निपचित कोळश्यासारखी अस्तित्त्व हरवतील

त्यावेळी माझे उस्फूर्त शब्द आर्ततेच्या जोरावर
त्या निद्रिस्त शक्तीला साद घालतील
आणि पुन्हा तिला देवपण येईल..


-
मूळ कविता: "बस चंद करोडों सालों में...."
कवी: गुलजार
भावानुवाद: ....रसप....
३० मार्च २०११



मूळ कविता:

बस चंद करोडों सालों में
सूरज कि आग बुझेगी जब
और राख उडेगी सूरज से
जब कोई चाँद न डूबेगा
और कोई ज़मीं न उभरेगी
तब ठंडा बुझा इक कोयला सा टुकड़ा यह जमीं का
घूमेगा भटका भटका
मद्धम खाकीस्तरी रोशनी में

मैं सोचता हूँ उस वक़्त अगर
कागज़ पे लिखी इक नज़्म कहीं उडते उडते सूरज में गिरे
तो सूरज फिर से जलने लगे!!

.
- गुलजार

"बस चंद करोडों सालों में...." (भावानुवाद - ६)

अजून काही वर्षांनी विजयाची भूक संपून जाईल
आणि उरतील आठवणींचे अवशेष
मग पाकिस्तानशी खेळताना ईर्षा नसेल
ऑस्ट्रेलियाशी खेळताना जिद्द नसेल
मग विझून थंड झालेले (अकरा) कोळसे
हरण्याच्या भीतीने मैदानात केविलवाणे दिसतील

त्यावेळी तुझ्या एका शतकाने
पुन्हा त्या संघात जान येईल
आणि उभा होईल एक "विश्वविजेता"


मूळ कविता: "बस चंद करोडों सालों में...."
कवी: गुलजार
भावानुवाद: ....रसप....
३० मार्च २०११


मूळ कविता:

बस चंद करोडों सालों में
सूरज कि आग बुझेगी जब
और राख उडेगी सूरज से
जब कोई चाँद न डूबेगा
और कोई ज़मीं न उभरेगी
तब ठंडा बुझा इक कोयला सा टुकड़ा यह जमीं का
घूमेगा भटका भटका
मद्धम खाकीस्तरी रोशनी में

मैं सोचता हूँ उस वक़्त अगर
कागज़ पे लिखी इक नज़्म कहीं उडते उडते सूरज में गिरे
तो सूरज फिर से जलने लगे!!

.
- गुलजार

Tuesday, March 29, 2011

बस चंद करोडों सालों में.... (भावानुवाद - ५)

काही करोड वर्षे आणि सरून जाता
ज्वाला विझून जाई सूर्यातली पहाता

ओकेल राख तेव्हा तो सूर्य अंतराळी
ना चंद्र मावळे तो, पृथ्वीस कोण त्राता?

तो थंड कोळसा जो, तैशीच होय पृथ्वी
अंधूकशा प्रकाशी फिरणे हताश आता

ऐश्या अगम्य वेळी त्या खास दोन ओळी
छोट्या चिठोर पानी, सूर्याकडेच जाता -

ज्वाला पुन्हा उठावी, सूर्यास पेटवावी
ऐसा पुन्हा मिळावा सृष्टीस तोच दाता

"ती पार कोळश्याला हीरा करून गेली"
मी खुद्द धन्य झालो", बोलेल तो विधाता..!!

-
मूळ कविता: "बस चंद करोडों सालों में...."
कवी: गुलजार
भावानुवाद: ....रसप....
२९ मार्च २०११



मूळ कविता:

बस चंद करोडों सालों में
सूरज कि आग बुझेगी जब
और राख उडेगी सूरज से
जब कोई चाँद न डूबेगा
और कोई ज़मीं न उभरेगी
तब ठंडा बुझा इक कोयला सा टुकड़ा यह जमीं का
घूमेगा भटका भटका
मद्धम खाकीस्तरी रोशनी में

मैं सोचता हूँ उस वक़्त अगर
कागज़ पे लिखी इक नज़्म कहीं उडते उडते सूरज में गिरे
तो सूरज फिर से जलने लगे!!

- गुलजार

Monday, March 28, 2011

दे घुमाके!! (World Cup 2011 Special)

बांगलादेश आणि इंग्लंड विरुद्ध....

.
पहिलाच सामना 'बांगला'शी
तोही त्यांच्या गल्लीत
न्यूझीलंडला खडे चारले
होते त्यांनी हल्लीच

विसरलो नव्हतो अजून
मागल्या वेळचा धक्का
भारताने 'बांगला'चा
घेतला होता धसका

पण सेहवागसमोर बांगलाचा
निभाव नाही लागला
गेल्या वेळच्या पराभवाचा
असा वचपा काढला

पुढचा सामना 'साहेबा'शी
'चिन्नास्वामी'त खेळला
सचिनने षटकारांचा
मस्त पाउस पाडला

डावाच्या शेवटी मात्र
आपण नांगी टाकली
कशीबशी ३३८
धावसंख्या गाठली

गोरा 'स्ट्रोस ' नेमका तेव्हाच
फॉर्मामध्ये आला
इंग्लंडचा पाठलाग
जोर घेउ लागला

"आता हरलो" वाटताच
झहीर धावून आला
तीन बळी घेउन त्याने
नूर पालटून टाकला

'साहेबा'नेही मनाशी
जिद्द होती केली
स्वान आणि शेह्झादने
चांगलीच झुंज दिली

शेवटच्या चेंडूला
श्वास रोखले होते
१ चेंडू दोन धावा
असे गणित होते

शंभर षटकी थराराचा
सार्थ शेवट झाला
रोमहर्षक सामना तो
बरोबरीत सुटला..



....रसप....
२८ मार्च २०११

आयर्लंड विरुद्ध....

आयरिश आर्मी 'साहेबा'चं
नाक कापून आली
मोठ्या जोशात भारतासमोर
येउन उभी झाली

नाणेफेक जिंकून त्यांनी
फलंदाजी घेतली
२ बाद ९ नंतर
शतकी भागी रचली

युवराजच्या फिरकीने
मग जादूच केली
पाच गडी बाद करून
"आयरीश" कंबर मोडली!!

सुस्थितीतला डाव त्यांचा
कोसळून गेला पार
तरीसुद्धा दोनशेचा
आकडा केला पार

कागदी शेर भारताचे
पुन्हा ढेर झाले
ठराविक अंतराने
बाद होऊ लागले

सचिन-विराट-युवराज-धोनी
थोडे थोडे खेळले
पठाणने फिरवला दांडपट्टा
गंगेत घोडे न्हाले

धापा टाकत भारताने
सामना जिंकला होता
"मजा नहीं आया यार"
प्रेक्षक बोलला होता..


....रसप....
२८ मार्च २०११


नेदरलंड विरुद्ध..

.
पहिल्या तिन्ही सामन्यांत
पियुष 'चा*वला' होता
तरीसुद्धा चौथ्यामध्ये
त्याला ठेवला होता

"डचां"चं आव्हान तसं
विशेष काही नव्हतं
पण आपलंही घोडं
कुठे भरवश्याचं होतं?

