तुजला बघता सुचली कविता
हसता हसता सुचली कविता
रुसवे-फुगवे सगळे हरले
नशिबास अता सुचली कविता
बहरून मनास म्हणे बगिचा
सुमने फुलता सुचली कविता
बघतेस कशी झुरवून उगा
जळुनी उरता सुचली कविता
मज जाणवते दुखणे सरले
जखमा जपता सुचली कविता
विसरून कथा सगळीच जुनी
मनची लिहिता सुचली कविता
चल आज जरा क्षितिजास बघू
नभ ओसरता सुचली कविता
जगणे उसने नव्हतेच 'जितू'
मरता-मरता सुचली कविता
....रसप....
८ मे २०११
वृत्त 'तोटक' - ललगा ललगा ललगा ललगा
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!