ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'
पण मला जराही समजत नाय!
मी दिसतो काळा जरा बावळा
शहरी पोरांहून वेगळा
चष्मे, गॉगल, उंची कपडे
स्मार्टफोन अन गळ्यात टाय
मी मऱ्हाटमोळा साधा ब्वाय
ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'
पण मला जराही समजत नाय!
शेतावर माझ्या मी रमतो
मित्रांशी गल्लाही जमतो
उगाच आलो शहराला ह्या
धावपळीने मी दमतो
तिला पाहुनी फक्त एकदा
दूर उडूनी थकवा जाय
पण....
ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'
अन मला जराही समजत नाय!
मी पोरींशी ना कधी बोललो
'हलो-हाय' मी नुकते शिकलो
नाव सांगतो कसेबसे
ती माझ्यावर जोरात हसे
प्रेमाची भाषा 'ग्लोबल' नाय
ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'
पण मला जराही समजत नाय!
कपास फुलते गालावरती
डोळ्यामधुनी कालवे झरती
चवळीची ती शेंग कोवळी
कधी वाटते तिख्खट मिरची
खळखळणारी मंजुळ वाणी
ऐकून मी तर गुंगून जाय
माझ्या मनचे बोलू काय?
मला जराही समजत नाय!
ती इंग्लिश बोलते 'व्हॉट' अन 'व्हाय'!
....रसप....
८ एप्रिल २०१२
अप्रतिम !! गावातून शहरात आलेल्या मुलांची दुखरी नस बरोब्बर पकडलीय ..
ReplyDelete