पहिली बैटिंग त्यांची होती
सुरुवात बरी केली
पुढच्या खेळाडूंनी मात्र
अगदी निराशा केली

१८९ मध्येच
डाव पुरा झाला
सहेचाळीस षटकांमध्ये
संघ बाद झाला

भारताची सुरुवात
धडाकेबाज होती
सचिन-सेहवागच्या लौकिकास
साजेशीच होती

पण दिमाखदार विजय काही
साधता आला नाही
पाच विकेट गेल्या
अती केली घाई

पुन्हा एकदा युवराज
उपयुक्त खेळला
धोनीच्या साथीने
बेडा पार केला


....रसप....
२८ मार्च २०११
* च चंद्राचा नव्हे

द. आफ्रिकेविरुद्ध....

चार सामन्यात सात गुण
असे होते कमावले
आफ्रिकेशी दोन हात
करण्यासाठी सरसावले

कर्णधार धोनीने
नाणेफेक जिंकली
खुषी-खुषी ताबडतोब
पहिली बैटिंग घेतली

सेहवाग-सचिनची जोडी
पुन्हा एकदा 'पेटली'
आफ्रिकेची गोलंदाजी
धू-धू धुतली

तिस-या पॉवरप्लेने
आपला घात केला
पत्त्यांच्या बंगल्यासारखा
सारा डाव पडला

३५०-४०० चं
स्वप्न गेलं धुळीत
२९६ मध्येच झाले
अकरा वीर चीत!

आफ्रिकेची सुरुवातही
आश्वासक झाली
आघाडीच्या सगळ्यांनी
डाव-बांधणी केली

भज्जीच्या तीन बळींनी
पारडं हलकं कललं
मुनाफलाही दोन बळींचं
फुक्कट घबाड लाभलं

आयत्या वेळी भज्जीने
शेपूट पायात घातली
शेवटचं षटक टाकण्याला
चक्क माघार घेतली!

६ चेंडू १३ धावा
समोर गडी नववा
फार कठीण नव्हतं
की 'हरभजन'च हवा

विचार करून शेवटी
चेंडू नेहराकडे दिला
माझा तरी हात तेव्हा
कपाळाकडे गेला

तुडतुड्या नेहराने
डोकं गहाण ठेवलं
"चार चेंडूत सोळा" चं
धर्मादाय केलं..!


....रसप....
२९ मार्च २०११

बस चंद करोडों सालों में.... (भावानुवाद - ४)


आयुष्याच्या एका वळणावर येउन
जेव्हा हा प्रवाह थिजेल
आणि हिरवट शेवाळी जमू लागतील
मग पुढील किनारे बहरणार नाहीत
फुललेलं डवरणार नाही
तेव्हा मी निरुद्योग, निरुपयोगी
मळकट वर्तमानात धूसर भविष्याचा ठाव घेईन

त्यावेळी तुझं फक्त सोबत असणं
इतकी ताकद देईल,
की जणू थिजलेल्या प्रवाहाला पुन्हा गती मिळावी...!


-
मूळ कविता: "बस चंद करोडों सालों में...."
कवी: गुलजार
भावानुवाद: ....रसप....
२८ मार्च २०११
मूळ कविता:

बस चंद करोडों सालों में
सूरज कि आग बुझेगी जब
और राख उडेगी सूरज से
जब कोई चाँद न डूबेगा
और कोई ज़मीं न उभरेगी
तब ठंडा बुझा इक कोयला सा टुकड़ा यह जमीं का
घूमेगा भटका भटका
मद्धम खाकीस्तरी रोशनी में

मैं सोचता हूँ उस वक़्त अगर
कागज़ पे लिखी इक नज़्म कहीं उडते उडते सूरज में गिरे
तो सूरज फिर से जलने लगे!!

- गुलजार

बस चंद करोडों सालों में.... (भावानुवाद - ३)

तोही दिवस येईल जेव्हा माझी प्रतिभा खुंटेल
आणि उरेल शब्दांची राख!
मग कल्पना मूर्त होणार नाहीत
भावना सजवता येणार नाहीत
तेव्हा सृजन होईल एखाद्या निस्तेज कोळश्यासारखं
जे माझ्याच भावविश्वात,
अंधुक धूसर प्रकाशात बेवारशी भटकेल

त्यावेळी जपून ठेवलेले तुझे शब्द
नजरेखालून घालीन..
आणि मला खात्री आहे,
पुन्हा एकदा माझी प्रतिभा झळाळेल..

-
मूळ कविता: "बस चंद करोडों सालों में...."
कवी: गुलजार
भावानुवाद: ....रसप....
२८ मार्च २०११


मूळ कविता:

बस चंद करोडों सालों में
सूरज कि आग बुझेगी जब
और राख उडेगी सूरज से
जब कोई चाँद न डूबेगा
और कोई ज़मीं न उभरेगी
तब ठंडा बुझा इक कोयला सा टुकड़ा यह जमीं का
घूमेगा भटका भटका
मद्धम खाकीस्तरी रोशनी में

मैं सोचता हूँ उस वक़्त अगर
कागज़ पे लिखी इक नज़्म कहीं उडते उडते सूरज में गिरे
तो सूरज फिर से जलने लगे!!

- गुलजार

Sunday, March 27, 2011

बस चंद करोडों सालों में.... (भावानुवाद - २)

काही कोटी अजूनी, सरतिल महिने, सूर्य जाई विझोनी
सूर्यातूनी उडूनी, चहुदिक पसरे, राख बाकी उरूनी
जेव्हा चंदा कधी ना, निशिदिन नभिचा, लुप्त हो मावळोनी
पृथ्वीसुद्धा असावी, निपचित अचला, जन्म- मृत्यू टळूनी

वाटावे की धरेचा, विझवुन उरला, कोळसा थंड व्हावा
येथे तेथे उगी तो, मळकट धुरक्या-श्या उजेडी उडावा
तेंव्हा ऐसे घडावे उडतच कविता पेटलेला चिठोरा
सूर्यामध्ये पडावा, अन मग फिरुनी, सूर्य तेजे जळावा


मूळ कविता: "बस चंद करोडों सालों में...."
कवी: गुलजार
भावानुवाद: ....रसप....
२७ मार्च २०११

.
(वृत्त स्रग्धरा - गागागागा लगागा, लललल ललगा, गालगा गालगागा)

बस चंद करोडों सालों में.... (भावानुवाद - १)

नक्कीच एक वेळ अशी येईल
जेव्हा सूर्यातली उर्जाही संपेल
आणि उरेल फक्त राख,
कधीच न मावळणारा चंद्र
आणि कधीच न उजळणारी जमीन.
मग कोळश्यासारखी थंड, विझलेली धरा
अवकाशात भरकटेल..
मंद मळकट प्रकाशात

त्यावेळी जर एखादी कविता..
कागदावर सजलेली
उडत उडत सूर्यामध्ये पडली,
तर..?
तर पुन्हा तो सूर्य झळाळू लागेल...

