Thursday, April 26, 2012

जीवना, वैरी न तू, नाही सखाही


ना कधी होता तुझा पुळका मलाही
जीवना, वैरी न तू, नाही सखाही

नेहमी माझे मुखवटे बदलतो मी
आठवे ना चेहरा मज कालचाही

कैक मी केले गुन्हे, ना सिद्ध झाले
वाटते, माझीच मी द्यावी गवाही

का, कसा बरबाद झालो, काय सांगू?
आजही प्रेमात माझ्या खोट नाही

मंदिरासम मानले मी घर प्रियेचे
आज कळले देव गाभाऱ्यात नाही..

सांगती इतिहास सोन्याच्या युगाचा
चाड नाही वर्तमानाची जराही !

पेटला वणवा तरी ना पेटलो मी
अन कटाक्षाने तिच्या का होय लाही ?


....रसप....
२६ एप्रिल २०१२

1 comment:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...