"मराठी कविता समूहा"च्या "लिहा प्रसंगावर गीत" ह्या उपक्रमासाठी लिहिलेलं गीत..
आई तुझ्याचसाठी बेभान झुंजलो मी
नाही पुरे परंतु, श्वासांत श्वास नाही
आई तुझ्यामुळे ह्या बाहूंत जोर होता
विझतोय प्राण माझा, पण तू समोर नाही
छातीवरी तुझ्या तो रोवून पाय होता
खवळून रक्त आले आवेश कोण होता
डोळ्यामध्ये तिरंगा, रक्तात तूच आई
बेहोष होऊनी मी केली अशी चढाई
शत्रूस ध्वस्त केले, ना मागमूस काही
नाही पुरे परंतु, श्वासांत श्वास नाही
तू सांग नातवाला माझीच वीरगाथा
संसार सोडला मी, तू सांध त्यास आता
होती अनेक स्वप्ने, ती राहिली मनाशी
चुकला हिशोब माझा विरल्या हवेत गाठी
मी चाललो, निघालो.. परतून येत नाही
नाही पुरे परंतु, श्वासांत श्वास नाही
भेदून ऊर माझा गेला न वार मागे
लढलो, अजिंक्य झालो, अभिमान आज वाटे
क्षण एक थांब काळा, आईस पाहू दे ना
पुत्रास आपल्या तू आई कुशीत घे ना
कर्जास फेडले मी, बाकी अजून काही
नाही पुरे परंतु, श्वासांत श्वास नाही
....रसप....
१८ मे २०११
Khoop chhaan..
ReplyDelete