आपल्या छबीसही न एकनिष्ठ माणसे
आरश्यासमोर वाटतात शिष्ट माणसे
आयता मिळेल तो न सोडती छदामही
ओरबाडणेच जाणतात भ्रष्ट माणसे
सांगती जनांस की "मला पहा, फुले वहा!"
देव जाहला कनिष्ठ अन वरिष्ठ माणसे !
वित्त साठवूनही नसे निवांत चित्त का ?
आपल्या घरात वाटती भ्रमिष्ट माणसे..
आजच्या सुखात दु:ख घोळतात कालचे
जीवनास आपल्या करून क्लिष्ट माणसे
जंगलात कायदा असे तसाच पाळती
राहिलीत फक्त श्वापदेच, नष्ट माणसे
जोडशील तू 'जितू' कितीक मित्र-सोयरे
सोडती चितेपर्यंत ती 'विशिष्ट' माणसे
....रसप....
१० एप्रिल २०१२
he kavita sarvarthane samkaalin ahe...... ! thank you so much for this one
ReplyDelete