"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ८९ मध्ये माझा सहभाग.. (एक हलकं फुलकं 'सुनीत' लिहिण्याचा प्रयत्न आहे..)
होते रोज सुरू पहाटसमयी गर्दी इथे धावती
सारे शांतपणे कसे समजुनी वेगास त्या पाळती ?
कंटाळा करती कधी न बसती काट्यासवे चालती
पाहूनी तुज वाटले गजब ना ही मुंबईची गती ?
जागेला धरण्यास लोकलमधे घेती उड्या धावुनी
हॉटेलात कधी पहा बसुनिया खाती भुका मारुनी
जो-तो येउन हो अधीर बनुनी होतो उभा मागुनी
घाई ही कसली असे? कळ नसे, थांबावया जाणुनी
घेणे श्वास जरा नसेच जमणे ह्या धावणाऱ्या जगा
नाही मंजुरही कुणास दमणे, रेंगाळणेही उगा
विश्रांती नच लाभते क्षणभरी आकाशवेड्या ढगा
त्याला ठाउक एक केवळ असे होणे जळाचा फुगा !
तूही आजच जुंपलास झटण्या गाड्यास ऐसा खरा
झाला थोर जरी 'मनी*' कमवुनी, तू घे विसावा जरा........!
....रसप....
१ एप्रिल २०१२
शार्दूलविक्रीडीत - गागागा ललगा लगा लललगा गागा लगागालगा
मनी* = Money, पैसा
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!