-
मूळ कविता: बस चंद करोड़ों सालों में....
कवी: गुलजार
स्वैर अनुवाद: ....रसप.... (रणजित पराडकर)
२७ मार्च २०११



मूळ कविता:

बस चंद करोडों सालों में
सूरज कि आग बुझेगी जब
और राख उडेगी सूरज से
जब कोई चाँद न डूबेगा
और कोई ज़मीं न उभरेगी
तब ठंडा बुझा इक कोयला सा टुकड़ा यह जमीं का
घूमेगा भटका भटका
मद्धम खाकीस्तरी रोशनी में

मैं सोचता हूँ उस वक़्त अगर
कागज़ पे लिखी इक नज़्म कहीं उडते उडते सूरज में गिरे
तो सूरज फिर से जलने लगे!!

- गुलजार

Saturday, March 26, 2011

साथ द्यावीच लागेल.

हात-पाय गळपटलेले
खांदे पडलेले
चेहरे ओढलेले
डोळे विझलेले

'त्या'च्या टीमला शोभत नाही
कारण तो स्वत: कुठेच कमकुवत नाही

तरीही गेली बावीस वर्षं त्याने
तुमच्या हाराकीरींची मढी वाहिली आहेत
तुमच्यामुळे शिव्या-शाप खालले आहेत
तोंडचा घास हिरावलेला पाहिलं आहे
मेहनतीची माती होताना साहिलं आहे

आता बस..

तुम्हाला देशाचंच नाही 'त्या'चंही देणं आहे
तो मागणार नाही..
"मागणे" त्याच्या स्वभावातच नाही
पण आता परतफेडीची वेळ आली आहे
त्या डोळ्यांना विजयाश्रूंची तहान आहे

एकच तुरा त्या शिरपेचात खोचायचा बाकी आहे
म्हणूनच तो लढतो आहे.. थकूनही लढतो आहे

त्याला फक्त साथ हवी आहे
तुमची..

द्यावीच लागेल.



....रसप....
२६ मार्च २०११

Thursday, March 24, 2011

आँसू भीगी मुस्कानों से.. - भावानुवाद

अश्रूंना तो पिऊन हसतो, बघतो प्रत्येकाकडे
म्हाता-याचे नाव प्रेम तो बोले वेडेवाकडे

आठवांनी भरली ओंजळ पाठी स्वप्नांचे ओझे
जीव जाईतो नाव कुणाचे घेउन घाली साकडे

मुर्ती ह्याची इवलीशी पण कीर्ती सोन्यासारखी
अपुल्यामधला आहे वाटे पाहुनिया ह्याच्याकडे

नात्यांची देणी चुकवाया ह्याचे मोल नका मोजू
लुटता लुटता लुटण्याची आहे युक्ती त्याच्याकडे

ऐशी उंची आहे बुटक्या व्यापा-याला लाभली
पाय रोवुनी धरतीला हा भिडला अस्मानाकडे


मूळ कविता: आँसू भीगी मुस्कानों से हर चेहरे को तकता है
कवी: माणिक वर्मा
मराठी भावानुवाद: ....रसप.... (रणजित पराडकर)
२१ मार्च २०११ ते २४ मार्च २०११


मूळ रचना:

आँसू भीगी मुस्कानों से हर चेहरे को तकता है
प्यार नाम का बुढा मानव जाने क्या क्या बकता है

अंजुरी भर यादों के जुगनूँ, गठरी भर सपनों का बोझ
साँसों भर के नाम किसी का पहरों-पहरों रटता है

ढाई आखर का यह बौना, भीतर से सोना ही सोना
बाहर से इतना साधारण हम-तुम जैसा लगता है

रिश्तों की किश्ते मत भरना, इसके मन का मोल ना करना
यह ऐसा सौदागर है जो खुद लुटकर भी ठगता है

कितनी ऊँची है नीचाई इस भोले सौदाई की
आसमान होकर धरत पर पाँव-पाँव ये चलता है

- माणिक वर्मा

सासू किती गोड!

बायको म्हणते मला, "एकदा तरी बोल..
माझी सासू किती किती गोड..!

सासरी जातोस तेव्हा कसली चंगळ असते
कशी तुझ्या राहण्याची बडदास्त ठेवते
तुला विचारूनच सगळा स्वयंपाक करते
तुझ्यासाठी खास कमी तिखट घालते
तोंडावर नाही तर माझ्याकडे बोल..
माझी सासू किती किती गोड..!

मी तुझ्यावर चिडलेय हे ती तुला सांगते
मला कसं पटवायचं हेसुद्धा शिकवते
चूक तुझी असली तरी मला झापून काढते
तुला समजून घेण्यासाठी मला समजावत असते
लाजेकाजेस्तव का होईना खरं खरं बोल..
माझी सासू किती किती गोड..!

तुलाही माहित आहे कुठे कुठे दुखतं
मुलीपासून दूर राहता मन कसं तुटतं
पुन्हा पुन्हा आतमधून काय भरून येतं
किती किती हुंदक्यांना पचवावंच लागतं
प्यायलेल्या आसवांचं जाणतोस ना मोल?
तुलासुद्धा वाटतं ना.. सासू किती गोड!
तुलासुद्धा वाटतं ना.. सासू किती गोड!"

....रसप....
२४ मार्च २०११

Saturday, March 19, 2011

जावे कुठे दिवाणे..!

भावानुवाद क्र. २

सांगा कुणी तरी की, जावे कुठे दिवाणे
सर्वत्र यौवनाचे येथे खुले खजीने

कारागिरी पहावी ही खास ईश्वराची
एकेक चेहरा तो माझ्या मनात राहे

चोरून घेतले अन् फेकून तोडले का?
सांगून ना कळावे, हृदयास छिन्न केले

मी दर्पणात माझे प्रतिबिंब पाहता ते
म्हणले मलाच, “मूर्खा!! तू काय पाहतो रे?”

पायी हजार होती हृदये तिने चुरडली
“घे शोधुनी तुझे ते”, हासून बोलताहे!!


....रसप....
१९ मार्च २०११
मूळ रचना:
कहाँ ले जाऊँ दिल दोनों जहाँ में इसकी मुश्क़िल है ।
यहाँ परियों का मजमा है, वहाँ हूरों की महफ़िल है ।

इलाही कैसी-कैसी सूरतें तूने बनाई हैं,
हर सूरत कलेजे से लगा लेने के क़ाबिल है।

ये दिल लेते ही शीशे की तरह पत्थर पे दे मारा,
मैं कहता रह गया ज़ालिम मेरा दिल है, मेरा दिल है ।

जो देखा अक्स आईने में अपना बोले झुँझलाकर,
अरे तू कौन है, हट सामने से क्यों मुक़ाबिल है ।

हज़ारों दिल मसल कर पाँवों से झुँझला के फ़रमाया,
लो पहचानो तुम्हारा इन दिलों में कौन सा दिल है ।
- अकबर इलाहाबादी

मैफल - त्या रात्री.. (२ कविता)

त्या रात्री..
जिथे बसलो होतो आपण सगळे
आणि उधळली होती
कवितांची फुले
बहुरंगी, सुगंधी, मोहक, सुखद
ती खोली अजून तशीच आहे..
मी आवरली नाही.

