ना कुणी ऐकायलाही मी फुका रडणे कशाला?
पेटला काळोख ज्योतीने तिथे जळणे कशाला?
हात द्यावा सागराने अंबराला विद्ध होता
आसवांच्या उष्णडोही भावना बुडणे कशाला?
श्वास माझे मोजुनी मी वेळ माझा घालवीतो
मोजदादीला कुणी ह्या मागुनी करणे कशाला?
स्वस्त झाली वेदना लिंपून सोनेरी सुखांना
मी किती चैनीत आहे जाणुनी हसणे कशाला?
भक्त आहे कोणता येथे खरा नाही कुणीही
निर्मिले तू विश्व आता 'आपले' म्हणणे कशाला?
सोबतीची आस येथे ठेवणेही फोल 'जीतू'
तू खुणांनी पावलांच्या वाट ही भरणे कशाला?
....रसप....
३० मे २०११
.
"मराठी कविता समूहा"च्या "अशी जगावी गझल - भाग ४" ह्या उपक्रमासाठी लिहिलेली गझल.
.
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!