तू गेलीस..
जाणार.. माहित होतं पण तरी -
मनातलं आभाळ निरभ्र झालं..
स्वच्छ.. फटफटीत झालं
आणि कुठल्याश्या कोप-यातून त्या रखरखीत आभाळाच्या
मला अलगद उचलून घेऊन जाण्यासाठी
रंगीबेरंगी आठवांचे धावून आले थवे
त्यांनी हात पुढे करण्याआधीच,
मी स्वत:च उडू लागलो त्यांच्या सवे
त्या पाखरांनी मला दाखवलं बरंच काही
जे मी कधी पाहिलंच नव्हतं
पाहूनही समजलंच नव्हतं
मी पाहिल्या तुझ्या कळा
मरणाच्या वेदना.. माझ्या जन्मासाठी
मी जागवलेल्या कित्येक राती
आणि तरीही तुझ्या प्रेमाला
आलेली अमर्याद भरती...
माझा पहिला शब्द... माझं पहिलं पाऊल
आणि तुझ्या भरल्या डोळ्यांमध्ये
माझ्या भविष्याची चाहूल
फुटलेलं ढोपर घेऊन माझं कळवळणं
झोंबणारं औषध लावताना तूसुद्धा रडणं
शाळेत मस्ती केली म्हणून मला शिक्षा केलीस
माझ्याबरोबर तूसुद्धा कशी उपाशी राहिलीस
नंतर जगासाठी मी मोठा झालो
पण तुझ्यासाठी मात्र नेहमी
तुझा सानुलाच राहिलो..
तू पाहिलेल्या स्वप्नांना मातीमोल केलं
तुझ्या सगळ्या अपेक्षांना अगदी फोल केलं
तरीसुद्धा माझ्यापाठी खंबीर उभी राहिलीस
माझ्या छोट्या छोट्या यशामध्ये धन्यता मानलीस
आज तू गेलीस..
जाणार. माहित होतं
तरी मनातलं आभाळ निरभ्र झालं..
त्या रखरखीत आभाळात आता उडताहेत आठवांचे थवे
मीही भरकटलोय उडता उडता त्यांच्या सवे...
.... रसप....
२५ मे २०११
"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता" ह्या उपक्रमासाठी लिहिलेली कविता