फुलांचे गुच्छ बनलेत... आपोआप
आणि सजलेत..कोप-या-कोप-यात
खिडकीत आणि मेजावर
जमिनीवरचा सडा अजून टवटवीत आहे
आणि..
एक धुंद परिमळ दरवळतोय
सा-या घरात....

कारण ती खोली अजून आवरलीच नाहीये..
तुम्ही पुन्हा पसराल..
उधळण कराल म्हणून..........



....रसप....
१९ मार्च २०११


भाग - २

आज त्या खोलीतून एक सळसळ ऐकू आली
काही तरी लपून बसलंय.. अशी चाहूल लागली
उश्या, लोड, जाजम.. सारं काही उचललं
खुर्चीखाली, मेजाखाली.. पुन्हा पुन्हा धुंडाळलं
माळ्यावर चाचपलं… कोप-या कोप-यात पाहिलं
पण काहीच नाही सापडलं..

मग मनात विचार आला
"बहुतेक मला भास झाला..!"
आपणच हसलो आणि पुन्हा..
सगळं आधीसारखं ठेवलं.. पसरलं

बाहेर आलो.. पुन्हा सळसळ.. तीच चाहुल!!
मग सरळ कवितांची वहीच उचलली..
त्यात मला एक पाकळी सापडली
मिश्किल हसली आणि म्हणाली..
"सगळ्या कविता वाचल्यास..
मलाच का झाकली?"

म्हटलं..

"सगळ्याच कविता सगळ्यांच्या नसतात
काही फक्त आपल्या आणि आपल्याच असतात..
कुणालाच दाखवायच्या नसतात..
अश्याच झाकून ठेवायच्या असतात.."

ती पुन्हा सळसळली, मिश्किल हसली

मी पुन्हा ती वही जाजमावर ठेवली
पुढचं पान उलटवून..


....रसप....
२१ मार्च २०११

Friday, March 18, 2011

लिहा गझल..!!

नव्या दमानी लिहा गझल
प्रबोधनाची लिहा गझल

गरीब वा श्रीमंत असो
मनामनाची लिहा गझल

फसेल किंवा जमेल ही
पुन्हा-पुन्हाही लिहा गझल

उगाच वादी पडू नका
मनोगताची लिहा गझल

निराश झालात का असे?
उमेद देई, लिहा गझल

शिळ्या हवेला पुन्हा तुम्ही
कराल ताजी, लिहा गझल

म्हणेल जीतू लिहा, तरी–
सुचेल तैशी लिहा गझल


....रसप....
१८ मार्च २०११

Thursday, March 17, 2011

पीले पत्तों का मौसम जा चुका हैं.......... - ४

पिवळी जुनाट सारी झडलीत जीर्ण पाने
उधळून रंग आता वसुधा हसे नव्याने

बहु रंग मोहवूनी करती मला नशीला
नभिच्या सजावटीला ढग शुभ्र पिंजलेला

हिरवा निसर्ग ऐसा हसतो खुल्या दिलानी
मज आठवे तुझे ते हसणे मधूर राणी

पुनरेकवार आला तव लाडका ऋतू हा
नसशील आज येथे, पण भास खास झाला


....रसप....
१७ मार्च २०११


पीले पत्तों का मौसम जा चुका हैं - (३)

बघ झडुनच गेली सर्व पाने जुनी ती
उधळण बहुरंगी जाहली भूवरीही

गडद मृदु छटांची मोहिनी ह्या मनाला
कळप विहरतो तो श्वेतरंगी ढगांचा

हिरवळ तनु ल्याली पर्वतांनी दऱ्यांनी
अलगद हलक्याने ओढली शाल कोणी?

अगतिक मन होते आठवांनी तुझ्या का?
दिवस बघ पुन्हा ते येतसी, तू न ये का?


....रसप....
१७ मार्च २०११


Tuesday, March 15, 2011

उधारीचं हसू आणून...

१ 

.
विसरण्याचा प्रयत्न मी किती वेळा केला
तो हिशोब विसरलो..
पण तुला नाही विसरू शकलो
रडण्याचा प्रयत्नही मी किती वेळा केला
वाटलं रडून शांत होईन..
पण रडूच नाही शकलो
मी पुरुष आहे ना..
डोळ्यातल्या विहिरी आटलेल्या असतात
मी मोठा झालोय ना..
आता भावनांना प्रौढत्वाच्या सीमा असतात
कुणास ठाऊक कुणी आखल्या..?
आणि का आखल्या..??
पण कैद होतात माझ्यासारखे..
बोलताही येत नाही..
रडताही येत नाही..
बस.. कुढत बसायचं...
आतल्या आत,
कुणाला ऐकू न येऊ देता
रडत राहायचं
डोळे न भिजवता..
आणि सारं काही विसरण्याचा
केविलवाणा प्रयत्न करायचा
उधारीचं हसू आणून...


....रसप....
१५ मार्च २०११

.

.
.
मग इच्छा नसतानाही
मुखवटा चढवावा लागतो
झापडं बांधावी लागतात
आणि जन्म घेतो
एक बेमुर्वतखोर स्वभाव
काही केल्या ऐकणार नाही..
ऐकायचंच नाही..!
कुणाचंही.. अगदी स्वत:चंही!
अडूनच बसायचं उदासीन बनण्यासाठी!
काही आवडलं तर हसायचं नाही..
काही नावडलं तर चिडायचं नाही..
कुणी बोलावलं तर ऐकायचं नाही..
कुणी हटकलं तर बधायचंही नाही

कृत्रिम चाल..
त्रोटक संवाद..
शून्य नजर..
आणि खरा चेहरा..?
तो लपवायचा..
उधारीचं हसू आणून….


....रसप....
१६ मार्च २०११
.

.
.
तू ओरबाडलं नाहीस..
तरी ओरखडा उठला
मी अश्रू ढाळले नाहीत
पण हुंदका फुटला

काट्या-काट्यामध्ये फरक आहे
गुलाब आणि बाभळीचा
दु:खा-दु:खामध्ये फरक आहे
आवडीचा-नावडीचा

माझं दु:ख मी जपतो
प्रेम केलंय म्हणून
प्रेमाच्याच बदल्यात मिळालंय…
“अमूल्य ठेव” म्हणून!

आपणच आपले खरे सोबती
मला चुकलंय कळून
हीच जाणीव लपवत असतो…
उधारीचं हसू आणून

....रसप....
१६ मार्च २०११
.

