Saturday, May 05, 2012

प्रगल्भ विषयाची प्रगल्भ मांडणी - 'काकस्पर्श' Kaksparsh Review

"मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा....."
ह्या मन:स्थितीत अडकलेल्या व्यक्तीचे आंतरिक द्वंद्व, "धर्म की कर्तव्य की भावना की माणुसकी ?" अश्या विचित्र संभ्रमात सापडलेल्या व्यक्तीची मानसिक घालमेल आणि ह्या सगळ्यात एका निरागस, निष्पाप जीवाची होणारी पराकोटीची कुचंबणा - ह्याचं उत्कृष्ट सादरीकरण म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट 'काकस्पर्श'.

स्वातंत्रपूर्व काळातील कोकण. एका गावातील एक सुखवस्तू कुटुंब - "रानडे". आई-वडील अवेळीच वारल्याने लहान भावाचं पालन पोषण करून, स्वत:चा संसार व प्रपंचही अगदी व्यवस्थित पार पाडत असलेले 'हरीदादा रानडे' हे गावातील एक अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व. लहान भाऊ 'महादेव' वकिलीच्या शिक्षणाकरिता मुंबईस असतो. त्याचं लग्न जवळच्या गावातील 'दुर्गा'शी ठरविले जाते. लग्न दिमाखात पार पडते. 'फलशोधना*'ची पूजा होते. पण महादेव मुंबईहून येतो तोच तापाने फणफणून आणि त्याच रात्री त्याचं निधनही होते. पोरवयातच 'दुर्गा'ला (लग्नानंतरची 'उमा') वैधव्य येते. आणि इथून पुढे सुरू होते एक अनाकलनीय भावनिक द्वंद्व. स्वत:शी, दुसऱ्यांशी..
हरीदादा उमाला माहेरी पाठविण्यास नकार देतात, उमा स्वत:सुद्धा त्यासाठी तयार होते. ते तिचं दुसरं लग्नही करून देत नाहीत व तिला सर्व रूढी परंपरा तोडून 'सोवळी' न करता (मुंडण न करता) घरात इतर कुटुंबसदस्यांप्रमाणेच वागवतात. तिच्याविषयी त्यांच्या व त्यांच्याविषयी तिच्या भावना नक्की काय आहेत? हे कळूनसुद्धा स्वत: त्या दोघांसह कुणालाच काही करता येत नसतं. हा गुंता वाढतच जातो. सामजिक संघर्षालाही तोंड द्यावं लागतं. आपली माणसं तुटतात. पण हरीदादा आपल्या भूमिकेवरून ढळत नाहीत. प्रसंगी ती आडमुठेपणाचीही वाटते. 
चित्रपट उत्तरार्धात येतो तोपर्यंत उमा व हरीदादा ह्यांच्यात "प्लॅटनिक लव्ह" (शारीरिक आकर्षणविरहीत पवित्र प्रेम) आहे, ह्याची खात्री पटते. पण अजून 'काही तरी' आहे, असंही जाणवत राहातं. कारण घरचे सदस्य उघडपणे त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत असतानाही हरीदादा आपल्या विरक्त भूमिकेवर ठाम असतात. ह्याचा परिणाम अखेरीस उमावर व्हायचा तसाच होतो. पोरवयात वैधव्य आलेलं, ज्यावर मनापासून प्रेम आहे तो माणूस जाणून-बुजून वाळीत टाकतोय, शारीरिक सुखाची एक विचित्र ओढ आहे/ औत्सुत्क्य आहे अशी ही उमा "माझे वर्तमान काय आहे आणि भविष्य काय?" ह्या विचारांनी पोखरून जाते. वेडगळही होते. आणि सरतेशेवटी एका वेगळ्या वळणावर येऊन आयुष्याची काटेरी वाट संपते.

कहाणी खूप धीम्या गतीने पुढे सरकतेय असं अनेकदा वाटतं, जे बहुतांशी खरंही आहे; पण कदाचित विषयाच्या गांभीर्यास पाहता जरा धीमी गती आवश्यकही असावी. 

हरीदादांच्या भूमिकेतील सचिन खेडेकर इतका उच्च दर्ज्याचा अभिनय करतो की कौतुक करावं तेव्हढं कमीच! तरूण वयातील 'उमा' साकारताना प्रिया बापट अविस्मरणीय काम करते आणि 'उपाध्याय' च्या नकारात्मक भूमिकेतील वैभव मांगले असा काही अभिनय करतो की त्याचा खरोखरच राग यावा. तसं पाहता सर्वच कलाकारांनी अप्रतिम अदाकारी केली आहे. पोरवयातील दुर्गा/ उमा साकारणारी केतकी माटेगांवकर मात्र खूपच कमी पडते. अनेक ठिकाणी तिचे भाव नीट समजतच नाहीत. ती कुठे पाहातेय तेही समजत नाही. मुंडण करण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती होत असताना हरीदादा तिला वाचवतात, तेव्हा ती हसते! ते तर अगदीच पटत नाही.
संगीत फारसं नाही, पण सुमधुर आहे. गीतं फारशी नाहीत, पण अर्थपूर्ण आहेत. 

एक अतिशय प्रगल्भ विषय अतिशय प्रगल्भपणे हाताळल्याबद्दल 'काकस्पर्श' टीमचे कौतुक करायलाच हवं. असा विषय हाताळताना बहुतेकदा अशी चित्रणं केली जातात की सिनेमास "वरिष्ठ" प्रमाणपत्र मिळते. पण प्रगल्भ विषयाची प्रगल्भ मांडणी करतानाही सभ्यतेच्या चौकटीत राहून सिनेमा आवश्यक परिणाम साधतो. काही दृश्यांमध्ये अंगावरही येतो. ह्याला म्हणतात 'मराठी चित्रपट' असंच म्हणावं लागतं, कारण हा विषय हिंदीत आला असता तर नक्कीच 'वरिष्ठ' झाला असता.

एकंदरीत, एकदा तरी पाहावाच असाच हा चित्रपट आहे.
मी (अर्धा गुण धीम्या गतीसाठी कापून) ५ पैकी ३.५ नक्कीच देईन.

=======================================

फलशोधन* = पूर्वीच्या काळी मुलीचं लग्न लहान वयात होत असे. मुलगी वयात येईपर्यंत मुलास तिच्याजवळ जाण्यास पाबंदी असे. मुलीला जेव्हा पहिल्यांदा वयात आल्याची जाणीव होई (Menstruation Cycle ची सुरुवात होई) तेव्हा 'फलशोधना'ची यथासांग पूजा केली जात असे व त्यानंतर खऱ्या अर्थाने मुलगा व मुलगी एकत्र येत असत.


1 comment:

  1. ही कथा 'रानडे' कुटुंबाची नसून 'दामले' कुटुंबाची आहे.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...