ह्या तीराचे त्या तीराशी नाते समजत नाही
दूर राहती तरी बंध का कधीच उसवत नाही ?
तसेच काहीसे माझे अन तुझे आगळे नाते
परस्परांचे नसतानाही स्वतंत्र करवत नाही
ह्या मेघाच्या अन धरतीच्या मनात काय असावे ?
ह्याने व्हावे रिते-रिते अन तिला चिंब भिजवावे !
तसेच काहीसे माझेही तुला आठवुन झुरणे
तुझी आसवे मी ढाळावी तुझी वेदना व्हावे
ओढ समुद्राची सरितेला कशास ही लागावी ?
कडे-कपारी ओलांडुन वेडावुन धावत यावी
तसेच काहीसे तू माझ्यासाठी चंचल होणे
रोज मला पाहून मनातुन नवी उभारी घ्यावी
संध्येच्या कातर सूर्याला क्षितिजाने सावरणे
एक क्षणाची संगत असते तरी किती मोहवणे !
तसेच काहीसे अपुले हे नजरबंद जपतो मी
पुन्हा पुन्हा अन त्याच क्षणाला फिरुन मनाशी जगणे..!तुझ्या सोबतीने जगण्याचे स्वप्न पाहिले नव्हते
तुझ्याविना पण कुणीच इतके कधी भावले नव्हते
ह्या नात्याला कशास द्यावे नाव उगा काहीही ?
ह्या नात्याने बांध मनाचे कधी तोडले नव्हते..
....रसप....
२८ मे २०१२
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!