.
.
हातावरच्या रेषांना काही अदृश्य वळणं असतात
किंवा ती फक्त मायक्रोस्कोपनेच दिसतात
कारण कसं शक्य आहे..
आयुष्य इतकं सरळसोट किंवा एकवळणी असणं?
वर्षानुवर्षांची कहाणी काही इंचांत लिहिणं..?
.
.
- असं मला पूर्वी वाटायचं
की सगळं खोटं असतं
पण आता पटतंय
एखादंच वळण असतं
तेव्हाच सावरायचं असतं
आणि जपून चालायचं असतं
तिथे तोल गेला की..
गडगडत खाली यावं लागतं
मग फक्त झाल्या जखमांना
भरून निघेपर्यंत सहन करायचं..
उधारीचं हसू आणून..

....रसप....
१६ मार्च २०११
.

.
.
अधाशी भुंग्यासारखं
सतत हुंगत राहा
म्हणजे तुम्हाला सुख मिळेल
हाच एक उपाय आहे आयुष्यात सुखी होण्याचा

सुख तुमच्याकडे येत नाही..
हुडकून काढावं लागतं
आणि दु:ख..?
कधीच चुकत नाही
बरोब्बर घाला घालतं….

पण तरीही…
आपण आपला शोध सुरूच ठेवायचा
अविरत हुंगत राहायचं..

आणि जे काही थोडंफार मधाळ मिळेल
त्याच्या क्षणैक माधुर्यात
आनंद मानायचा..
.
.
उधारीचं हसू आणून....



....रसप....
१७ मार्च २०११
.

.
.
हात सुटल्याचं दु:ख
हात तुटण्याच्या वेदनेपेक्षा कमी नाही

मला असंच थोटं बनून जगायचंय..
मरायचा अधिकारच नाही
कारण दुस-या हातात काही हात आहेत..
तुझ्यासारखं, सोडू शकत नाही

त्यांना पर्वा आहे माझी
काळजी आहे
त्यांनी पाहीलेलं स्वप्न
मीच स्वत: आहे
मला ठेच लागली
तर त्यांच्या डोळ्यात पाणी येतं
कसं दावू त्यांना
हात 'तुटल्या'चं दु:ख?

शब्द न् शब्द बोलायचा
तोलून, मोजून, मापून..
मुकाट आसवांना प्यायचं
उधारीचं हसू आणून….


....रसप....
१८ मार्च २०११


७. 


"टाईम हील्स एव्हरीथिंग"
ती म्हणाली होती सोडून जाताना
स्वत:च केलेल्या घावावर फुंकर घालताना..
मी मूर्खच होतो..
आधी विश्वास ठेवला प्रेमावर
आणि नंतर ह्या फसव्या मलमावर !

तिने सिद्धांत मांडला.. तिचंही काय चुकलं?
"अपवादही आहेत" इतकंच सांगायचं राहिलं!
'आफ्टर ऑल, एक्सेप्शन्स प्रूव्ह अ लॉ !'

लाखातला एक मी
लाखातलंच माझं दु:ख...
उरलंय अपवाद बनून
काळाला पुरून
पण मी अजूनही प्रयत्न करणार आहे
.... उधारीचं हसू आणून.......


....रसप....
२१ डिसेंबर २०११


८.
.
अंगणातली रातराणी
चिंब दहिवरात न्हाली
अन् डोळ्यांत साखळलेल्या रक्ताला
आज पहिल्यांदाच जराशी ओल आली

वाटलं, तू नाहीस,
तर तुझा आभास तरी ओंजळीत घ्यावा
आज अंमळ जास्तच
हा सुवास रेंगाळावा

झुपका तोडून ओंजळीत घेतला
आणि एक शहारा उठला
तुझ्या केसांचा स्पर्श
परत एकदा स्मरला..

रातराणी ओंजळीत होती
पण गंध हरवला होता
कागदाच्या फुलांसारखा
एक झुपका समोर होता..

मीही बहुतेक ह्या फुलांसारखाच झालोय
तुझ्यापासून विलग होऊन गंधाला मुकलोय

हिरमुसलेली फुलं मला
पाहात होती टक लावून
मोठ्या मनाने त्यांनी माफ केलं
उधारीचं हसू आणून.....


....रसप....
२४ डिसेंबर २०११

९.


कवितांच्या जुन्या वहीतलं
'ते' पिंपळाचं पान
- मला आठवतंय, मी जेव्हा ठेवलं होतं
तेव्हा फक्त वाळलेलं होतं -
आज जाळीदार झालंय..

पानातून आरपार माझी कविता दिसतेय
अस्पष्टच.. नीट वाचता येत नाहीये..
पण ती 'तेव्हा'ही नीट वाचली गेली नव्हतीच !
तुला फक्त शब्दच दिसले होते..
भावना उमगली नव्हतीच !
माझी कविता तू हसण्यावारी नेलीस
आणि अजून लिहिण्यासाठी शुभेच्छा देऊन गेलीस

मीही लिहिल्या..
पाणीदार, जाळीदार कविता
प्रत्येक कवितेला 'तुझ्यासाठीच' म्हणून
आणि तू सगळ्या वाचल्यास -
उधारीचं हसू आणून....

....रसप....
१४ जानेवारी २०१२

१०.
घड्याळातला काटा पुढेच फिरतोय
दिवसामागून दिवस.. सूर्य बुडतोय
ऋतू बदलले
हवा बदलली
फुले कोमेजली..
पुन्हा उमलली
सांडलेला पाचोळा उडून गेला
पुन्हा नवा पसरून झाला
भिंतींचे रंग विटले
खिडक्यांना गंज चढले
तरी मी अजून तसाच आहे
तिथेच आहे..

पण आज मी येणार आहे, तुला बघायला
सुखी-समाधानी आयुष्याच्या शुभेच्छा द्यायला
पण तुला दिसणार नाही.. दूरच उभा राहीन
तुझी पाठ वळली की हात उंचावीन
लोकांच्या नजरा चुकवून आवंढे गिळीन
खुशीत असल्याचं भासवून देईन
.....उधारीचं हसू आणून....

....रसप....
१९ जानेवारी २०१२

११.

तो फसफसत होता
दात विचकून खदखदत होता
पावलांना खेचत होता..
पण मी शांत होतो
अजून पुढे जायचं टाळत होतो
पूर्वी खाल्लेल्या गटांगळ्या आठवत होतो


मला हा खारट स्पर्श आवडतच नाही
म्हणून मी कधीच ह्याला जवळ केलं नाही
पण आज...
आज मावळत्या सूर्याच्या लालीला भुललो..
आणि कळलंच नाही कधी इथे आलो..
एक मात्र कळलं..
खारट स्पर्शात वेगळीच मजा आहे..
नुसतंच खदखदण्यात वेगळीच मजा आहे


मनातल्या मनात मावळताना
डोळ्यातली लाली झाकायची आहे
विरघळणाऱ्या सूर्यासोबत
आज मलाही जरासं वाहायचं आहे
....उधारीचं हसू आणून....


....रसप....
१ फेब्रुवारी २०१२

१२.


