कविता... कविता... कविता...
अहो असतं तरी काय?
कुणी म्हणालं, "दुधावरची साय!"
पण कोणत्या दुधावरची ?
फ्रीजमध्ये गोठलेल्या
की तापवून निवलेल्या?
कोणती साय?
हळुवार फुंकरीने सरकणारी?
की बोट घालून दुमडायला लागणारी?
फुग्यासारखी फुलणारी?
की थप्पीसारखी जमणारी?
अहो.. सायीसारखी साय!
विरजण लागलं पाहिजे
खोटं खोटंच लिहा की
यमक जुळलं पाहिजे !
मग मीही बसलो ठरवून
की काढायचंच काही तरी लिहून
यमक-बिमक जुळवून
इथून-तिथून उचलून...
कुसुमाग्रजांच्या कवितेतेतून घेतली 'अनंत आशा'
केशवसुतांची चोरली जराशी वजनदार भाषा
उगाच लिहिलं काही-बाही, जे कुणालाच कळलं नाही
वरून म्हटलं - "का बरं? ग्रेसांनी लिहिलं नाही?"
'र' ला 'र' आणि 'ट' ला 'ट' जोडला
आणि पाडगांवकरी सहजतेचा आव आणला
गोंडस "खळखळ-झुळझुळ" लिहिलं
आणि बालकवींचा साज मानला
वृत्तांच्या साच्यातून काढल्या दोन-दोन ओळी
आणि माधवरावांच्या पायी वाहिल्या
रदीफांच्या शेपट्या जोडून नाचवले काफिये
आणि भटांच्या गोडव्या गायल्या !
खंडीभर लिहिलं.. लिहीतच राहिलो
कवितांचा रतीब घालतच राहिलो
वाह-वाह करणारे भाट बरेच भेटले
पोकळ स्तुतीने हुरळतच राहिलो
आणि एक दिवस आलं काही तरी उफाळून..
कुठून तरी.. आतून...
पराकोटीची चलबिचल झाली
काही ठोके चुकले
मनातल्या मनात थोड्या वेळासाठी
डोळे मिटून घेतले
ती पहिली कविता आली
काळजावरचा ओरखडा बनून
यमक स्वत:च जुळले होते..
शब्द वृत्तात खेळले होते
तिचा साज होता वेगळाच..
अन रुबाब होता आगळाच..
एक तो दिवस आहे आणि एक आजचा..
दुधावरती साय आपसूकच जमते
माझ्या हातून कविता स्वत:लाच लिहिते..
माझ्या हातून कविता स्वत:लाच लिहिते....!
....रसप....
८ मे २०१२
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!