शब्द-सुरांचे नाते जुळले मी तुमच्यातुन जाता जाता
अजुन शिदोरी नको कोणती मला जगातुन जाता जाता
माझे काही नव्हते येथे तुम्हाजवळचे दिले तुम्हाला
नको मला अश्रूंची सुमने ह्या बगिच्यातुन जाता जाता
विशाल अंबर अथांग सागर अनंत धरणी तुमच्यासाठी
नको मला कुठलीही चौकट मी माझ्यातुन जाता जाता
माझी वसने विरली तेव्हा नात्यांचीही वीण उसवली
नको मला बंधन स्मरणांचे अनुबंधातुन जाता जाता
ह्या जगण्याला आकाशाचे प्रेम दिले मी स्वरांजलीतुन
मरणालाही हसवुन जाइन मी जगण्यातुन जाता जाता
....रसप....
३० एप्रिल २०१२
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!