पळवून पळवून काळाने
पुरती दमछाक केली
पायांना पडलेल्या छाल्यांकडे
मीही डोळेझाक केली

आज कळतंय, वेडेपणा होता
तुझ्यापासून दूर जातोय,
हा विचारच चुकीचा होता

कारण तू नेहमीच क्षितीज होतीस
जवळ असूनही दूरच होतीस
मी वेड्यासारखा पळतोय
क्षितिजापासून दूर जाण्यासाठी
आणि तू तिथेच आहेस,
मला फक्त खुणावण्यासाठी

उशीरा का होईना पण मला शहाणपण सुचलंय
फार दूरचं न पाहायचं आज मी ठरवलंय
रोज नवा सूर्य पोटात जाईल,
रोज नवा बाहेर येईल..
पण मी क्षितिजाकडे न बघता आकाशालाच बघीन
स्वत:च्या नजरेत पडलोय, तरी मान वर करीन

माझ्याच वेदनेला छळीन खोटं खोटं नाकारून
पायाच्या छाल्यांकडे बघीन,
उधारीचं हसू आणून....

....रसप....
५ फेब्रुवारी २०१२

१३.


आताशा,
काळवंडलेली संध्याकाळ फारच अंगावर येते
असं वाटतं की भिंती जवळ-जवळ येत आहेत
आणि छत खाली-खाली..
दरवाजे, खिडक्या लहान-लहान होत आहेत..
मी मनातल्या मनात मुटकुळं करून तोंड लपवून घेतो...
डोळे गच्च मिटून घेतो..
वर्तुळातून वर्तुळं बाहेर येताना दिसतात..
निश्चल डोहात तरंग उठावेत तशी...

ही घुसमट सहन होत नाही..
थरथरत्या हातांनी मी पुन्हा ग्लास भरतो..
ह्यावेळी आकंठ बुडतो..
त्याच निश्चल डोहात...

मी बाहेर येतो तेव्हा
इतका काळोख असतो... की
भिंती.. छत... दरवाजे... खिडक्या काहीच दिसत नसतात..
मला घाबरवत नसतात..
अजून एक काळवंडलेली संध्याकाळ सरून गेलेली असते
आणि मी, माझ्या आवडत्या काळोखात
मला हवं ते बघत बसतो..!
उधारीचं हसू आणून.....

....रसप....
१८ फेब्रुवारी २०१२


१४.

माझी वेदना अशी आहे की
जखम कुठे आहे तेच कळत नाही
मला नक्की काय हवंय..
शोधूनसुद्धा मिळत नाही

कदाचित तुझ्या मागोमाग निघून गेली,
ती मन:शांती हवी आहे
कदाचित तुझ्या नकाराने डिवचलेला
स्वाभिमान हवा आहे
कदाचित तुझ्यासाठी लिहिलेली
प्रत्येक कविता हवी आहे
कदाचित हवेतच विरून गेलेले
ते सोनेरी स्वप्न हवं आहे
किंवा
कदाचित मला मीच हवा आहे पूर्वीचा..
जो आरश्यात हसायचा
जो मित्रांत रमायचा
एकटाच गुणगुणायचा
आणि शांत निजायचा..

पण हा बदललेला 'मी'ही माझाच आहे
जसा कसा आहे, आवडता आहे

ह्या वेदनेच्या गाण्याला गायचंय आळवून
त्या अज्ञात जखमेला नकळत कुरवाळून
मी परत एकदा पूर्वीसारखा गुणगुणणार आहे
तुलासुद्धा भुलवून..
उधारीचं हसू आणून....

....रसप....
२२ फेब्रुवारी २०१२


१५.

आयुष्यात कमतरता कशाचीच नव्हती,
पण म्हटलं तुला जरा अजून श्रीमंत करावं..!
 तुझ्यावर प्रेम करावं..
 मनाचं सोनं उधळावं..

 .... उधळलं.........

 तू दिलेलं काहीच मी माझ्याकडे ठेवलं नाही
 - दु:ख सोडून
 मी दिलेलं काहीच तू तुझ्याकडे ठेवलं नाहीस
 - मन सोडून

 माझं दु:ख आणि माझं मन..
 दोन्ही हट्टी आहेत.. चिवट आहेत
 त्यांना नकार कळत नाही
 ते खरं सोनं आहे
 जाळूनही जळत नाही

 तुला मी दिलेल्या मनाची किंमत नसेल,
 पण मला तू दिलेल्या दु:खाची किंमत आहे
 म्हणूनच,
 उराशी जपलंय..
 घट्ट कवटाळून
 मी खराखुरा 'जगतोय'
 उधारीचं हसू आणून....


 ....रसप....
 २५ फेब्रुवारी २०१२



१६.

तांबूस संध्याकाळच्या निवांत वेळी
ओलसर वाळूत
तू माझं नाव लिहिलं होतंस
"सागरासारखाच मोठ्ठ्या मनाचा आहेस"
असंही म्हटलं होतंस
ते नाव तर लगेच पुसलं गेलं
पण -
खवळलेल्या सागरलाटांसारखं
पुन्हा पुन्हा काही तरी उचंबळून येतं

निश्चल किनाऱ्यासारखं माझं मन
भिजून भिजून वाळतं...
 कधी ठिक्कर काळ्या मध्यरात्री
 पापण्या पेटून तांबूस प्रकाश होतो
 आणि कधी फटफटीत उजाडलं तरी
 दिवस उंबऱ्याबाहेरच थांबतो

 बहुधा माझ्यासाठी ही दिनचक्रं आणि ऋतूचक्रं
 एका वेगळ्याच परीघाची झाली आहेत
 उज्ज्वल भविष्याच्या ओढीने
 कधीकाळी मनात किलबिलणारी निरागस पाखरं
 कधीच उडून गेली आहेत
 पण मी त्या सागरकिनाऱ्यासारखाच शांत आहे

 वठलेल्या झाडालाही पालवी फुटेल
 हीच आशा मनात जपून
 रोज खारं पाणी देतोय
 उधारीचं हसू आणून....

 ....रसप....
 २९ फेब्रुवारी २०१२


१७.


सुखाच्या मल्मली वेषात आली बोचरी दु:खे
उधारीचे हसू आणून झाली साजरी दु:खे

सराईताप्रमाणे मी सुखांना चोरले होते
सुखे सारीच ती खोटी निघाली ही खरी दु:खे

मनाचे मी किती कप्पे करावे अन् किती वेळा?
इथे जागा नसे पाहून झाली बावरी दु:खे

तुझ्या माझ्या शिळ्या ताज्या क्षणांचे सोहळे झाले
मनापासून सजवावी अशी ती लाजरी दु:खे

जरी अंधारल्या वाटा मनाला लाभल्या होत्या
विसाव्याच्या क्षणी बनली घराची ओसरी दु:खे

मला प्रेमाविना काही तुझ्याकडचे नको होते
तुझे समजून नजराणे जपावी मी तरी दु:खे

तुला पाहून 'जीतू' आरसाही बोलला नाही
लपवली काय त्यानेही स्वत:च्या अंतरी दु:खे


...रसप....
३ एप्रिल २०१२

उधारीचं हसू आणून.... (भाग - २)

पीले पत्तों का मौसम जा चुका हैं - (२)

आता सरूनही गेली बघ पिवळाई
पुन्हा एकवार मन रंगामध्ये न्हाई

रंग पानाफुलांना नि रंग जमिनीला
रंग डोळ्यांमध्ये आणि रंग क्षितिजाला

उजळल्या आकाशाला रंग निळा निळा
श्वेतरंगी मेघ पहा होती कसे गोळा

ऊबदार शाल जशी पांघरावी कुणी
तसे मला वाटे हिरवाईस पाहुनी

हाच साज लेऊन तू आली होतीस ना?
तोच साज तुझी वाट पाहतो पुन्हा….


....रसप....
१५ मार्च २०११


Monday, March 14, 2011

मी जपानी

ध्वस्त होता जिद्द नाही सोडली
घेतली नाही कधी माघार मी

दावले तू दानवाचे रूप जे
पोळलो मी, साहिले मी घाव ते
मानली नाही मनाने हार मी
घेतली नाही कधी माघार मी

रे निसर्गा क्रुद्ध तू झालास का?
मानवाला पाहुनी भ्यालास का?
का कधी केले तुला बेजार मी?
घेतली नाही कधी माघार मी

मी नवे सिद्धांत येथे मांडतो
राख होता मी भरारी मारतो
आक्रितांना झेलुनी खंबीर मी
घेतली नाही कधी माघार मी

मी जपानी गर्व आहे हा मला
देश माझा मीच माझा बांधला
ह्या जगाने पाहिले झुंजार मी
घेतली नाही कधी माघार मी


....रसप....
१४ मार्च २०११

Sunday, March 13, 2011

पीले पत्तों का मौसम जा चुका हैं


मूळ रचना:

पीले पत्तों का मौसम जा चुका हैं
ज़मीन में हर तरफ रंग ही रंग हैं
शोख और दिलकश
उजले आसमान में
सफ़ेद बादलों की टुकडियां तैर रही हैं
वादियों में हरी घास की कालीन बिछ गए हैं
यही सब कुछ था जब हम तुम मिले थे
वोहीं सब कुछ है लेकिन तुम नहीं हो

- जावेद अख्तर


भावानुवाद - १

झाडांची पिवळाई सरून गेली आहे
रंगांची उधळण सुरू झाली आहे
गही-या अन मनमोहक
निळ्या आकाशी -
पांढ-या ढगांचा ताटवा सजला आहे
डोंगरांनी हिरवागार गालीचा पांघरला आहे
असंच होतं सारं जेव्हा तू आली होतीस
तसंच आहे सारं पण........
तू नाहीस..

....रसप....
१३ मार्च २०११


भावानुवाद - २
आता सरूनही गेली बघ पिवळाई
पुन्हा एकवार मन रंगामध्ये न्हाई

रंग पानाफुलांना नि रंग जमिनीला
रंग डोळ्यांमध्ये आणि रंग क्षितिजाला

उजळल्या आकाशाला रंग निळा निळा
श्वेतरंगी मेघ पहा होती कसे गोळा

ऊबदार शाल जशी पांघरावी कुणी
तसे मला वाटे हिरवाईस पाहुनी

हाच साज लेऊन तू आली होतीस ना?
तोच साज तुझी वाट पाहतो पुन्हा….


....रसप....
१५ मार्च २०११
भावानुवाद - ३
बघ झडुनच गेली सर्व पाने जुनी ती
उधळण बहुरंगी जाहली भूवरीही

गडद मृदु छटांची मोहिनी ह्या मनाला
कळप विहरतो तो श्वेतरंगी ढगांचा

हिरवळ तनु ल्याली पर्वतांनी दऱ्यांनी
अलगद हलक्याने ओढली शाल कोणी?

अगतिक मन होते आठवांनी तुझ्या का?
दिवस बघ पुन्हा ते येतसी, तू न ये का?


....रसप....
१७ मार्च २०११
भावानुवाद - ४
पिवळी जुनाट सारी झडलीत जीर्ण पाने
उधळून रंग आता वसुधा हसे नव्याने

बहु रंग मोहवूनी करती मला नशीला
नभिच्या सजावटीला ढग शुभ्र पिंजलेला

हिरवा निसर्ग ऐसा हसतो खुल्या दिलानी
मज आठवे तुझे ते हसणे मधूर राणी

पुनरेकवार आला तव लाडका ऋतू हा
नसशील आज येथे, पण भास खास झाला


....रसप....
१७ मार्च २०११ 
  

तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?

तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?
रोज जरी भांडली तरी तुम्हाला आवडते ना हो?

ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जाता
चकाचक हॉटेलात डीलक्स रूम घेता
नाश्त्यापासून डिनर पर्यंत हाण-हाण हाणता
तरीसुद्धा पोट काही भरत नाही ना हो?
तिच्या स्वयंपाकाची चव येतच नाही ना हो?

काही दिवसांसाठी जेव्हा ती माहेरी जाते
जमेल तेव्हढी तुमची व्यवस्था लावून ठेवते
चार वेळा फोन करून हालहवाल विचारते
रिकाम्या घरात काही केल्या करमत नाही ना हो?
ऑफिस संपल्यावरती घरी जाववत नाही ना हो?

समारंभाला जाण्यासाठी ती भरपूर नटते
तुम्ही तयार होऊन बसता, ती तासभर लावते
पुन्हा पुन्हा विचारते, “मी कशी दिसते?”
कशीसुद्धा असली तरी, सुंदर दिसते ना हो?
तुम्ही “सुंदर” म्हटल्यावरती, गोड लाजते ना हो?

अनेक महिने-दिवसांनंतर तुम्ही मित्रांना भेटता
जुने दिवस आठवून आठवून गप्पांमध्ये रमता
थोड्याच वेळासाठी तुम्ही बायकोला विसरता
तितक्यात येतो फोन आणि तुम्ही पळता ना हो?
मित्र तुम्हाला बायकोचा गुलाम म्हणतात ना हो?

तुमचं पहिलं प्रेम तुम्ही बायकोत पाहता का हो?
तिच्या दोन डोळ्यांमध्ये आरसा दिसतो का हो?
तिचा हात हातात घेताच निवांत होता का हो?
“तिच्याशिवाय तुम्ही नाहीच” असं समजता का हो..??
.
.
तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?
.
तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?



....रसप....
१३ मार्च २०११

दुनिया - २

अमकी दुनिया
तमकी दुनिया
बोले त्याला
ऐकी दुनिया

असली दुनिया
तसली दुनिया
कळली त्याला
कसली दुनिया

उजाड दुनिया
बकाल दुनिया
बघतो त्याला
गचाळ दुनिया

मिजास दुनिया
नशेत दुनिया
समजे त्याला
उधळी दुनिया

उगीच दुनिया
मुकीच दुनिया
तारी त्याला
मारी दुनिया


....रसप....
१२ मार्च २०११

दुनिया - ३

 

विशाल दुनिया
विराट दुनिया
शोधी त्याला
अथांग दुनिया

इथेच दुनिया
अशीच दुनिया
गेला त्याला
भुलवी दुनिया

खडूस दुनिया
कजाग दुनिया
बोचे त्याला
टोचे दुनिया

'रग में' दुनिया
'नस में' दुनिया
भिनली त्याला
घुमवी दुनिया

सोडे दुनिया
मोडे दुनिया
जोडी त्याला
तोडे दुनिया

....रसप....
१३ मार्च २०११

Saturday, March 12, 2011

बसस्टॉप आणि कट्टा (बस स्टॉप वरच्या कविता)

दुनिया - १

फसवी दुनिया
नकली दुनिया
विकली त्याला
झुकली दुनिया

उर्मट दुनिया
कर्मठ दुनिया
पेटे त्याला
जाळी दुनिया

मळकी दुनिया
विटकी दुनिया
पुसतो त्याला
झटकी दुनिया

उपरी दुनिया
कुरूप दुनिया
नटतो त्याला
सुंदर दुनिया

पशुसम दुनिया
अघोर दुनिया
लुटला त्याला
लुटते दुनिया

माझी दुनिया
तुमची दुनिया
ज्याची त्याने
केली दुनिया

....रसप....
१२ मार्च २०११

Tuesday, March 08, 2011

अगतिक पुरुषांचं काय?

जागतिक महिला दिनाचं ठिक आहे हो..
अगतिक पुरुषांचं काय?

म्हणे, महिलांवर अत्याचार होतो..!
च्यायला, हे बरं आहे..
आम्ही केला तो अत्याचार
तुम्ही केला तो चमत्कार?

अहो, कंटाळा आलाय मला ह्या जगण्याचा
रोज घाबरत घरात शिरण्याचा
“आज काय झालं असेल ?
कामवाली आली नसेल?
की शेजारीण भांडली असेल..?
माझ्याशी नीट वागेल ना?
उखडलेली नसेल ना?”

आता होतं कधी कधी माणसाकडून
कामाच्या व्यापात जातो काही विसरून
दिवसभरात फोन केला नाही
म्हणून इतकं का चिडायचं?
"तुझं माझ्यावर प्रेम नाही" म्हणून
डोळ्यात पाणी आणायचं?
फारच अवघड काम आहे
लग्न करणंच हराम आहे

बारा तास ऑफिसात सडल्यानंतर
थोडा विरंगुळा लागतो
कधी एखादी मॅच
कधी ॲक्शन सिनेमा असतो
पण रोज हिची कोणती तरी
फालतू सीरियल असते
ब्रेकमध्येसुद्धा चॅनल बदलायला
मला मनाई असते

ऑफिस मध्ये बॉस बसू देत नाही
घरी आल्यावर ही झोपू देत नाही
जरा डोळा लागायचा अवकाश
कर्कश्श घोरायाला लागते
जागं करून सांगितलं तर–
“मी कुठे घोरते…!!”
डोक्याखालची उशी मी
कानावरती घेतो
मलाच माहीत कसा मी
झोपेत गुदमरतो!!

तरी अजून तुम्हाला
भांडणांचं सांगितलं नाही
कटकट, भुणभुण करण्यासाठी
कारणही लागत नाही..!
"चादरीची घडी केली नाही..
पेपर उचलून ठेवला नाही..
पंखा बंद केला नाही..
दूधवाला आला नाही..(??)
माझ्या भावाने याँव केलं
माझ्या “जीज्जू”ने त्याँव केलं
माझंच असलं नशीब फुटकं
वाट्यास आलंय ध्यान मेलं..!!”

वीकेंडलाच घेतो मी
एखाद-दोन पेग
त्याच्यावरून हिची
आदळआपट.. फेकाफेक..
मोठेमोठे डोळे तिचे
आणखी मोठे करते
माझ्या अख्ख्या खानदानाचा
उगाच उद्धार करते!
तरी मी बिचारा सगळं सहन करतो
प्रत्येक अपमान पचवतो अन् तोंड बंद ठेवतो..

आजकाल मला प्रत्येक पुरुष दीनवाणा दिसतो
'बायको' नावाच्या भुताने पछाडलेला वाटतो !!
आणि तुम्ही म्हणता
महिलांवर अत्याचार होतो..?

च्यायला, हे बरं आहे!!


....रसप....
८ मार्च २०११
(महिला दिन - पुरुष 'दीन')

Monday, March 07, 2011

आशिक़ी

माझे चित्त कुठे कुणा गवसले द्यावे मला आणुनी
होते मीच दिले प्रियेस बहुधा हातावरी ठेवुनी

झाले काय पुढे हताश बसलो खोटे हसू दावतो
प्रेमी खास म्हणे असाच हरतो युद्धातही जिंकुनी

जातो जीव जरी प्रियेस बघता ना होय काही दया
मृत्यूदंड असे इथे प्रियकरा घेतोच तो जाळुनी

सौंदर्यास तिच्या नसेच उपमा ऐशी प्रिया साजिरी
पाही सूर्य तिला नभी अवतरे रातीस तो चोरुनी

सांगा काय गुन्हा असा करियला केली जरी आशिक़ी
नाही एक 'रण्या' असंख्य इथले गेलेत की भाळुनी


....रसप....
७ मार्च २०११
(वृत्त - शार्दूलविक्रीडित)

Saturday, March 05, 2011

आभार मानू किती

सा-यांनीच दिले शुभाशिष मला
आभार मानू किती
लोभाची तुमच्या अशीच वृद्धीही
व्हावी न होवो क्षती

माझ्या शब्दसमुच्चयास कविता
ऐसे तुम्ही मानले
जाती शब्द इथे फुकेच जर का
कोणास ना भावले

येथे मानव मी असा विचरतो
केले न काही 'बरे'
वाचोनी कविता इथेच तुमच्या
आता मला 'मी' कळे

ऐका गूज अता गुणीजन तुम्ही
स्वीकार केले असे
आले दाटुनिया रण्या गहिवरे
आभार मानू कसे?


....रसप....
५ मार्च २०११

Thursday, March 03, 2011

....मी जरासा..!

कुंद होता पश्चिमा ती धुंद झालो मी जरासा
बात होती जी मनाशी गात होतो मी जरासा

का मला बोचून आहे प्रेम मी नाकारलेले
मुक्त होते व्हायचे अन् सुप्त झालो मी जरासा

जा नको थांबूस येथे सोड आता एकट्याला
जाग आली, हातचे हे डाग धूतो मी जरासा

कर्ज झाले आठवांचे आसवांना वाहिले ना
शुष्क डोळ्यांतून आता रक्त देतो मी जरासा

रीघ येथे लागली आलेत काही आपलेसे
जीव देतां वाटली जी कीव होतो मी जरासा

जीत आणि हार येथे क्षुद्र आहे खेळताना
जिंकुनी सारे तरीही त्यक्त होतो मी जरासा

मीच माझा खास आहे ना रण्या आहे कुणीही
खोट सा-यांच्यात आहे घोट घेतो मी जरासा


....रसप....
३ मार्च २०११
Related Posts Plugin for WordPress, Blogger...